Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



शरद जोशींनी शेतकऱ्यांमधील स्वाभिमान जागवला - भानू काळे

शरद जोशींनी शेतकऱ्यांमधील स्वाभिमान जागवला - भानू काळे
 
(सह्याद्री फार्म्स, मोहाडी, नाशिक येथे भरलेल्या अकराव्या शेतकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून सोमवार, ४ मार्च २०२४ रोजी मा. भानू काळे, संमेलनाध्यक्ष यांनी केलेल्या भाषणाचे संपादित शब्दांकन)
 
 
नमस्कार, 
 
मी या अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलनाला अध्यक्ष म्हणून यायचं मान्य केलं त्यासाठीचं एक आकर्षण म्हणजे शरद जोशी आणि त्यांचं कार्य याविषयी मला असलेला आदर. दुसरं कारण म्हणजे उदघाटक म्हणून येणारे नाना पाटेकर. देशभर पसरलेल्या त्यांच्या असंख्य चाहत्यांपैकी मीही एक आहे. एक अभिनेता म्हणून ते श्रेष्ठ आहेतच पण नाम फौंडेशनच्या मार्फत ते करत असलेलं कामही खूप मोलाचं आहे. तिसरं कारण म्हणजे मी शरद जोशींचं चरित्र लिहिताना त्यांच्या ज्या निकटच्या सहकाऱ्यांची मला खूप मदत झाली, त्यापैकी रामचंद्रबापू पाटील, सरोजताई काशीकर आणि वामनराव चटप या तिघांची या संमेलनातील उपस्थिती. शिवाय चौथे कारण म्हणजे स्वागताध्यक्ष आणि सह्याद्री फार्म्स शेतीउद्योगाचे प्रणेते विलास शिंदे यांना भेटायची संधी.
 
विलास शिंदे यांना मी पूर्वी एकदा भेटलो होतो. त्यांच्याशी थोडाफार परिचय होता. त्यांचं कामही बघितलं होतं. पण अजून थोडा परिचय व्हायला हवा अशी भूक जागवणारं ते व्यक्तिमत्व होतं.
 
एक छोटीशी गोष्ट सांगाविशी वाटते. या संमेलनाचं आमंत्रण द्यायला विलास शिंदे त्यांच्या चार सहकाऱ्यांसोबत औंधला माझ्या घरी आले होते. सकाळी फोन झाला होता आणि आजच्या दिवसांत केव्हातरी भेटू असं ठरलं होतं. पण भेटायची वेळ नक्की ठरली नव्हती. “मी तुमच्या इमारतीत पोचलो आहे” असं सांगणारा फोन आला तेव्हा मी तेव्हा शनिवार पेठेत साधना साप्ताहिकाच्या कार्यालयात अडकलो होतो. कितीही प्रयत्न केला तरी लगेच येणं अवघड होते. जवळ जवळ पाऊण तास विलास शिंदे आणि त्यांचे तीन सहकारी आमच्या इमारतीच्या पार्कींग लॉट मध्ये उभे होते. मला वाटेत असताना सतत खूप संकोच वाटत होता. मी फोनवर त्यांना म्हटलं, ‘अहो, तुम्ही पार्किंग लॉट मध्ये उभे का राहता? आमच्या घरी जा. मी तळमजल्यावर राहतो. बसा. मी येतोय.’ पण तरीदेखील ते चौघे पार्कींगमध्ये उभं राहून त्यांची कामं करत राहिले. इतकं प्रचंड यश मिळविलेल्या या माणसामधील ती विनम्रता मला विलक्षण भावून गेली. एका कुठल्यातरी कार्यक्रमातून ते येत होते. दुसऱ्या दिवशी मी पेपरमध्ये वाचलं की ज्या कार्यक्रमाहून ते येत होते तो अभिनेता अमिर खानचा कार्यक्रम होता. त्याच्या पत्नी किरण राव या त्यात प्रमुख अतिथी होत्या. जॅकी श्रॉफ वगैरे नट तिथे उपस्थित होते. पण त्या कार्यक्रमाचा शिंदे यांनी अगदी ओझरता उल्लेख केला होता. अशा मोठ्या लोकांच्या ओळखी सांगणं, त्यांच्याशी जोडलं जाणं हे त्यांनी जराही केलं नाही. याचंही मला खूपच कौतुक वाटलं.
 
आता मुख्य भाषणाकडे वळतो. मला तीन मुद्दे मांडायचे आहेत.
 
त्यातील पहिला मुद्दा - शरद जोशी यांचं चरित्र मी का आणि कसं लिहिलं?
दुसरा मुद्दा - अंधाराकडून ज्योतीकडे ही त्यांची विचारधारा कशी बनली? याच विचारधारेचं प्रतीक सह्याद्री फार्म्स हे आहे.
तिसरा मुद्दा - शरद जोशी यांचं साहित्य आणि हे शेतकरी साहित्य संमेलन.
 
पहिल्या मुद्दयापासून सुरवात करतो –
 
शरद जोशी यांचं चरित्र मी का आणि कसं लिहिलं?
 
