नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
लेखनस्पर्धा 2023 साठी कथा
शीर्षक:- जिंदगानीच्या वाटनं
दुपारच्या पारी ऊन माथ्यावर आलं व्हतं. वत्सी भराभर गवत कापू लागली. रानातली वाऱ्यावर डोलनारी ऊसं पाहून बकुळीच्या तोंडाले पानी सुटलं. तिनं वत्सीले म्हणलं
"माय ओ माय, मले ऊस पायजे."
"गवत काढ गुमान आन् घरला चाल दिस डोक्यावर चढलाय. भाजीसाटी पलिकडल्या वाफ्यातले वांगे घे म्या मालकीनीले ईचारून ठिवलं हाये!" वत्सीनं तिच्याकडं न पाहताच म्हणलं
बकुळीचं मन खट्टू झालं. ती जागच्या जागीच खिळून उभी ऱ्हायली. वत्सीनं तिच्याकडं पाह्यलं लेकराच्या डोयातली आस तिले दिसली. ती मनात इचार करू लागली
"लेकरू कवाच तं काई मांगत न्हाई मातर ऊस घेतला तर मालकीन काई म्हणल का? हा इचार तिच्या मनात लखलखून गेला. तिनं पुन्हा इचार केला, काई म्हणलं तं गुमान आयकून घिऊ."
"बकुळे ऊस पायजेल व्हय थांब म्या आणते तू तवरोक वांगे घे तोडून." असं म्हणून वत्सी उसात शिरली.
ऊस भेटनार म्हून बकुळीची कळी खुलली. बकुळीच्या फुलावानी पांढरी फटक बकुळी आंगीकाठी वयाच्या मानानं लवकरच भरली व्हती. कोनीबी तिले पाह्यलं त घटकाभर डोये भरून पाह्ये. बकुळी लान लेकरसारकी उड्या मारत वांग्याच्या वाफ्याकडं गेली. परकराच्या ओचित बकुळीनं वाफ्यातले वांगे खुडून घेतले. परकर वदर धरल्यानं तिच्या केवड्याच्या फुलावानी पिवया धम्मक असलेल्या पोटऱ्या उघड्या पडल्या व्हत्या. नागिनीसारका केसाचा शेपटा पाठीवर लोंबत व्हता. तिनं वांगे ओच्यात टाकले. बंधावरल्या झाडीत काहीतरी सळसळ आवाज झाला म्हून तिनं तिकडं पाह्यलं मातर काहीच दिसलं न्हाई. ती पुन्ह्यांदा वांगे खुडू लागली. तिची नजर काकडीच्या येलाकडं गेली. लुसलुशीत काकड्या पाहून तिचं मन हरखून गेलं. ती म्होरं पाऊल टाकणार इतल्यात मागून कोणीतरी तिला गच्च आवळून धरलं. बकुळी जोरात आरडली
"कोण हाये.....सोडा... सोडा.
माय s s...ओ ... मायs s सोडा मले, सोडा s s s..."
बकुळीचा आवाज आयकून वत्सीच्या कायजात धस्स झालं. थे उसातून लगबगीनं भाहीर निंगली. लेकिले पाटलाच्या धाकल्या पोराच्या कचाट्यात पाहून वत्सीच अवसान गळालं. घटकाभर काय करावं तिले सुचलच न्हाई. वत्सीले पाहून भेदरलेल्या बकुळीले जरा धीर आला. तिले वाटलं माय आता ह्याची धडगत ठिवणार न्हाई. पण झालं येगळचं......
वत्सी हात जोडून पाटलाच्या वाया जायेल कार्ट्याले इनवू लागली,
"धाकले मालक!! सोडा लेकराले, बकुळी आजूक नासमझ हाये! ऐका मालक सोडा .....!"
बकुळी मायले असे हताश पाहून थक्क झाली. तिले वाटलं व्हतं का हातातला इळा घिऊन मायनं धाकल्या पाटलावर धावून येवाव. पण समदं उलटंच झालं. तिले मायचा लई राग आला. तिच्याच जनू धा हत्तीचं बळ आलं. तिनं समदा जोर लावून पाटलाच्या हाताले हिसडा दिला पण पाटलाच्या रांगड्या हातातून तिले सुटका करून घेता आली न्हाई. मंग तिनं त्येच्या हाताले कडकडून चावा घेतला. धाकल्या पाटलाच्या हातातून झनझन करत एक तिळक मस्तकात गेली. त्यानं वदर उचलून धरलेल्या बकुळीले खाली ठिवल अन् दोन पावलं मांग सरकला. वत्सीनं बकुळीले चटकन आपल्याकडं वढून घेतलं.
