नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
“शेतीबाडी” नाही हो ही लाडीगोडी
रसिकहो कवी श्री. माधव गिर ह्यांचे “शेतीबाडी” हे अष्टाक्षरी खंडकाव्य नुकतेच चपराक प्रकाशनच्या साहित्य महोत्सवात प्रकाशित झाले व ते माझ्या वाचनात आले आणि मी काही वेळ नी:शब्द झालो होतो. तरीही मला राहवले नाही म्हणून मी ह्या खंडकाव्याबद्दलचे मनोगत आपणासमोर व्यक्त करण्याचे एक अतिशय प्रामाणिक धाडस करतो आहे.
शेतकरी हा विषय शहरी माणसाच्या फारसा जिव्हाळ्याचा राहिला नाही हे एक जळजळीत सत्य माझ्या मनाला सतत कुठेतरी बोचत होते. ह्या जाणिवेतूनच मी हे खंडकाव्य जेंव्हा वाचायला घेतले तेंव्हा माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला. जो शेतकरी त्याच्या शेतात राब राब राबतो आणि आपल्यासाठी अन्नधान्य, भाजीपाला, फळ फळावळ पिकवतो तोच खरा आपला अन्नदाता आहे हे आपण आपल्या ह्या धकधकीच्या शहरी जीवनात कसे विसरत चाललो आहोत ह्याची मला अगदी प्रकर्षाने जाणीव झाली आणि आपण किती आपमतलबी आहोत हे उघड झाले आणि मन खिन्न होऊन गेले.
शहरी माणसांच्या विझलेल्या ह्या संवेदना जागृत करण्याचे फार मोठे कार्य गिर सरांचे “शेतीबाडी” हे खंडकाव्य करेल ह्यात शंकेला कुठेही वाव नाही व त्याच भावनेतून त्यांनी हे खंडकाव्य प्रकाशित करण्याचा ध्यास घेतला असावा असे मला वाटते. गिर सर हे मराठवाड्यातील भूकंपग्रस्त शेतकरी आहेत तसेच ते खूप चांगले शिक्षक व तितकेच प्रगल्भ कथाकार आणि कवीही आहेत. त्यांचा “नव तांबडं फुटेल” हा काव्यसंग्रहही खूप प्रसिद्ध आहे. ते स्वत: शेतकऱ्यांचे आयुष्य जगलेले असल्यामुळेच त्यांच्या प्रतिभेनेच त्यांना गप्प राहू दिलेले नाही हे अगदी स्पष्टपणे जाणवते. शेतीबाडी हे खंडकाव्य नुसते शेतकऱ्यांच्या व्यथा अथवा दु:खेच मांडत नाही तर ह्या बळीराजाची सगळीकडून कशी मुस्कटदाबी होते आहे हे जळजळीत सत्य गिर सरांनी त्यांच्या लेखणीद्वारे सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवण्याचे काम एका उदात्त हेतूने केले आहे ह्यात वादच नाही. ३०० कडव्यांच्या शृंखलेत गुंफलेले हे अष्टाक्षरी खंडकाव्य म्हणजे शेती आणि शेतकऱ्याच्या व्यथांचा, दु:खांचा, त्याच्या दुर्दैवी नशिबाचा पाढाच गिर सर आपल्यासमोर अतिशय प्रभावीपणे
मांडत जातात व मन हेलावून टाकतात आणि तितक्याच आत्मविश्वासाने ते शेतकऱ्याची ह्या सगळ्या समस्यांशी लढण्याची जिद्द आणि काळ्या मातीशी असलेली श्रद्धा ही व्यक्त करतात.
बळीराजाची वर्षानुवर्षे जी काही हलाकीची परिस्थिती आहे आणि त्याची जी काही दुर्दैवी ससेहोलपट होते आहे ते वाचून तर सर्वसामन्य संवेदनशील शहरी माणूसही दु:खी कष्टी होतो व ह्या बळीराजासाठी त्याचाही जीव हळहळतो, तळमळतो हे ह्या खंडकाव्याचे फलित आहे असे मला वाटते.
शेतकऱ्यांच्या ह्या व्यथा, ही दु:खे, समस्या, निसर्गाचे बदलेले चित्र, नैसर्गिक आपत्ती, ओला-सुका दुष्काळ, कधी अवकाळी पाऊस तर कधी गारपीट, गावकी आणि भावकी व त्यातून निर्माण झालेली कौटुंबिक आणि सामाजिक समस्या, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, असंघटीत शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी, कोरडवाहू व बागाईत शेती, शेतमजुरांच्या व्यथा, प्रतिष्ठित व प्रस्थापित शेतकरी, शेती तज्ञांचा कारभार, प्रशासकीय दुजाभाव, विवध सरकारी योजनांचा नुसताच पडणारा पाऊस व मधल्या मध्ये गायब होणारे त्याचे फायदे, आडत आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे साटेलोटे, विपणन व्यवस्थेचा अभाव आणि शेत मालाला न मिळणारा बाजार भाव व त्यामुळे कर्जांचे वाढलेले डोंगर आणि सावकारांनी गळ्याभोवती आवळलेल फास, इत्यादी गोष्टींचा लेखाजोखाच गिर सर ह्या वाचकांसमोर ह्या खंडकाव्याच्या माध्यमातून अगदी नी:संकोचपणे मांडतात व शेतीविषयक एकप्रकारचे समाजप्रबोधनाचे खूप मोठे कार्य करून जातात.
ह्या खंडकाव्याचा समारोप करतांना शेवटच्या काही कडव्यांमध्ये गिर सरांचे शेतीवरील प्रेम आणि श्रद्धा मन भारावून टाकते...
जिने घडविले मला
तिचा लिहिला मी ग्रंथ
त्रिखंडात आहे थोर
काळ्या माऊलीची साथ
जिच्या उदरी जन्मलो
जिच्या कुशीत खेळलो
तिच्यापुढे आज पुरा
नतमस्तक मी झालो
पुन्हा जन्म झाला तर
शेतकऱ्या पोटी व्हावा
उभा देह पुन्हा पुन्हा
काळ्या मातीत रुजावा
मला भेटली अक्षरे
आणि शब्दांची थोरवी
म्हणूनच फुटली हो
शेतीबाडीला पालवी...
त्यांचा हा आशावाद सर्वसामन्य माणसाच्या काळजाला नक्कीच पाझर फोडेल व तो ही त्यांच्या ह्या बळीराजाच्या व्यथेवर मात करण्यास सर्वोतोपरी प्रयत्न करेल असा विश्वास हे खंडकाव्य माझ्या मनात निर्माण करून जाते.
“शेतीबाडी” हे खंडकाव्य चपराक प्रकाशनने प्रकाशित करून गिर सरांच्या ह्या उदात्त कार्यास हातभार लावून साहित्य विश्वाला एका प्रतिभावंत शेतकरी व कवीची ओळख करून दिलीत त्यासाठी संस्थापक संपादक श्री. घनश्याम पाटील सर आणि समूहाचे मन:पूर्वक अभिनंदन. तसेच अतिशय सुबक आणि संयुक्तिक मुखपृष्ठासाठी श्री. समीर नेर्लेकर सरांचेही अभिनंदन.
कवी श्री. माधव गिर सरांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि “शेतीबाडीला” खूप खूप शुभेछ्या.
स्नेहचिंतक,
रविंद्र कामठे
२४ जानेवारी २०१७
प्रतिक्रिया
सुरेख परीचय नक्की वाचेन
सुरेख परीचय
नक्की वाचेन