नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
तहान
निरभ्र आकाशात आग ओकणारा सूर्य अंगाची लाही लाही करत पश्चिमेला झुकला होता. वाहणारा उष्ण वारा आसमंत भाजून टाकत धुडगूस घालत होता. भेगाळलेल्या काळ्या शेताच्या बांधावरून गजा आणि बाजा दोघे भाऊ शेताला लागून असलेल्या निमसरकारी गेस्ट हाऊसच्या दिशेने झपाझप चालले होते . शेतातली हिरवी ज्वारीची रोपे सुकून अर्धवट पिवळी पडलेली होती . कुठे कुठे रोपांवर लटकणारी मोतीदार कणसं पाण्याच्या अभावी मान टाकून पडली होती .परतीच्या पावसाने दडी मारून बरेच आठवडे लोटले होते. उभ्या पिकाला पाणी पाजून पाजून शेतातील विहीर आटून कोरडी ठणठणीत पडली होती. या वर्षी बियाणांसाठी घेतलेलं कर्ज मानेवर लटकणा-या तलवारीसारखं खुपत होतं. परतफेड कशी होणार याची घोर चिंता लागली होती. कोसकोस लांब अंतरावरून नुसतं पिण्याचं पाणी आणायला लागायचं. हातातोंडाशी आलेली पिकं सुकू नयेत यासाठी पाण्याचं काय करावं तेच समजत नव्हतं.
सकाळीच बाजाची बायको दूरच्या आडावरून चार कळशा पाणी घेऊन आली, ती सांगायला लागली की शेताजवळच्या गेस्टहाऊसवर खादी कपडेधारी लोकांची बरीच गर्दी जमली होती. तेव्हा रिकामटेकडा बसलेला बाजा चौकशी करायला गेला. कळलं की जिल्ह्याचा हा भाग दुष्काळी म्हणून घोषित करावा की नाही याच्या पाहणीसाठी आमदार, खासदार , जिल्हाधिकाऱ्यांपासून मोठेमोठे सरकारी अधिकारी येणार होते.पाहणीनंतर गेस्टहाऊसमध्ये बैठक होणार होती. आपापल्या गावाची वर्णी दुष्काळग्रस्त यादीत लागावी म्हणून गावोगावीचे सरपंच , पंचायतसदस्य गेस्टहाऊसच्या आवारात केव्हाचं ठाण मांडून बसले होते . अधिकारीवर्गाच्या भोजनाच्या सोयीसाठी गेस्टहाऊसवर लांबून पाण्याचा टँकर आणला होता . दिवसभर गाड्यांची आणि माणसांची येजा चालूच होती. सरकारकडून काय काय सवलती उकळता येतील याची चर्चा खादीधारी मंडळींमध्ये चालली होती..उन्हं कलायला लागली. तेव्हा अधिका-यांची पाहणी केल्यानंतरची निरीक्षण बैठक संपली,तशा सरकारी गाड्या परतू लागल्या . लोकप्रतिनिधी पण परतले. जमलेली गर्दी ओसरलेली पाहून बाजा, गजा दोघे भाऊ आपल्या शेताचे बांध ओलांडून गेस्टहाऊसच्या भिंतीला वळसा घालून मुख्य फाटकापाशी येऊन थडकले . गेटवरचा सुरक्षारक्षक पांडू त्यांच्या खास परिचयाचा होता. सुगीच्या काळात बाजागजाच्या वडिलोपार्जित शेतावर हुरडा पार्टी झाली की त्याचं निमंत्रण पांडूला नेहेमीच मिळत असे,
त्या दोघांना येताना बघताच गेटवरच्या बंदिस्त चौकीतून पांडू बाहेर आला.
“पांडू, सक़ाळला पाण्याचा टँकर आलता, तो खाली झाला का बा ?”बाजाने विचारले .
“ पाचसे लिटरचा लहाना टँकर आलता .तो टाकीत कवाच रिकामा झाला. दुपारला सुदिक परतून गेला .” पांडू म्हणाला. “ टाकीत उरलं असंल तर काही बादल्या पाणी मिळंल का?” बाजाने विचारलं . "शेतातली पिकं पाण्याबिगर सुकायला आलीत .ईहिरीनं कवाच तळ गाठला. बघ. थोडंसं पाणी मिळालं तर पिकं पुन्ना टवटवीत व्हतील. पुढेमागे परतीचा पाऊस येईस्तोवर तग धरून राहतील. “ गजाने कळवळून सांगितलं .
