Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***स्वानुभवाचा वैश्विक आविष्कार: 'चांदणभूल'

लेखनविभाग: 
पुस्तक समीक्षण

लेखनस्पर्धा

समीक्षण-रसग्रहण स्पर्धा 2023 विभाग अ
ललीतलेख संग्रहाचे पुस्तक समीक्षण

स्वानुभवाचा वैश्विक आविष्कार: 'चांदणभूल'

ललित लेखन म्हणजे काय? या प्रश्नाचे नेमके उत्तर देता येणार नाही कारण ललित लेखनाची निश्चित अशी कुठलीही व्याख्या मराठी वाङमयात नाही. प्रत्येक व्यक्तिपरत्वे आणि साहित्यकृतीपरत्वे ललिताची व्याख्या बदललेली आहे. कधी प्रतिकात्मक भाषिक सौंदर्याने नटलेल्या ललितास स्वानुभवाचे भरते आलेले असते तर कधी त्यात मुक्तचिंतन असते. लक्षण तांबोळी म्हणतात,
"ज्या अनुभूतीने मन झपाटलेले असेल, त्या अनुभूतीने आपसूक धारण केलेला रुपाविष्कार म्हणजे ललित लेख."

वरील व्याख्यांच्या सिद्धतेला प्रमाण देणारा व स्वानुभवाचा वैश्विक आविष्कार काव्यात्मक शैलीतून, भाषा सौंदर्याने नटलेल्या मुक्त चिंतनातून वाचकांना समर्पित करणारा ललित संग्रह म्हणजे विजयकुमार मिठे यांचा 'चांदणभूल'!

'चांदणभूल' या चित्तवेधक आणि मनमोहक शिर्षकानेच मनाला भुरळ पडते. मातीतून शब्दचांदण्यांचे पीक घेणारे कृषिनिष्ठ साहित्यिक विजयकुमार मिठे यांची आजवर एकूण अठरा पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. ग्रामीण कथाकार म्हणून साहित्य क्षेत्रात सुप्रसिद्ध असलेले मिठे यांनी ललितलेखनातही आपल्या वैशिष्ट्यपूर्ण लेखनशैलीने आपला वेगळा ठसा निर्माण केला आहे. हाडाचे शेतकरी असलेले विजयकुमार मिठे यांनी आपल्या शेतकरी असल्याचे भांडवल आपल्या लिखाणातून कुठेही केलेले नाही. उलटपक्षी शेती मातीत राबत असतांना त्यांना आलेल्या जीवनानुभवनातून त्यांचे साहित्य फुलत गेले, बहरत गेले. त्यांच्या लिखाणात काळजातील आभाळओल दाटून येते तसेच शेतीवर घातलेल्या बांधाप्रमाणे संयमशीलताही आढळते. शब्दांच्या वारूवर स्वार होऊन मनातील सुप्त भावना ते चौफेर उधळतात तर कधी शब्दांची लगाम करकचून आवळून घेऊन उधाणलेल्या भावभावनांना ते कुशलतेने रोखून ठेवतात. नाशिक जिल्ह्यातील पालखेड येथे वास्तव्यास असलेल्या विजयकुमार मिठे यांच्या भाषाशैलीत ग्रामीण दख्खनी भाषेचा खास लहेजा आढळतो. 'घोंगट्याकोर', 'कादवेचा राणा' 'बुजगावणं', 'मातीमळण' हे त्यांचे गाजलेले कथासंग्रह आहेत. व्यक्तिचित्रण, श्रुत्तिका लेखन, एकांकिका असोत वा कथा, कविता, लेखन असो विजयकुमार साहित्याचा प्रत्येक प्रकार आपल्या लेखणीतून सहजपणे साकारतात. आशयघन ओघवती, देखणी शब्दकळा हे त्यांच्या लेखनशैलीचे वैशिष्ट्य आहे. ग्रामीण भागातील साहित्यकरांचे साहित्य वाचकांपर्यंत पोहचवण्यासाठी त्यांनी कादवा शिवार हे मासिक तर साहित्यकृतींना पुरस्कृत करण्यासाठी कादवा प्रतिष्ठानची स्थापना केली.