खरं म्हणजे 1994 साली अंतर्नाद मासिक सुरु करण्याकरीता मी मुंबईहून पुण्याला आलो. पण तत्पुर्वीच्या 40-45 वर्षांत शरद जोशींविषयी पेपरात अधून मधून वाचायला मिळायचं. पण ते त्यांच्या कार्याचं खऱ्या अर्थाने मूल्यमापन करणारं नव्हतं. कुठेतरी शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला आहे किंवा आज मुंबईत दूध येणार नाही; अशा स्वरुपाच्या कृतक बातम्या, त्याही वर्तमानपत्राच्या दुसऱ्या-तिसऱ्या पानावर असायच्या. कारण ज्या अर्थाने जॉर्ज फर्नांडिस, बाळासाहेब ठाकरे हे मुंबईकरांचे आयकॉन बनले, त्या अर्थाने शरद जोशी हे मुंबईकरांचे आयकॉन बनू शकले नाहीत.
 
1994 साली पुण्याला आल्यानंतरचा एक सुखद योगायोग म्हणजे माझ्या शेजारीच राहणारे बद्रीनाथ देवकर नावाचे शरद जोशींचे निस्सिम कार्यकर्ते माझे मित्र झाले. शेतकरी संघटनेच्या संमेलनाला जाण्यासाठी त्यांनी एका प्रसंगी स्वत:ची गायही विकली होती. त्यांच्याशी बोलतांना मला शरद जोशींविषयी अधिक माहिती मिळत गेली. तसं पाहिलं तर बद्रीनाथ यांच्याशी बोलतांना मला दोन मोठ्या माणसांची माहिती मिळत गेली -- एक म्हणजे शरद जोशी आणि दुसरे म्हणजे बद्रीनाथ यांचे सासरे रावसाहेब शिंदे जे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते. रावसाहेब शिंदे यांच्या थोरल्या मुलीशी बद्रीनाथ यांचा विवाह झाला होता. त्यावेळेला शरद जोशींचा पुण्यात फ्लॅट नव्हता. खूपदा ते बद्रीनाथ देवकरांकडे असत. तिथे आमच्या गाठीभेटी व्हायच्या.
 
1999 साली आम्ही अंतर्नादचा जो दिवाळी अंक काढला होता त्याचं सूत्र होतं ‘स्वयंस्फूर्त कार्याचे समाजजीवनातील स्थान’. ‘स्वयंस्फूर्त’ हा शब्द ‘व्हॉलंटरी वर्क’ या अर्थाने वापरला होता. त्याच्यासाठी जे अनेकांचे लेख आले होते, त्या सगळ्यांपेक्षा शरद जोशींचा लेख अगदी वेगळा होता. बाकी सगळ्यांनी केलेल्या लेखनात सामाजिक कार्य, समाजकार्य यांचं गुणगान केलेलं होतं. शरद जोशींचा लेख मात्र अगदी वेगळा आणि त्याच्या शीर्षकापासूनच खूप स्फोटक होता. त्याचं शीर्षकच होतं : ‘बस्स करा हे समाजसेवेचे ढोंग‘. त्यांच्या लेखात त्यांनी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचा नावानिशी उल्लेख केला होता. ती सगळी नावं (त्यांना विचारुन) प्रत्यक्ष लेख प्रसिद्ध करताना गाळली होती.
 
   शरद जोशींच्या विचारांवरती प्रथमपासूनच लेखिका आयन रॅन्ड यांच्या साहित्याचा मोठा पगडा होता. स्वार्थ हीच प्रगतीची खरी प्रेरणा आहे, समाजसेवेमध्ये मी दुसऱ्या कुणाचा तरी उद्धार करतोय ही भावना असते, ती भावना अहंकारातून निर्माण होते आणि पुढे तिचीच एक झिंग चढते; अशा प्रकारचे विचार त्यांनी त्या लेखात मांडले होते. तो बराच मोठा 11-12 पानांचा लेख होता. त्यांची सगळी मतं मला पटणारी नव्हती आणि संपादकीयात मी ती खोडलीही होती. मात्र त्यांची अनेक मतं विचारांना प्रेरणा देणारी होती. तेव्हापासून मी त्यांच्याकडे आकृष्ट होत गेलो.
 
   मघाशी सरोजताई काशीकरांनी त्यांच्या भाषणात चांदवडच्या महिला अधिवेशनाचा उल्लेख केला. सुमारे पाच लाख महिला चांदवडसारख्या छोट्या गावात एकत्र येणं, त्यांतल्या बहुतेकांनी अनवाणी पायांनी चालणं, प्रत्येकीने दोन भाकऱ्या भाकरी स्वत:च्या बांधून आणणं, आदल्या रात्री मुक्काम करणं, हे सगळंच कल्पनातीत होतं. माझ्या मनात ज्या स्त्री-मुक्तीच्या कल्पना होत्या त्या सगळ्या शहरात राहणाऱ्या विद्वान महिलांनी मांडलेल्या होत्या -- ज्यांच्या भाषणाला 50-60 पेक्षा जास्त माणसं कधीच जमत नव्हती अशांनी मांडलेल्या.
 
   शरद जोशींचं काम त्या अर्थाने खरोखर अफाट असं होतं. मघाशी कुणीतरी नाशिक आंदोलनाचा उल्लेख केला. त्यावेळी 31,000 शेतकऱ्यांना अटक झाली होती. दौलतराव घुमरे नावाचे वकील होते. त्यांनी बार कौन्सिलमध्ये असा ठराव पारित करुन घेतला की या केसेस आम्ही एक रुपयाही न घेता लढू. सगळ्या वकिलांनी त्या तशाच लढविल्या. केस लढवतांना शंभर रुपयांचा बॉन्ड लिहून द्यावा लागतो, तितकेही पैसे यांच्यापैकी कुणा शेतकऱ्याकडे नव्हते. एकतीस हजार लोकांना अटक हा आकडाच कल्पनातीत आहे.
 