“टाकीमंदी फारसं पाणी उरलं नसंल. आज वीसेकजण जेवायला व्हते .टँकर आला म्हणल्यावर काही तलाठी लोकांनीभी गेस्टहाऊसमंधी अंघोळी उरकून घेतल्या. लै येळा चाय बनिवला ! लै पाणी खर्ची लागलं. त्यात दोन लांबचे पत्रकार रात्री गेस्टहाऊसमंदी राहणार हायेत . त्यांच्यासाठी पाणी राखून ठिवायलाच हवं.” पांडूने उत्तर दिलं. त्याचातरी नाईलाज झाला होता . बाजाच्या डोक्यात सुपीक कल्पना आली .
“अरं मला शेतातल्या रोपांसाठी पाणी पायजे, टँकरचं ताजं पाणी नसलं तरी काय हरकत नाय. सांडपाण्याच्या टाकीत जमा झालेलं पाणी पण चालंल . सांडपाण्याची टाकी कुठेय तेवढं दाखीव. त्यातून पाणी उचलून घेऊ, आठवडाभरासाठी तरी पिकांना ओलावा लाभंल. माना मुरगळून पडलेली कणसं उभारी धरतील. बाकी पुढं ईश्वराची मर्जी.“बाजा म्हणाला.
बाजाचं बोलणं ऐकून पांडू दोघांना गेस्टहाऊसच्या मागच्या भागात घेऊन आला . बाजाच्या शेताला लागून असलेल्या भिंतीला चिकटून जमिनीच्या वरून आत सांडपाण्यासाठी टाकी बनवली होती .त्यात गेस्टहाऊसच्या सहाही खोल्यांमधून, स्वयंपाकघर अन् भोजनघरातून आलेलं सांडपाणी पाईपानं सोडलं होतं . त्या लांबलचक टाकीवर चढून काँक्रीटचं जड झाकण बाजा गजा दोघांनी मिळून उघडलं. पण आत मिट्ट काळोख .पांडूनं टॉर्च मारला. टाकीचे दोन भाग दिसले. गेस्टहाऊसमधून सांडपाणी वाहून आणणा-या पाईपमधून पाण्याच्या संतत धारा टाकीच्या उजवीकडच्या कप्प्यात पडताना होणारा खळखळता आवाज लक्ष वेधत होता . उजवीकडच्या कप्प्यात अर्ध्याहून अधिक टाकी पाण्याने भरलेली होती. टाकीच्या मधोमध उभारलेल्या उंचच उंच बांधलेल्या वाळूखडीच्या फिल्टरमधून झिरपून , डाव्या बाजूच्या कप्प्यामध्ये थेंबथेंब पाणी टपकत होतं. तिथल्या साठलेल्या पाण्याची पातळी तशी कमी होती, त्यामुळे झिरपून डावीकडे आलेल्या पाण्याच्या पृष्ठभागावर पसरलेला पांढरा फेनयुक्त द्रव अंधुक प्रकाशात चमकत होता. दोघांना प्रश्न पडला की हे पाणी शेतात न्यायचं कसं? सांडपाण्याच्या टाकीच्या डाव्या कप्प्यामधून बाहेर पडलेला पाईप गेस्टहाऊसच्या तटभिंतीच्या बाहेर काढला होता. शेताच्याकडेला खाली कुठेतरी सांडपाणी वाहून नेणारं भुयारी गटार असावं . भिंतीच्या बाहेर हा पाईप तोडला तर हे सारे पाणी खाली आपल्या शेतात पसरून जमीन ओलावेल अशा विचाराने दोघं गेटच्या बाहेर पडून वळसा घालून भिंतीपलिकडच्या आपल्या शेतात आले .हातातल्या दगडाने त्यांनी चक्क तटभिंतीतून बाहेर पडलेल्या सिमेंटच्या पाईपचा मोठा टवका उडवला .पण त्यातून पाण्याचा टिपूससुध्दा टपकला नाही.जवळच्या झाडाची लांब फांदी तोडून आणली आणि तुटलेल्या पाईपातून आत घुसवून आतली घाण साफ करायचा प्रयत्न केला,पण छे! पाईपच्या टाकीतल्या तोंडाशी कुठेतरी तुंबड साठून पाण्याचा प्रवाह बंद झाला होता. बरेच दिवस गेस्टहाऊसमघ्ये पाहुणे आले नसल्याने टॅंकरचं पाणी आलं नसावं, मग सांडपाणी कसं जमा होणार ? त्यात मग घाण, पालापाचोळा तुंबला असावा. पाणी कुठं तुंबलं हे बघण्यासाठी बाजा आणि गजा पुन्हा गेस्टहाऊसच्या भिंतीला वळसा घालून गेटमधून आत आले .पांडू तिथेच उभा होता. बाजा पांडूला म्हणाला ,”पांडू, पायपातून टाकीत साठलेलं पाणी भाईर येईना बा. डावीकडचा टाकीचा भाग तर पाण्यानं अर्धामुर्धा भरलाय. मंग पाणी बाहेर का येईना बघायला हवं.” त्यावर पांडूनं टाकीच्या झाकण काढलेल्या तोंडातून आत डोकावत म्हटलं ,” पाणी जिथून टाकीतून भाईर निघतंय तिथं तुंबड साठली असंल .आपल्याला एखादी लांब तार मिळाली तर वरूनच तुंबड काढता येते का बघू .निदान पाण्याचा अडलेला रस्ता तरी मोकळा करता येईल.”