आभाळमनाच्या चांदणअक्षरांतून वाचकांच्या मनात झिरपत जाणारा 'चांदणभूल' हा त्यांचा दुसरा ललितसंग्रह आहे. यापूर्वी आलेल्या 'आभाळओल' या ललित संग्रहातून विजयकुमार मिठे यांनी आपल्या लालित्यपूर्ण शैलीची छाप वाचकाच्या हृदयावर सोडली होती. त्यानंतर 'चांदणभूल' या ललित संग्रहातून तर त्यांनी साहित्यविश्वात आपले एक वेगळे अढळ स्थान निर्माण केले आहे.

ललित लेखनाची सर्व मूल्ये जोपासणारा 'चांदणभूल' ललित संग्रह आगामी पिढीसाठी सर्वोत्कृष्ट ललित लेखनाचा आदर्श नमुना आहे.
'चांदणभूल' या ललित संग्रहातून विजयकुमार मिठे यांच्या भाषाशैलीचा स्वतंत्रपणे अभ्यास करावा इतपत त्यांनी आपली भाषा समृद्ध बनवली आहे. त्यांच्या भाषाशैलीचा अभ्यास करण्यासाठी 'चांदणभूल' मधील 'चांदणभूल' या शीर्षक लेखाचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या बी. ए., बी. कॉम, बी. एससी प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलेला आहे. बरेच विद्यार्थी स्वतंत्रपणे विजयकुमार मिठे यांच्या साहित्यावर पी. एच. डी, एम.फील करीत आहेत. 'चांदणभूल' या ललितसंग्रहास आजवर महाराष्ट्र साहित्य परिषद,शाखा सिन्नर (नाशिक)यांचा "साहित्य सेवा" राज्यस्तरीय वाड्मय पुरस्कार, मराठी साहित्य प्रतिष्ठान जामखेड यांचा राजे संभाजी राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार, शब्दगंध साहित्यिक परिषद अहमदनगर यांचा 'राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार, पदमगंधा प्रतिष्ठान नागपूर यांचा 'विमलताई देशमुख ललित साहित्य पुरस्कार' अशा एकूण चार राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित आहे.

कविवर्य ग्रेस यांच्या 'चर्चबेल', 'मितवा', ओल्या वेळूची बासरी', इ. ललितलेखनाची पारायणे झाल्यावर तसेच इंदिरा संत, इरावती कर्वे, अनंत काणेकर, मारुती चितमपल्ली,वपु काळे, रवींद्र पिंगे, मधु मंगेश कर्णिक यांचे ललित माझ्या मनावर कायम अधिराज्य करीत असल्यावर माझ्या मनाला दुसऱ्या कुठल्याही ललित लेखकाच्या ललितलेखनाची भुरळ पडणार नाही असे मला नेहमी वाटत असे. परंतु एक दिवस अचानक 'विजयकुमार मिठे' यांचा 'आभाळओल' हा ललित संग्रह माझ्या वाचनात आला. तेव्हा त्यांच्या लालित्यपूर्ण शैलीची आभाळओल आपसूकच माझ्या मनात रुजली. त्यानंतरचा 'चांदणभूल' माझ्या हातात आला, त्याची तीनदा पारायणे झाल्यावरही मनाची वाचनतृप्ती झाली नाही.

विजयकुमार मिठे यांच्या नावापुढे असलेले 'ग्रामीण लेखक' हे बिरुद त्यांच्या ग्रामीण लेखन समृद्धीच्या मास्टरकीचे भूषण आहे. चांदणभूल ललित लेखनातून त्यांनी आपल्या बालपणीच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. रम्य ते बालपण म्हणत वाचक त्यांच्या बालपणातील खोडकर आठवणीत देहभान विसरून रममाण होतात. संपूर्ण गावगाड्यातील जीवनचित्र रेखाटतांना त्यांनी वाचकांची मनेही त्यात रेखाटली आहेत. वाचक 'चांदणभूल' च्या भुलाव्यात पडून स्वतःला हरवून बसतात. वाचकांची मने आकर्षित करण्याची अफाट किमयागिरी विजयकुमार मिठे यांच्या शब्दांत आहे. चांदणभूलला अरविंद शेलार यांचे मनाला भुरळ पडणारे मनमोहक मुखपृष्ठ लाभले आहे. कृष्णकुमार सोनवणे यांनी आपल्या सुरेख रेखाटनातून प्रत्येक लेखाचा आशयगर्भित गाभा चित्रित केला आहे. सुप्रसिद्ध समीक्षक व प्रस्तावनाकार विवेक उगलमुगले यांची प्रत्येक लेखाचा आढावा घेणारी प्रतिभासंपन्न प्रस्तावना लाभली आहे.

