Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




आणि तिनं खुरप्याच्या पाठीला धार लावली...

(ग्रामीण लघुकथा)

: रावसाहेब जाधव (चांदवड)
rkjadhav96@gmail.com
मो. नं. ९४२२३२१५९६

डाव्या हाताच्या मुठीत दाबून ठेवलेलं खोडरबर पुन्हा एकदा तिनं उजव्या हाताच्या बोटांमध्ये पकडलं आणि अर्ध्यामुर्ध्या डेरेदार झाडाच्या खोडासाठी रेखाटलेल्या चार-दोन रेघा पुरी ताकद लावून खोडून टाकल्या...पुन्हा एकदा. क्षणभर तिच्या हातांची हालचाल थांबली पण मन मात्र झाडाचे अवयव जुळवण्याचा प्रयत्न करतच राहिलं. तिला रेखाटायचं होतं, एक झाड आणि त्यावर बसलेली पाखरं. पण त्याआधी ती रेखाटू पाहत होती; त्याच झाडाचं एक सोटमूळ, जमलंच तर बरीचशी तंतुमुळं, त्यानंतर एक जमिनीची आभाशी वाटणारी पारदर्शक आडवी रेघ, जी घट्ट पकडून ठेवील वाढत जाणाऱ्या झाडाला. उंच वाढत जाणाऱ्या खोडावर गोलाकार पानांचा डेरेदार घनगोल, इतका की, पृथ्वीचा अख्खा गोल सामावला जाईल त्यात.

एक उत्तम चित्रकार म्हणून शाळेत तिची ओळख होती. आठवीच्या वर्गात प्रवेश घेतल्यापासून गेल्या वर्षभरात आपली कल्पकता आणि हुशारी दावत तिनं रसिक शिक्षकांच्या मनावर स्वत:च्या अस्तित्वाचं एक आदरयुक्त चित्र उमटवलं होतं. आणि आज नववीच्या वर्गाची सहामाही परीक्षा जवळ आली म्हणून इच्छा नसतानाही शिक्षकांच्या आग्रहाखातर तब्बल दोन महिन्यांनी शाळेत हजर झाली होती ती. तसंही दिवसभरात कोणत्याच तासाला तिचं मन लागलं नव्हतं. पण तिच्या आवडीचा चित्रकलेचा तास सुरु झाला आणि तिनं मन एकाग्र करण्याचा प्रयत्न केला. क्षणभरच... दुसऱ्या क्षणाला स्वत:चं अस्तित्व सांभाळण्याचा प्रयत्नही केविलवाणा ठरला तिचा.

का, कुणास ठावूक? ते मनातलं ते चित्र कागदाच्या अंगावर उतरवण्यात यश मिळत नव्हतं तिला... चार दोन रेघा ओढून झाल्या की खोडून टाकायची ती. एव्हाना तिला पेन्सिलपेक्षा खोडरबर जवळचं वाटू लागलं होतं. साधी रेघ ओढतानाही खोडरबर जवळ असल्याची खात्री करून घ्यायची ती.

“पण असं किती वेळ चालणार?” मनात पुटपुटली... कागद फाटण्याइतका कमकुवत झाला होता. तशातच डबडबल्या डोळ्यांतील एक एक थेंब कागदावर टपकला आणि त्याचा ओलसरपणा कागदाला आणखीच कमजोर बनवू लागला. आतातर तिला चित्र रेखाटण्यापेक्षा कागद वाचवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार होते. आधीच कोरडेपणा गमावलेल्या रुमालानं तिनं तो थेंब पुसण्याचा प्रयत्न केला खरा पण त्यामुळे पांढरा कागद आणखीच काळवंडला, तिच्या दाटून कोसळू पाहणाऱ्या मनासाराखा... मोकळ्या आकाशात दाटून आलेले काळे ढग चक्री वादळासोबत गरगर फिरावेत आणि स्वत:सह अख्खं झाडच उन्मळून त्याचं अंग ओरबाडून निघावं असा भास होऊ लागला तिला.

“कसं? कसं रेखाटू ते झाड? ज्याच्या डोक्यावरील आभाळाच्या चिंध्या झाल्या होत्या आणि जमिनीला वणवा लागलेला...” असेच काहीबाही विचार तिच्या निराधार मनावर आवळगाठीचे करकोचे पाडत राहिले. डोळ्यांपुढं अंधारी आल्याचा भास होऊ लागल्यामुळं उजेडाविना मनात तयार होऊ पाहणारं चित्र आणखीच धूसर होत गेलं...

