करोना माहात्म्य ||३||
स्वतःला ओळखा, इतरांनाही ओळखा
करोना हे संकट अक्षरश: अभूतपूर्व असे आहे. यापूर्वी अशा तऱ्हेचे संकट देशावर कोसळले होते किंवा नाही हे सांगणे तसे अवघड आहे. कदाचित काही शतकांपूर्वी करोना सदृश्य वायरस आलाही असेल, त्याचे संक्रमण झालेही असेल, लोकं दगावलीही असतील पण वैद्यकीय शास्त्र त्या काळात आज आहे तेवढे प्रगत नसल्याने त्याविषयी दक्षता म्हणून आज जी उपाययोजना केल्या जात आहे, त्या केल्या गेल्या नसतील. इतके मात्र खरे की, संपूर्ण दळणवळण यंत्रणा ठप्प, प्रत्येक मनुष्य आपापल्या घरात कैद आणि प्रत्येक मनुष्याने एकमेकापासून विलगीकरण अंतर राखून वावरणे, असे कधीही यापूर्वी झालेले नाही.
अनपेक्षित संकट उद्भवले की मनुष्य भांबावतो. (अर्थात मनुष्यच नव्हे तर कोणताही सजीव प्राणी भांबावतोच.) काय करावे काय करू नये हे त्याला सुचेनासे असे होते. अशा वेळी नकळत चुका होण्याची शक्यताही वाढते. मग तेव्हा जे काही तत्क्षणी त्याच्या नजरेला उपयुक्त वाटते ,ते करण्याचा मनुष्य प्रयत्न करत असतो. शासनाकडून आज सुरू असलेल्या सर्व उपयोजना ह्या काहीश्या याच तऱ्हेच्या आहेत. कदाचित त्या योग्य असतील किंवा अयोग्य पण; जोपर्यंत दुसरे चांगले अन्य पर्याय उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत आज ज्या उपाययोजना सुरू आहेत त्याच उपाययोजना करण्याशिवाय दुसरा इलाज नाही. म्हणून जरी ह्या उपाययोजना आपल्याला पटल्या असतील किंवा कदाचित पटल्या नसतील, तरी सुद्धा या उपाययोजनावर अंमल करणे आपले राष्ट्रीय कर्तव्य समजून निभावण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
जेव्हा जेव्हा देशावर राष्ट्रीय संकट कोसळते तेव्हा तेव्हा तेव्हा त्याचे चटके-फटके सरसकट सर्वांनाच बसत असतात. कदाचित कुणाला जास्त तर कदाचित कुणाला तुलनेने कमी. पण या चटक्या-फटक्यातून कुणीच सुटत नाही. त्यामुळे माणसाने अशा आपद्कालीन स्थितीत स्वतःला संयमी, सोशिक आणि कणखर बनवले पाहिजे. शक्य असेल तर मनात करूणाभाव देखील निर्माण करता आला तर उत्तमच. प्रत्येक बाबीसाठी सरकारकडे बोट न दाखवता "मी काय करू शकतो" असा विचार करून ज्याला जे शक्य असेल ते तरी निदान करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
अनेक लोकांची जीवनशैली अशी असते की त्याला जेवण आणि चहा सुद्धा बाहेर जाऊन घ्यावा लागतो. त्याच्या स्वतःच्या खोलीमध्ये स्वयंपाकाची भांडी तर सोडा पण साधी पिण्याचे पाणी साठवण्यासाठी बकेट सुद्धा नसते. आज या दीर्घ लॉकडाऊन व संचारबंदीच्या काळात त्यांची काय स्थिती असेल? याची कल्पना करणे सुद्धा अंगाचा थरकाप उडवणारे आहे. अनेकांना दिवसभरातून एकदा तरी जेवण कसे मिळवावे असा प्रश्न पडला असेल तर अनेकांना पिण्यासाठी पाणी कुठून आणावे इतका अगदी साधा पण जीवनमरणाचा प्रश्न सुद्धा पडलेला असेल. एकंदरीत स्थिती गहन आणि गंभीर आहे.