असं बोलून पांडू गेस्टहाऊसमधली अडगळीची खोली धुंडाळायला गेला.. बाजानं डोकं चालवत म्हटलं, “ जर तुंबड नाय निघली तर घरला जाऊन दोन-तीन बादल्या आणि दोरखंडाचं वेटोळं मागवून घेऊ आणि बादलीला दोरखंड लावून पाणी टाकीतून भाईर खेचून घेऊ .” त्यावर गजा टाकीत डोकावत म्हणाला, “ अरे भौ, कुणाचा विलेक्ट्रीक पंप मिळाला तर भसाभसा पाणी उपसलं असतं. पंप मिळतो का ते बघू या ?” त्यावर बाजा म्हणाला ,”त्यात लै येळ जाईल.दिवस मावळेल गड्या. त्यापरीस येकेक बादली पाणी उचलून भिंतीपल्याड शेतात उपडी करू .”
गजा म्हणाला ,”मेहनत लै लागणार भावड्या. बादल्या पण घाणीनं बरबटून जातील .पुन्ना वापरायच्या कामी येणार न्हाईत. “
“बादल्यांचं जाऊ दे !सुकलेल्या रोपांना हिरवी झिलाई आली, कणसं भरली की समदं भरून येईल. लोन फेडायला थोडाफार पैका मिळंल.”बाजा म्हणाला .
तेवढ्यात पांडू स्टीलची एक जाडजूड पट्टी आणि लांब बांबू घेऊन आला. बांबूच्या टोकाला चीर पाडून स्टीलच्या पट्टीला रस्सीने घट्ट बांधलं आणि बांबूसकट ती पट्टी टाकीच्या डाव्या कप्प्यामध्ये सोडली .पाण्याच्या पातळीचा अंदाज घेऊन पाण्याच्या पृष्ठभागाखाली पाइपचं टोक कुठं असेल याचा अंदाज घेत तुंबड काढायचा प्रयत्न करू लागला .एवढ्या उंचावरून नेमक्या तुंबड साठलेल्या पाईपाचं तोंड कसं सापडणार? पांडूने गजाला भिंतीपलीकडे जायला सांगितलं . तुंबड सुटली आणि पाणी वाहायला लागलं तर तसं सांगायला कोणीतरी पलीकडे जाऊन बघणारा पाहिजे होता. पांडूने सांगितल्याप्रमाणे गजा गेटमधून पुरा वळसा घालून भिंतीपलिकडे पोचला .पांडू मोठ्या प्रयत्नाने लांब बांबू मागे पुढे करून तुंबड काढायचा प्रयत्न करत होता पण छे . पाण्याला बाहेर निघायला मार्गच मिळत नव्हता. टाकीतनं पाणी उपसायला शेतातल्या घरातून दोर आणि बादल्या आणायच्या, असा विचार करून गजा तडक शेतातल्या घराकडे निघाला .परत येताना घरात टिवल्याबावल्या करत बसलेली दोन शाळकरी मुलं,तीन बादल्या आणि मोठं दोरखंडाचं वेटोळं घेऊन आला . इकडे बाजा आणि पांडू तुंबड काढायचा व्यर्थ प्रयत्न करत होते .बराच वेळ खटपट केल्यावर बाजा पांडूला म्हणाला,”पांडू, तुंबड काढायची तर मलाच आत टाकीत उतरावं लागेल .उतरायची सोय आहे का ?” त्यावर पांडू म्हणाला ,”सफाई कामगार बऱ्याचदा आत उतरत्यात. तेंना उतरण्यासाठी जाड मजबूत खुंट ठोकलेत.पण तेंना सवय असते. नवख्या माणसाला उतरणं धोक्याचं हाय.खु्ंटावरून पाय सटकला तर सरळ सांडपाण्यात पडायला व्हईल .”
