सरकारी वकील : पुढे काय झालं?
वसुली अधिकारी : आम्ही आर्वी छोटी या गावांमध्ये वसुलीसाठी गेलो होतो.
ऍड देशमुख : तुम्ही गावांमध्ये गेले होते कशावरून? काही पुरावा आहे का?
वसुली अधिकारी : आम्ही आमच्या ऑफिसमध्ये कारवाई बुक मध्ये तशी नोंद केली होती.
ऍड देशमुख : दाखवा बुक
वसुली अधिकारी : ऑफिसमध्ये आहे, सोबत आणले नाही.
ऍड देशमुख : का आणले नाही? तुम्ही आणले नाही त्याचे कारणच तुम्ही रजिस्टर काही लिहिले नाही. कारण तुम्ही त्या गावात गेलेच नव्हते
वसुली अधिकारी : गेलो होतो. रजिस्टर मध्ये नोंद आहे. रजिस्टर ऑफिस मध्ये आहे.
ऍड देशमुख : तलवार घरी ठेवून लढाईला जायचं किंवा वस्तरा घरी ठेवून हजामतीला जायचं, असं चालत असते का? तुम्ही रजिस्टर मेंटेन केलेलेच नाही कारण तुम्ही त्या गावात गेलेलेच नव्हते. तुम्ही त्या गावाला गेले असते तर तुम्ही नक्कीच रजिस्टर सोबत आणले असते.
वसुली अधिकारी काही बोलत नाही. चूप राहतो.
ऍड देशमुख : तुम्ही गावात गेल्यानंतर ज्यांच्याकडे कर्ज आहे त्यांना तुम्ही शिवीगाळ केली.
वसुली अधिकारी : नाही. आम्ही शिवीगाळ केली नाही. आम्ही नियमाप्रमाणे वसुली करत होतो तेव्हा छातीवर शेतकरी संघटनेचे बिल्ले लावून सुमारे 100 तरुण पोरांचा जमाव गंगाधर मुटे यांच्या नेतृत्वाखाली आमचेकडे आला आणि आमची वसुली थांबवली
ऍड देशमुख : वसुली थांबवली म्हणजे नेमके काय केले?
वसुली अधिकारी : आम्हाला मारहाण केली, आणि शिवीगाळ केली
ऍड देशमुख : तुमची कॉलर वगैरे पकडली होती का?
वसुली अधिकारी : होय, आमची कॉलर पकडली होती.
ऍड देशमुख : आमची म्हणजे कोणाकोणाची?
वसुली अधिकारी : मी आणि माझ्या चार-चार सहकाऱ्यांची
ऍड देशमुख : तुमची कॉलर कुणी पकडली?
वसुली अधिकारी : गंगाधर मुटे यांनी
ऍड देशमुख : आणखी कुणी तुमची कॉलर झाली धरली?
वसुली अधिकारी : गंगाधर मुटे यांनी धरली
ऍड देशमुख : एकाच व्यक्तीने एकाच वेळी पाच लोकांची कॉलर कशी काय धरली? गंगाधर मुटे यांना किती हात आहेत?
वसुली अधिकारी : दोन आहेत
ऍड देशमुख : मग कॉलर धरायला किती हात लागतात?
वसुली अधिकारी : एका हाताने कॉलर धरता येते
ऍड देशमुख : गंगाधर मुटे यांना दोनच हात आहेत. दोन हाताने दोघांची कॉलर धरली असेल. एक माणूस एकाच वेळी पाच लोकांची कॉलर धरू शकत नाही. बरोबर?
वसुली अधिकारी : बरोबर आहे
ऍड देशमुख : म्हणजे गंगाधर मुटे यांनी पाच लोकांची कॉलर धरलीच नाही?
वसुली अधिकारी : चुकलो होतो, पाच लोकांची नाही दोघांची धरली होती.
ऍड देशमुख : मग पोलीस तक्रार करताना कॉलर धरली असे तक्रारीत लिहिले होते का?
वसुली अधिकारी : हो लिहिले होते
ऍड देशमुख : नक्की आठवते का?
वसुली अधिकारी : हो नक्की आठवते. तक्रारीत लिहिले होते.
ऍड देशमुख : तक्रार कोणी केली होती?
वसुली अधिकारी : मीच दिली होती?
ऍड देशमुख : तुमच्या तक्रारीचा मूळ कागद माझ्याकडे आहे. तक्रारीत कॉलर धरल्याचा कुठेही उल्लेख नाही
वसुली अधिकारी : मग विसरलो असेल
ऍड देशमुख : जेव्हा घटना घडली तेव्हा रिपोर्ट देताना आठवले नाही, आज कसे काय आठवले?
वसुली अधिकारी : तुम्ही विचारलं म्हणून आठवले
ऍड देशमुख : मी विचारले नसते तर आठवले नसते का?
वसुली अधिकारी : नसते आठवले.