एखादा मनुष्य किंवा एखादा समूह फक्त स्वतःचा विचार करतो, दुसऱ्याचा विचार करत नाही आणि परोपकारी वृत्तीने दुसऱ्याला मदतही करत नाही, असे असेल तरी ते क्षम्य आहे; पण "माझं ते माझं आणि तुझं तेही माझंच" अशी प्रवृत्ती सद्यस्थितीत अक्षम्य असून मानवतेला काळिमा फासणारी ठरते. ज्यांच्याकडे बरेच काही उपलब्ध आहे तेच जर ओरड आणि आकांडतांडव करायला लागले, देखावा निर्माण करून पराकोटीचा कांगावा करायला लागले की जणू काही केवळ त्यांच्यावरच आभाळ कोसळले आहे. तर त्यांची किळस यायला लागते आणि ही प्रवृत्ती किळस करावी याच योग्यतेची असते.
त्यानिमित्ताने मला एक घटना आठवली. काही वर्षापूर्वी एका बसचा भीषण आणि भयानक स्वरूपाचा अपघात झाला होता. त्या अपघातात काही लोक जीवानिशी गेले. कुणाची तंगडी मोडली, कुणाचा हात मोडला, कुणाचा डोळा फुटला, कुणाचा कान तुटला, कुणी फॅक्चर झाले.... ही सर्व अपघातग्रस्त माणसे आपापल्या जागी विव्हळत असताना याच अपघातग्रस्त गाडीतला एक मनुष्य ज्याचा मलमली शर्ट फाटला होता, पायजाम्याला भोक पडले होते, चप्पल तुटली होती आणि हातावरची घड्याळ फुटली होती तोच सर्वात जास्त आकांडतांडव करत होता. ओरडू ओरडू त्याचा मलमली शर्ट कसा फाटला ते दाखवत होता, पायजाम्याला किती लांबीरुंदीचे भोक पडले याचे तावातावाने तारस्वरात वर्णन करत होता, त्याचे घड्याळ फुटल्याने त्याचे कसे आर्थिक नुकसान झाले हे आकडेवारीनिशी अन्य मरणासन्न जखमींना जिवाच्या आकांताने पटवून देण्याचा प्रयत्न करत होता. मदतीचा ओघ आला तेव्हा सर्वप्रथम मदत त्याचीच केली जावी अशी त्याची अपेक्षा होती. जेव्हा मदतीसाठी आलेले लोक जखमींकडे धावत होते तेव्हा त्यांना अडवून आधी माझ्याकडे लक्ष द्या म्हणत अडथळे आणत होता.
तो मलमली शर्टवाला मला पुन्हा नंतर कधी दिसला नाही. कुठे गेला असेल? तुमच्यात तर दडून बसला नाही ना? जरा अंतरात्म्याला विचारून तर बघा. तुमच्या सभोवताली तर तो वावरत नाही ना? जरा सभोवार नजर तर फिरवून बघा. आपण आवर्जून अशावेळी आपल्या सभोवतालच्या आणि संबंधित लोकांचा अभ्यास करून त्यांची पारख करून घेतली पाहिजे कारण संकटकाळात मनुष्य ओळखणे जितके सोपे असते तितके सोपे अन्य कोणत्याही काळात नसते. अशी संधी पुन्हा परत कधी येईल हे सांगणे अवघड आहे. त्यामुळे संधीचा लाभ घ्या! अवश्य लाभ घ्या!!
- गंगाधर मुटे आर्वीकर
दि. ०८/०४/२०२०
(क्रमशः)
=============
टीप : हा लेख आपण माझ्या नावासकट किंवा माझ्या नावाशिवाय किंवा तुमचे नाव घालून कुठेही शेअर किंवा कॉपी करून पेस्ट करू शकता.