नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
उजेडाचा पाठलाग...
काळाच्या ओघात अनेक बद्दल झालेले पहायला मिळतात. मग त्या बदलांचा इष्ट अनिष्ट परिणाम समाजजीवनावर आपसूक घडून येतो. काळाच्या ओघात कैक हडप्पा, सिंधू यांसारख्या संस्कृत्या लोप पावल्या; बरेच साम्राज्य धुळीस मिळाले. एक ना अनेक संकट वेगवेगळ्या आपत्तीच्या नावाखाली पाहायला मिळतात. संकटांना दोष देऊन काहीही हालचाल न करता तरेल हे तत्व कधीच सफल ठरलेलं दिसत नाही. काही माणसांचं जगणं अशाप्रकारचे असते की त्यांच्यापुढे संकटावर स्वार न होता जगणं हे एकप्रकारे संकटच असते. अपेक्षित काळासाठी ते त्या संकटाला सामोरे जाण्यास टाळू शकतात मात्र अनपेक्षित काळासाठी त्यांचं शांत बसणं त्यांच्यासह इतरांनाही कायमच चिरकाल शांत करू शकते. त्यामुळे योग्य ते पाऊल उचलण्याशिवाय वेगळा पर्याय त्यांच्यासमोर नसतो. काळासोबत चालताना कधी कळत नकळतपणे आपणही त्याचा भाग होऊन जातो याचे आपल्यालाही भान उरत नाही. माणसाला जन्मापासूनच संघर्षाची भेट आहे. प्राप्त परिस्थितीतुन बाहेर पडणे जगण्याचा एक भाग असतो. आहे त्याच परिस्थितीत जगायचं म्हटलं तर एक दिवस स्वतःची स्वतःशीच घुसमट होऊ लागते. त्यामुळे प्राप्त संकटांना तोंड देतांना काही बदल स्वीकारावे लागतात. काही बदलांनी जगण्याची परिभाषा बदलून भविष्याचा एक नवा वेगळा मार्ग दिला तर काही बदलांनी आहे त्या परिस्थितीला एखाद्या खोलवर झालेल्या जखमेला चिघळवण्यासारखे काम केले. कित्येक वर्षे मातीत रक्ताचं पाणी करून पिकांना जगवलं जात त्या मातीशी विश्वास जडलाय तो हा की, श्रम केले तर ती काळी माय तिच्या लेकरांवर उदार होतेच. पण अचानक उदभवलेली नैसर्गिक, मानवनिर्मित आपत्ती आहे त्या वर्तमान परिस्थितीवर नक्कीच परिणाम करून जाते. उन्हाळा सरल्यावर पडणारा पहिला पाऊस आणि मातीतून दरवळणारा गंध सगळ्यांना मोहून टाकतो एक वेगळाच सुवास अंतःकरणात भरला जातो. पण त्याच मातीतून उगवलेल्या झाडाला लटकून कुणी मरतो तेव्हा इतरांना वाटते की, पिकांच्या कवडीमोल भावासाठी, व्यसनाने इत्यादी तत्सम कारणे जोडून शिळ्या वर्तमानपत्रासारखं विषय गुंडाळून बाजूला सारला जातो. पण तो फार अस्वस्थ करणारा मरणगंध कसा कुणाला जाणवत नाही ? कसा कुणाला विचार करायला भाग पाडत नाही ? अशी परिस्थिती पुढ्यात असताना आलेलं नैसर्गिक असो वा मानवनिर्मित संकट कुठला तरी परिणाम पावलांच्या ठशागत मागे सोडून जातो. कितीही बदलांचा पाढा वाचला तरी पेरायचं सोडून देऊ असं म्हणून थोडी ना आपसूक काहीएक उगवून येईल; ही बाब शक्यच नाही. त्यामुळे मातीशी इमान बाळगणारा स्वस्थ बसूच शकत नाही ही मात्र सत्य परिस्थिती.