"आज माघार घेतोय पण म्या डाव साधनारच. कवातरी पाखरू जाळ्यात सापडलंच." पाटील मिशिवर ताव दिऊन बोलला.
पाटलाचा लेक निंगून गेला. थरथर कापनाऱ्या बकुळीले वत्सीनं पोटाशी धरलं. बकुळी मनातून लई भेदारली व्हती. तिचा हुंदका दाटून आला व्हता. बकुळीनं तिच्या डोस्क्यावरून हात फिरोला. बकुळीनं चटकन वत्सीचा हात दूर सारला. तिच्या मनात माय बद्दल राग खदखदत व्हता. तिचं आंग थरथरत व्हतं. तिनं मायले उलटजाब ईचारला,
"माय त्या धाकल्या पाटलांनं मले आसं धरलं आन् तू फकस्त पाह्यत ऱ्हायली?"
वत्सीनं बकुळीले शांत कऱ्यासाटी तिच्या खांद्यावर हात ठिवला पण बकुळीनं झटकन काढून फेकला. वत्सी तिच्या म्होरं होऊन म्हणली,
"पोरी जरा आयकून घे...."
बकुळी काईच आयकायच्या मनस्थितीत नव्हती. धाकल्या पाटलापेक्षा तिले मायचा जास्त राग आला व्हता. ती रागातच बोलली,
"मले काईच सांगू नोको, तुह्या हातात इळा व्हता ना मंग हात काहाले जोडले?"
बकुळीले समजावून सांगण्याच्या सुरात वत्सी म्हणली,
"बकुळे आपुन गरीब लोकं, मोलमजुरी करून पोट भरणारे. त्येत्यात आपुन दोघीच आपल्या ना मांग ना म्होरं कोनी हाये."
बकुळी फनफनली "म्हून काय मंग.....?"
"पाटलाच्या नांदी लागून कसं चालन पोरी, सापाची जात हाये ते त्याच्या शेपटावर पाय देला तं ते डूक धरून बसत्याल. जगू बी देनार न्हाई आन् मरू बी देणार न्हाई. समद्या गावावर त्येची हुकूमत चालते."
"गावावर चालत आसन माह्यावर न्हाई चालनार? म्या न्हाई गप बसनार?" बकुळीचे डोये रागात लाल लाल झाले व्हते.
"मंग काय करनार तू गावात जाऊन बोंब ठोकशील व्हय? गावात तोंड दाखव्याले आपल्यालेच जागा ऱ्हायनार न्हाई. कोन खरं म्हनीन आपल्याले? गरीबाच्या इकून कोनी उभं ऱ्हात न्हाई. इसरली का तू ?? चंद्रि पाटलाच्या इरोधात बोलली व्हती तं काय झालं ते? गढी मांगलच्या वडाच्या झाडावर झुलत व्हती थे! गिधाडायांन लचके तोडले व्हते तिचे."
बकुळीच्या डोयासमोर वडाच्या झाडाले लटकलेली चंदरी दिसू लागली. आजूक किती चंदऱ्या आस्याच झुलनार हायेत?? बकुळीच्या डोसक्यात इचारचक्र गरगर फिरत व्हतं. काहीतरी कराय पायजे आसं चूप ऱ्हायलं त एकदिस पाटलाचं कारटं डाव साधनारच आन् इरोध केला तं ...... तिच्या डोयाम्होरं पुन्यानंदा चंदरी झुलू लागली. काय कराव आन् काई नाई या तंद्रीत आसतानाच वत्सीनं तिले हाक मारली.
"बकुळे उठ घरला जाऊ." गवताचा भारा बांधल्यावर वत्सी म्हणली.
बकुळी सोताले सावरून उठली आन् गवताचा भारा उचलून तिनं मायच्या डोसक्यावर देला. त्या दोघी पांदन तुडवत चालू लागल्या. बकुळीकडं एक नजर फिरवत वत्सी म्हनली,
"बकुळे! जिंदगानीच्या वाटनं असले लई परसंगं येत्यात धीरानं ऱ्हाय!
बकुळीची पावलं मंदावली तशी ती मांग पडली. मायच्या पावलावर पाऊल ठिवून चालताना तिला पावलं जड झल्यागत वाटू लागली. मांग पडलेल्या बकुळीकडं पाहत वत्सी म्हनली
"कनचा इचार करून ऱ्हायली...?"
बकुळीनं मायच्या परसनाचं उत्तर देलं न्हाई मातरं तिच्या डोसक्यात बंडखोरी जलम घेत व्हती. तिचे पावलं जिंदगानीची येगळी वाट शोधू लागले.
निशा डांगे/नायगांवकर
पुसद
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते आहे असे वाटत नाही.