ऍड देशमुख : बरं पुढे काय झालं?
वसुली अधिकारी : आम्हाला मारलं
ऍड देशमुख : कोणी मारलं आणि कशाने मारले?
वसुली अधिकारी : लाथाबुक्क्यांनी मारले
ऍड देशमुख : तक्रारीत तुम्ही लाठ्याकाठ्यांनी मारले असे लिहिले आहे
वसुली अधिकारी : होय, आम्हाला लाठ्याकाठ्यांनी मारले
ऍड देशमुख : पुढे आणखी काय झालं?
वसुली अधिकारी : आम्हाला दगड फेकून मारले
ऍड देशमुख : तुम्हाला दगड लागलेत का? काही जखमा झाल्यात का?
वसुली अधिकारी : होय, आम्हाला दगड लागले आणि जखमा सुद्धा झाल्या होत्या
ऍड देशमुख : मेडिकल रिपोर्ट दाखवा
वसुली अधिकारी : केस पेपरमध्ये जोडला असेल
ऍड देशमुख : तुम्ही जोडला असेल? की अन्य कुणी जोडला असेल?
वसुली अधिकारी : पोलिसांनी जोडला असेल
ऍड देशमुख : तुम्हाला मेडिकलमध्ये पोलिसांनी नेले होते का?
वसुली अधिकारी : नाही, आम्ही स्वतःहूनच गेलो होतो
ऍड देशमुख : पोलिसांनी मेडिकल रिपोर्ट घेतला होता का?
वसुली अधिकारी : आता नक्की आठवत नाही
ऍड देशमुख : शरीरावर जखमा झाल्याचे काही व्रण तरी आहेत का?
वसुली अधिकारी : होय. आहेत.
ऍड देशमुख : दाखवा, कुठे आहे?
वसुली अधिकारी : तेव्हा कुठे कुठे जखमा झाल्या होत्या ते आता आठवत नाही.
ऍड देशमुख : तुम्ही यांना ओळखता का?
वसुली अधिकारी : ओळखतो. हेच गंगाधर मुटे आहेत
ऍड देशमुख : यांनी तुमची गावातून मारबत काढली होती का?
वसुली अधिकारी : हो. "कर्जवसुली अधिकाऱ्यांना घेऊन जा गे मारबत" असे म्हणत आमच्या गाडीमागे धावत येऊन आमची मारबत काढली होती.
ऍड देशमुख : यांनी तुमच्या अंगावर चिखल फेकला होता का?
वसुली अधिकारी : यांनी आमच्या अंगावर चिखल फेकला होता.
ऍड देशमुख : तुमच्या अंगावर फेकायला यांनी चिखल कुठून आणला आणला होता?
वसुली अधिकारी : यांनी विहिरी जवळच्या नालीतील घेतला होता.
ऍड देशमुख : ही शाळेजवळची घटना आहे ना?
वसुली अधिकारी : होय. शाळेजवळचीच घटना आहे.
ऍड देशमुख : पण शाळेजवळ तर विहीरच नाही. मग तिथे नाली आणि चिखल कुठून आला? तुमच्या अंगावर चिखल फेकला, असे तुम्ही तर तक्रारीत लिहिलेलेच नाही!
वसुली अधिकारी काही बोलत नाही. चूप राहतो.
ऍड देशमुख : गंगाधर मुटे यांनी तुमच्या अंगावर शेणसुद्धा फेकलेच असेल ?
वसुली अधिकारी : होय, त्यांनी आमच्या अंगावर शेण फेकले.
हे ऐकून सरकारी वकील वैतागून उभा होतो आणि वसुली अधिकाऱ्याकडे बघून म्हणतो "आणखी किती खोटे बोलणार आहात रे तुम्ही? आता इथे बोलतो आहेस त्यातील अर्धे तर तू तुझ्या मूळ रिपोर्ट मध्ये लिहिलेच नाही!"
ऍड देशमुख न्यायालयाला सांगतात की, ही सगळी बनावट कहाणी आहे. ही मंडळी आर्वीला गेलेलीच नव्हती आणि तिथे काहीही झालं नाही. गंगाधर मुटे पत्रकार आहेत आणि त्यांनी बँकेविरोधात अनेक बातम्या वृत्तपत्रांमध्ये छापल्या होत्या आणि बँकेतील गैरकृत्याचे बिंग फोडले होते म्हणून ही मंडळी चिडली आणि खोटी बनावट केस उभी करून माझ्या अशिलाला त्यात गुंतवण्याचा प्रयत्न केला.
ही कहाणी आहे १९८२ या सालातील. या काळात इतिहासात पहिल्यांदाच शेतकरी संघटना स्थापन होऊन शेतकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर येण्याला सुरुवात झालेली होती. कॉलेज करत असतानाच मी जशी संधी मिळेल तसा संघटनेच्या उपक्रमात सहभागी होत असायचो. शरद जोशी वर्धेला आले आणि त्यांची सभा किंवा बैठक असली की मी कॉलेजला बुट्टी मारून शरद जोशींना ऐकायला जात असायचो. तो काळच वेगळा होता. त्या काळातल्या कहाण्या ऐकताना आजच्या नव्या पिढीला काल्पनिक कहाण्या वाटून एखादा कपोलकल्पित चित्रपट बघत असल्याचा फील येईल, इतका तो काळ वेगळा होता. शेती आणि शेतकऱ्याला अजिबात प्रतिष्ठा नव्हती. ७० वर्षाच्या वयोवृद्ध शेतकऱ्याला दलालांचा किंवा व्यापाऱ्यांचा १० वर्षाचा पोरगा अथवा मार्केट यार्डातला हमाल देखील अरे-कारे, आबे-काबे अशा एकेरी भाषेत बोलायचा. गावातल्या पटवाऱ्याकडे किंवा सोसायटीच्या बाबूकडे शेतकरी देव किंवा मसीहाच्या नजरेने बघायचे. माझं बालपण गावात आणि शिक्षणासाठी शहरात गेल्याने शहर आणि खेडी यांच्यातील जीवनमानाची दरी स्पष्टपणे नजरेत भरत होती. शेतीची दुर्दशा संपवायची असेल तर शेतकरी संघटित झाला पाहिजे, अशी अस्पष्ट जाणीवही अंतर्मनाला होत होती. तशातच शरद जोशींचे परदेशातून गलेलठ्ठ पगाराची नोकरी (१९७८ मध्ये दीड लाख रु. महिना) सोडून भारतात येऊन शेतकऱ्यांसाठी शेतकरी संघटना बांधण्याचे त्यांचे प्रयत्न मनाला भुरळ घालत होते.
त्या काळात सक्तीची कर्जवसुली हा एक भयानक प्रकार सुरू होता. सक्तीची वसुली म्हणजे एखाद्या शेतकर्यावर एखाद्या बँकेचे जर ५० हजार रुपये कर्ज असेल तर वसुली अधिकारी त्या शेतकर्याच्या घरात घुसून त्याच्या घरातली स्वयंपाकाची भांडी जप्त करायचे, झोपायचा पलंग जप्त करायचे, घरात असलेले पाचपन्नास किलो अन्नधान्य जप्त करायचे. या वस्तूंची एकूण किंमत दोन-चारशे रुपयेच असायची. पण या वस्तू जप्त करून, त्याचे चावडीवर प्रदर्शन मांडून त्या शेतकर्याची पुरेपूर नाचक्की करणे, हा त्यामागचा हेतू असायचा. हे वाचताना एखाद्याला अतिशयोक्ती वाटेलही; पण सक्तीची वसुली करताना वसुली अधिकारी शेतकर्यांना ”तुझी बायको गहाण ठेव”, “तुझी मुलगी रातच्याला पाठव पण आमची वसुली दे'', या भाषेत बोलायचे. शेतीची, घराची, खुंट्याच्या जनावराची जप्ती करून जाहीर लिलाव करायचे आणि येईल त्या किमतीला हर्रास करून विकूनही टाकायचे. कर्ज मागायचे असेल तर अधिकाऱ्यांना पार्टी दिल्याशिवाय कर्जमंजुर होत नव्हते आणि कर्जफेडीसाठी महिनाभराची मुदत वाढवून मागायची असेल तर कोंबडीच्या तंगडीचा नैवद्य दाखवल्याशिवाय मुदतवाढ मिळत नव्हती. एकंदरीत "पार्टी द्या, कर्ज घ्या; कोंबडी द्या, वसुली थांबवा" असा सर्रास प्रकार चालायचा. शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नसल्याने शेती व्यवसाय घाट्याचा झाला की भांडवली तूट भरून निघत नाही आणि शेतीवर कर्जाचा डोंगर उभा राहतो. त्यामुळे प्रयत्न करूनही, प्रामाणिकपणे शेती करूनही, कर्जफेड करणे शेतकऱ्यांना शक्य होत नव्हते. शेतमालाला भाव द्यायला सरकार तयार नव्हते, मात्र शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली पाहिजे म्हणून सक्तीची कर्ज वसुली करणे हा त्या काळातील नेहमीच फंडा असायचा. मी नागपूर येथील एका प्रतिष्ठित दैनिकाचा पत्रकार असल्याने मी त्या काळात सविस्तर बातम्या लिहून प्रकाशित केल्या होत्या आणि शक्य त्या पद्धतीने हा प्रश्न चव्हाट्यावर आणायचा प्रयत्न केला होता.
सक्तीची कर्जवसुली हा ज्वलंत प्रश्न असण्याच्या काळातच शेतकरी संघटनेचा एक शेतकरी मेळावा झाला होता. त्या मेळाव्यात शरद जोशींनी "राजकीय पुढाऱ्यांना आणि कर्ज वसुली अधिकाऱ्यांना गाव बंदी" असा एक कार्यक्रम दिला होता. हा कार्यक्रम आपल्या गावात आपण राबवायचाच असा मी निर्धार केला. अंकुश भोयर, स्व. बाबा कातोरे, अशोक कातोरे, प्रभाकर उगेमुगे, अशोक धात्रक, राजू उगेमुगे या सहकाऱ्यांच्या मदतीने गावात संघटना स्थापन केली. शेतकऱ्यांसोबत बैठका केल्या. शरद जोशी काय म्हणतात ते शेतकर्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला आणि पाहता पाहता गावामध्ये शेतकरी संघटनेच्या रूपाने एक तरुणांची फौज तयार झाली. फौज तयार झाली पण काम काहीच नव्हते म्हणून मग आम्ही गावात भिंती रंगवणे, आजूबाजूच्या गावात जाऊन शेतकरी संघटनेचा विचाराच्या प्रचारार्थ छोट्या छोट्या बैठका घेणे असे कार्यक्रम सुरू केले. त्या काळात आम्ही तसे नवखे आणि अनुभव शून्य पण सळसळत्या रक्ताचे नवतरुण होतो. गावबंदी कशी करायची, त्याचा शेवट काय होईल, याचा विचार करायची जराशी सुद्धा गरज न वाटणारे आणि परिणामाची चिंता न बाळगणारे.
एक दिवस आम्ही सहज गप्पा मारत चौकात बसलो असताना काही शेतकरी पोरं धावत आमच्याकडे आली आणि म्हणाली की, बँकेचे कर्जवसुली अधिकारी गावात येऊन उत्तम देशकर यांच्या पत्नीला अर्वाच्य शिवीगाळ करत आहेत. हे ऐकताच आम्ही खाडकन उभे झालो आणि घटना स्थळाच्या दिशेने पळत सुटलो. तिथले दृश्य बघून मी अवाकच झालो. तो बँकेचा वसुली अधिकारी त्या शेतकऱ्याच्या पत्नीला "आत्ताच्या आत्ता आता कर्ज भर" असा हुकूम सोडत होता.
"साहेब, अजून आमचे कापूस बोंड मार्केटला गेले नाही, घरात अजून पैसा आला नाही, आम्ही कर्ज भरावे कसे? कापूस विकला की कर्ज भरतो" अशी ती शेतकऱ्याची पत्नी गयावया व विनंती करत होती.
"तुम्हाला मुलीचे लग्न करायला पैसे सापडतात, नातेवाइकांच्या तेरवीला जायला पैसे सापडतात, दारू प्यायला पैसे सापडतात, लुगडे घ्यायला पैसे सापडतात, मात्र बँकेचे कर्ज भरायला पैसे सापडत नाहीत, तुम्ही आत्ताच्या आत्ता कर्जाची रक्कम भरली पाहिजे" असा तो उर्मट अधिकारी हुकूम सोडत होता.
कर्जाचा हप्ता म्हणून भरायला काहीही रक्कम घरात नसल्याने तो शेतकरी हतबल होता पण अधिकारी मात्र काहीच ऐकून घेत नव्हता. शेवटी म्हणाला की, मी तुमच्या घरातली भांडीकुंडी जप्त करणार आहे आणि त्याने लगोलग आपल्या सहकाऱ्यांना आदेश दिला की भांडीकुंडी घराबाहेर काढा. त्याचे सहकारी लगेच घरात घुसले आणि त्यांनी घरातील गुंड, ताट, वाट्या ,कोपरा, अशी स्वयंपाकाची भांडी गोळा करून रस्त्यावर आणून टाकली. अधिकाऱ्याने लगेच कागद लिहिला. त्यावर या सगळ्या भांड्यांचे वर्णन आणि जप्तीचा आदेश लिहून त्यावर स्वाक्षरी करून शेतकऱ्याच्या हातात ठेवला. आम्ही अगदी सौम्य भाषेत त्या वसुली अधिकाऱ्यांना विचारले की, साहेब! आता या भांड्यांचे काय करणार आहात? तर तो अधिकारी म्हणाला "ही भांडी आम्ही जप्त करून घेऊन जाणार आणि हिंगणघाट बँकेचे ऑफिस समोर लिलाव करणार." स्वयंपाकाच्या भांड्यांचा जाहीर लिलाव हे ऐकताच आम्ही संतापलो, आमची वानरसेना संतापली आणि रस्त्यावर आणलेली सर्व भांडी आम्ही परत शेतकऱ्याच्या घरात नेऊन ठेवली. हे बघून तो अधिकारी आणखी चिडला आणि म्हणाला "मी तुम्हाला पाहून घेतो, जेलची हवा दाखवतो, तुम्हाला सहा महिन्यासाठी जेलमध्ये घातलं नाही तर मी नावाचा घोरपडे नाही." स्वाभाविकपणे मग आमची त्या अधिकाऱ्यांसोबत बाचाबाची झाली. मग ते घर सोडून अधिकारी पुढच्या कर्जदार शेतकऱ्याकडे जायला निघाले. आम्ही त्यांचा पाठलाग करत त्यांच्या मागे जात होतो. ते शेतकर्याच्या घरी घुसून त्याच्या घरातली भांडी काढून रस्त्यावर आणत होते आणि जप्तीची प्रक्रिया पूर्ण झाली की ती भांडीकुंडी आम्ही उचलून परत शेतकऱ्याच्या घरात व्यवस्थित नेऊन ठेवत होतो. असे दहा-बारा घरी झाल्यानंतर सरतेशेवटी ते निघून गेले.
आम्हाला वाटले की ते निघून गेलेले आहेत, म्हणून आम्ही सर्व एका शेतकऱ्याच्या घरासमोर शांतपणे ''आता पुढे काय होईल" याविषयी चर्चा करत बसलो होतो. तितक्यात पुन्हा बातमी मिळाली की तो अधिकारी आणि त्यांचे सहकारी गावाच्या दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन जप्तीची कारवाई करत आहेत. आम्ही लगबगीने त्या दिशेने निघालो. आम्ही पोहचेपर्यंत त्यांनी रामकृष्ण खाडे यांच्या घरात घुसून त्यांच्या घरात असलेला एकमेव लोखंडी पलंग सर्वांनी मिळून बाहेर आणला होता पण या वेळेस मात्र त्यांनी पलंग रस्त्यावर ठेवला नाही. सहा जणांनी तो पलंग खांद्यावर घेऊन ते त्यांच्या जीपगाडी कडे जायला निघाले होते. आता मात्र थेट संघर्ष अटळ होता. त्यांच्या हातचा पलंग हिसकावून घेणे यापलीकडे दुसरा कुठलाही मार्ग उरला नव्हता. मग आम्ही सगळ्यांनी मिळून वसुली अधिकारी आणि त्याच्या सहकाऱ्यांची बर्यापैकी धुलाई केली. इतकी धुलाई केली की ते मिळेल त्या दिशेने पळायला लागले. आम्ही त्यांचा पाठलाग करून "वसुली अधिकाऱ्यांना घेऊन जा गे मारबत" "शेतकरी संघटनेचा विजय असो" "शरद जोशी झिंदाबाद" "शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळालाच पाहिजे" "सक्तीची कर्जवसुली थांबलीच पाहिजे" अशा घोषणा दिल्या आणि तो पलंग परत ज्याचा होता, त्याच्या घरी नेऊन ठेवून दिला. आम्ही सर्व त्या काळात नवथर म्हणजे वय वर्षे १५ ते २२ वयोगटाचे होतो, आम्हाला तशी कसलीच व्यावहारिक जाण नव्हती. आम्ही वसुली अधिकाऱ्यांशी जसे वागलो ते योग्य की अयोग्य, त्याचे दुष्परिणाम काय होतील, याचा विचार करण्याची सुद्धा आम्हाला त्या वेळेस गरज वाटली नाही. अधिकारी पळून गेले, आपला विजय झाला, आता हे सगळं प्रकरण संपलं आहे, असा काहीसा स्वतःचा ग्रह करून आम्ही सर्वच्या सर्व वानरसेनेसह घरी परतलो आणि गप्पा हाकत बसलो.
तितक्यात आजनगाव पोलीस स्टेशनची पोलीस व्हॅन आली. पोलीस निरीक्षक विकास देशकर आणि त्यांच्यासोबत पंचवीसेक पोलिसांचा ताफा. विकास देशकर झपाझप पावले टाकत आमच्या दिशेने आला आणि म्हणाला,
"गंगाधर मुटे कोण आहे?"
"मी आहे साहेब!" मी उभा झालो आणि अदबीने म्हणालो.
विकास देशकरने माझा हात धरला आणि अक्षरशः ओढत न्यावे तसे ओढत नेऊ लागला.
"साहेब! मी स्वतःहून तुम्ही म्हणाल तिथे यायला तयार आहे, माझा हात सोडा, मला सन्मानाने चालू द्या.” पण एका सामान्य शेतकरी पुत्राचे ऐकेल तो पोलिस अधिकारी कसला? या पोलीस निरीक्षकाने मला बाजारओळी पर्यंत ओढत न्यावे त्या स्टाइलनेच नेले. गावातील लोकांसमोर अपमानास्पद वागणूक देऊन मानसिक खच्चीकरण करणे हा त्याचा प्रयत्न असल्याचे माझ्या लक्षात आल्याने आता माझे डोके तापायला लागले होते. जी काही कायदेशीर सजा होईल ती आनंदाने भोगायची माझी आनंदाने तयारी होती. पण अशी वर्तणूक सहन करण्यापलीकडे होती पण नाईलाज होता.
बाजारओळीतील चौकात गेल्यानंतर देशकर मला म्हणाला,
"या वसुली अधिकाऱ्यांची माफी माग"
"साहेब, मी माफी मागावी असा कोणताही गुन्हा मी केलेला नाही" मी म्हणालो आणि तो कर्ज वसुली अधिकारी शेतकरी महिलेशी कसा वागला, हे सांगण्याचा प्रयत्न करू लागलो. पण तो मला बोलूच देत नव्हता. माझे काहीही न ऐकताच तो म्हणाला..
"आम्हाला शहाणपणा शिकवू नकोस. चल माफी माग" या वेळेस त्याचा स्वर मग्रुरीपूर्ण आदेशात्मक होता.
"मी गुन्हा केलेला नाही आणि मी माफी मागणार नाही" मग मी सुद्धा तितक्याच धीटपणे उत्तर दिले.
हे ऐकताच त्या पोलीस निरीक्षकाचा पारा चढला आणि त्याने खाडकन माझ्या कानशिलात ठेवून दिली. हा क्षण माझ्यासाठी नक्कीच अनपेक्षित होता. आपल्यावर कायदेशीर कारवाई होईल, याचा अंदाज आला होता पण आपल्या अंगावर हात टाकला जाईल, याची मी यत्किंचितही कल्पना केली नव्हती. मी आजवर कधी कुणाकडून मार खाल्लेलाच नव्हता. शाळेत त्या काळी शिक्षक विद्यार्थ्यांना झोडून-फोडून काढायचे, पण किरकोळ शिक्षा वगळता मोठ्या शिक्षा मला माझ्या शालेय गुरुजनांनी कधी केल्या नव्हत्या. त्यामुळे हा प्रसंग माझ्यासाठी अत्यंत अनपेक्षित असाच होता. त्यामुळे पुढे जे घडले तेही अनपेक्षित असेच घडले.
ज्याक्षणी पोलीस इन्स्पेक्टरने पूर्ण ताकदीनिशी माझ्या कानशिलात ठेवली त्याच क्षणी....
अगदी क्षणाचा विचार न करता...
मी सुद्धा माझ्या पूर्ण ताकदीनिशी पोलीस इन्स्पेक्टरच्या थोबाडीत ठेवून दिली.
आरोपीच्या अंगावर हात घातल्यावर आरोपीसुद्धा उलटटपाली परतफेड करू शकतो.... अशी त्याने आयुष्यात कधीच कल्पना केलेली नसणार. तो पूर्णतः बेसावध असल्याने त्याला मला अडवायची संधीच मिळाली नाही. डोक्यावर हॅट असल्याने कानशिलाचा भाग झाकलेला असला तरी गुबगुबीत गालाचा मलईयुक्त प्रदेश हिरव्यागार मैदानासारखा सताड मोकळा होता. त्याचा फायदा मी उचलला आणि पाचही बोटे उमटतील अशी झापड त्याच्या गालधरून ठेवून दिली.
त्यांनंतर पुढे जे झाले ते पाहण्याच्या अवस्थेत मी नव्हतो. कारण आता पोलिसांचा पूर्ण ताफाच सक्रिय झाला होता. पावसात गेल्यानंतर जसे एकाच वेळी पाचपन्नास टपोरे थेंब अंगावर पडताना जाणवतात तसेच माझ्या सर्वांगावर पाच-पन्नास लाठ्यांचा भडिमार एकाचवेळी होत आहे असे जाणवत होते. प्रतिपक्षाला पुन्हा संधी मिळू नये म्हणून जशी व्यूहरचना केली जाते तशीच व्यूहरचना बहुधा त्यांनी केली असावी. दहावीस मांजरींनी मिळून उंदीर पकडावा तसे त्यांचे मला पकडणे, उचलणे, गाडीत कोंबणे ...... वगैरे वगैरे.
घटना घडत असताना सारा गाव तिथे गोळा झाला होता. शेतकरी संघटनेच्या घोषणांनी आसमंत दुमदुमत होता. शेतकरी संघटनेच्या घोषणांमध्ये आता आणखी ''पोलीस खाते मुर्दाबाद" "पोलिसांची दडपशाही आम्ही खपवून घेणार नाही" यासारख्या घोषणांची आणखी त्यात भर पडली होती. ज्या सफाईने गाडीत बसून शिताफीने व लगबगीने पोलिसांनी गाडी तिथून काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला, गाडीत ज्या तऱ्हेने सर्व "पोझिशन" घेऊन बसले होते, त्यावरून गावकरी विरुद्ध पोलीस असा संघर्ष उभा राहतो की काय, अशी भीती बहुधा पोलीस खात्याला वाटली असावी, असे जाणवले. मला घेऊन पोलीस व्हॅन पोलीस स्टेशनच्या दिशेने रवाना झाली. गाडी चालत असताना माझ्या अंगावर किती वळ उमटले असतील, लाठ्या किती आणि कुठे कुठे बसल्या असतील याचा अजिबात विचार माझ्या डोक्यात आल्याचे मला आठवत नाही. माझ्या डोक्यात तेव्हा फक्त एकच विषय घोळत होता.... तो म्हणजे आपण थोबाडात कशी हाणली. तेच दृश्य शौर्य रूपाने माझ्यासमोर वारंवार दृष्टिपटलावर येत होते आणि मी माझ्या स्वतःच्या शौर्यात इतका मशगुल झालो होतो की अजूनपर्यंत माझ्या वेदनांनी डोके वर काढायला सुरुवातच केलेली नव्हती. ठाण्यात पोचताक्षणी मला पोलीस कस्टडीत कोंबले गेले... आणि कस्टडीला बाहेरून कुलूप लागले. एखादा कुख्यात दहशतवादी कस्टडीत कोंबताना व्हावे तसे त्यांचे वर्तन होते पण मी पाणी मागताच मात्र राज्याच्या मुख्यमंत्र्याने पाणी मागितल्यावर करावी तशी धावपळ करून त्यांनी माझ्यासाठी पाणी आणले. मला पाणी दिले आणि पुढील कारवाईला लागले. मला जिथे ठेवले ती कस्टडी अगदीच मोक्यावर असल्याने त्यांचे सर्व कामकाज मला दिसत होते.
वसुली अधिकाऱ्याच्या तोंडी तक्रारीवरून पोलिसांनी आतापर्यंतची कारवाई केली होती. त्यामुळे "लेखी तक्रार तातडीने द्या" असे वसुली अधिकाऱ्याला सांगण्यात आले. वसुली अधिकाऱ्याने माझ्याकडे पहिले आणि नजरानजर होताच त्याला दरदरून घाम फुटला. रिपोर्ट लिहिताना त्याचे हात थरथरत होते. कोणत्याही स्थितीत सहा महिने जमानत मिळता कामा नये, यासाठी कोणकोणती कलमे लावावी, याचा सर्वांनी सामूहिक विचार करून माझ्यावर गुन्हा नोंद करून ३५३ हे अजामीनपात्र आणि आणखी ४ अन्य कलम लावण्यात आले. वसुली अधिकाऱ्याला तिथून निसटण्याची घाई असल्याने घाईगडबडीत रिपोर्ट लिहिल्या गेल्याने त्यात बऱ्याच चुका झाल्या आणि त्याच धबडग्यात वसुली अधिकारी व सहकाऱ्यांचे मेडिकल करणे पुराव्याच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे असूनही राहून गेले.
या घटनेची वार्ता वाऱ्यासारखी पसरावी अशी त्या काळात कोणतीच साधने आमच्या गावात उपलब्ध नव्हती. न मोबाईल, न फोन, ना बाइक, ना फोरविलर. होती ती फक्त सायकल. आमची पोलीस व्हॅन गावावरून निघाली तेव्हा त्याच वेळी माझे सवंगडी सहकारी सायकली घेऊन हिंगणघाटच्या दिशेने रवाना झाले होते. एक टीम आमदार डॉ. बोंडे यांचेकडे तर दुसरी टीम शेतकरी संघटनेचे कणखर नेते गिरधर राठी यांच्या घरी पोचली. हिंगणघाटला आमदार डॉ. बोंडे, गिरधर राठी, प्रा. मधुकर झोटिंग, प्रा. शेषराव येरलेकर, डॉ. जवादे आणि अन्य सहकाऱ्यांची तातडीची बैठक झाली. पुढे काय करावे याविषयी विचार विमर्श करण्यात आला. ही मंडळी तातडीने उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात पोहोचले पण कार्यालयात उपविभागीय पोलिस अधिकारी हजर नव्हते. कळले की ते कुठे तरी लग्नात गेले आहे. मग ही मंडळी लग्नाच्या दिशेने रवाना झाली. उपविभागीय पोलिस अधिकारी यांना सर्व प्रकार सांगितला आणि या प्रकरणातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी आजनगाव पोलीस स्टेशनला चालावे असा आग्रह धरला. पण अधिकारी काही केल्या ऐकेचना. मग गिरधर राठी यांनी तंबीच दिली की तुम्हाला यायचं नसेल तर नका येऊ पण जर का प्रकरण हाताबाहेर गेले आणि तिथे काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर सर्व जबाबदारी तुमची राहील. मग मात्र परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ही सर्व मंडळी त्यांना घेऊन आजनगावला आली. माझ्या सुटकेची मागणी केली तर ठाणेदार म्हणाले आरोपीवर ३५३ व अन्य ४ कलमे रजिस्टर झालेले आहेत. येथे जमानत देता येणार नाही. तुम्ही उद्या न्यायालयात आपली बाजू मांडा आणि जमानतीसाठी प्रयत्न करा. गुन्हा संगिन असल्याने सहा महिन्यापर्यंत जामीन मिळणे अशक्य आहे, असेही ते म्हणाले. ठाणेदाराची उर्मट भाषा ऐकून शेतकरी संघटनेचे नेते संतापले.
डॉ. बोंडे म्हणाले "आत्ताच्या आत्ता आमचा कार्यकर्ता सोड नाहीतर मी तुझी पॅंट सोडतो आणि तुला कस्टडीत कोंबून आमचा कार्यकर्ता बाहेर काढतो"
गिरधर राठी म्हणाले "जास्त शहाणपणा करशील तर कुलूप फोडून आम्ही आमचा कार्यकर्ता बाहेर घेऊन जाऊ आणि पोलीस स्टेशन पेटवून देऊ"
तोपर्यंत पोलिस स्टेशन बाहेर सुमारे तीन हजार लोकांचा जमाव गोळा झाला होता. तणाव वाढत होता. परिस्थिती आटोक्याबाहेर जात असल्याचे लक्षात येताच एसडीपीओ श्री सारंगी साहेबांनी एसपी साहेबांसोबत फोनवरून संभाषण केले. त्यांना परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगितले आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तणाव वाढू नये, अनुचित घटना घडू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आरोपीला विनाशर्त सोडून देणे आवश्यक असल्याचे एसपींना त्यांनी पटवून दिले. सरतेशेवटी ठाणेदाराला नमते घ्यावे लागले आणि माझी विनाशर्त सुटका करण्यात आली.
कर्जवसुली अधिकाऱ्याला कर्जवसुली करण्यापासून मज्जाव करणे, त्याला अडवणे आणि कर्ज वसुलीचा डाव उधळून लावणे हा शेतकरी संघटनेच्याच नव्हे तर शेतीच्या इतिहासातील हा पहिला अध्याय आणि मैलाचा दगड असण्याची शक्यता आहे. कदाचित सृष्टीच्या उगमानंतर समग्र शेतीच्या इतिहासातील हे पहिलेच आंदोलन असण्याची शक्यता आहे. त्याच आंदोलनाने राज्यभर वसुली अधिकाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण केले. तेव्हापासून पुढे कालांतराने सक्तीची कर्ज वसुली हा प्रकार कमी होत गेला आणि आता तर औषधालाही उरला नाही. नवीन पिढीला आज हे सुद्धा ज्ञात नसेल की ३० वर्षांपूर्वी इतक्या कठोर पद्धतीने शेतीची कर्जवसुली केली जात होती.
दुसऱ्या दिवशी हिंगणघाट येथे पोलीस कारवाईच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला आणि सक्तीची कर्ज वसुली थांबवा ही मागणी करण्यात आली. माझ्यावर दाखल झालेला गुन्हा हा व्यक्तिगत स्वरूपाचा होता आणि तो सरकार परत घेणार नाही याची आम्हाला जाणीव होती. त्यामुळे न्यायालयीन लढा लढण्याशिवाय अन्य काही पर्याय नव्हता. माझ्या विरोधात न्यायालयात सहा वर्षे खटला चालला. बँकेच्या बाजूने पूर्ण ताकदीनिशी केस लढवण्यात आली. माझ्या विरोधात पुरावे सुद्धा भक्कम होते परंतु बँक अधिकाऱ्यांनी तक्रार लिहिताना अक्षम्य चुका केल्याने तसेच माझ्या वकिलांनी बाजू पद्धतशीर व भक्कमपणे हाताळल्याने या प्रकरणातून माझी निर्दोष मुक्तता झाली.
शेतकरी संघटनेचे कार्य करताना एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे लक्षात घेतली पाहिजे की पोलीस कारवाई झाली किंवा न्यायालयीन केसेस झाल्या तरी या केसेस प्रत्येक कार्यकर्त्याला आपआपल्या बळावरच स्वतःच्या ताकतीने आणि स्वतःच्या खर्चाने लढाव्या लागत असतात. शेतकरी संघटनेकडे कुठलाही निधी नसल्याने त्यावर अन्य काही पर्याय नाही. शेतकरी संघटनेत आजपर्यंत जेवढ्या पोलीस कारवाया अथवा न्यायालयीन कारवाया झाल्या आहेत त्या सर्व केसेस शेतकऱ्यांनी आपापल्या खर्चाने व स्वतःच्या ताकतीने न्यायालयात लढवलेल्या आहेत. शेतकरी संघटनेला राज्यभर असे कार्यकर्ते मिळालेत हेच शेतकरी संघटनेचं खास वैशिष्ट्य आणि वैभव आहे
- गंगाधर मुटे
(टीप : संबंधितांच्या खाजगी आयुष्यातील हितसंबंधांना बाधा येऊ नयेत म्हणून काळ, वेळ, स्थळ आणि नावे बदलण्यात आलेली आहेत.)