म्हणतात ना काळ आला होता पण वेळ नव्हती आली याप्रमाणेच कोरोनासारखं विदारक संकट सगळ्या मानवजातीला त्यासोबतच वेगवेगळ्या क्षेत्रांना हादरा देऊन अजूनही थांबण्याच नाव घेत नाही. या महाभयंकर संकटाने जगण्याची परिभाषेला एक नवा आयाम दिला. या संकटात शेतीक्षेत्राची तेवढी वेळ आली नव्हती हे जरी हाती आलेल्या जीडीपीच्या क्रमवारीत आघाडीवर असल्याचे कळालं तरीही काहीच हानी झाली नाही असं म्हणणं योग्य ठरणार नाही. शेतकरी म्हणून जगणारा कुठलातरी प्राणी आपल्या अवतीभोवती असतो त्याला माणूस म्हणून या संकटाने गडद रंग दिला. कोरोनाच्या काळात शेतकरी घराघरात विविध माध्यमांच्या साहाय्याने पोहचला असणार. एरव्ही सुद्धा बरेचदा पोहचत असतो पण त्याच्याशी प्रत्यक्षात काहीएक घेणेदेणे नसते त्यामुळे कुठलीही जाणीव त्यांना होत नाही. मात्र कोरोनाच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचे महत्व लक्षात आले. त्या जीवनावश्यक समजल्या जाणाऱ्या मुख्य वस्तू या शेतकऱ्यांच्या शेतातून पिकतात याची जाणीव सगळ्यांना झाली असेल. असा माझा समज गैरसमज न ठरावा नाहीतर कोरोनाचे संकट व्यापक प्रमाणात समाजबदल घडवून गेला हे अर्धसत्य ठरेल. आहे त्या परिस्थितीकडे कानाडोळा करणारी पिढी प्रत्येक कालखंडात जन्मास येते. यासोबतच कुणी विचारात घेवो न घेवो आपले सत्कार्य नित्यनेमाने सदोदित चालू ठेवणारेही असतातच.
समाजात घडणाऱ्या बदलांचे आपणही साक्षीदार असतोच फक्त आपल्यावर अवलंबून असते की आपण कितपत इमानेइतबारे त्या घडलेल्या बदलाशी विश्वासार्हता दाखवतो. पडझडीचा तसाच उभारणीच्या काळाचेही व्यक्तिसापेक्ष बदल घडून येतात. काही आठवणींच्या रुपात मनाच्या गाभाऱ्यात कोलाजरूपी कायमचे स्थान निर्माण करतात. कोरोनाच्या काळात शेतातला भाजीपाला थेट शहरांतील चाळीत, अपार्टमेंटमध्ये नेहमीच्याच दरात उपलब्ध करून देणारे अगणित लोक सामोरे आले. प्राप्त परिस्थितीला टक्कर देत; जीवावर उदार होत स्वतःच्या घरच्या जीवांच्या हितापायी का होईना कुणितरी संकटावर स्वार होण्याचे धाडस करताना पाहायला मिळाले. हीच बाब माणसाचा माणसावर विश्वास वाढवण्यास कारणीभूत ठरते. पण तरीही मला विंदा करंदिकरांच्या काही ओळी आठवतात त्या अशा की,
" देणाऱ्याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे,
घेणाऱ्याने घेता घेता
देणाऱ्याचे हात घ्यावे."
कोरोनाच्या संकटाचा कडेलोट होऊन जनजीवन सुरळीत होईलच मात्र घेणारे हात देणाऱ्याच्या हाताला ध्यानात ठेवतील आणि या काळातील माणुसकीचा शिरस्ता नेहमी अंमलात आणतील ? हा एक गहन प्रश्नच आहे. व्यापक प्रमाणात जनजीवन शेतीवर अवलंबून आहे. शेतीचं आणि यावर अवलंबून असलेल्या कृषक समाजच नातं हे आभाळ आणि पाणी तसेच पंढरीचा वारकरी आणि विठ्ठलासारखं आहे. आभाळ जेवढं भरून येईल तेवढं रिचवेलच असं नाही तसंच कितीही पायांची फरपट झाली तरी वारकरी पंढरीच्या वारीचा नेम चुकवत नाही. त्याचप्रमाणे मातीत राबणारा शेतकरी न चुकता पेरण्याचा ध्यास ठेवतो. कोरोनाच्या संकटात मोठ्या संकटाने बी-बियाणे खते यांचा जोडजमा करून मातीत भविष्य पेरलं काहींच साधलं तर काहींच मातीत जिरलं. पाणावलेले डोळे दाखवावे तरी कुणाला त्यामुळे आभाळातून पडणाऱ्या पाण्यात डोळ्यातलं पाणी सामावून पुन्हा नव्या स्वप्नात मश्गुल व्हायचं. या जगात दुःखाचा खरेदीदार कुणीही नसतो त्यामुळे ते वाटत फिरल्याने हाती काहीएक लागत नाही; त्याला स्वतःमध्ये सामावून जगणं हा शेतकऱ्याचा नित्याचाच भाग बनलेला असतो. सगळं काही आपल्या आजूबाजूलाच असतं मात्र आपण सगळे शोध हा भलतीकडेच घेत फिरतो. मग कधी पाश्चात्य उदाहरणे देतो तर कधी दूरवरच्या परिस्थितीचा पुरावा सांगतो जे कधीही अनुभवलेलं नसतं किंवा पाहिलेलं नसतं. त्यामुळे आजूबाजूला पाहणं सुद्धा गरजेचं असते. कोरोनाच्या काळात माझ्या गावातील बहुतांश शेतकऱ्यांनी आशेनं पेरलेले क्षेत्र जोमाने उगवून आले. क्वचित एकदोन शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागले. त्या उगवून आलेल्या इवल्याश्या कोंबाला पाहून मन बेभान होऊन कामाला अधिक ऊर्जा देते हे मात्र नक्की. काही शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवड केलेली मात्र कोरोनाच्या काळात त्याला योग्य ग्राहकांपर्यंत पोहचवण्यास अपयश आल्याने तसाच काही कुजला तर काही फुकटात वाटून दिला. मात्र शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या मिरचीच्या उत्पादनाने तो तोटा काहीच दिवसांत भरून काढला. मिर्चीच्या लागवडीनंतर कोरोना विषाणूचा धोक्यास सांभाळून बऱ्याच प्रमाणात उत्पादन मिळवण्यास बरेच शेतकरी सफल ठरलेत. त्यामुळे आयुष्याचा रहाटगाडा हाकताना बरेचदा वाटेत दगड-धोंडे येतात. कधी-कधी तर ठेचही लागते तरीही रक्ताळलेल्या पायाकडे दुर्लक्ष करीत जगणारे अगणित माणसं या कृषीजन संस्कृतीत पाहायला मिळतात. ते नकळत वातावरणात सकारात्मक उर्जाचं पेरत असतात.