'चांदणभूल' निसर्ग सौंदर्याने ओतप्रोत आणि शाब्दिक अलंकाराच्या समृद्धीने नटलेला ललितसंग्रह आहे. यात लेखकाने बालपणीच्या हळव्या आठवणी तसेच बदलत्या आधुनिक जीवनमानामुळे हरवत चाललेल्या ग्रामीण जीवनमूल्यांची हुरहूर मांडली आहे. 'चांदणभूल' या पहिल्या लेखात लेखकाने बालविश्वातील निर्माण झालेले आभाळाचे नाते अजूनही उराशी जपलेले आहे. आकाशातील चंद्र आपला मामा तर आभाळ नात्याने चांदणी आपली 'चांदमामी' लागते का? हा प्रश्न त्यांच्या भाबड्या बालमनाला पडत असे. चंद्रप्रकाशात शेतात उपणवट चालत असे त्यावेळी लेखकाने केलेले आभाळ आणि चंद्राचे वर्णन त्यांच्याच भाषाशैलीत बघूया!

'एखाद्या उंच माणसाने हातात कंदील घेऊन उजेड दाखवावा तसं आभाळ चंद्र घेऊन उभं असलेलं दिसायचं'

'चिखलात तोल जाऊन पडलेल्या पोरागत काळ्या ढगात सापडलेल्या चंद्राची गत व्हायची'

आभाळ वैभवाची परिचिती देणारे तिकाडं, विंचू, बाज, सुक असे परिचित संदर्भ त्यांनी दिले आहेत. आभाळातील कमी होत जाणाऱ्या चांदण्यांची सांगड त्यांनी आपल्या वाढत्या वयाबरोबर कमी होणाऱ्या केसांसोबत घातली आहे. आकाशातील तुटता तारा बघणे अशुभ असते हे बालपाणापासून त्यांच्या मनावर बिंबवलेले आहे तरी आजही ते चुपचाप तुटता तारा बघून आपल्या मनातील इच्छा मागून घेतात.

"सोनपिवळ्या फुलांची बाभूळ" या लेखात त्यांनी काटेरी रुक्ष बाभळीचे वर्णन एखाद्या मनमोहक चाफ्याच्या झाडाला लाजवेल इतके अफाट सुंदर केले आहे. विजयकुमार मिठे यांच्या अलंकारिक शब्दांनी बाभळीच्या लावण्यात कमालीची भर टाकली आहे. मळईच्या शेतात मधोमध हिरवी चोळी, पातळ नेसलेल्या पोक्त घरंदाज बाईसारखी बसलेली बाभूळ त्यांच्या जीवनात आशय समृद्धीचे द्योतक बनून आली आहे. बाभळीसारख्या दुर्लक्षित झाडाच्या वार्धक्याची सुंदर पखरण त्यांनी आपल्या हृदयस्पर्शी लेखणीतून शब्दांकित केली आहे. या बाभळीच्या सानिध्यातील त्यांच्या आठवणी वाचकांच्या मनात घर करून बसतात.

'गोष्टी रंगल्या ओठी' या लेखात त्यांनी शेवटपर्यंत वाचकांची उत्कंठा टिकवून ठेवली आहे. तारुण्यसुलभ वयातील पोरकटपणाच्या परंतु मनाला चटका लावून जाणाऱ्या आठवणी लेखकाने या लेखात मांडून स्वतःच्या मनाचे आभाळ रिते केले आहे. लेखक आणि त्यांची बालमैत्रीण सलमा यांची निखळ मैत्री धर्म, जात, लिंग यांना न जुमानता मनाची निरागसता आणि पवित्रता जपते. गुलतूऱ्याची पानं आणि शेवरीचा कात यापासून बनविलेला पानविडा चावून एकमेकांच्या अंगावर नवीन नवरा, नवरीने हळद उतरवतांना खोबरं खाऊन पिचकाऱ्या माराव्यात तशा पिचकाऱ्या मारणे, यातून दोघांची अल्लडता दिसून येते. त्यानंतर खाल्लेला मार आणि वाढत्या वयाबरोबर आलेल्या सलमाच्या मैत्रीतला दुरावा वाचकांनाही दुःखी करतो. शेवटी कमी वयात झालेले सलमाचे लग्न आणि तिचा मृत्यू मनाला चटका लावून जातो. मन कितीतरी वेळ सुन्न होऊन हळहळतं.

