नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
कथा ...
*धग ...*
लेखक : *सचिन शिंदे*
दसरुनं शेतावर नजर फिरवली. ऊसानं शेत अगदी भरून दिसू लागलं.बांधावर बसून त्याने मनातल्या मनात हिशोबही करायला सुरुवात केली. तसा पावलांचा झपझप आवाज त्याच्या कानी आदळला. भलीमोठी मान वळवून दसरूनं पाठीमागे पाहिलं.पाटलांचा गडी सदा जोरात घराच्या दिशेने पावले उचलत होता. दसरूनं आरोळी ठोकली,
"ये ... सदया ..."
तो आपल्याच नादात.
पुन्हा आरोळी.
"अरे ... ये सदया ..."
सदा दबकला, त्यानं पाहिलं दसरु आपल्याला बोलावतो ते. पण, ऐकून न ऐकल्यासारखं तो चालतच होता. पण,त्याचा आता नाईलाज झाला.त्यांना विचारलं, " " कायरे दसरु दा " ?
"आरे हिकडं ये".
कशाला ? सदा बोलला.
"आरं हिकडं ये बाबा अगुदर".
"पण मला लय घाई हाय रे दसरू दा". सदा कळवळ्याच्या स्वरात बोलला.
"कशाची घाई करतो रे सदया ?
ये हिकडं तंबाखू खाय.ये लवकर".
तंबाखू म्हटल्यावर सदा तसाच दसऱ्याच्या शेताच्या बांधावर येऊन बसला.दसरुनं खमिसातून छोटी पिशवी काढली. त्यातून त्यांनं चुन्या तंबाखूची डबी काढून सदाच्या तळहातावर ठेवली. थोडा तंबाखू अन त्याला चुना लावून त्यानं तो हातावर मळला आणि तोंडात टाकला.
तसा दसरु ऐटीत म्हणाला,
"सदया आवंदा किती टन व्हईल रे ऊस" ?
सदानं दसरुकडं पाहिलं अन ताडकन जाग्यावरच उठून उभा ऱ्हायला. कपाळावर आडवा हात आणून त्याने दूरवर पसरलेल्या ऊसावर नजर फिरवली अन् बोलला,
"दसरु दा ह्यावर्षी लक लागली गड्या तुझी "?
"कस काय म्हणतोस" ?
दसरुनं उत्सुकतेने विचारलं.
आरं तुझा ऊसंचं यावर्षी हाय तसा".
"काय म्हणतोय काय"? दसरूची उत्सुकता ताणली.
"व्हय तर दसरू दा, सदा बोलला.
"मग सांग की लेका, तुझा अंदाज किती टन ऊस व्हतो ते" ?
तसा सदा थोडा वेळ विचारात मग्न झाला. अन् त्यानं सांगून टाकलं, दीडशेक टन व्हईल, दसरू दा समदा धरून."
"एव्हढा होईल "?
सदाच्या हातावर सुपारीचे खांड देत दसरूनं विचारलं.
"झालाच समजा," सदानं पुष्टी दिली.
दीडशे टन म्हटल्यावर दसरु आनंदला. त्याच्या पोरानं राबून राबून ऊसाची आतोनात काळजी घेतली होती.
"बरं तू कुठं एव्हढ्या घाईत निघालास"?दसरूनं विचारलं, "आरं इसरलोच च्यामायला,मोटार बंद झाली व्हती,जाऊन सुरू कराया पाहिजे. असं म्हणत सदा झपाट्याने निघाला.
सदाचे शब्द दसरूच्या कानात घुमू लागले. चार एकराच्या तुकड्यात दसरूचं पोरगं शिवराम हे ऊसाची राखण करायचं. मोकाट जनावरापासून वाचवायचं. त्याची काळजी घ्यायचं.कधी मोटर बंद पडली तर चालू करून रात्री-बेरात्री रानात झोपायचं. पोरांना केलेले कष्ट आता दसरूच्या डोळ्यासमोर तरळू लागलं. तसाच तो ताडकन उठून घराच्या दिशेने चालायला लागला.