   दौलतराव घुमरे यांनी त्यांच्या लॉयर या आत्मचरित्रात याविषयी विस्ताराने लिहिलेलं आहे. या पुस्तकाला राम जेठमलानी यांची प्रस्तावना आहे.  त्यात त्यांनी एक उल्लेख असा केलाय की, जामिनावर सुटलेल्या शेतकऱ्यांना जेवायला वाढायला जेव्हा पंगत भरली होती तेव्हा तिथले जे जाधव नावाचे पोलिस प्रोसिक्युटर होते. त्यांच्या पत्नी स्वत: या कैद्यांना वाढायला आल्या होत्या. सुनावणीसाठी न्यायाधीशदेखील स्वतःच जेलमध्ये गेल्याची ही पहिलीच घटना होती. कारण एवढ्या सगळ्या लोकांना कोर्टात आणणं अशक्य होतं. तो सगळाच अगदी रोमांचकारी इतिहास आहे. वकिलांकडून खरं म्हणजे हे अपेक्षित नसतं. पण या सगळ्या वकिलांनी ते आनंदाने केलं. खरोखरच मोठा चमत्कार होता तो.
 
   शरद जोशींवरील मी लिहिलेल्या ‘अंगारवाटा-शोध शरद जोशींचा’ या चरित्राच्या प्रकाशनाच्या दिवशी पुण्याच्या एस. एम. जोशी हॉलमध्ये तुडुंब गर्दी झाली होती. कुणीतरी सांगितलं की दौलतराव घुमरे येथे आले आहेत. तेव्हा मी मंचावरुन विनंती केली की ते इथे असतील तर त्यांनी कृपया उभं राहावं म्हणजे लोकांना ते दिसतील. टाळ्यांच्या कडकडाटात ते उभे राहिले आणि त्यावेळी त्या गच्च भरलेल्या हॉलमधील प्रत्येकाचे डोळे पाणावले होते.
 
   शरद जोशींच्या अशा अनेक आठवणी सांगता येतील. मी एकदा त्यांना म्हटलं की तुमच्या नावाने जी पुस्तकं प्रकाशित झाली आहेत त्यातील एकही पुस्तक तुम्ही पुस्तक म्हणून कधी लिहिलेलं नाही. ‘शेतकरी संघटक’मध्ये प्रसंगोत्पात तुम्ही जे लेख लिहिले त्यांची ती संकलनं आहेत. पण त्यामध्ये कुठेही तुमचं सलग चरित्र असं येत नाही. चरित्र म्हणजे तुमच्या जीवनाची गाथा. पण अशा चरित्रलेखनाला त्यांचा प्रचंड विरोध होता. जवळ जवळ वर्षभर मी त्यांना आग्रह करीत होतो की त्यांचं हे चरित्र लिहिलं जाणं आवश्यक आहे. पण त्याला त्यांची अजिबात संमती नव्हती. मग मी त्यांना एकदा म्हटलं की सध्या आपल्याकडे दोन पुस्तकं फार गाजताहेत -- एक म्हणजे पी. साईनाथ यांचं ‘एव्हरीवन लव्हज व गुड ड्राऊट’ हे सुमारे ७०० पानी पुस्तक; जे शेतकऱ्यांच्या आत्महत्येविषयी आहे. शेतकऱ्यांच्या दु:खाबद्दल आहे. पण तरीही त्यात शरद जोशी किंवा शेतकरी संघटना, शेतकरी आंदोलन हे शब्ददेखील नाही. दुसरं  पुस्तक जे खूप गाजतंय ते म्हणजे रामचंद्र गुहा यांचं ‘इंडिया आफ्टर गांधी’. याच्यामध्ये देखील तुमचा उल्लेख जेमतेम तीन वाक्यात आहे. तोदेखील टिकैत यांच्या जोडीने. तुम्ही बड्या बागायतदारांचेच प्रतिनिधित्व करता असा अत्यंत चुकीचा आरोप तिथे केला आहे.
 