कोरोनाच जागतिक संकट शेतीक्षेत्रात फारसं धुडगूस नाही घालू शकले मात्र पूर्णपणे अलिप्त सुद्धा नाही राहिलं. एखादी अगरबत्ती वातावरणात सुगंध निर्माण करते आणि राखेत सामावते तसंच काहीसं शेतकऱ्याच जगणं तोही फार जळतो हालाखीच्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी मात्र त्याचीही शेवटी राखच होते. कुणालाही वातावरणात दरवळणाऱ्या सुगंधाची आवश्यकता भासते मात्र त्या राखेचा वाली कोण..? हा प्रश्न शेवटी मागे उरतोच. हाडाची-काड करीत मातीतून सोन्यासारखं पीक काढायचं अन मातीमोल भावात समोरच्याने ते खरेदी करायचं. हा प्रकार नेहमीचाच असल्यानं आणि रोजरोजचं वेगवेगळं रडगाऱ्हाण तरी कोण ऐकणार...? मग एखाद्याला वाटतं च्यायला करावं रोजचं रडगाऱ्हाण बंद कायमचंच. असे कित्येक गाणारे गळे फासात अडकतात. कोरोनाच्या संकटानेही या मार्गात येऊन भरच घातली. कित्येक देहांच गाणं बंद झालं या भिषण काळात; याकडे दुर्लक्ष करून काहीएक बोलणं म्हणजे डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजरागत ठरेल.
" कवेत घेऊन स्वप्न सारी
मला चालण्याची आस आहे,
उजेड असो क्षितिजापल्याड
माझ्या पावलांना त्या दिशेचा ध्यास आहे.."
याप्रमाणे नवनिर्मितीचा ध्यास घेऊन मातीत कायम अशावादाने जीव ओतणारे कैक लोकं आहेत; ही जाणीव अत्यंत आवश्यक आहे. शेतकरी नेहमीच संकटांचा सामना करतात. कोरोनाच्या महाभयंकर सवटाखालीही ते आलेच मात्र काळ्या मातीचे लेक या संकटालाही मोठ्या पराकाष्ठेने लढले आणि अविरत हताश न लढण्याचा वसा समृद्धीच्या दिशेने नेतील. माणूस म्हणून जगण्याचा आणि माणुसकी टिकवण्याचा उदात्त हेतु समोर ठेऊन तिमिराकडून तेजाकडे जाणाऱ्या रस्त्याचे शेतकरी सुद्धा वाटसरू आहेत त्यांनाही वाटेतल्या सावलीचा आधार हवा असतो. त्यांनाही नको असते त्याच सावलीत पुढे चालण्याचा ध्यास कायमचा थांबवणे. संकट येतात आणि जातात पण चिवटपणे परिस्थितीवर मात करण्याचं बळ शेतकऱ्यांना लाभत असेल ते त्या काळ्या आईवर असलेल्या निस्सीम श्रद्धेमुळेच..!!
- कृष्णा अशोक जावळे.
- रा. कोनड खु. , पो - देऊळगाव घुबे,
ता. चिखली, जि - बुलडाणा.
- 7028563001
प्रतिक्रिया
काहीएक सूचना असेल तर सांगाव्यात.
सूचनांचे स्वागत...
वास्तवाच भान राखत अतिशय तरल
वास्तवाच भान राखत अतिशय तरल तितकच कठोर सुंदर प्रवाही ललित
शुभेच्छा जावळे सर
रवींद्र अंबादास दळवी
नाशिक
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने