परिघाबाहेरची गझल
आनंदऋतू ई-मॅगझिनच्या निमित्ताने दर्जेदार कविता आणि गझल शोधता शोधता गंगाधर मुटे साहेबांची कविता नजरेस पडली. कविता, व्यंग, नागपुरी तडका आणि गझल अशा विविध माध्यमातून चौफेर स्वैर साहित्य भ्रमंती करणाऱ्या एका संवेदनशील आणि ऋजू व्यक्तिमत्वाशी ओळख होण्याचा योग जुळून आला. आनंदऋतू ई-मॅगझिनमध्ये दर महिना कविता आणि गझल प्रकाशित करण्याची मुटे साहेबांनी परवानगी दिल्याने नव्याने झालेली ओळख परिचयात बदलली. तशी प्रथमदर्शनीच वेगळी वाटणारी त्यांची गझल पण परिचयाची वाटू लागली.
सुरेश भट साहेबांनंतर काही काळापुरती गझल ही चार लोकात आणि चार गावात कैद झाली होती. तेच तेच, त्याच त्याच भाषेत आणि शैलीत लिहणारे लोक स्वत:ला गझलकार समजू लागल्याने, गझल त्याच त्याच साच्यात गुदमरली होती. कल्पना करून वृत्तांमध्ये बसवलेली कपोलकल्पित दु:खे! वास्तवाशी सुतराम सोयरसुतक नसलेल्या स्वप्नाळू प्रतिमा आणि अलंकारांनी गझल गुदमरली होती. शहरी भागाचा आणि एका ठराविक वर्ग समाजाचा गझलेवर ठसा स्पष्टपणे दिसू लागला होता. काही काळापुरती तर गझल एका ठराविक समाज विशेषाची मक्तेदारी बनून गेली होती. एका ठराविक समाज विशेषाबाहेरचं किंवा ठराविक परिघा आणि भूगोला बाहेरचं काही लिहणं किंवा मांडणं हे गझलेला वर्ज्य मानलं गेलं होतं. कोणी तसा प्रयत्न केलाच, तर त्याला गझलेच्या व्याकरणात रक्तबंबाळ करून, शाब्दिक कसोट्यांमध्ये जेर करून स्वत: होऊन गझल लेखानातून बहिष्कृत करण्यासा भाग पाडलं जाऊ लागल्याने, गझलेमध्ये तोच तोच पणा आला. त्यामुळे साहजिकच सुरेश भटांनी नावारुपाला आणलेली आणि लोकाश्रय मिळवूने दिलेली गझल लोकांपासून दुरावली आणि एका आम्ही म्हणजे मैफिल मानणाऱ्या एका वर्तुळात सिमटली गेली.
हे सर्व सांगण्याचे प्रयोजन म्हणजे गंगाधर मुटे साहेबांची गझल. ती वाचता क्षणीच, परिघाबाहेरची वाटते. तिच्यामध्ये कदाचित ती गझलेची नजाकत नसेलही, पण जी गझलेची रग आहे, ती मात्र सोळा आणे अस्सल आहे. प्राचार्य प्र. के. अत्रेंनी उत्कृष्ट आणि सकस साहित्य कसं असावं? यासंबंधी एका ठिकाणी असं म्हटलं होतं की, "ऊस जसा ज्या जमिनीत रुजून येतो, त्या जमिनीची त्याला गोडी येते. तसं खरं साहित्य ज्या जमिनीतून फुलून येतं, तिचा त्याला गंध यावा." गंगाधर मुटे साहेबांची गझल या परिमाणाला पुरेपूर उतरते. त्यांची कोणतीही गझल वाचली, तरी तिच्यामध्ये प्रथमच जाणवतो तो तिचा अस्सल गावरान बाज आणि शेतकरी साज! या गझलेमध्ये एक बंडखोरपणा आहे. पण त्यात उर्मटपणाचा लवलेशही नाही हे या गझलेचं मोठं वैशिष्ट्य आहे. वाचकाना या गझलेमध्ये चंद्र तारे, ऊन वारे, प्रेमाचे शिडकावे आणि प्रियकर प्रियेसीचे शृंगारमय बारकावे कमीच सापडतील, पण शेतकऱ्यांचा आक्रोश आणि पीडितांच्या व्यथा मात्र भरभरून मिळतील. कारण ही गझलच लिहली गेली आहे, शोषितांच्या आणि श्रमकऱ्यांच्या ऊपेक्षेला वाट करून द्यायला! श्रमिकांची दु:खे कधी गझलेमध्ये सांडलेली दिसत नाहीत, कारण गझलेमध्ये मांडण्याइतकी ती सुवासिक आणि अलंकारिक नसतात, असा एक अघोषित वृथा समज पसरवण्यात आला आहे. गंगाधर मुटे साहेबांची वास्तववादी गझल या गैरसमजाला छेद देण्याएवढी पूर्ण सक्षम नक्कीच आहे.
"माझी गझल निराळी" या गंगाधर मुटे साहेबांच्या गझल संग्रहास मन:पूर्वक शुभेच्छा!
किमंतु ओंबळे
संपादक
दिनांक: ५ मे २०१३ आनंदऋतू ई-मॅगझिन
ठाणे
== ० == ० == ० == ० == ० == == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० ==