संध्याकाळ झाली. दसरूनं पायावर पाणी घेतलं,तसाच तो बैलांच्या गोठ्यात गेला. बैलापुढे चारा टाकून तो परतला. मधल्या घरात देवापुढे दिवा लावलेला होता. दसरुनं अगरबत्ती लावून देवापुढे डोकं टेकवलं.तोपर्यंत घरातून चहाही आला. कपातला चहा बशीमध्ये ओतून दसरूनं पिला. बशीतून चहा पिताना ओल्या झालेल्या मिश्या त्यांनं खांद्यावर शेल्यानं पुसल्या.
पोरगं थकलं, याची जाणीवही दसरुला झाली, पण न राहूनही त्यांना शिवरामला विचारलं, "शिवराम, ऊसाच्या पाण्याचा फेर कवा संपल"?
त्यांनं आतूनच उत्तर दिलं,"संपल की उद्या परवा."
"आता हा फेर संपला की, ऊसाचं पाणी थांबवू गड्या."
"कामून अजून एक फेर होऊ द्यावं म्हणतो मी." शिवराम म्हणाला.
"नको रे बाबा,आज-उद्या ऊसाची तोड कारखान्याकडून येईल." तवा रान वाळलं पाहिजे,रानात गाडी गेली पाहिजे, म्हणून मी म्हणतो, आता पाणी थांबवायला हवं."दसरु म्हणाला.
''पर कवा रं बा, ही तोड यायची ? याची काय तारीक फिरिक."
"तसं काईच सांगता येत न्हाई." दसरु बोलला.
बराच वेळ बापलेकाचं बोलणं झालं अन शिवराम बाहेर पडला.
दसरुनं भिंतीला मान टेकवली. डोळे मिटले. आणि विचारात गुंतला.मोठ्या पोरीचं लग्नाचं कर्ज अजून डोक्यावर व्हतं.लहान पोरगीबी लगनाला आली व्हती. तिच्याही लगनाची घाई दसरुला झाली व्हती. त्यामुळे यावर्षीच्या ऊसाच्या पिकावर त्याचं पुढलं नियोजन अवलंबून होतं. थोरल्या पोरीच्या लगनानं बराच कर्जाचा डोंगर त्याच्या ऊरावर चढला होता. मात्र यावेळी ऊसाचं चांगलं बहारदार पीक आल्यामुळे यातून आपण बाहेर येऊ,असा त्याला विश्वास होता.
"बा,ताट वाढलय."धाकटी पोरगी म्हणाली.
जोराचा श्वास टाकून दसरू जेवायला बसला. का ? कुणास ठाऊक ? आज तो हात राखून जेवला.
सरपंचाकडं ऊसाच्या तोडीची माहिती विचारतो असं म्हणून तो घराबाहेर पडला. मारुतीच्या मंदिराला वळसा घालून सरपंचाच्या घराकडे तो आला. येताना बाहेरूनच त्यांनं मारुतीला हात जोडले. व मनात काहीतरी पुटपुटला.
दाराच्या पुढं जाऊन त्यांनं बाहेरूनच आवाज दिला, ''सरपंच सायेब, हायत का घरात ?
"या,आत या दसरु काका." आतमधून एकजण बोलला. बाहेर चपलांची गर्दी बघून बरीच माणसं घरात असल्याची जाणीव दसरुला झाली.
तो बैठकीत गेला. सगळ्यांना राम राम घातला व भिंतीला टेकून बसला. सरपंच आलेल्या माणसांसोबत चर्चेत मग्न आहेत हे त्यांना ओळखलं. बऱ्याच वेळानं सरपंचाच लक्ष त्याच्याकडं गेलं. त्यांनी विचारलं,
"काय दसरु काका,कसं काय येणं झालं ? आज अचानक ?
"काय न्हाई ऊसाच्या तोडीबद्दल इचारावं म्हणून आलतो."
"बर - बर. सरपंच उच्चारले.
काय माहित हाय काय एवढ्यात कधी येईल ते ? दसरुनं हळूच विचारलं.
" न्हाई हो काका, उद्या मी कारखान्याला जाणार हाय, तवा सगळी माहिती काढून उद्याच्याला सांगतो."
"बर - बर." म्हणत दसरूनं मान डोलावली,आणि परतला.