   हे सगळं चुकीचं आहे, तुमच्यावर अन्याय करणारं आहे. मी जे शेतकरी आंदोलन बघितलं, यातील जी माणसं मला भेटली, त्यातून जे समोर आलं त्यापेक्षा त्या पुस्तकात आहे ते अगदी वेगळं आहे. खूप आर्ग्युमेंटस केल्यानंतर ते तयार झाले. त्यांनी मला सुरवातीलाच सांगितलं की, शेतकरी संघटनेच्या बँकेत 10 हजार रुपयाचा सुद्धा बॅलन्स नाही. तरीदेखील तुम्हाला असं काही चरित्र लिहायचा उपक्रम करायचा असेल, तर तो तुम्ही ‘ऑन युवर ओन’ करा. त्याला मी तयार झालो. त्यांनी त्यांच्या कार्यकारिणीची एक बैठक पुण्यातील बोपोडी येथील फ्लॅटवर बोलावली. त्यावेळेला त्यांनी त्यांची आंबेठाणची थोडीशी जमीन विकून बोपोडीला हा एक फ्लॅट घेतला होता. या बैठकीत त्यांच्यापुढे मी एक निवेदन केलं, जे त्यांनी ‘शेतकरी संघटक’मध्ये प्रसिध्द केलं आणि सगळ्यांना विनंती केली की ‘तुमच्याकडे माझ्याविषयी जी काही माहिती असेल, ती तुम्ही भानू काळेंना द्या.’ तसं त्यांनी इतरांना सांगितलं याचं कारण असं होतं की कुठल्यातरी एका वैफल्यग्रस्त क्षणी शरद जोशींनी त्यांचे सगळे पर्सनल पेपर्स नष्ट केले होते. त्यांच्याकडे ज्याला आपण ‘प्रायमरी सोर्सेस’ म्हणतो तसे चरित्रलेखनाकरिता आवश्यक असे काहीही कागद नव्हते. ते कुठल्या वर्षी बीकॉम झाले? कधी एमकॉम झाले? हेही काही नव्हतं. त्यांनी इंडियन पोस्टल सर्व्हिसमध्ये 10 वर्षं नोकरी केली. त्या 10 वर्षांच्या कालखंडाबद्दल काहीही डॉक्युमेंटेशन नव्हतं. त्यांनी स्वित्झर्लंडमध्ये 8 वर्षं काढली. तो 8 वर्षाचा कालखंड म्हणजे आयुष्याचा एक बोगदा होता फक्त. त्याच्याबद्दल काहीच इन्फॉर्मेशन नव्हती.
 
   1978 च्या सुमारास त्यांनी चाकणला कांदा आंदोलन सुरु केलं त्यानंतरचा कालखंड लिखित स्वरूपात कुठे ना कुठे उपलब्ध होता. त्याच्या आधीचा कालखंड मात्र नव्हता. ती सगळी माहिती जमा करणं, हे एक अतिशय अवघड असं काम होतं. त्यानंतर पुढची 3-4 वर्षं त्याच्यात गेली. मी औंधला राहत होतो. ते बोपोडीला राहत होते. हे अंतर तसं कमीच होतं. दर शुक्रवारी सकाळी मी त्यांच्याकडे जात असे आणि त्यावेळी आमचं बरंच बोलणं व्हायचं. मी ते लिहून काढायचो. नंतर त्यावर त्यांचं अप्रुव्हल घ्यायचो. असा प्रघात होता. तर हे सगळं चरित्र लेखन करतांना मला त्यांच्याविषयी जी माहिती मिळत गेली ती थक्क करणारी होती.
 
   मला आठवतं मी बटाला येथे, म्हणजे पंजाबमध्ये गेलो होतो. तिथे त्यांचे निकटचे सहकारी भुपेंदरसिंग मान राहत होते. त्यांच्या घरी मी गेलो. आज पंजाबमधील शेतकऱ्यांचं आंदोलन आहे, तशाच प्रकारच्या त्यांच्या मागण्या त्यावेळेला होत्या. पण शरद जोशींच्या आगमनानंतर त्या किती बदलल्या! त्यानंतर पंजाबातील शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने ‘भीक नको हवे घामाचे दाम‘ ही भूमिका पटली. हा रोमांचकारी इतिहास आहे. खरोखरच त्या आंदोलनाची दिशाच त्यांनी बदलली. त्यावेळेला भिंद्रनसिंग यांचं खलीस्थान आंदोलन पंजाबात जोरात होते. बॉडीगार्ड घेतल्याशिवाय ग्रामीण भागात फिरणं केवळ अशक्य होतं.  कारण शीख समाज हा मुख्यत: शेतकरी आणि मुख्यत: ग्रामीण भागात राहणारा. पण शरद जोशी त्या काळात सुद्धा कुठल्याही प्रकारचं संरक्षण न घेता पंजाबभर सगळीकडे फिरत होते.
 
   भूपिंदरसिंग मान यांच्या घरामध्ये एकदा आम्ही नाश्‍ता करीत होतो. तेव्हा माझ्या लक्षात आले, त्यांच्या घराच्या भिंतीवरती फक्त दोन फोटो आहेत. त्यातील एक फोटो अमृतसरच्या सुवर्णमंदिराचा. जो कुठल्याही शिखाच्या घरी असतो. आणि दुसरा फोटो शरद जोशींचा होता. शीख शेतकऱ्यांनी शरद जोशींवरती जे प्रेम केलं ते असं अतुलनीय होते.
 
   स्वामिनाथन अय्यर हे नाव तुम्हाला नक्कीच माहिती असेल. इकॉनॉमिक टाइम्सचे ते संपादक होते. त्या वेळेला त्यांनी त्यांच्या लेखात.. ‘पंजाबचा प्रश्‍न हा हिंदु आणि शीख असा प्रश्‍न नाहीय. पंजाबचा प्रश्‍न हा गव्हाच्या अपुऱ्या किमतीचा आहे. तुम्ही शरद जोशींकडे पंजाब प्रश्‍न सोडवा. एका महिन्यात त्याला सोल्यूशन निघेल.’ असं लिहिलं होतं.  हे स्वामिनाथन अय्यर त्यावेळेला इंडियन एक्स्प्रेसमध्ये नोकरी करीत होते. अशा अनेक गोष्टी कळत गेल्या. शरद जोशींविषयीचा आदर वाढत गेला.
 