तेवढयात गजा आणि बच्चेमंडळी बादल्या,दोरखंड घेऊन आली .बच्चेमंडळी प्रथमच गेस्ट हाऊसमध्ये शिरत होती त्यामुळे गेस्टहाऊसमध्ये पोसलेली हिरवळ ,बैठी कौलारू दगडी इमारत सगळं तोंड आ वासून बघत होती .
“पांडू, गजाने दोरखंड आणलाय. मी पाठीला बांधतो आणि खुंटांच्या पाय-या उतरून खाली जातो. गजा तू मुलांना घेऊन भिंतीपलीकडे उभा राहा. तुंबड निघली की पाणी भसाभसा भाईर पडंल “. बाजा म्हणाला.
गजाने एकदा टाकीत डोकावलं आणि म्हणाला, “येवढ्या खोल अंधारात उतरणार? आत पडलास तर? तू दोर लावून एकेक बादली पाणी उचल,मुलांकडे दे .मी भिंतीवर बसतू, आन् मुलांनी दिलेली बादली भिंतीवरून पल्याड शेतात उपडी करतू. ज्येवढं पाणी शेतात जाईल तेवढं जाईल. भेगाळलेली जिमीन थोडी तरी ओलावंल. .”
“ बादली उपडी करताना तुझा तोल गेला तर? कपाळ फुटंल. तसं नको. मी पडलो तर पाण्यातच पडेन. सहज वर येईन, “बाजा म्हणाला." गजा,तू पोरांना घेऊन भिंतीपल्याड जा. मी आत उतरून तुंबड काढतो.पाणी फुटक्या पायपातून भाईर पडलं की वरडून सांग. पांडोबा टाकीवर हुभा -हाईल. पांडोबानं शिट्टी मारली की टाकीभाईर येईन. पायपातून भाईर पडलेल्या पाण्यानं जिमीन आपसुक वल्ली हुईल.बादल्यांची गरजच लागायची नाय."
बाजाने स्वतःच्या अंगाला दोरखंड गुंडाळला. लांबलचक दोरखंडाचं दुसरं टोक गजाने एका झाडाला गच्च बांधलं . हळू हळू खुंट्यांना पकडून बाजा टाकीत उतरू लागला . पांडू सुपारी चघळत टाकीच्या झाकणाजवळ उभा राहिला .
गजा आणि मुलं धावपळ करत गेटबाहेर पडू लागली .गेटजवळ हिरवळीवर खुर्च्या टाकून दोन पत्रकार पाहुणे बसले होते. त्यातल्या चष्मेवाल्या पत्रकाराने गजाला विचारलं ,”काय गडबड चाललीये रे तिकडे?” त्यावर गजा म्हणाला ,”सायेब, दुष्काळाने पिकं करपून गेलीत. गेस्टहाऊसच्या टाकीत साठलेलं सांडपाणी त्यांना पाजलं तर जरा दम धरतील .”
“अरे शेतं वाळायला लागली तर टँकरने पाणी मागवायचं .तुम्हाला एवढंसुध्दा कळू नये का?“ दुसरा परीटघडीचा झब्बालेंगा घातलेला पत्रकार ज्ञान पाजळत म्हणाला .
“सायेब, दुष्काळात एका टँकरचा भाव पंधराशे रुपये झालाय .पार चाळीस मैलावरून आणावा लागतू .शेतात टॅंकरने पाणी टाकायला पैका कुठून आणणार एवढा ?आधीच कर्ज हाय डुईवर ”गजा म्हणाला .
“काळजी नको करूस .आज कलेक्टरच्या मिटिंगमध्ये सांगण्यात आलंय, हा भाग दुष्काळी म्हणून घोषित झाला की सरकार दर दिवसाआड टँकरने पाणी पोचवणार .उद्या पेपरात वाच.” चष्मेवाला पत्रकार म्हणाला .
