![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
आता केवळ लेखनीतूनच आंदोलन उभारले जाऊ शकते
संमेलनाध्यक्ष : मा. सौ. सरोजताई काशीकर यांच्या भाषणाचे स्वैर शब्दांकन
माननीय आमदार राजेंद्र पाटील स्वागताध्यक्ष, ज्यांनी आपल्या खांद्यावर ही जबाबदारी घेऊन हे सगळं आपल्याला तयार करून दिलं. असे संयोजक अॅड सतीश बोरुळकर, कार्यध्यक्ष गंगाधर मुटे, ज्यांनी मोठ्या जिद्दीने १२ वर्ष अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्याची चळवळ चालू ठेवली आणि एकट्यांनी किल्ला लढवला, ज्यामुळे सलग १२ वर्ष हा यज्ञ अखंडपणे चालू आहे.
मला साहित्य संमेलनाचा अध्यक्ष व्हावं असं तो सांगायला आला तेव्हा मी त्याला म्हटलं की, अरे बाबा! माझ्याकडे साहित्याची खूप मोठी पुंजी नाही आहे. छोटं-मोठं, थोडंफार जे काही असेल ते वृत्तपत्रामध्ये आणि अंकांमध्ये लिहिण्याएवढं. बाकी पुस्तक लिहिण्या एवढी कधी उसंतच झाली नाही किंवा कधी विचारच आला नाही. त्यामुळे मी तुम्हा सगळ्या साहित्यिकांच्या आणि कवीच्या मांदियाळीत खरंच बसत नाही पण; एक मात्र सांगते की साहित्य मला लिहिता आलं नाही पण शेतकरी साहित्य १९८० सालापासून मला जगता आलं आणि हीच माझी एक जमेची बाजू आहे.
शरद जोशींमुळे अर्थशास्त्र कळले :
घरी शेती होती, माहेरी शेती होती, सासरी शेती पण शेतकऱ्यांचे एवढे दुःख असतील असं कधीच मला ८० सालापूर्वीपर्यंत कळलं नाही. मी कृषी अर्थशास्त्रात एम.ए केलेलं आहे पण त्या एम.ए. च्या अर्थशास्त्राच्या पुस्तकात या कृषीची अशी दशा आणि दिशा कधीच मला कळली नव्हती आणि ज्या दिवशी ८० साली आदरणीय शरद जोशींचं भाषण ऐकलं तेव्हा मला आणि माझ्यासारख्या असंख्य शिकलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना स्वतःच्या शिक्षणाची लाज वाटायला लागली. आज आम्हाला संधी मिळाली की आम्ही आमच्या आईवडिलांच्या शेतीच्या दुःखाचं गाऱ्हाणं मांडून आणि त्याच्यासाठी भांडून पुढे येऊन लढण्याची संधी आम्हाला आदरणीय शरद जोशींच्या विचाराच्या माध्यमातून मिळाली.
वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या तऱ्हेने वेगवेगळी आंदोलन आणि केवळ आंदोलन रस्त्यावरची नाही, उठसुठ कुठही रस्त्यावर बस, असं आंदोलन आदरणीय शरद जोशींनी कधीच सांगितलं नाही. प्रत्येक आंदोलनाच्या मागे एक दिशा होती, एक विषय होता, समजावून सांगण्याची पद्धत होती. सहा सहा महिने, वर्ष वर्ष त्या आंदोलनाचा विषय प्रत्येक शेतकऱ्यांच्या गळी उतरवून आणि सर्व शेतकऱ्यांची मान्यता घेऊनच एवढी मोठी-मोठी आंदोलन झाली. तेव्हाच तर १९८६ चं झालेलं, ६ डिसेंबर ते १२ डिसेंबर पर्यंतचं आंदोलन... हे अभूतपूर्व आंदोलन होतं कारण या आंदोलनात ६५ हजार शेतकरी तुरुंगात आणि तरीही १५ हजार शेतकरी रेल्वे रुळावर मायबहिणीसह बसले होते.