   शरद जोशींवरती प्रेम करणं ही  सोपी गोष्ट नव्हती. ही वॉज ए व्हेरी डिफिकल्ट पर्सन टू लव्ह.  ते कधी काय बोलतील याचा नेम नसायचा. पण तरीसुध्दा शेतकरी संघटनेबरोबर असंख्य कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्षे  काढली. त्यांचं प्रेम शरद जोशींनी संपादन केले. त्यांच्या शब्दाखातर जीवावर उदार होणारी लाखो माणसं तयार झाली. हा सगळा केवळ शेतकरी आंदोलनातलाच नव्हे तर भारताच्या इतिहासातला एक अभूतपूर्व अध्याय आहे.
 
   मी वर्ध्याला सरोजताई काशीकरांच्या घरी गेलो होतो. तेव्हा त्यांनी त्यावेळच्या आंदोलनाचा थक्क करणारा इतिहास माझ्याशी बोलताना उलगडला. 12 डिसेंबरला रास्ता रोको करतांना त्यांनी स्वत:ला रेल्वेच्या रुळावरती  झोकून दिलं होतं. त्यापूर्वी त्या कधीही पंजाबी ड्रेस घालून घराबाहेर पडल्या नव्हत्या. पण या कामासाठी त्या प्रथम तशा बाहेर पडल्या. सगळे पुरुष तुरुंगात असतांना फक्त महिलांनी ते आंदोलन चालू ठेवलं होतं.
 
   विदर्भामध्ये त्यावेळेला 60 हजार आंदोलनकर्त्यांना अटक झाली होती. हे आकडे तुम्हाला अकल्पनिय वाटतील. शंकरराव धोंडगे हे शरद जोशींचे तत्कालीन सहकारी मराठवाड्यात कार्यरत होते. त्यांच्याकडेही असंच अटकसत्र होतं. जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांतीच्या आंदोलनातसुद्धा इतके लोक अटक होऊन तुरुंगात गेले नव्हते. दुर्दैवाने याची नोंद आपल्या समाजात जशी घ्यायला हवी होती तशी घेतली गेली नाही.
 
   शरद जोशी जे मनात येईल ते बोलायचे. त्याचा त्यांना तोटा होत होता असं मला कधी कधी वाटतं. उद्दाहरणार्थ, चांदवड अधिवेशनात 5 लाख महिला एकत्र येणे हा चमत्कार आहे. शरद जोशींनी काही नामांकित महिला नेत्यांना त्या कार्यक्रमाकरीता बोलावलं होतं. त्यात मृणाल गोरे, विद्या बाळ यांच्यासारख्या अनेक बड्या नेत्या होत्या. शरद जोशी त्यांना म्हणाले, ‘तुम्ही महिला आंदोलन आयुष्यभर करीत आलात. एवढ्या सगळ्या बायका तुम्ही एका वेळेला कधी बघितल्या होत्या का?’ खरंतर हे शरद जोशींनी बोलायची गरज नव्हती. पण ते बोलले आणि त्यामुळे त्या महिल्यानेत्या चांगल्याच दुखावल्या गेल्या होत्या. नर्मदा धरणाला आपला पाठिंबा आहे हे जाहीर करण्याकरीता शरद जोशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सत्याग्रह केला होता. नर्मदा धरणातले पाणी तिथल्या कालव्यांमध्ये; जिथे ते टाकलं जात नव्हतं; तिथे नेऊन टाकलं होतं. मुद्दाम गुजरातमध्ये जाऊन त्यांनी त्यावेळी केलेला हा सत्याग्रह होता..
 
डंकेल प्रस्तावाला आणि एकूणच जागतिकीकरणाला 100 टक्के समर्थन देणारे शरद जोशी एकमेव नेते होते. दिल्लीमध्ये मी ही सगळी माहिती गोळा करण्याकरीता गेलो होतो तिथे मधु किश्‍वर म्हणून त्यांच्या एक सहकारी भेटल्या. शरद जोशींनी डंकेल प्रस्तावाचे स्वागत करणारी पोस्टर्स जागोजागी लावली होती. तेव्हा मधु किश्‍वर त्यांना म्हणाल्या होत्या की जागतिकीकरणाला पाठिंबा देऊन, जागतिकीकरणाचे (डब्ल्यूटीओ)चे समर्थन करुन, ‘यू आर कमिटींग अ पॉलिटीकल सुसाईड.’  (ही तुमची राजकीय आत्महत्या आहे.) कारण या विचाराच्या माणसाला भारतामध्ये, भारतातील विचारवंतांमध्ये वा अन्य कुठेही थारा मिळणे अशक्य आहे. पण शरद जोशींनी कधीही आपल्या विचारांशी तडजोड केली नाही.
 
आपली वागणूकही त्यांनी कधी लोकप्रियता मिळावी म्हणून बदलली नाही. त्यांनी कधी आपल्या अंगावरचा टी-शर्ट बदलला नाही. त्यांनी कधी ब्ल्यू जीन्स बदलली नाही. त्यांनी कधी शेतकऱ्यांची रांगडी भाषा वापरली नाही. ते म्हणायचे, ‘मी आहे हा असा आहे.’ पण त्यांची तळमळ अत्यंत प्रामाणिक होती आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांना आपले पंचप्राण मानले. अशा मोठ्या माणसाच्या सहवासात मी येऊ शकलो ही माझी पूर्वजन्मीची पुण्याई होती असं मला वाटतं.
 