“ ते पाणी पु-या गावासाठी येणार. लायनीत हुभं -हावू , तवा प्येयला चारपाच कळशा मिळतील. मंग त्यात शेती कशी व्हणार ? त्यात टॅंकरचं पाणी गावात यायला ,आधी हा भाग दुष्काळी म्हणून घोषित व्हायला पायजे ना. इथं सरकारी कचेरीत रिपोर्ट लिवण्यातच महिना गेला तर लोकांनी पाण्याविना दिस कसं काढायचं ?”गजा बोलला.
त्यावर परीटघडीवस्त्रधारी पत्रकार विनोदाने बोलला.“ हॅ हॅ, त्यात काय. पाणी नाय मिळालं तर शेतात ताडीची झाडं आहेत ना, त्याची ताडी काढून प्यायची. जाऊ दे. काळे, यांच्या सुकलेल्या शेताचे फोटो घे. उद्या बातमीसोबत टाकायला कामाला येतील“
“गोसावी , दिवसभर कलेक्टरबरोबर फिरताना दुष्काळी शेतांचे खूप फोटो काढलेत .मी तर जाम थकलोय. आता रूममध्ये जाऊन विश्रांती घेईन म्हणतो .”म्हणत काळे उठला.
गजा आणि बच्चेमंडळी रिकाम्या बादल्या घेउन गेटच्या बाहेर पडून शेतात आले. गजाने तोडलेल्या पाईपाखाली कर्दळीची पानं जोडून एक पन्हळ तयार केली आणि पाईपमधून खाली ओघळणारं पाणी पन्हळीच्या आसऱ्याने खाली लावलेल्या बादलीत पडेल अशी व्यवस्था केली. आता सर्वांचं लक्ष पाईपातून पाणी कधी टपकतं तिकडं होतं. बराच वेळ वाट पाहिल्यावर पाइपातून हलकीशी चिळकांडी बाहेर आली आणि बादलीत फिक्कट तपकिरी रंगाचं पाणी झिरपू लागलं.बच्चे मंडळींनी आनंदाने टाळ्या पिटल्या. लहानशी चिळकांडी घाणीचा बुचका घेऊन बाहेर आली आणि बादलीत धोधो पाणी पडायला लागलं .गजानं ओरडून पाणी बाहेर आल्याचं सांगितलं. खाली लावलेली पहिली बादली ओसंडून वाहायला लागली .गजानं लावलेली बादली काढून दुसरी रिकामी बादली लावली .मग एका मुलानं पाण्याने भरलेली बादली जवळच्या बांधावर चढून अर्धवट सुकलेल्या पिकांच्या खाचरात ओतली. भेगाळलेल्या जमिनीत बादलीभर पाणी गडप झालं .पाठोपाठ दोन बादल्या ओतल्यावर जमीन जराशी ओलसर झाली .
सुक्या ढेकऴात आसरा घेतलेले मुंगळे आणि किडे झपाझपा बाहेर येऊ लागले ,आणि आस-यासाठी सुक्या ढेकळांच्या शोधात सैरभैर फिरू लागले . भसाभसा पाण्याच्या बादल्या रिकाम्या होत असतानाच भिंतीपलिकडून शिट्ट्यांचे आवाज येऊ लागले . ठरल्याप्रमाणे बाजा आता टाकीबाहेर येईल ,असा विचार करून गजा कामात मग्न होता. पण पांडू पलीकडून शिट्ट्या मारतच राहिला.थांबेच ना. मग काय झालं बघायला गजा बादल्या तशाच टाकून गेटच्या दिशेने पळाला .गजाला पाहून पांडू ओरडला, ” गजा, धाव,लवकर ये, बाजा बेशुद्ध झालाय. लवकर लवकर ये.” ते ऐकून गजा लगबगीने टाकीकडे आला .पांडू टाकीतून बाहेर पडणारा दोरखंड पु-या ताकदीने वर खेचायचा प्रयत्न करत होता .गजा पळत पळत पांडूला मदत करायला आला. दोघं दोर खेचू लागले .दोरखंडाच्या खालच्या टोकाला असलेला बाजा नुसता मान टाकून निश्चल अवस्थेत लटकत होता. खुंटयावरचे पाय केव्हाच सुटले होते . मोठ्या कष्टाने दोरखंड ओढत ओढत दोघांनी बाजाला वर काढलं आणि जमिनीवर झोपवला. तो निपचित पडला होता. श्वास एकदम मंद झाला होता शिट्ट्यांचे आवाज ऐकून पाहुणे पत्रकार पण थडकले.