अबोल लेखणीला बोलतं करण्यासाठी :
एवढं मोठ काम या शेतकरी नेत्याने शरद जोशींनी केलं आणि केवळ कशासाठी तर जसं आज अबोल लेखणीला लिहितं करण्यासाठी गंगाधर मुटे काम करतो आहे तसंच या अबोल बोलतं शेतकऱ्यांना बोलतं करण्यासाठी. शेतकऱ्यांना कळतच नव्हतं की आम्हाला पिकलं किंवा पिकलं नाही तरीही सरकारची तकाबी द्यायची आहे. मी काहीतरी पाचवी सहाव्या वर्गात असेल, पुण्याच्या सुट्टीत किंवा दिवाळीच्या सुट्टीत घरी गेली असेल आणि आजी म्हणाली की, अरे ज्वारी नाही पिकली पण जर तकाबी नाही दिली तर आपल्याला हातकड्या घातल्या जातील. असं कर, उधार ज्वारी घे आणि तकाबी देऊन दे. पुढच्या वर्षी आम्ही सवाईने ती उधारीची परतफेड करू.
या पद्धतीचं सगळं शेतकऱ्यांचं जिणं त्या काळात लक्षात आलं नाही पण जेव्हा शरद जोशींचं साहित्य वाचलं, शरद जोशींचं भाषण ऐकलं, शरद जोशींनी बाहेर देशातून येऊन जो शेतकऱ्यांचा मुलगा नव्हता, ज्याला अनेकदा म्हटलं जायचं की तू शेतकऱ्यांच्या जातीचा नाही, शेतकऱ्याच्या मुळाचा नाही, पण शेतकऱ्याच्या दुःखाचं मूळ शेतकऱ्याच्या जातीचं खरं दुःखाचं मूळ ज्यांनी दाखवलं अशा महात्म्याने आम्हाला हे सगळं शिकवलं. या सगळ्या महात्म्याच्या शिकवणीतून आम्ही सगळे जवळजवळ ८० पासून तर आजपर्यंत हे सगळं आत्मसात केलं. या चळवळीत जगताना आमच्यापैकी एकाही व्यक्तीला, म्हणजे मला तर असं वाटते की जन्मानी फक्त एक कुटुंब, लग्नाने दोन कुटुंब पण या चळवळीतून मला असंख्य भारतीय शेतकऱ्यांचं कुटुंब मिळालं. कोणत्याही जिल्ह्याचा, कोणत्याही प्रांताचा, कुठेही जा आमच्या चळवळीतले भावंड, ज्यांनी ही चळवळ जगली, ते आमच्यासोबत आहेत.
राजकारण्यांचा समाचार घेण्याची गरज :
ही सगळी चळवळ जगताना, केवळ रस्त्यावरचीच लढाई नाही तर ही लढाई कागदावरची असावी ,ही लढाई लेखणीची पण असावी, हे सुद्धा आवश्यक आहे. एक असाच लेख मी बघितला होता की या सगळ्या राजकारण्यांच्या भोवऱ्यात आम्ही कसे अडकलो, आम्ही सगळे शेतकरी साधे भोळे. कोणी आम्हाला सांगितलं बैलजोडी चिन्ह आहे, हा बैलजोडी नक्कीच आपल्याला तारेल. आम्ही सगळे बैलजोडीच्या मागे शिक्के लावत फिरलो. बैलजोडी गेली गायवासरू आलं. गायवासरू काय, इंदिरामायच आहे आपली. ती आपल्याला सगळं देणारच. गायवासरूच्या मागे लागलो. असं करता करता वेगवेगळ्या चिन्हाच्या भोवऱ्यात आम्ही शेतकरी फक्त अडकत गेलो, फिरत गेलो, याला मदत, त्याला मदत, त्याला मदत आणि आता तर या राजकारणाची चिवचिंधी जर बघितली तर कोणालाच मत न देता घरी बसावं असं वाटायला लागलेलं आहे.
या सगळ्यात आम्हा साहित्यकारांचं मोठ योगदान असायला पाहिजे. कुणा कुणाला मतदान देणार आणि मतं घेतल्यावर कोण कुठे राहणार याची काही खात्री आहे? अरे ज्या मतासाठी तुम्ही निवडून येता, जी आश्वासन तुम्ही आम्हाला देऊन निवडून येता, त्या आश्वासनाचा विचार करण्याकरता तुम्ही त्या खुर्चीवर, संसदेत, विधानसभेत जात नाही तर स्वतःच्या बुडाखालची खुर्ची कशी टिकेल आणि स्वतःला कसे पैसे कमवता येतील एवढे बघता. मग ज्या शेतकऱ्याच्या, मजुराच्या, तरुण विद्यार्थ्याच्या, तरुण बेरोजगारांच्या भरवशावर तुम्ही निवडून येता, त्या सगळ्यांना वाऱ्यावर सोडून एका मिनिटात या खुर्चीवरून त्या खुर्चीवर कोलांटउड्या घेताना काहीच कसे वाटत नाही? अशा राजकारण्यांचा समाचार घेण्याची गरज आहे.