“नाही... नकोय मला ते झाड.” तिचे अस्पष्ट ओठ हालले. पण तरीही झाडाच्या मुळ्या जमिनीचे पोट सोडू शकल्या नाहीत. हुंदका दाबण्याचा तिचा प्रयत्न यशस्वी झाला पण डोळ्यांच्या धारा ती थोपवू शकली नाही. पूर होऊन वाहता वाहता अचानक धरणाचा बांध आडवा यावा आणि पुढचे सारे प्रवाही मार्ग बंद व्हावे, अशी काहीशी कालवाकालव पोटात सुरु झाल्याने बाकावरील अर्धवट खोडलेल्या चित्राच्या पानावर डोकं टेकवून आतल्याआत काळजाला पिळे देऊ लागली ती.

बाप जाऊन दोन महिने झाले तरी आई अजूनही न्यायाची वाट पाहत थबथबल्या डोळ्यांतील डबडब सोडू शकत नव्हती आणि आश्वासनांचे ढग सोबत घेऊन येणारांपैकी कोणी बरसेल अशी आशाही उरली नव्हती. ‘हत्या की आत्महत्त्या?, कर्जापायी की वेगळं काही?’ संशोधक अजूनही संशोधन करत होते. विनवण्या करून भाकर-तुकडा खाऊ घालणाऱ्या शेजाऱ्यांचा जिव्हाळ जोर सरत आला होता आणि घरची चूल पेटवण्याची ताकद आई गमावून बसली होती. कदाचित म्हणूनच नंदा आज बिनाभाकरीचे पोट सोबत घेऊन शाळेत आली होती...

“झाडच नसतं अस्तित्वात ते तर, नसता बांधू शकला बाप दोर त्या झाडाला...” अर्धवट झोपेतून जागी होऊन पुटपुटत ती वळवळली.
खरं तर, झाडाचाच गळा आवळावा. असे विचार तिच्या मनात काहूर करत असायचे. कदाचित तिच्या आईच्याही... किंवा त्यामुळेच तिच्याही...
“पह्यलं ते झाड हाटव डोळ्यापुढून, उठ्ल्याबसल्या जीव घेतंय ते माहा...” तिच्या आईच्या शब्दांनी घायाळ होत “नको ती आठवण.” म्हणून तिच्या मामानं दोन दिवसांपूर्वीच बापजाद्यांच्या कर्तबगारीची साक्ष देणाऱ्या त्या आंब्याच्या झाडाचा अंत्यविधी पार पाडला होता.

झाड तुटले, खोड फुटले, फांद्याचा ढिगारा विकला गेला आणि महिनाभराचा किराणा घरात आला. त्याच झाडाच्या जीवावर महिनाभर जगण्याची सोय झाली खरी पण बाप नसण्याच्या दरीची खोली अधिकच वाढत गेली.

“मला चक्कर येताहेत...” हुंदक्यासोबत तिच्या तोंडातून अडखळते शब्द बाहेर पडले. मनातलं ते वादळ थोपवण्याचे तिचे सारे प्रयत्न सरल्यासारखे... तिला भीती वाटत होती तिच्या अंगणातल्या झाडासारखीच कोसळून पडण्याची... ज्या झाडाला बांधलेल्या झोक्यावर कालपरवापर्यंत झुलत होती ती. ते झाड आज सरपणाच्या भावात विकलं गेलं होतं... आणि बापाच्या खांद्यांसोबतच झाडाच्या फांद्यांना पारखी झालेली ती अखेर बाकावरून खाली कोसळली... झाडासारखीच... आणि अचानक सगळ्या वर्गाचं लक्ष तिच्या कोसळण्यानं वेधून घेतलं. वर्गात फलकावर चित्र रेखाटण्यात रंगलेले शिक्षक धावले. धावाधाव साऱ्यांचीच झाली. मान सावरून धरत शिक्षकांनी तिला थेट दवाखान्यात दाखल केलं.

थोड्याशा उपचारानंतर ती शुद्धीवर आली खरी पण आता तिचं मन दवाखान्याचं बील, घरी थंडावलेली चूल, भुकेनं मुकी झालेली आई, मेरावर उरलेलं आणखी एक झाड आणि तिची चित्रकलेची वही यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करू लागलं. हे समीकरण सोडवण्याइतकं तिचं गणित पक्कं नसल्याचा प्रत्यय तिला आला. पुन्हा एकदा... एव्हाना तिचे अश्रूही सुकत आले होते.

घरी पोहचताच अखेर तिनं मनाचा हिय्या केला आणि खुरप्याच्या पाठीला धार लावली...
...*...

लेखनप्रकार: 
गद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनप्रकार : 
गद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनविभाग: 
कथा
Share

प्रतिक्रिया