“काय झालं वॉचमन? हा बेशुध्द पडला का ?” चष्मेवाल्या काळेने विचारलं.
“ समजलंच नाय ,काय झालं ते. पाठीभोवती दोरखंड बांधल्या अवस्थेत गडी खुंटीचा जिना उतरत होता. आत एवढा काळोख होता की टॉर्चनं अंधुकसं दिसत होतं.आत उतरून बांबूनं तुंबलेली घाण काढत असावा. थोड्या वेळाने अचानक घशात काहीतरी अडकावं, तसा जोरजोरात आवाज येऊ लागला म्हणून बघितलं तर दोरखंडाबरूबर लटकत हेलकावे खात होता,मान टाकलेली, बहुधा शुध्द हरपली व्हती. मला विचित्र वाटलं म्हणून मी हेलकावणारा दोर वरून गच्च पक़डला.बाजाला हाक मारली,तर उत्तर नाही. जोरजोरात शिट्टी मारली तरी मान पडल्या स्थितीत गडी ढिम्म. दोर ओढून वर खेचायला लागलो पण एकट्याला जमेना. मंग मदतीसाठी शिट्टी मारत सुटलो.” पांडू सांगू लागला.
त्याला थांबवत पत्रकार काळे ओरडला ,” अरे आचके देतोय तो. कृत्रिम श्वास द्यायला लागेल.” काळेने बाजाला उताणा झोपवला आणि त्याच्या छातीवर दाब टाकत त्याच्या फुफ्फुसाला कार्यरत करायचा प्रयत्न करू लागला.
“ खोल टाकीत सडणा-या घाणीतून विषारी वायू निघत असतात. नाकावर निदान फडकं तरी बांधायचं. दूषितवायूनं घुसमट होऊन बेशुध्द पडलाय. प्राणवायूचं सिलिंडर लावायला लागेल लगेच” . काळेनं पोटतिडीकीने सांगितलं. समोरच्या घोर संकटाची जाणीव होऊन गजा सुन्न झाला. काय करावं तेच सुचत नव्हतं.
“ सायेब, प्राणवायूसाठी चाळीस मैलावरच्या दवाखान्यात न्यायला लागंल, कुणाची तरी गाडी मागवायला लागंल. तोवर श्वास टिकेल असं बघा.” गजा काकुळतीला येऊन म्हणाला.
पांडू मोबाईलवर चारचाकी गाडीसाठी कुणाकुणाला संपर्क करत होता. कुणाच्या गाडीत पेट्रोल नव्हतं, तर कुणी दुस-या गावी होतं. त्या छोट्याशा खेड्यात दूरवरच्या सरकारी रूग्णालयातून येणा-या रूग्णवाहिनीच्या भरवशावर राहण्यापेक्षा एखाद्या फटफटीवरून न्यावं ,म्हणून जवळच्या गावक-याला बोलावलं. तो मात्र मोटरसायकल घेऊन वेळ न घालवता आला. काळाच्या अक्राळविक्राळ पंजातून बाजाच्या जीवाची सुटका व्हावी , म्हणून काळे कृत्रिम श्वास देऊन प्रयत्नांची शिकस्त करत होते..मोटरसायकलवर गावक-याच्या मागे गजा बसला,दोघांच्या मधे बेशुध्द बाजाला बसवून तो पडू नये म्हणून दोरखंडाने गजाने बाजाला आपल्या शरीराभोवती गुंडाळून घेतलं आणि रुग्णालयाच्या दिशेने मोटरसायकल निघाली.सगळे ईश्वराला साकडं घालू लागले.
तिकडे पत्रकार गोसावींना मात्र वेगळीच चिंता पडली होती, या केसचं बरंवाईट झालं, तर बातमी देताना , केसची गणना आत्महत्येत करावी की दुष्काळातील भूकबळी म्हणून करावी ? या सा-या प्रकरणाशी अनभिज्ञ अशी भेगाळलेली काळी जमीन मात्र शेतात सैरावैरा वाहणा-या सांडपाण्याने अधाशासारखी आपली तहान भागवून घेत होती.
०००००००००००००००००
लेखक -- शिरीष नाडकर्णी ए १०१ रेसिडेन्सी अपार्टमेंट,विश्वेश्वर रस्ता,
गोरेगाव (पूर्व) मुंबई ४०००६३ भ्र०ध्वनी --९८२३७२१६३२
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
स्पर्धाविजेती प्रवेशिका.
स्पर्धाविजेती प्रवेशिका. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!