शेतकरी विरोधी जे जे कायदे आहेत, त्या सर्व कायद्यांचा समाचार आम्हाला आता या साहित्याच्या लेखणीतून घ्यायचा आहे. शरद जोशींनी सांगितलं होतं की आता रस्त्यावरच्या आंदोलनाचे दिवस राहिले नाही. आपण बघितलं की अनेक आंदोलन आजही दिल्लीत पेटत आहेत पण त्या आंदोलनाला कोणी दाद देणार नाही कारण हे सरकार इतकं निर्ढावलेलं आहे ते निर्ढावलेलं सरकार कधीही तुमच्या पाठीशी, आंदोलकांच्या पाठीशी उभं राहणार नाही. अशा वेळी जागृती घडवावी लागेल ती लेखणीनीच घडवावी लागेल.
१९२० साली महात्मा गांधींनी जेव्हा ''गावाकडे चला'' म्हटलं तेव्हा शेतकरी किंवा गावाच्या साहित्याचं लिखाण सुरू झालं. हळूहळू हे लिखाण गावाच्या वेशीवर न राहता गावातल्या परिस्थितीवर सुरू झालं. आम्ही शाळेत शिकत होतो तेव्हा सावकार कसा आम्हाला लुटतो हे सांगणारा एक "पुज्याचा फटका" धडा होता. असे वेगवेगळे धडे हे त्यावेळच्या पुस्तकात येत होते पण आताच्या पुस्तकात? आम्ही सगळे आंग्लाळलेलो झालेले आहोत. आम्हाला इंग्रजी शिक्षण आणि इंग्रजी मूळ हेच सगळं वाटायला लागलेलं आहे. आमचा इतिहास काय आहे आणि आमचं नंतरचं भविष्य काय असेल? आमच्या इतिहासात आमची लूट कशी झालेली असेल, शेती काय असेल, शेती काय होती? या सगळ्या विषयाचा अभ्यास या पूर्ण शिक्षण व्यवस्थेतून पार दुूर करून टाकला आहे. जसं मी सांगितलं ना की एमए इन ऍग्रीकल्चर इकॉनॉमिक्स असूनही मला कधीच शेतीचं अर्थशास्त्र कळलं नाही, ते अर्थशास्त्र मला कळलं आदरणीय शरद जोशींच्या लेखणीतून, विचारातून. तसंच आता आम्हा सर्व शेतकरी साहित्यिकांच्या विचारातून, कवीच्या लेखणीतून या सरकारांना आणि येणाऱ्या नवीन पिढीला हे शेतीशास्त्र कळायला पाहिजे.
पाटलाची सून व्हायला शेतकऱ्याची मुलगी राजी नाही :
आमदार साहेबांनी समस्या मांडली, गंगाधर मुटेही म्हणाला, मला पण वाटतं की आता शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न गंभीर समस्या झाली आहे. शहरात जाऊन २५ - ३० हजाराची नोकरी करायची, लग्न झालं की नोकरी सोडून घरी यायचं आणि मग अशा वेळी बायको नांदली नाही तर डिवोर्सचा नोटीस घ्यायचा... इथपर्यंत समाजव्यवस्था पार बदललेली आहे. स्त्री हक्कासाठी आम्ही भांडलो, स्त्रियांचे हक्क तिला मिळावे, तिला बरोबरीचा दर्जा असावा, पण मला कुठेतरी असं वाटते की आम्हा स्त्रियांनी सुद्धा समाजाचं बॅलन्स राखण्याची एक मोठी जबाबदारी आमच्यावर आहे. जसा शेतकरी सृजन करतो काही झालं, कितीही झालं, कशीही परिस्थिती असेल तरी त्याच्या दारात गेलेला माणूस कधी उपाशी वापस येत नाही मग तुम्ही म्हटलं की अरे, माझ्या घरी आज काहीच शिजायला नाहीये, त्याच्याकडे काही नसलं तरी तो एक पायलीभर ज्वारी आणून जे काही असेल त्याच्याकडे आणून तुम्हाला तो देईलच आणि त्याचं मोलही तो घेणार नाही, तसंच मातृशक्तीचं आहे.
आम्हा स्त्रियांमध्ये सृजनतेचा एक विशेष गुण आहे. घर, संसार, सृजनता, शेतीत पिकलेला माल, तो आलेला त्याची व्यवस्था करणे, घरात आलेला नवऱ्याचा पगार जो कमी असेल तरी, तो सर्व अर्थाने बरोबर कसा पुरेल हे एका अर्थमंत्र्यापेक्षाही आपण चांगल्या प्रकारे हाताळत असतो, पार पाडत असतो. त्याचप्रमाणे घराचीही अशीच अवस्था झालेली आहे. मुलं आता वेगवेगळ्या नादी लागले आहेत. मोबाईलमुळे म्हणा, नवीन चित्रपटसृष्टीमुळे म्हणा, आपण बघतो त्या दूरदर्शनमुळे म्हणा, वास्तविकतेचं भान त्यांना राहिलेलं नाही आहे. आम्हाला असं वाटते की शहरात जे सगळं दिसतं ना, तर मग हे आपल्या घरी असायला पाहिजे. सिनेमात एवढं चांगलं घर आहे ना, मग आपलंही घर असायला पाहिजे पण हे भ्रमजाल आहे. या मृगजळाच्या मागे धावण्यात आमचं भलं होणार नाही. हे मृगजळ आमच्याकरिता नाही, ते केवळ चित्रपटात दाखवण्यासाठी आहे. जर आम्हाला आमचं आयुष्य खरंच तसं बनवायचं असेल तर त्याच्यासाठी आम्हाला एकदा घट्ट पाय रोवून उभं राहावं लागेल. आमच्या शिक्षणासाठी, व्यवसायासाठी, नोकरीसाठी आणि आम्ही करत असलेल्या प्रत्येक व्यवहारासाठी.
साहित्यिकातून लोकमान्य टिळक तयार व्हावे :
वेगवेगळ्या व्यसनांचा उच्छाद संपूर्ण देशभर माजलेला आहे. सगळ्या जाहिरातीत नवीन व्यसन तुमच्यापुढे आहेत. आपण उडता पंजाब सिनेमा बघितला असेल, ज्या पंजाबमध्ये दमदार सैनिक तयार होत होते, त्या पंजाबमध्ये आजकाल फक्त तयार होत आहेत ते व्यसनाधीन झालेले सगळे शेतकऱ्यांची तरुण मुलं. तर ही सगळी कथा चितारण्याची जबाबदारी ज्यांना ज्यांना साहित्य लिहिता येते त्या सगळ्या साहित्यिकांवर येऊन पडते. आम्ही साहित्यिक, तो काय साहित्यकार आहे का? तो काय कवी आहे का? अरे असं म्हणण्यापेक्षा त्याच्या लेखणीत काय ताकद आहे हे एकदा वाचून त्याची क्षमता काय आहे हे या समाजाला परखू द्या, निरखू द्या. असं साहित्य तयार करण्याची पुन्हा जबाबदारी आपल्यावर आलेली आहे. सर्व साहित्यिक मंडळींना माझी हीच विनंती आहे की, आताचं साहित्य तंत्रज्ञान, या सरकारचे डोळे उघडणे, सरकारची कान उघाडणी करणे यावर केंद्रित असले पाहिजे. वेळप्रसंगी तुमच्या लेखनीवर बंदी सुद्धा येऊ शकते. लोकमान्य टिळकांवर आलीच होती ना? मग आमच्यातला कोणी लोकमान्य टिळक घडू शकणार नाही का? आमच्यातला कोणी असं लिखाण लिहू शकणार नाही का ? नक्कीच लिहू शकू आणि त्या लेखकाच्या मागे आम्ही सगळे लेखक मंडळी सर्व विचारवंत नक्कीच उभे राहणार!
शरद जोशींच्या आंदोलनाच्या वेळी आम्हाला हिणवणारे म्हणायचे की, "हे काय येऊन जाऊन रस्त्यावर बसता आणि शेतमालाचा भाव मागता? अरे शेतमालाचा भाव मिळून काय होणार?" पण आज सगळ्यांना पटायला लागलं की शेतमालाचा भाव नसल्यामुळे ही दरिद्री आलेली आहे. शेतमालाला भाव नसल्यामुळे गावातली सामाजिक अवस्था, समाज बिघडलेला आहे. तुम्ही वेगवेगळे सप्ताह करता, वेगवेगळे भागवत घडवतो पण या सगळ्या भागवतातून शिकणारा एकही तरुण आता आमच्याकडे शिल्लक उरलेला नाही कारण त्या तरुणाला वाटते आहे की, माझ्याकडे हेटाळणेने बघतात कारण माझ्याकडे रोजगार नाही.
पाटलाची गुर्मी उतरवणारी व्यवस्था :
त्या काळात पाटलाचा पोरागा आहे म्हटल्यावर किती गुरमी असायची! किती मानसन्मान असायचा! पोरगी पाटलाच्या घरी पडली याचा अभिमान असायचा पण आता तसं नाही. मला अजूनही आठवते की, आमच्या आत्याचं लग्न ऍग्रीकल्चर ऑफिसरशी ठरत होतं. आजीने विचारलं की, बाबू शेती किती आहे? त्यांनी सांगितलं की माझी शेती नाही आहे, माझ्याकडे फक्त नोकरी आहे. मुलीची आई म्हणाली, नको! याला माझी मुलगी देणार नाही कारण महिन्याच्या शेवटी याचं घर खुडखूड वाजेल. याच्या घरात धान्याचा दाणा राहणार नाही आणि शेतकऱ्यांच्या घरी कणग्या भरून राहतील. हे सगळं आम्ही बघितलेलं आहे आणि आता हे नवीन बघतो आहे की शेती मुलांनी करायची की नाही? हा प्रश्न जसा मुलांसमोर आहे तसंच त्यांच्या आईवडिलांसमोरही आहे. त्यांनाही असं वाटते की या शेतीतून आमच्या मुलांचं भविष्य काय असेल? हे नवीन शेतीचं भविष्य उज्ज्वल करण्याचं तुमच्या लेखणीत सामर्थ्य किती आहे हे बघण्यासाठी हे साहित्य संमेलन आहे. असं मला वाटते. हे आव्हानात्मक साहित्य संमेलन आहे. इथे येऊन या साहित्य संमेलनातून हे एक नवीन आव्हान घेऊन आपण सर्व साहित्यिक मंडळी इथून जावे, अशी अपेक्षा आहे.
साहित्य संमेलनाच्या आयोजकांचं, गंगाधर मुटेचं मी खरोखर मनापासून आभार मानते की, त्याने हे सगळं ओढत नेलं. अनेकदा मी त्याला म्हणायची की, काय रे तू हे सगळं करत असतो, किती करणार आहेस तू आणि तरीही तो जिद्दीने, नाही सरोजताई आपल्याला हे करणं भागच आहे आणि हे केल्याशिवाय गत्यंतर नाही कारण लोकांना आता दिशा दाखवणारी लेखणी हीच फक्त उरलेली आहे आणि या लेखणीच्या माध्यमातून एक दिशादर्शक म्हणून तुम्ही सगळ्यांनी उभं राहावं, एवढीच विनंती करते.
साहित्यिकांचा आशीर्वाद हवा :
पुन्हा एकदा ऍडव्होकेट सतीश बोरुळकर यांचं आभार मानते कारण त्यांनी याही परिस्थितीत हे संमेलन रेटून नेण्याची आणि गंगाधरला खूप मोठा आधार देण्याचं काम केलं. संपूर्ण मंडळी, ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचंही आभार मानते आणि मनीषा रिठेचं सुद्धा. त्यांनी तर अतिशय गोड बोलून या संमेलनाचा अध्यक्ष मलाच करावं असा आग्रह धरणारी कारण मला अजिबातच शक्य नव्हतं. येणंही शक्य नव्हतं आणि मी त्यांना अनेकदा सांगितलं की, बाई गं, मी काही एवढी मोठी साहित्यिक नाहीये की या संमेलनाचं मी अध्यक्ष व्हावे पण माझ्या जवळ फक्त जमेची बाजू आहे साहित्याची चळवळ जगणे आणि साहित्य जगणे. जर तुमच्यासारखं मला लिहिता आलं तर मलाही फार बरं वाटेल, तो आशीर्वाद तुम्हा सर्व साहित्यिकांकडून घ्यायलाही मी आज इथे आलेली आहे! नमस्कार!!