सरपंच तालुक्याच्या कारखान्याला जाऊन आले, पण ऊसाची तोड कधी येईल याची माहिती अजून तरी दसरुला मिळाली नव्हती. दसरु नित्यानं सरपंचाकडं विचारपूस करायचा. त्याला अपेक्षित असं उत्तर तरी सरपंच देत नसल्यानं त्याचा भ्रमनिरास व्हायचा. एक-दोन वेळा स्वतः दसरु कारखान्याकडे जाऊन आला.मात्र त्याला तिथं काहीच थांगपत्ता लागला नाही. ऊसाच्या कारखान्याकडं आलेल्या गाड्या, ट्रक, ट्रॅक्टर बघून दसरु आपलाही ऊस लवकर कारखान्याला गेला पाहिजे याच काळजीत होता. परंतु अपेक्षित अशी वेळच आली नाही.
दिवस लोटत होते. दसरुनं ऊसाला पाणी द्यायचंही थांबवलं होतं.उन्हाच्या झळा उसाला सोसवत नव्हत्या. त्यामुळे ऊसाचा रंग पिवळाशार पडत चालला होता. तोडीच्या नादी लागून आपण ऊसाचे वजन घटवत आहोत, याची त्याला पुरेपूर जाणीव होती.मात्र आता दिवसही राहिले नव्हते. त्यामुळे त्याला ऊसाची तोड व्हावी असं कळकळून वाटत होतं.
त्यांनं पुन्हा कारखान्याच्या साहेबाला भेटावं म्हणून सरपंचाला बरोबर घेऊन तो तालुक्याला आला. सरपंच सोबत असल्यामुळे साहेबांनी लवकर भेट झाली.
साहेबांच्या कार्यालयात दसरु सरपंचांना घेऊन शिरला. सरपंच सोबत असल्याने साहेबांनाही भेट नाकारता आली नाही.
दसरूनं साहेबाकडे बघितलं अन राम राम ठोकला.
साहेबांनं मान उचलली व कामात मग्न असल्याची जाणीव करुन देत म्हणाले,"बोला,काय अडचण ?
"सायेब आमची तोड आली नाही, ऊस जागच्या जागीच वाळायला लागलाय. तव्हा तोड लवकर येईल तर बरं होईल साहेब. ऊस वजनदार भरल.आणि आमची चिंताही मिटल." दसरु केविलवाणा होऊन म्हणाला.
साहेबानं सरपंचाकडं पाहिलं. सरपंच काहीच न बोलता खाली मान घालून बसले होते. साहेब समजुतीच्या स्वरात बोलले,"हे बघा काका, उद्या परवा तुमच्या ऊसाची तोड पाठवतो. तुम्ही काही काळजी करू नका.
साहेबानं चष्म्यातून सरपंचाकडे पाहिलं. सरपंचानंही साहेबांना नजरेतूनच खुणावलं, दसरुला याची तसूभरही कल्पना नव्हती.
दसरूनं पुन्हा विनवणी केली, "सायेब, जरा लवकर पाठवा हं, गरीबाचं पुण्य लागंल तुम्हाला."
"हो ...हो ...काका,तुम्ही निश्चिंत होऊन जा. आठ दिवसात तुमची तोड येईल."
दसरु माघारी फिरला. ऊसाच्या पिकावरचं तेज काळवंडून चाललं होतं.याची त्याला खात्री होती. परंतु त्याचा नाईलाज होता. कारखान्याची माणसं येऊन कधी ऊस नेतील याची तो चातकासारखी वाट पाहत होता.
दिवसांमागून दिवस वाऱ्यासारखे धावत होते, मात्र कारखान्याची माणसं काही येत नव्हती. त्यामुळे दसरु व त्याचा परिवार हतबल झाला होता. थोरल्या पोरीचं लग्नाचं कर्ज आणि धाकट्या पोरीचं लग्न या गहन विचारात तो दिवस ढकलत होता.
सरपंचाशी चर्चा करून काही उपयोग नाही, याची त्याला आता खातरजमा झाली होती. त्यामुळे तो पुन्हा कारखान्याच्या वाटेला लागला.
