नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
फासाचा पडला वेढा ...
रोजच्या प्रमाणे आजही तो निराश मनाने घराबाहेर पडला. एक-दीड वर्षापासून त्याचं भाग्य त्याला साथ देत नव्हतं. उन्हाच्या तीव्र झळा झेलत अनवाणी पायाने दुर्दैवी पावलं जमिनीवर पडत होती. हृदयात प्रचंड घालमेल सुरू होती. भूतलावरील धुळीचे उष्ण कण वातचक्राच्या मदतीने गगनाला भिडू पहात होते. त्यातच त्याची विचारप्रतिभा प्रवेश करून वरच्यावर घुटमळत बाहेर निघण्याचा अंतिम मार्ग कोणता असू शकतो ? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात मग्न ...
आतापर्यंत त्याला दूर ss कोठेतरी अनामिक स्थळी नेऊन पोहचवले होते. त्याला नेहमी साथ संगत करणारा हा मरूत, पवन, वात त्याला असा अवेळी धोका देऊ शकतो यावर त्याचा विश्वासच बसेनासा झाला ... भिरभिरत होती नजर ... आकाश - पाताळ एक झाल्यासारखे भासत होते. कधीही देवावर विश्वास न ठेवणारा , त्याची नेहमीच अवहेलना करणारा तो आज आपत्काली संकटमुक्त व्हावे म्हणून ईश्वराला प्रार्थनेतून भीक मागत होता. आज त्याच्या अस्तित्वाचे धागेदोरे तुटत चालले होते. गावाबाहेरच्या भग्न देवळावर नजर लावून अश्रूंचा अभिषेक परमेश्वराला वाहत होता. तो धुळीने पूर्णतः माखल्या गेला.
समोरच त्याला एक पक्षी घिरट्या घालताना दिसला ... विचित्र आवाज काढीत सावधानीचा इशारा करत असावा ... त्याचा सूर त्यालाही भेडसावत दुःखमग्न होऊन मुक्तीचे गीत गात होता. उदास अगदी ओलावल्या लोचनांनी हृदय पिळवटून निघाले होते. कुठवर ... कुठवर ही अवस्था पहावी ?
'आता कुठे मी जावे
सोडून जीव वेडा
कळले खरेच होते
फासाचा पडला वेढा' ...
जिवाची तगमग होताना उत्स्फूर्त लयींवर कवितेच्या मोहात तो पडला होता. 'ती'चं नि त्याचं घनिष्ठ नातं जुळून येत होतं. काट्याच्या टोकदार अनकुचीवर तो बसण्याचा असफल प्रयत्न करत होता. निष्पर्ण झालेली बाभळ त्याला सतर्कतेची खूण करत होती. तिच्या काळ्याठिक्कर खोडावर प्रेमाची झूल घातली गेलेली ... मुळांमध्ये अजूनही तग धरून राहण्याचं बळ होतं .वाटा - पळवाटा धूम ठोकत स्वतःच्या रक्षणाची उपाययोजना करत होत्या.
कुणीतरी मागून हाक दिली. त्याला काहीही दिसत नव्हते. कुठेतरी उंच टेकडीवर एक मंदिर ... बाजूला लाकडी पोलवर लावलेला फिक्कट पडलेला भगवा झेंडा फडकत होता ... प्रचंड मोठ्या दगडांचा डोंगर ... चोहीकडून वाळलेल्या गवताने वेढलेले ... तो निघाला त्याच्याच हरवलेल्या आत्मबलाच्या , उदात्त मनाच्या शोधात. दगड - गोट्यांचा खडतर रस्ता ... पाऊल ठेवले की तोल गमवायचा ... हृदयात जखमेचे व्रण घेऊन धडपडत मार्गक्रमण करत निघाला तो ...
'स्मशानात जळते गाणे
थोडाही शिडकावा न ओला
तू तुझ्याही गाण्यासाठी
भरलेला ठेव रे डोळा'
तो आता त्याच्यातील आदिम जाणीवेला जिंकण्याकरिता युक्ती लढवत दिव्यत्व संपादन करायला निघाला. योग-वियोगाचा हिशोब ठेवत चालत होता. सोबत केवळ त्याचा सैरभैर आत्मा ! कोण्या कवीच्या कविता गुणगुणत पदग्रहण करत होता. आपणाला आपलीच साथ मिळाली मग कशाची उणीव ? थोडे पुढे जाताच त्याला एक वाळलेले झाड दिसले. कोणत्याच फांदिवर पानांचे अवशेषही नव्हते. होती ती निर्जीव झालेली साल ... त्याला ते पहावले नाही. नकळत त्याचा अनावर हुंदका दाटून आला. वेळ बराच झाला होता. चलबिचल काळीज काहीसे थरथरत सुटकेचा हिरवा पाला शोधत होते. आता तर पक्षीही फिरकत नव्हते.
दिवसाची तडफड ... सूर्याची दाहकता ... अंगावर उन्हाचे चटके ... पाण्याचा थेंबही कुठे नजरेस येत नव्हता. मातीच्या कशी बिचारी साहतेय कळा ? कशी त्या मेघांना, वरवर गर्जना करणाऱ्या ढगांना दया-माया नाही येत ?
त्याचं आता रक्तही पाण्याविना आटत चाललं होतं. डोळ्यातलंही पाणी नाहीसं होत होतं ... संपूर्ण शरीराचंही बाष्पीभवन होत चाललं होतं. हाडांचे सर्व सुटे सुटे पार्ट झाले. चालताचालताच तो सबंध जमीनदोस्त झाला. कन्हत - विव्हळत देहत्याग केला त्यानं ... संपला ... संपला बिचारा ! आता तो पलीकडे खोल दरीमध्ये समाधिस्थ होऊन बसलाय. त्याला आता ना अन्न लागते ना पाणी. आता त्याची सुटका झालीय ... सुटका ...
- केशव कुकडे ऊर्फ मुक्तविहारी.
क्वार्टर क्र. जुने डी - ८,
थर्मल काॅलनी, परळी वैजनाथ,
जि. बीड - ४३१५२०.
मो. ९८६०९८५९११.
ईमेल : muktvihari@gmail.com
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने