![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
५०% च्यावर आरक्षण नको, छ. शाहू महाराजांची न्याय्य भूमिका
संयोजक : मा. श्री. अॅड सतीश बोरुळकर यांच्या भाषणाचे स्वैर शब्दांकन
अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन याचा संयोजक म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे की विदर्भातील महाराष्ट्रातून जे माझे मित्र इथे आलेले आहेत त्यांना या परिसराचा इतिहास माहिती करून देणे. या कोल्हापूरची महती काय सांगावी! मित्रांनो, इथे दगड उचलाल तर तुम्हाला इतिहास ऐकू येईल. इथे वाऱ्याशी गप्पा माराल तर स्वराज्यासाठी धावलेल्या सैनिकांच्या टापांचा आवाज ऐकू येईल आणि इथलं मातीचं ढेकूळ जर का तुम्ही उचललात तर सुबत्ता आणि सुपीकतेचा गंध येईल. ही अशी काय वर्णावी कोल्हापूरची महती!
छत्रपती शिवाजी महाराजांवरती अनेक संकट आली. स्वराज्यावरती पण एक मोठं संकट इथे आलं म्हणजे पन्हाळ गडला पडलेला सिद्धी जोहरचा वेढा. महाराजांनी प्रयत्न करूनही त्यातून मार्ग निघत नव्हता म्हणून महाराजांनी ठरवलं की हा वेढा फोडायचा. 12 जुलै 1660 ला महाराज पन्हाळ्यावरून निघाले. एक पालखी महाराजांची, दुसरी पालखी महाराजांचं रूप घेऊन बसलेल्या शिवाकाशीदची आणि ती पालखी निघाली होती शत्रूला चकवा देण्यासाठी. शिवाकाशीदला माहिती होतं की मी प्रत्यक्ष शिवाजी म्हणून इथे बसलेलो आहे. मृत्यू अटळ आहे. तरी शिवाकाशीदनी मृत्यूला कवटाळलं. हे एकाच कारणाने की, मी प्रति शिवाजी म्हणून मरणार आहे.
13 जुलै 1660 बाजीप्रभूंचा संग्राम पन्हाळगडाचा सर्वश्रुत आहे. आपण लहानपणापासून इतिहासात वाचतो की, 65 किलोमीटर पन्हाळगड ते विशाळगड. २१ तासात ६५ किलोमीटरचा प्रवास महाराजांनी पन्हाळ गडावरून विशाळगडकडे केला आहे. तारीख आहे 13 जुलै 1660. सिद्धी मसूद मागावर आहे. सिद्धी मसूदकडे हजारोंचं सैन्य आहे आणि त्या सैन्याला तोंड देत आहे बाजीप्रभू. त्या दिवशी मृत्यू पडलेल्यांची संख्या आहे 1300. महाराजांना वाचवण्यासाठी किती शर्थ केली त्या मावळ्यांनी आणि म्हणून मी म्हणतो या मातीत या शूर मावळ्यांचं निष्ठा, शौर्य, रक्त पेरलेले आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहू महाराज आणि महाराणी येसूबाई या औरंगजेबाच्या कैदेत होत्या. अशावेळी धुरा सांभाळली स्वराज्याचे तिसरे सेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या आणि छत्रपती राजाराम महाराजांची पत्नी ताराबाई राणीसाहेबांनी. पहिल्यांदा पन्हाळगड राजधानी केली होती नंतर मग ती कोल्हापूर झाली आणि या अतिशय नाजूक प्रसंगी ताराबाईंनी स्वराज्य सांभाळलं. त्यांना एक नाव तिथे फार उल्लेखनीय आहे की ज्यांची स्वराज्य सांभाळण्यामध्ये ताराबाईंना मदत झाली ते म्हणजे रामचंद्रपंत अमात्य बावडेकर. संताजी घोरपडे यांची समाधी इथेच कुरुंदवाडला आहे.
13 एप्रिल 1731 ला वारणेचा तह झाला. आणि कोल्हापूर संस्थान निर्माण झालं. आणि या कोल्हापूर परिसर म्हणा किंवा प्रांत म्हणा संस्थान म्हणा, त्याचा सुवर्णकाळ हा 1894 ते 1922 आहे. शाहू महाराजांचा 1894 त्यांचा राज्याभिषेक झाला 1894 ला आणि त्यांचं निधन झालं 1922 ला. ही राजवट हा या काळाचा सुवर्णकाळ आहे आणि शाहू महाराजांचे खरे स्मारक काय असेल तर शाहू महाराजांनी इतके शहरं बांधली, इतक्या इमारती बांधल्या पण खरं शेतकऱ्यांसाठी स्मारक आहे राधा नगरीचं धरण. राधा नगरीचं धरण पहिल्यांदा महाराजांनी बांधलं कारण शिक्षणाचं महत्त्व महाराजांनी ओळखलं, शाहू महाराजांनी ओळखलं, वसतिगृह, शाळा हे आहेतच शिवाय शाहू महाराजांची देणगी आणि भारतीय राज्यघटनेवर त्यांच्या विचारांचा प्रभाव आहे. भारताला स्वातंत्र्य मिळालं 47 ला. राज्यघटना आली 50 ला. राज्यघटनेमध्ये आरक्षण कसं असावं याचा वाद आजही बघतो पण शाहू महाराजांनी 50% आरक्षण 1902 ला कोल्हापूर संस्थानामध्ये दिलं आहे. महाराजांचा कायदा आज सुप्रीम कोर्टाने मान्य केलेला आहे म्हणजे 50% च्यावर आरक्षण नको, त्यामध्येच न्याय आहे.
इथे सर्वात प्रथम अस्पृश्यता निवारण धोरण शाहू महाराजांनी दिलं. मग ते तुमच्या राज्यघटनेच्या 17 अनुच्छेद मध्ये एबोलिशन ऑफ अनटचेबिलिटी (अस्पृश्यता निवारण) हे नंतर आलंय. महाराजांची धोरणं राज्यघटनेचा पाया आहे. समानता, बंधुता ही ह्या कोल्हापुरात आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या सानिध्यात आले बाबासाहेबांना आर्थिक साहाय्य महाराजांनी दिलंच शिवाय त्यांना मूकनायकला आर्थिक सहकार्य सुद्धा शाहू महाराजांनी दिलं. कोल्हापूर संस्थानाची वैचारिक जडणघडणही त्यांनी केली. शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या मध्यस्थांपासून सुटका करण्यासाठी महाराजांनी सहकार सुरू केला. ग्रामोत्थानाचा समृद्धी मार्ग हा सहकार आहे, अनुदान नाही, कर्जमाफी नाही या विचाराची पेरणी महाराजांनी केली. त्यामुळे हा विचार घेऊन कोल्हापुरामध्ये सहकाराचा वृक्ष वाढला. घटना समितीचे सदस्य देशभक्त निमशिंग कशीगावचे रत्नाप्पा कुंभार, समाजसेवक तात्यासाहेब कोरे यांनी हा वृक्ष वाढवला आणि ज्या नाट्यगृहात, वास्तूत आपण आहोत ते या विभागाचे भाग्यविधाते सरकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर!
बारावे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, जयसिंगपूर
दिनांक : शनिवार, दि. ८ व रविवार, दि. ९ फेब्रुवारी, २०२५
स्थळ : युगात्मा शरद जोशी विद्यानगरी, सहकारमहर्षी शामराव
पाटील यड्रावकर नाट्यगृह जयसिंगपूर ता. शिरोळ जि. कोल्हापूर