गाडीत बसून कारखान्याचं कार्यालय गाठलं. साहेबांच्या कार्यालयात माणसांची गर्दी होतीच. तेव्हा त्यांनं बाहेरूनच थांबून काही वेळ वाट पाहिली. मात्र गर्दी बाहेर येत नाही हे त्याच्या लक्षात आलं तेव्हा दसरूच आत मध्ये शिरला. सर्वांच्या नजरा त्याच्यावर खेळल्या. त्यांनं आतल्या माणसांच्या चेहऱ्याकडे पाहिले. काळवंडलेले चेहरे, उदासवाणी माणसं पाहून दसरूचं डोकं गरगरायला लागलं. मात्र तो न घाबरता तसाच उभा होता. आलेली माणसे सुद्धा आर्जवाच्या स्वरात विनंत्या करीत होती. तेव्हा धीर धरून त्यानं साहेबाला विचारलं,
"सायेब तुम्ही तोड येते म्हणालात, पण तोड आलीच नाही साहेब."
साहेबानं काहीच न बोलता मान टेबलावर टेकवली. दसरू आता खचला. गर्भगळीत झाला. त्याचा चेहरा पार उतरला. प्रचंड कर्जाचा डोंगर त्याच्या नजरेसमोर दिसू लागला. तरी पण त्यानं पुन्हा विचारलं,
"सायेब आमचं ऐकून तुम्ही घेणार का नाही ?"
बऱ्याच वेळापासून गप्प बसलेले साहेब बोलले, हे बघा काका आमचे कारखान्याचे कामगार नाहीत. जे होते ते पळून गेलेत तेही सापडत नाहीत. त्यामुळे तुम्ही स्वतः माणसे व कामगार लावा आणि ऊस तोडून कारखान्याला पाठवा,कळलं.
दसरु चक्रावला. त्याला पुन्हा निराश मनाने परतावे लागले.
आता हिवाळा संपत आला होता. त्यामुळे कधी उन्हाळ्याची चाहूल येईल याची काही शाश्वती नव्हती. शेतात गाडी व ट्रक जाणार नाही याची कल्पना दसरुला होती. त्यामुळे तो अधिकच बुचकळ्यात पडला होता. विचारात गुंगू लागला होता. व मार्ग शोधण्याचा प्रयत्न करु लागला.
संध्याकाळ झाली. त्याच्या डोक्यात विचारांचं वादळ घोंगावू लागलं. त्यांनं तडक शेताचा रस्ता धरला. एकटाच तो झपाटल्यासारखा शेताच्या दिशेने चालला. मनात विचारांचं मोहोळ घोंगावत होतं. कर्जाचा विचार जीव पोखरून खात होता. काही सुचेनासं झालं होतं. बधिरता वाढली होती.
दिवस मावळला. आकाशात पश्चिमेला तांबूस पट्टा तेवढाच दिसत होता. शेताच्या बांधावर येऊन दसरू थबकला. मनात हुंदका दाटून आला. डोळ्यात अश्रू तेवढे यायची राहिले. मात्र तो सावरण्याचा प्रयत्न करीत होता. त्याने त्याच्या खिशात हात घालून आगपेटी काढली. डोळे रागानं फरफरत होते. पुन्हा एकवार ऊसावर नजर फिरवली. आणि सर्व ऊसाच्या फडाला त्यांनं आग लावली. आणि एकच आक्रोश केला, ''इथे माणूस मेल्यावर उचलायला माणूस मिळेनात अन ऊस तोडून कारखान्याला पाठवायचा कुठून माणसं आणू."
त्याचा हुंदका दाटला. अश्रू आवरेनात. संपूर्ण ऊसाच्या फडात आता विस्तवाने हाहाकार माजवला. पेटत्या आगीच्या ज्वाला वेड्यावाकड्या होत आकाशाकडे झेपावू पाहत होत्या. धुरानेही प्रचंड अवकाश व्यापून टाकलं होतं. आणि त्या जळत्या ऊसाच्या आगीची धग दसरूच्या देहाला असह्य होत होती. प्रचंड झोंबत होती.
सचिन शिंदे
मुरली,उमरखेड
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने