नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
कृषी प्रदर्शन आणि त्यातला एक प्रातिनिधिक संवाद…
मी: आम्ही पर्यावरणविषयक काम करतो.
शेतकरी : ! (त्यांच्या डोळ्यातली उत्सुकता बघून बरं वाटत होतं.)
मी : आणि इथे आम्ही असा विषय मांडतो आहोत की आता गावे उजाड झाली आहेत. जंगल राहिली नाहीत कुठे.
शेतकरी : एकदम बरोबर!
मी : पण निसर्ग नसेल तर शेती होणार कशी? शेतकऱ्यासाठी दोन संसाधने महत्वाची आहेत : माती आणि पाणी. ही बळकट ठेवली तर उत्तम शेती होऊ शकेल. सध्या आपण जी शेती करतो ती बहुतांशी भूजलावरच चालते. त्यामुळे भूजल पुनर्भरण हा महत्वाचा विषय आहे. या नकाशात दाखविल्याप्रमाणे, पूर्वी प्रत्येक गावाच्या पाणलोटक्षेत्रात, ओढ्यांच्या उगमाशी आणि काठांवर अशी जंगले होती तेव्हा झरे जिवंत होते. कोकण, सह्याद्री आणि पूर्व विदर्भाच्या काही भागात असे जिवंत झरे अजूनही दिसतात. झरे जिवंत ठेवण्यात भूगर्भरचनेचा वाटा मुख्य आहेच पण जंगलांचा वाटा दुर्लक्षिता येत नाही. ही जंगले स्पंजप्रमाणे काम करतात. पावसाचं पाणी जमिनीत, भूगर्भरचनेत जिरवण्याचं काम करतात. आणि फक्त एकदा किंवा दोनदा नाही करत तर चिरंतन करत राहतात. पिढ्यानपिढ्या! या झऱ्यांमुळे वर्षभर पिके घेता येत होती. बरोबर की नाही?
शेतकरी : हा.. एकदम मुद्द्याचं बोललात ताई.. आमच्या आजाच्या टायमाला पाणी भरपूर होतं. आता काय नाय राहीलं..
मी : मग तुम्ही काही प्रयत्न केले नाहीत का हे झरे टिकवायला?
शेतकरी : अं.. काय गरज नाय लागली.. आमच्या बाच्या टायमाला धरणातून कालवे आले गावात. पन त्याचंबी पानी काय भरोश्याचं नव्हत. हळू हळू मग आम्ही बोरवेल केली आणि पंप लावले.
मी : मग आता पाण्याचा प्रश्न मिटला का ?
शेतकरी : नाय हो, कसच काय, आमचा लय दुष्काळी भाग. विहिरी नी बोरवेल आटल्या की लवकरच. ते रिचार्ज कस करायचं ते सांगा तुमी..
मी : सांगतो आम्ही तेही, पण आता बघा पाणी भरपूर होतं म्हणून आपण शेतीचं क्षेत्र वाढवलं पण आता बोरवेल आटल्यामुळे त्या क्षेत्राला पुरेसं पाणी मात्र नाही आपल्याकडे. हा सगळा स्केलचा म्हणजे प्रमाणाचा मुद्दा आहे. पूर्वी पाणी कमी होतं पण होत्या तेवढ्या शेतीला पुरेसं होतं. आणि मातीचं काय?
शेतकरी : माती तशी चांगली हाये. आता काळ्या आईशिवाय काय शेती होते होय?
मी : वा ! मग खताशिवाय होते का शेती?
शेतकरी : नाय ! खतं तर घालावीच लागतात ना दर पिकाला.
मी : आता बघा, पूर्वी जंगले होती तेव्हा थोड्या पाण्याची पण वर्षभर आणि कायमस्वरूपी सोय होती. विहिरी भरलेल्या होत्या. शेती थोडीच होती पण यशस्वी होती. पण ती कमी पडत होती म्हणून की काय हरितक्रांतीने जोर धरला पण आपल्याला अधिकाधिक उत्पादनाची सवय लागली आणि उपलब्ध संसाधनांचं आणि पिकांचं गणित कोलमडलं. म्हणून मग खतांचा आधार घेत शेती करावी लागली, इलाजच नव्हता. पण मातीतून आपण कायम घेतच राहिलो तर कधीतरी तिची देण्याची क्षमता संपणार. ती पुनरुज्जीवित करत राहिलो तर शेती उत्तम होणार. तीच गोष्ट पाण्याची. भूगर्भातल्या पाण्याच्या टाकीची क्षमता मर्यादित आहे. तीच टाकी सतत वापरायची असेल तर तिचं पुनर्भरण करावं लागणार की.
शेतकरी : हा.. ते कसं करायचं सांगा की..
मी : तेच करण्यासाठी निसर्गाची सिस्टीम परत बसवावी असं आम्ही सुचवतोय. निसर्ग चिरंतन काम करतो. माती आणि पाणी ही निसर्गाचीच रूपे. आपण निसर्गाकडून कायम घेतच राहिलो तर कधी ना कधी तो संपुष्टात येणार. हा निसर्गाला परत देण्याचा विषय आहे. तर आपली पुढची पिढी शेती करू शकेल. कसं साध्य करायचं हे? तर या नकाशात दाखविल्याप्रमाणे गावाच्या पाणलोटक्षेत्राचं अत्यंत विचारपूर्वक नियोजन करायला हवं. ओढ्यांच्या उगमाला जंगल पुनरुज्जीवनाची सुरवात करायला हवी. त्याकरता इथे मांडलेल्या या पळस, पांगारा, ऐन, शिसव, कळंब, करंज, वड, उंबर, बिब्बा, कुसुम, रिठा, खिरणी यासाख्या स्थानिक झाडांचा कार्यभाग महत्वाचा आहे. परदेशी झाडांची एकसुरी लागवड करण्यापेक्षा स्थानिक विविधता जपणे महत्वाचे आहे. तर पुढच्या पिढीला जंगल बघायला मिळेल.
शेतकरी : हा बरोबरे.. हे काम लई गरजेचं आहे. पण आम्हालाच नाय बघायला मिळत जंगल.. पुढच्या पिढीच सोडूनच द्या.. पानीच नाय गावात तर झाडाला पानी देनार कसं?
मी : तेच तर! पाणी राहिलं नाही कारण आपण आपल्या पाणलोटक्षेत्राचा अमर्याद, हवा तसा वापर करतोय. सगळीकडे मुक्त चराई आहे, सर्वत्र शेती करतो आहोत, शेती व्यतिरिक्तच्या भागातली माती कडक झाली आहे, तिथे पाणी मुरतच नाही. पूर्ण वाहून जाते. जंगले किंवा राखीव गवताळ कुरणे तयार झाली तर ते पाणी मुरण्याची सोय होईल. गावाच्या भूरुपाचा वापर जर आपण नियंत्रित केला तर अनेक फायदे होतील. उदाहरणार्थ, गवताळ कुरणे राखली तर गुरांना सकस चारा मिळेल. कुसळीसारखी निकृष्ट गवते नाहीशी होऊन त्यांची जागा पवन्या, मारवेल, डोंगरी यांसारखी सकस गवते घेतील. धुळ्यातल्या लामकानी गावाने गावातील पाचशे हेक्टरला असे संपूर्ण संरक्षण देऊन सकस चारा कसा वाढवतो येतो याचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. बरोबरीने हिवरे बाजार किंवा राळेगण सिद्धी ही उदाहरणे आहेतच. संरक्षणाबरोबर माती आणि जल संधारणाच्या कामांचे उत्तम परिणाम देखील इथे बघायला मिळतात. विहिरींची आणि बोरवेलींची पातळी वाढली आहे. शेती सोडून दिलेल्या लोकांनी पुनश्च शेती सुरु केली आहे. तर मुद्दा असा आहे की पुनरुज्जीवनाची तंत्रे राबवून मातीतला ओलावा वाढतो आणि मग लागवड केली तर त्याला पाणी कमी लागते. अर्थात हे वेळखाऊ काम आहे पण याला इलाज नाही. तुम्ही किती वर्षे उघडी बोडकी जमीन बघता आहात?
शेतकरी : लई वरसं झाली.. म्हणजे आम्ही कधी जंगल पाह्यलच नाय गावात.. आजाकडून ऐकलय फक्त..
मी : मग इतक्या वर्षांचा निसर्गाचा ह्रास एखाद्या वर्षात कसा भरून निघणार? पण आपण आत्ता सुरवात केली तर काही वर्षांनी आपल्याला आणि पुढच्या सगळ्याच पिढ्यांना त्याचा फायदा मिळेल की..
शेतकरी : पण कुठे करायचं हे.. म्हणजे शेतात कसं काय जमणार? तुम्ही काय मदत देणारे का?
मी : तुम्ही तुमची शेती सुरु ठेऊन शेताच्या बांधावर पण लागवड करू शकता किंवा सामुहिक जमिनीवर हे काम सुरु करू शकता. ते कसं करायचं याची मार्गदर्शनपर मदत आम्ही देऊ शकू. पण हे काम गावाने एकत्र येऊन सामुहिक पद्धतीने करावे लागेल. गायरान किंवा वन विभागाच्या जमिनीपासून तुम्ही सुरवात करू शकता.
शेतकरी : आमच्या गावात एवढी मोठी जमीन नाय किंवा फोरेष्ट बी नाये..
मी : हं.. मग तुम्ही गावात छोट्या जमिनीवर, एखाद दोन एकरात देवळाच्या आवारात किंवा शाळेच्या आवारात किंवा कुणाच्या वरकस जमिनीवर ‘जीविधता उद्यान’ करू शकता. जीविधता उद्यान म्हणजे आपल्या भागात येणाऱ्या स्थानिक वनस्पतींचं संवर्धन आणि लागवड. अर्थात हा फक्त लागवडीचा विषय नव्हे तर कीटक, पक्षी, प्राणी, जीवाणू या सर्व जैविक विविधतेचा विषय आहे. शेतीत आपल्याला या सर्व जीवांची गरज असते. या सगळ्यांना अभय देणे महत्वाचे आहे. या माहितीपत्रकात असे उद्यान कसे करायचे याची थोडक्यात माहिती दिली आहे झाडांच्या यादीसकट. आणि ही यादी पाऊसमानानुसार वेगवेगळी आहे. कमी पाऊस, मध्यम पाऊस आणि खूप पाऊस अशा तीन याद्या इथे ठेवल्या आहेत. तुम्ही गावानुसार यातली एक यादी घेऊ शकता. परंतु यातली कृती अत्यंत महत्वाची आहे. पाण्याची किमान दोन वर्षे सोय असलेली आणि जरा बरी माती असलेली योग्य जमीन निवडणे महत्वाचे आहे. आणि लागवडीपूर्वी माती पुनरुज्जीवन महत्वाचे आहे. मातीतला ओलावा वाढला की लागवड करणे योग्य. भलेही यात एखाद दोन वर्षे उशीर झाला तरी चालेल. ह्या सगळ्याची विस्तृत माहिती आम्ही आपल्याला whatsapp वर पाठवू शकू.
शेतकरी : म्हणजे सरकारी ‘पानी अडवा, पानी जिरवा’ सारखं काम आहे हे. मग यात सरकारचं काही अनुदान मिळेल का?
मी : आता बघा.. सरकार किती गावात पोहोचणार. आणि शेती आपण करतो तर आपली संसाधने बळकट ठेवण्याचं कामही आपण करायला काय हरकत आहे. गावपातळीवर सामुहिकरित्या हे काम केलं तर एका कुणावर भार येणार नाही. तुम्ही काम करायला सुरवात केली तर अनुदान देणारे लोकही कदाचित सापडतील. पण सुरवात आपली आपणच करावी अर्थात अगदीच शक्य नसेल तर मनरेगा सारख्या योजना तुम्ही गावात घेऊ शकता.
शेतकरी : पटतंय हे पण सुरवात कुठून करायची नक्की ?
मी : याची सुरवात तुम्ही ग्रामसभेत हा विषय मांडून करू शकता. आणि हा केवळ जंगलाचाच विषय नाही तर गावाच्या एकूण क्षेत्राचा वापर कसा करायचा याची निश्चिती करायला हवी. गावात चुली असतील तर सरपण लागवड देखील तितकीच महत्वाची आहे. रस्त्याच्या कडेने तुम्ही चांगल्या उष्मांक असणाऱ्या झाडांची लागवड केली तर रस्त्याला सावली पण राहील आणि बायकांना फार लांब रानात जाऊन डोक्यावर ओझं आणायचा त्रास कमी होईल. उतारांवर किंवा वरकस जमिनीवर वनशेती करता येईल. वनशेती म्हणजे उत्पादन देणाऱ्या विविध स्थानिक वृक्षांची लागवड. परत एकदा यातून काही लगेच पैसे मिळायला सुरवात होणार नाही पण काही वर्षांनी शेतीला पूरक उत्पादन सुरु होईल. गावात जंगल आणि वनशेती वाढली तर तापमान नियंत्रण होईल. सूक्ष्म हवामान सुधारेल. पर्यायाने माती आणि तिच्यातील जीवाणू पण वाढीस लागतील जे शेतीला फायद्याचे ठरेल. थोडक्यात, गावात जंगल, वनशेती, राखीव गवताळ कुरणे, चराऊ कुरणे, सरपण लागवड, ओढे आणि त्याच्या काठावरची जंगले आणि शेती अशा अनेक गोष्टींचा आराखडा बनवता येईल, ज्यायोगे गाव समृद्धतेकडे आणि स्वयंपूर्णतेकडे जाऊ शकेल, असं आम्हाला वाटतं. पण हे सगळं गाव पातळीवर राबवण्यासाठी तुमचीच मदत लागेल.
शेतकरी : नक्की सुरु करनार ताई ! पण यातून तुमाला काय मिळनार?
मी : आनंद. असा उपक्रम तुम्ही गावात सुरु केला आणि निसर्गाला मदत केलीत तर आम्हाला आनंद होईल. कसं आहे, आम्ही गेली १८ वर्षे पर्यावरणविषयक काम करतो आहोत पण ते केवळ खाजगी जमिनींवर आणि अगदीच थोड्या प्रमाणावर. त्याचेच परिणाम बघून आता हे काम गावपातळीवर नेता येईल असे वाटते आहे. त्यामुळे गावात या पद्धतीने काम कसे होऊ शकेल याची आम्ही इथे केवळ मांडणी करतो आहोत. हे काम कसं पुढे जाऊ शकेल, यात काय अडचणी आहेत हे तुम्हीच आम्हाला सांगू शकता.
शेतकरी : हा .. मंग तुमी गावात येऊन आम्हाला मार्गदर्शन करनार का?
मी : इथे हजारो शेतकरी येत आहेत. प्रत्येक गावात जाऊन मार्गदर्शन करणं थोडं कठीण आहे. पण आम्ही आपल्याला whatsapp वर माहिती पाठवून मदत करू शकतो ८४४६०४६७२८हा आमचा नंबर. गरज लागली तर तर आम्ही येऊ पण आधी तुम्ही ग्रामसभेत हा विषय मांडून काय चर्चा होते आहे ते कळवा. गावाची काम करण्याची तयारी असेल आणि आपण बोललो त्याप्रमाणे तुम्ही जमिनी निवडल्या तर गरज लागली तर आम्ही येतो. पण हे काम राबवणं तसं सोपं आहे. यात कुठेही उच्च तंत्रज्ञान नाही. मूळ मुद्दा – हे काम करायला हवं – हे ठरवण्याचाच आहे.
शेतकरी : हा तोच मुद्दा कठीन हाय.. पण आमी नक्की प्रयत्न करनार. गाव नाइ पुढे आलं तर शेताच्या बांधावर तरी दोन झाडं नक्की लावणार…
तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट नक्कीच समजली की शेतकऱ्यांना पर्यावरणाचे महत्व माहित नाही असे निश्चितच नाही. पूर्वी शेतीचे मर्यादित प्रमाण आणि पद्धती यामुळे संवर्धनाची थेट गरज कधी भासली नसावी. परंतु काळाच्या ओघात शेतीपद्धतीचा बदलता कल आणि वाढते प्रमाण बघता सक्रिय संवर्धन व्हायला हवे असे दिसते. माती आणि पाणी सुदृढ ठेवणे, शेतीला उपकारकच आहे आणि ते आपल्याच हातात आहे, ही जाणीव जागृती करणे हाच या लेखामागचा मूळ उद्देश !
नाव- निर्मळ वैष्णवी नानासाहेब
तिसरे वर्ष फार्मसी विद्यार्थिनी
८४४६०४६७२८