 अंगारातून ज्योतीकडे
 
मला दुसरा मुद्दा मांडावासा वाटतोय तो या ‘सह्याद्री फार्म्स‘शी निगडीत असा आहे -- अंगारातून ज्योतीकडे. शरद जोशींचे अनेक सहकारी असं म्हणणारे होते की आंदोलनकाळातले शरद जोशी त्यांना मान्य आहेत. मग ते चाकणचं कांदा आंदोलन असो, नाशिकचं ऊस आंदोलन असो, निपाणीचं तंबाखू आंदोलन असो किंवा विदर्भातील कपाशी आंदोलन असो. त्या आंदोलनातील शरद जोशी आम्हाला मान्य आहेत; पण त्यानंतरचे शरद जोशी आम्हाला मान्य नाहीत.
 
वस्तुस्थिती अशी होती की शरद जोशींना केवळ आंदोलनाच्या मार्गाने यापुढे आपले प्रश्‍न सुटणार नाहीत यांची स्पष्ट जाणीव झाली होती. एका विशिष्ट क्षणी आंदोलनाची गरज असते, कारण त्या क्षणी ठिणगी पडावी लागते. शरद जोशींच्या मते सुरवातीचा तो कालखंड होता. त्यांच्या एका ‘शेतकरी संघटक’मधील लेखाचे शीर्षक असे होते की ‘ठिणगीने आपलं काम केलं. आता गरज आहे ती ज्योतीची’. स्थिर स्वरुपाचे, दीर्घकाळ टिकणारे उपक्रम आपण आता राबवले पाहिजेत. या त्यांच्या विचारधारेतूनच चतुरंग शेतीचा उपक्रम त्यांनी राबविला.
 
लक्ष्मीमुक्ती आंदोलनाविषयी नेहमी बोललं जातं. हे आंदोलन म्हणजे खरोखरच चमत्कार होता. दोन  लाख महिला त्याच्या लाभार्थी होत्या. याचा अर्थ दोन लाख शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीच्या सातबाऱ्यावरती आपापल्या पत्नीचं नाव लावलं. ही किती महत्वाची आणि अभूतपूर्व अशी गोष्ट आहे हे तुम्ही लक्षात घ्या. ते म्हणायचे, ‘एखाद्या गावात आपल्या पत्नीचं नाव जमिनीच्या सातबाऱ्यावर लावणारे शंभर शेतकरी असतील तर त्या गावाला मी भेट देईन.’ दोन लाख शेतकऱ्यांनी तसं नाव लावलं हा एक चमत्कारच होता. असे अनेक चमत्कार या शेतकरी आंदोलनामध्ये झाले.
 
याचाच पुढचा भाग म्हणून पुढे त्यांनी सीता शेती (प्रयोग शेती), माजघर शेती (प्रक्रिया शेती), व्यापारी शेती आणि निर्यात शेती ही चतुरंग शेतीची कल्पना मांडली. शरद जोशींचे बरेचसे विचार हे त्यांनी स्वित्झर्लंडमध्ये आठ वर्षं काढली त्या कालखंडामध्ये घडलेले आहेत. त्यांनी बघितलं होतं की मुळात शेतीप्रधान असलेला स्वित्झर्लंड या राष्ट्राची एकही वसाहत नाही. कुठल्याही वसाहतीचं त्यांनी शोषण केलेलं नाही. आणि तरीही युरोपातील सर्वात श्रीमंत राष्ट्रांत हा देश कायम पहिल्या क्रमांकावर आहे. याचं कारण त्यांची समृध्द शेती आणि त्या शेतीला मिळालेली तंत्रज्ञानाची जोड हे होय. स्वित्झर्लंडमध्ये त्यावेळेला 22 हजार दूध उत्पादक संघ होते आणि ‘नेस्ले’ ‘सारखी मल्टीनॅशनल कंपनीदेखील होती. शेतकऱ्यांची संघटना आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान या दोन्हींची सांगड तिथे शरद जोशींनी बघितली होती.
 
ते म्हणायचे, भारताच्या गरिबीचा अभ्यास करणारे अनेक विचारवंत युनायटेड नेशन्समध्ये माझ्याकडे यायचे. त्या सगळ्यांना युनायटेड नेशन्सकडून आपल्याला काही कमिटमेंट मिळते का? काही कमिशन मिळेल का? कुठल्या तरी समितीवर आपली वर्णी लागेल का? किंवा आपल्या मुलाला कुठे ‘इन्सियाड’ सारख्या शाळेत आंतरराष्ट्रीय शाळेत ॲडमिशन मिळेल का? -- याची आस असायची. मग त्यातून त्यांच्या  लक्षात आलं की गरिबीचा अभ्यास म्हणून हे जे काही केलं जातंय त्याला काहीही अर्थ नाहीय.
 
गरिबीचे मूळ वेगळं आहे आणि ते आपण शोधलं पाहिजे, या विचाराने ते 1 जानेवारी 1976 रोजी भारतात परत आले. पुढचा सगळा इतिहास त्यांच्या चरित्रात आहे.
 
