नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
*हतबल भारतीयांचे इंडियातुन पलायन* - अनिल घनवट.
१९७२ च्या दुष्काळा नंतर ग्रामिण भागातुन शहरांकडे स्थलांतरीत होणार्या शेतकर्यांच्या लोंढ्याच्या करुण कथा, कादंबर्या प्रकाशित झाल्या होत्या. त्या वाचताना ह्यदयाला पिळ पडायचा. अन्ना पाण्या वाचुन शेकडो मैलाचा प्रवास करत शेतकरी कुटुंबे मुंबई पुण्यासारखी शहरे गाठत व जगण्यासाठी काम शोधण्याची धडपडीला लागत.
साडे चार दशका नंतर हा प्रवाह उलटा वाहताना दिसत आहे. भरधाव ट्रकच्या मागील दोरांना लटकुन शहराच्या बाहेर पडणार्या दोन तरुणांचा व्हिडिअो व्हायरल झाला. त्या नंतर कंटेनर मध्ये, दुधाच्या टॅंकर मध्ये, खुल्या ट्रकमध्ये ताडपत्रीखाली लपुन, बसच्या टपावर बसुन जीव धोक्यात घालुन गावाकडे प्रवास करताना लोक पोलिसांनी पकडले.
आता सर्व मार्ग बंद झाल्या नंतर लोकांनी पायीच गाव गाठायचा निर्णय घेतला. ठाण्यातुन राजस्थान!! दिल्लीतुन बिहार!! हजारो मैलाचा प्रवास पायी करण्याचा निश्चय करुन लोक आपल्या गावाकडे निघाले होते. जवळ अतिशय कमी किंवा पैसे नाहीच. रसत्यात सर्व हॉटेल बंद. पाण्याची बाटली सुद्धा मिळण्याची सोय नाही. डोक्यावर, पाठीवर जे काही सामान घेता येइल ते घेतलेले. लहान मुले कडेवर, काही रडत कढत पायी चालत निघालेले. केव्हा कसे पोहिचू याचे काही नक्की नाही. पोहोचू की नाही हे ही सांगता येत नाही. जिथे ते काम करत होते त्या ठेकेदारांनी कामाचे पैसे सुद्धा दिले नाहीत. मग इथे राहुन काय खायचे? कसे जगायचे? गावी गेलो तर शिळी भाकरी चटणी तरी मिळेल असे हे मजुर चालता चालता सांगत होते.
मुंबई जवळ रस्त्याने चालणार्या लोकांना ट्रकने चिरडले. दुचाकीवर जाणार्या कुटुंबाचा अपघात होउन मयत झाल्याच्या अनेक बातम्या पहायला मिळत आहेत. त्यात पोलिसांची अडमुठ दंडेलशाही. आमच्या श्रीगोंदा तालुक्यातील एक तरुण अॅमब्युलंसचा चालक आहे. मुंबईहुन एक पेशंट घेउन तो श्रीगोंद्याला येत होता. सोबत त्याचे वडील पण होते. शिक्रापुर जवळ त्यांना अडवले व तुम्ही प्रवासी घेऊन चाललात असा आरोप करुन बेदम मारहाण करण्यात आली. त्यात त्या चालकाच्या वडिलांचा मृत्यू झाला.
उत्तर भारतात हजारो मजुरांच्या रांगा प्रत्येक महा मार्गावर दिसत आहेत. त्यांच्या खाण्या पिण्याची सोय तर सोडाच पण त्यांचा छळ पोलिसांकडुन होत आहे. बिहार कडे निघालेल्या एका तरुणाने प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की " हे इंग्रजांपेक्षा ही वाईट सरकार आहे. पदेशातल्या भारतियांना घेउन येण्यासाठी विमाने पाठवता व आम्हाला गावाकडे जाण्यासाठी बसची सुद्धा सोय करू शकत नाही का?"
शरद जोशींनी सांगितलेला इंडिया भारत इथे स्पष्ट दिसतो. सर्व सुखसोयी इंडियावाल्यांसाठी. भारतियांनी जमले तर जगावे नाहीतर मरावे. उत्तर प्रदेशच्या एका आमदार महाशयांनी तर "या लोकांना गोळ्या घातल्या पाहिजेत" अशी भाषा केली आहे.
गावकडे येणार्या या स्थलांतरितांना गावी जाण्याचे कारण विचारले कोणीही कोरोनाच्या भितीने गावी जात असल्याचे सांगितले नाही. इथे आता काम नाही, कधी सुरु होइल सांगता येत नाही, मग इथे राहुन खायचे काय हा प्रश्न सर्वांपुढे होता म्हणुन शहरांकडुन गावी जाणार्याकडे होता. स्वातंत्र्या नंतरच्या प्रत्येक दुष्काळानंतर शहरांकडे जाणार्यां पुढे हाच प्रश्न होता,इथे राहिले तर खायचे काय? शेवटी प्रश्न पोटाचा आहे.
भारतातील या भुमीपुत्रांनी मुंबईत पोट भरण्याचा मार्ग शोधला. भारतात सत्तेवर आलेली सर्व पक्षांची सरकारे हे लोंढे रोकण्यास असमर्थ ठरली. ज्याच्या बापाच्या धंद्यात एकादाण्याचे हजार दाणे होतात तो पोट भरण्यासाठी शहरांतील फुटपाथवर, झोपडपट्टीत दिवस काढतो याचे कारण, त्याच्या बापाची झालेली लूट. शेतकरी शेतीत पराभुत होउन शहरात गेला अन् आज पुन्हा पराभुत होउन गाव गाठतो आहे. आपल्याच गावात "निर्वासित" म्हणुन जगण्याची वेळ त्याच्यावर आली आहे.
कोरोनाचा प्रसार रोकण्यासाठी काही उपाय करणे गरजेचे आहे. लोकांना घरात राहणे पण आवश्यक आहे पण ज्यांना ते शक्य नाही त्यांचा विचार आगोदर करणे गरजेचे होते. रेल्वे व बस बंद करण्या आगोदर किमान आठ दिवसाचा अवधी देउन ज्यांना गावी जायचे आहे त्यांच्यासाठी ज्यादा गाड्यांची व्यवस्था करुन घरी जाऊ द्यायला हवे होते. आपल्या सरकारने उलट गाड्या कमी केल्या मुळे तुफान गर्दी झाली व नंतर पुर्ण बंद केल्यामुळे लोकांना अन्य मार्गाने घर गाठावे लागले.
या गर्दीमध्ये काही कोरोनाग्रस्त असतील तर रोगाचा प्रसार अधिक होणार यात शंका नाही. भारत सरकार कोरोनाच्या नियोजनात सपशेल अपयशी ठरले आहे. हजारो लोक तहान भुकेने व्याकुळ, उन्हातान्हात पायी गावाकडचा रस्ता कापत असताना देशाचा एक मंत्री आपल्या घराच्या सुसज्ज दिवानखाण्यात, भल्या मोठ्या टिव्ही संचापुढे बसुन रामायण पाहण्याचा आनंद घेतानाचे फोटो शेआर करत असेल तर एकच अख्याईका आठवते. Rome was burning and Nero was fidlling. ( रोम जळत होते व न्युरो फिडल वाजवत होता.)
२८/३/२०२०
अनिल घनवट
अध्यक्ष, शेतकरी संघटना.