'दिवाळी त्याच्या डोळ्यातली' या लेखात गरीब गणप्या परिस्थिती समोर हतबल होऊन मामुली फटकड्यांसाठी इतर मुलांसमोर हात पसरतो. फोडलेल्या फटाक्यांची बारुद जमा करून ती पेटवून त्याच्या उजेडात आनंदाने हरखून जातो. लेखकांनी कितीदाही हाकलून दिले तरी त्यांच्या दाराशी घुटमळतो. लेखकाचे वडील गणप्याला दरवर्षी फटाके द्यायचे यातून ते गरजवंताला मदत करणे शिकले. गणप्याला अद्दल घडवून त्यांनी क्षणिक अघोरी, असुरी आनंद मिळवला परंतु त्याची बोचरी सल त्यांच्या काळजात आजही सलते. या लेखाचा सखोल अभ्यास केल्यावर लक्षात येते की, लेखकाने ग्रामीण जीवनातील गरिबीचे वास्तव व विदारक चित्रण मांडले आहे.

'टेलरीनचा सदरा' या लेखात त्यांच्या वडिलांनी आणलेला टेलरीनचा सदरा घालण्यासाठी त्यांची आई त्यांना शेतात राबवून घेते. आयुष्यात कोणतीही गोष्ट कष्टाशिवाय सहजासहजी मिळत नाही ह्याची जाणीव त्यांना या प्रसंगातून झाली. गरिबीची रखरखती झालर लेवून आलेल्या ह्या आठवणी शेवटी टेलरीनच्या कपड्यासारख्या मऊसूत होतात. या लेखात आंतरिक ओढ, नाट्यमय प्रसंगातील रंजकता आणि जीवनभुवनातून आलेले शहाणपण यातून लेखकाने वाचकांची उत्सुकता ताणून धरली आहे. छोट्या छोट्या प्रसंगाला दिलेल्या कलात्मक कलाटणीने लेखाला एका उंचीवर नेऊन पोहचवले आहे.

'गुपित बाबाचा डोह' या रहस्यमय लेखात त्यांनी जुन्या अंधश्रद्धा व खुळचट कल्पना पिढीगत कशा पसरत जातात हे दाखवले आहे. मानवी मनातील लोप पावत चाललेली संवेदनशीलता, अगतिकता त्यांनी या लेखात अधोरेखित केली आहे.

'जुनं ते सोनं' या लेखात लेखकांनी त्यांच्या जुन्या मैत्रिणीशी पुन्हा मैत्री केली. तिच्या सहवासात माळरानातून फेरफटका मारत उरलेल्या आयुष्याचा आस्वाद घेत त्यांनी बिघडलेली प्रकृती ठणठणीत बरी केली. प्रत्येकाने 'सायकल' या जुन्या मैत्रिणीशी मैत्री करून ती शेवटपर्यंत टिकवून ठेवण्यातले फायदे त्यांनी अतिशय लालित्यपूर्ण भाषेतून सहजपणे सांगितले आहेत.

पडतीच्या काळात ज्या बैलांनी जीवापाड कष्ट करून त्यांना साथ देऊन त्यांचं शिवार फुलवलं, तीच बैलं आता निकामी झाल्यावर त्यांचे कुटुंब बैलं विकण्याचा निर्णय घेते. त्यावेळी त्या मुक्या जीवासाठी लेखकाच्या मनात दाटून आलेला गहिवर, त्यातील हळवे प्रसंग मनाला हुरहूर लावून जातात. विकास आणि प्रगतीच्या नावाखाली होणारी मुक्या प्राण्यांची दैनावस्था 'गहिवर बैल विकतानाचा' या लेखातून त्यांनी मांडली आहे.

'ये रे ये रे पावसा या बालगीताने सुरुवात झालेला 'पावसाचं काही देणं लागतो' हा लेख सर्वांना बालपणीच्या सुखद आठवणीत रममाण करतो. दोन्ही हातांनी भरभरून देणाऱ्या पावसाने आज अचानक पाठ का फिरवली ह्याचे चिंतनशील विवेचन त्यांनी या लेखातून मांडले आहे.