चतुरंग शेतीची त्यांची जी कल्पना होती ती बऱ्याच प्रमाणात ज्यांना त्यांनी आपले गुरु मानले होते त्या महात्मा जोतिबा फुल्यांकडून मिळालेली प्रेरणा होती असं ते सांगत. खूप कमी लोकांना याची माहिती असते; पण महात्मा जोतीराव फुले हे एक समाजसुधारक तर होतेच पण ते अत्यंत यशस्वी बागायतदारदेखील होते. ते उत्तम कॉन्ट्रॅक्टरही होते. कात्रजचा टनेल बांधणारी कंपनी त्यांची होती. या माणसाने समाजसुधारणा तर केलीच, पण तंत्रज्ञान, आधुनिक अर्थव्यवस्थापन यांचाही अव्हेर केला नाही.
 
शरद जोशींना अशीच सांगड घालायची होती. त्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रयोग केलेत. शेतकरी सॉल्व्हंट, शिवार ॲग्रो, भामा कस्ट्रक्शन इत्यादी. ते दुर्दैवाने अपयशी ठरले.
 
खरं म्हणजे लहानपणापासूनच शरद जोशींच्या मनामध्ये श्रेयविहीनतेची भावना होती. आय विल नेव्हर गेट क्रेडीट फॉर व्हॉट आय डिड, असं त्यांना वाटे. याविषयी बोलताना ते बायबलमधील एक गोष्ट सांगायचे. येशू ख्रिस्ताचे सहा चेले होते आणि ते प्रसिद्ध आहेत. पण त्याचा अजून एक सातवा चेला होता ज्याचा कुठे उल्लेखच होत नाही; आणि तो सातवा चेला म्हणजे मी आहे. या श्रेयविहीनतेच्या जाणीवेतूनच कदाचित त्यांनी हे विविध प्रयोगांतील अपयश पचवलं.
 
माझा त्यांच्याशी संबंध आला त्या कालखंडात ते अनेक वर्षं एकटेच राहत होते. पत्नी वारली होती. मुली दोन्ही परदेशी होत्या. शेतकरी संघटनेच्या निमित्ताने त्यांचा इतरांशी संपर्क असायचा. त्यांचे सहकारी यायचे, त्यांच्यावर प्रेम करायचे, ही गोष्ट खरी आहे. पण एरव्ही ते एकटेच राहत होते. हा एकटेपणादेखील काही वर्षानंतर असह्य होतो. माझा शरद जोशींचा जेव्हा संपर्क झाला तेव्हा मला जाणवलं की चतुरंग शेती, आधुनिक शेतीचे प्रयोग यावर त्यांची अढळ श्रद्धा आहे. ते एकदा म्हणाले होते, ‘मी 1976 ऐवजी जर 1990 साली भारतात परतलो असतो, तर मी अशी एखादी कंपनी काढली असती.’ शिवार ॲग्रोचा आणि इतरही त्यांचे आधुनिक प्रयोग हे त्याच अर्थाने केले होते. त्यांचा तो आधुनिक शेतीचा विचार ‘सह्याद्री फार्म्स‘च्या रुपाने विलास शिंदे यांनी प्रत्यक्षात आणला आहे. या अर्थाने विलास शिंदे हे शरद जोशींचे वारसदार आहेत असं मी म्हणेन.
 
शरद जोशी यांचं साहित्य आणि हे शेतकरी साहित्य संमेलन
 
शरद जोशींना स्वत:ला साहित्याची आवड होती. त्यांनी स्वत: थोडंफार लेखनही केलं होतं. त्यांनी काही कथा लिहिल्या होत्या. ते पॅरीसला असतांना त्यांनी लिहिलेल्या एका इंग्रजी कथेची 14 पानं मला मिळाली होती. अतिशय सुंदर अशी ती कथा हिरव्या रंगाच्या शाईने लिहिली होती. नंतर मात्र त्यांनी ते कथालेखन पूर्ण केलं नाही. त्यांच्या ‘अंगारमळा‘ पुस्तकाला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला होता. तोदेखील श्रीकांत उमरीकरांनी त्यांचं ते पुस्तक स्पर्धेसाठी पाठवलं होतं म्हणून. कारण त्यापूर्वी जोशी यांनी स्वतः जाहीर केलं होतं की ‘माझं कुठलंही पुस्तक कुठल्याही पुरस्कारासाठी पाठविणार नाही.’ साहित्यिक म्हणून त्यांची जी मतं होती ती त्यांच्या दोन भाषणांमध्ये उत्तम प्रकारे मांडलेली आहेत. ज्यांना खऱ्या अर्थाने साहित्याकडे वळायचं असेल त्यांना मी सांगेन की इस्लामपूर आणि परभणी येथे भरलेल्या दोन साहित्य संमेलनांमध्ये शरद जोशींनी केलेली ती दोन भाषणं त्यांनी अगदी आवर्जून वाचावीत. कारण त्यामध्ये शरद जोशींनी साहित्याबद्दलचे त्यांचे विचार स्पष्टपणे मांडलेले आहेत.
 
