श्री तिर्थक्षेत्र रावेरी
सीतामंदीर तिर्थक्षेत्राचे महात्म्य
श्री क्षेत्र रावेरी हे गांव यवतमाळ जिल्हा त. राळेगाव वरुन दक्षिणेस ३ कि.मी आहे. या गावाला पौराणिक इतिहास लाभला आहे.
त्रेतायुगात रामायण कालीन इतिहासाप्रमाणे अयोध्येचे राजा दशरथ, त्यांचा पुत्र प्रभू रामचंद्र, लक्ष्मण व सीतेसह १४ वर्षाच्या वनवासात असताना रावणाने सीतेचे अपहरण करून लंकेत अशोकवनात ठेवलेले होते. प्रभू रामचंद्राने रावणाचा पराभव करून सीतेला अयोध्येत परत आणल्यानंतर पावित्र्याबद्दल शंका निर्माण झाली. सीतेने अग्निपरिक्षा देऊन पावित्र्य सिद्ध केले परंतु समाजातील कोणत्यातरी व्यक्तीचे समाधान झाले नाही. प्रभू रामचंद्राने समाजाची सुव्यवस्था राखण्यासाठी सीतेला गरोदर अवस्थेत लक्ष्मणाच्या रथात बसवून दंडकारण्यात सोडून दिले.
********
श्रीक्षेत्र रावेरी गावातील पूर्वजापासून वयोवृद्ध मंडळी याबद्दल अशी आख्यायिका सांगतात की, जेव्हा रामाने सीतेला गरोदर अवस्थेत वनात सोडून दिले तेव्हा सीतेने याच रावेरी गावात वाल्मिकॠषिचे आश्रयाने वास्तव्य केले. रावेरी हे गाव आणि आसपासचा परिसर हा दंडकारण्याचा भाग असून याच गावात लव आणि कूश यांचा जन्म झाला. लव-कुशाचा जन्म झाल्यानंतर सीतेने गावातील लोकांकडे पसाभर गहू मागितला. गहू देण्यास लोकांनी नकार दिल्यावर तिने गावकर्यांना शाप दिला की या गावात गहू पिकणार नाही. शापाप्रमाणे या गावात गहू पीकत नव्हता. परंतू अलिकडे सन १९०० चे दरम्यान गावातील लोकांनी सीतेला साकडे घालून पिकलेला गहू सीतामंदीरात भेट दिल्याशिवाय आम्ही गव्हाचा एकही दाणा खाणार नाही. असा संकल्प करून तो संकल्प वार्षिक पाळल्यामुळे गावात गहू पिकण्यास सुरुवात झाली.
आणखी अशीही एक कहाणी आहे की, रामाचा अश्वमेघ नावाचा घोडा लव-कुशांनी अडविला आणि त्या घोड्याबरोबरोबर आलेल्या शत्रुघ्न, लक्ष्मण यांचा पराभव करून घोड्याबरोबर आलेल्या हनुमंताला वेलीने बांधून ठेवले. रावेरी गावात वेलीने बांधलेल्या स्थितीतील ९ फ़ूट उंचीची हनुमंताची भव्य मुर्ती आहे. ज्या ठिकाणी लव-कुशांनी अश्वमेघ घोडा पकडला ते ठिकाण तमसा नदीचे (रामगंगा) तीरावर आजही पाहण्यास मिळते. गावाच्या दक्षिण भागाकडून तमसा (रामगंगा) नदीचे वळण असून उत्तर वाहनी असलेल्या नदीचे तिरावर जगातील एकमेव वनवासी सीतेचे हेमाडपंथी मंदीर आहे. तसेच बाजुला वाल्मिक ऋषिचा आश्रम सुद्धा आहे. शिवाजी महाराजांचे कालखंडातील पाच मोठे बुरूज (गढी) व त्याला भिंतीचा असलेला परकोट आजही पाहण्यास मिळतो.
अशा पौराणिक इतिहास असलेल्या गावात शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशींनी २ मे १९८२ ला भेट देऊन संपूर्ण इतिहास जाणून घेतला.
