नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
पाहून घे महात्म्या, इथली शिवार राने
केला भकास भारत, शोषून इंडियाने
तुमचे विचार बापू, गाडून पूर्ण केला
तुमचा बघा पराभव, तुमच्याच वारसाने
चाकू - सुऱ्या प्रमाणे, हातात पेन त्यांच्या
जितके लुटायचे ते, लुटतात कायद्याने
संपूर्ण सातबारा, कोरा करू म्हणाले
भुललेत भाड़खाऊ, दिल्लीत पोचल्याने
आसुड उगारणारा, माझा स्वभाव नाही
पण; वेळ आणली या, मग्रूर लांडग्याने
वृद्धाश्रमात आई, गोतावळ्यास झुरते
गायीस मात्र माता, म्हणतात गौरवाने
इतुकेच शोध उत्तर, मातीत राबणार्या
बदलेल भाग्य निव्वळ, तू घाम गाळल्याने?
मुर्दाड शासकांना, सोयरसुतूक नाही
हकनाक तूच मरशिल, गळफास घेतल्याने
शेती कसून दाखव, विद्याप्रचूर तज्ज्ञा
सुटणार प्रश्न नाही, बुद्धी उगाळण्याने
लक्ष्मीस आणखी मी, सांगा किती पुजावे?
नांदूच देत नाही, ही अवदसा सुखाने!
डोक्यास ताण दे तू , अन सोड आत्मग्लानी
काही तरी 'अभय' कर; मुक्ती मिळेल ज्याने
- गंगाधर मुटे 'अभय'
=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=
प्रतिक्रिया
फेसबुक पोस्ट
https://www.facebook.com/gangadharmute/posts/1912187692139243
शेतकरी तितुका एक एक!
अतिशय सुंदर गझल
छानच!
Dr. Ravipal Bharshankar
धन्यवाद सर!
धन्यवाद सर!
शेतकरी तितुका एक एक!