'रानमेवा' या लेखातून अस्सल रानमेवा मिठेंच्या भाषिक सौंदर्याने सालंकृत झालेल्या ग्रामीण बोलीतून चाखण्याचे सुख काही औरच!

'बिन पैशाचा आनंद' आणि 'फोटोवाला' या लेखातून त्यांनी निखळ आनंदाच्या तुषार सिंचनातून वाचकांची मनं चिंब भिजवली आहेत. आजकालच्या मुलांचं हरवलेलं बालपण पाहून मनाला ज्या वेदना होतात त्या वेदनांवर मिठेंचे हे लेख हळुवार फुंकर घालतात. हे लेख लहान मुलांना पालकांनी आवर्जून वाचून दाखवायला हवेत.

एखाद्या चित्रपटाचा हृदयस्पर्शी शेवट काळजाला चटका लावून त्यावर विचार करायला भाग पाडतो, तसा चांदणभूल मधील शेवटचा लेख 'गावपण हरवलेलं गाव' काळजात खोल खोल रुतून बसतो. गावाच्या गल्लीबोळातून आपणही लेखकासोबत फिरायला लागतो. गावची संस्कृती, सभ्यता, जीवास जीव देणारा जिव्हाळा, माणसाचे माणूसपण जपणारी नाती ह्याचे यथार्थ दर्शन घडवत शेवटी टि. व्ही., मोबाईल या सोशल मीडियाने पार ढासळून टाकलेल्या गावगाड्याचे विदारक चित्रण रेखाटतांना लेखकाने काळीज ओतले आहे.

'चांदणभूल' मधील सर्वच लेखामध्ये प्रसंग चित्रण करतांना आभाळमनातील भावभावनांचा चांदणचुरा लेखकाने बेमालूमपणे उधळला आहे. चांदणरातीत मनाला चांदण भुलव्याची जशी भुरळ पडते तशी वाचकाला 'चांदणभूल' या ललित संग्रहाची भूल पडते.

ललित लेखन हा साहित्यातील फार अवघड प्रांत आहे. आजच्या धकाधकीच्या काळात इतक्या हळव्या भावभावनांची हळुवार गुंफण करण्यास लेखकांना साधत नाही. त्यासाठी आयुष्य मोजावे लागते. शब्दांच्या रेशीम बंधात वाचकांची मने अलवारपणे गुंफण्याचे अनन्य साधारण कौशल्य विजयकुमार मिठे यांना साधलेले आहे. आजच्या व्यावहारिक जगात मानवी जीवनाची नीतिमूल्ये जपणे ही काळाची गरज आहे हे सहजपणे त्यांनी वाचकांच्या मनावर बिंबवले आहे.

लेखकाचा ललित लेखनात चांगलाच हातखंडा आहे तरीही सुचवावेसे वाटते 'चांदणभूल' हा ललित लेखसंग्रह नसून तो विजयकुमार मिठे यांचा आत्मकथनात्मक ललितकथा संग्रह आहे. स्वानुभवाचा मुक्त आविष्कार आहे. त्यामुळेच वेगळे आत्मचरित्र किंवा आत्मकथन लिहिण्याची गरज लेखकाला भासत नसावी. प्रत्येक कथेत एक स्वतंत्र कथाबीज आहे. प्रत्येक कथेतून ग्रामीण जीवनाचे समग्र दर्शन घडविणाऱ्या ग्रामीण शब्दांची एक स्वतंत्र सूची लेखकाने संग्रहाच्या शेवटी किंवा प्रत्येक पाठांतर जोडावी. ही दुरुस्ती त्यांनी पुढच्या संग्रहात नक्कीच करावी.

विजयकुमार मिठे यांना पुढील साहित्यिक वाटचालीस अनेक हार्दिक शुभेच्छा!

समीक्षक:- निशा डांगे/नायगांवकर
पुसद
संपर्क:- 8329065797
चांदणभूल:- ललितसंग्रह
लेखक:- विजयकुमार मिठे
संपर्क:- 9881670204
मुखपृष्ठ:- अरविंद शेलार
प्रकाशक:-अक्षर वाड्मय प्रकाशन पुणे
पृष्ठसंख्या:- १२०
मूल्य:-१२० रू/

Share

प्रतिक्रिया