जगातील एकमेव सीतेचे मंदीर जिर्ण असून मंदीराचा जिर्णोद्धार करण्याची गरज असल्याचे सांगीतले, परंतू एका शेतकरी राजाची भूमीकन्या सार्वभौम राजाची राणी वनवासी सीतेला गरोदर अवस्थेत वनात सोडल्यानंतर तिची काय अवस्था झाली असेल. वाल्मिकी ऋषीचे आश्रयाने वनवासी सीतेने धैर्याने आपल्या दोन मुलांचा सांभाळ करून समाजाला दाखवून दिले. त्याचप्रमाणे समाजातील ६०% महिला आपला घाम गाळून शेतीचे कष्ट करते. परंपंरेने चालत आलेला अन्याय होतच आहे. त्यासाठी महिलांना आधाराची गरज आहे. ज्याप्रमाणे वनवासी सीतेला श्री क्षेत्र रावेरी हे आधारस्थान मिळाले त्याचप्रमाणे समाजातील परित्यक्त्या महिलांसाठी सुद्धा रावेरी हे माहेर झाले पाहिजे, अशी मा. शरद जोशींनी गावकर्यांसमोर इच्छा प्रगट केली. १९९४ ला मा. शरद जोशींनी शेतकरी महिला आघाडीचा लक्ष्मीमुक्ती कार्यक्रमाचे रावेरी येथे आयोजन करून शेतकरी महिला आघाडी समोर विषय ठेवला. हे काम शेतकरी महिला आघाडीने करावे अशी मा. शरद जोशी यांनी सुचना करून आम्ही शेतकरी संघटनेचे पाईक बंधू तुमच्या सोबत असल्याचे सांगीतले.
सन नोव्हेंबर २००१ ला मा. शरद जोशींनी शेतकरी महिला आघाडीचे अधिवेशन रावेरीला घेऊन अधिवेशनात जगातील एकमेव सीता मंदीराचा जिर्णोद्धार करण्याचा संकल्प केला. शेतकरी संघटना, शेतकरी महिला आघाडी व मा. शरद जोशी यांनी स्वत:च्या मिळकतीतून दहा लाख खर्चून मंदीराचा जिर्णोद्धार करून २ ऑक्टोंबर २०११ ला लोकार्पण सोहळा घेऊन गावाच्या सुपूर्द करण्यात आले.
परित्यक्त्या महिलांचे श्रीक्षेत्र रावेरी हे माहेरघर व्हावे, ही संकल्पना मा. शरद जोशींनी पुढे नेण्यासाठी गावकर्यांना आवाहन केले. श्रीक्षेत्र रावेरी येथे श्री हनुमान मंदीर संस्थान रावेरी, र.नं. ए ६३६ या नावाने विश्वस्त ट्रस्ट आहे. मा. शरद जोशींची संकल्पना पुढे नेण्यासाठी विश्वस्त मंडळाने गावातील २५ तरुण युवकांची सन २०१० ला सौंदर्यीकरण विकास समिती निर्माण करून समितीमार्फ़त रावेरी हे गाव तिर्थक्षेत्र, परित्यक्त्या महिलांचे माहेर कसे करता येईल त्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न सुरू केले आहे. तरी या कार्यासाठी सर्वांनी आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
*****
वाल्मिकी ऋषीचा आश्रम व समोरील परिसर
********
********
******
******
*******
*******
गाभार्यातील मुर्ती
******
सीतेची न्हाणी
*******
मंदीराचा दक्षिणभाग
******
******
वेलीने बांधलेल्या स्थितीतील ९ फ़ूट उंचीची हनुमंताची भव्य मुर्ती
*****
*******
दिनांक २७/०४/२०१५ रोजी सीतानवमी उत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष श्री बाळासाहेब देशमुख यांनी प्रास्ताविक केले. व्यासपीठावर श्री विजय निवल, सौ. स्वाती मते, श्रीमती सुलोचना राहणे, सौ. सरोज काशीकर, सौ. शैलजा देशपांडे, गंगाधर मुटे व ट्रस्टचे पदाधिकारी.
******
या प्रसंगी स्वत:ची किडणी देऊन पतीचे प्राण वाचविणार्या सौ. स्वातीताई मते यांचा व मुलांचे योग्य पालनपोषण करून त्यांना उच्चपदस्थ नोकरीपर्यंत पोचविणार्या सुलोचनाबाई राहणे यांचा शाल व श्रीफ़ळ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी माजी आमदार सौ. सरोज काशीकर यांनी त्यांचे शब्दसुमनांनी कौतुक केले.
*******
याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना माजी आमदार अॅड वामनराव चटप.
******