भारतातल्या साहित्यामध्ये शेतीचे प्रतिबिंब उमटत नाही ही त्यांची व्यथा अनेकदा त्यांनी बोलून दाखवली आहे. दुर्दैवाने कामगारांच्या दुःखाचं आणि भावनांचं प्रतिबिंब मराठी साहित्यात बऱ्यापैकी उमटलेलं दिसून येईल. कारण तसं लेखन करणारे लेखक समाजात होते. पण शेतकऱ्यांच्या वेदना साहित्यात उमटवू शकेल असं लेखन मात्र झालेलं नाही याची त्यांना खंत होती.
 
‘साहित्य’ या शब्दाची व्याख्या आपण अजून व्यापक करायला पाहिजे. कारण साहित्य म्हणजे फक्त कथा किंवा कविता किंवा कादंबरी नव्हे. असं साहित्य संमेलन भरविणाऱ्या आयोजकांचा बराचसा भर कथा, कविता या ललित साहित्यावर असतो. तो साहित्याचा एक भाग आहे. विचारप्रधान साहित्य हादेखील साहित्याचा तेवढाच महत्वाचा भाग आहे. विन्स्टन चर्चिलला साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला तो त्याने दुसऱ्या महायुद्धाचा जो इतिहास लिहिला त्यासाठी मिळालेला आहे. हे आपण जरुर लक्षात घ्यावं.
 
साहित्याची प्रचलित व्याख्या ही बऱ्यापैकी शहरातील प्राध्यापक, समीक्षक वगैरेंनी केलेली आहे. त्यांना साहित्य म्हणजे केवळ ‘कल्पित साहित्य’ किंवा ‘प्रातिभ साहित्य’ असं वाटतं. मात्र ते खरं नाही. विचारप्रधान साहित्य हे देखील महत्वाचं आहे. शेती करतांना येणारे अनुभव, अडचणी या देखील साहित्यात यायला पाहिजेत, त्यांनादेखील साहित्य म्हणूनच मान्यता मिळाली पाहिजे. त्या दृष्टीने देखील आपण साहित्यिकांनी अवश्‍य प्रयत्न करावा.
 
सरतेशेवटी निपाणीमधील माझी एक आठवण सांगावीशी वाटते. निपाणीला तंबाखू आंदोलनात गोळीबार झाला. ते सगळं आपल्याला ठाऊकच आहे. तिथे एक शेतकरी म्हणाला की, ‘शरद जोशींमुळे तंबाखूला जास्त भाव मिळेल की नाही ते मी सांगू शकत नाही, पण त्यांच्यामुळे आम्हां शेतकऱ्यांना स्वाभिमान मात्र नक्की मिळाला. शेतकरी संघटनेचा हा लाल बिल्ला बघा. या लाल बिल्ल्यामुळे आम्ही कुणीतरी आहोत ही जाणीव शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली. हेअर कटींग सलूनमध्ये आम्ही गेल्यानंतर त्या सलूनचा मालक आज आम्हाला आत येऊन बसायला सांगतो, एरवी तो आम्हाला बाहेर उभे राहायला सांगायचा!’ ही डिग्निटी, हा सन्मान शेतकऱ्यांना मिळवून देणं हे शरद जोशींचं सर्वात मोठं योगदान आहे.
 
आपण आज इथे नाशिकमध्ये आहोत आणि कुसुमाग्रज हे तर येथील दैवत मानलं जातं. आपल्यापैकी बहुतेकांना त्यांची ‘कणा’ ही कविता ठाऊक आहे. त्यातल्या त्या शेवटच्या चार ओळी फार अर्थपूर्ण आहेत. तो पूरग्रस्त विद्यार्थी त्याच्या गुरुजींना भेटायला जातो. त्याची सगळी व्यथा ऐकून घेतल्यानंतर गुरुजींना वाटतं की तो मदत म्हणून चार पैसे मागायला आला आहे. त्यामुळे ते खिशात हात घालतात.... पुढच्या शेवटच्या अजरामर ओळी आहेत.. ..
 
खिशाकडे हात जाताच
हसत हसत उठला.
‘पैसे नकोत सर,
जरा एकटेपणा वाटला.
मोडून पडलं घर तरी
तुटला नाही कणा,
पाठीवर हात ठेवून
फक्त लढ म्हणा!’
 
ही कविता म्हणताना मला आजसुद्धा मी फार भावनिक होतो. हेच शरद जोशींचं नेमकं योगदान आहे. शरद जोशींनी शेतकऱ्यांचा स्वाभिमान जागवला. अनुदान संस्कृतीवर त्यांनी कधीच भर दिला नाही. स्वाभिमान जागवणं हे त्यांचं खरं काम आहे. ते त्यांनी पूर्ण ताकदीने केलं. हेच काम आपण सगळ्यांनी यापुढील काळात ताकदीने पुढे नेलं पाहिजे. सह्याद्री फार्म्स मधील शिवारात अकराव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनात, शरद जोशींच्या नावाने असलेल्या या नगरीमध्ये कार्याध्यक्ष गंगाधर मुटे यांनी मला संमेलनाचा अध्यक्ष म्हणून आमंत्रण दिलं; विलास शिंदे आणि त्यांचे सहकारी यांनी माझं प्रेमाने स्वागत केलं; आपण सगळ्यांनी माझं बोलणं ऐकून घेतलं याबद्दल मी आपला मनापासून ऋणी आहे. खूप धन्यवाद.
 
(शब्दांकन : ज्ञानेश उगले)
Share