Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



पोटा पुरते पीक

*आता तरी पोटा पुरतं पिकवा ना भाऊ*

कांदा एक रुपया किलो!! कुणाला दोन रुपयांचा चेक, कुणाला उणे एक रुपयांची उलटी पट्टी, कोण वांगी बाजारात फेकून देत आहे, कोण फ्लॉवरच्या शेतात बकऱ्या सोडतय, कोण कांद्याला पाळी घालतय, कोण वांगी उपटून टाकतेय... कोण काय!! कोण काय!!! मनाचं नाही सांगत. टीव्हीवर दखवलं हो हे सगळं !!
एक पीक तयार करायला सहा महिने राबावं लागतं शेतात. ऊन असो, पाऊस असो, थंडी असो, कामाला सुट्टी नाही. राबायचच. बाकी सगळ्यांना दिवसा लाईट. शेतकऱ्यांनी मात्र रात्रीची लाईट. शेतात, काट्याकुट्यात, साप- विंचू , लांडगे, बिबट्याच्या दहशतीत रात्री अकरा ते सकाळी सहा वाजे पर्यंत शेतात पिकाला पाणी द्यायचं. विजेच्या तुटलेल्या तारांवर पाय पडून मरायचा धोका पत्करून पीक जगवायचं.
जवळचं भांडवल कधीच उडालेलं म्हणून कर्ज काढून पीक काढायचं. वीजबिल थकलं म्हणून आकडे टाकून पाणी उपसायचं. वायरमन, बँकेच्या साहेबांनी केलेला अपमान मुकाट गिळून गप्प बसायचं..... सगळं सहनच करायचं ...... कशासाठी? हे पीक पदरात पडलं की सगळी देणी मिटवायची, शिल्लक राहिलेल्या पैशात पुढच्या पिकाची तयारी करायची, पुन्हा रानात राबायला, मरायला तयार व्हायचं.....
पीक तयार झालं की बाजार कोसळलेला. बाकी खर्च सोडाच, शेतातून मार्केट पर्यंत माल घेऊन जाण्याचा खर्च सुद्धा निघायची मारामार. सगळे हिशोब कोलमडतात, सगळी स्वप्ने धुळीला मिळतात. आम्ही शेतकरी स्वप्नच का पहातो कळत नाही. ही परिस्थिती फक्त भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची नाही, उसाच्या शेतकऱ्याने हजारो रुपये खर्च करून पिकवलेला ऊस तोडून नेण्यासाठी पुन्हा एकरी दहा पंधरा हजार खर्च करायचे, पण काय भाव मिळल माहीत नाही. द्राक्षाला किमान ३५ रुपये किलोला भाव मिळाला तर परवडतं, ते द्राक्ष आज वीस रुपये किलो विकावे लागत आहेत. कसा जगायचं शेतकरी?

ही परिस्थिती आज निर्माण झालेली नाही. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून शेतकऱ्यांना लुटून राज्य करण्याचे कारस्थान या देशात सुरू आहे. शेतीमालाला भाव मिळू द्यायचाच नाही असं धोरण सत्तेत आलेल्या सर्व पक्षांनी राबवले आहे. शेतकरी संघटनेने १९८४ साली परभणी येथे घेतलेल्या अधिवेशनात शरद जोशींनी शेतकऱ्यांना "पोटापूरते पिकविण्याचा" सल्ला दिला होता. पण शेतकऱ्यांनी तो मानला नाही त्याचे हे परिणाम आहेत.

*शेतकरी पोटापूरते पिकविण्याचा निर्णय का घेत नाही?*
पोटापूरते पीकवायचे म्हटले तर इतर खर्च कसे भागवायचे हा पहिला प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात येतो. पण असे ही तोट्यात गेल्यावर हे खर्च कसे भागवतात? एकदा नाही दर वर्षी, सगळ्याच पिकात असाच अनुभव येऊ लगला आहे. मिळत काहीच नाही उलट जवळचे आहे ते जातंय, कर्ज होतंय. पिकवायचे थांबवले तर किमान खर्च तरी कमी होईल.
दुसरा विचार येतो तो हा की आपण नाही पिकवलं अन बाकीच्यांनी पिकवलं तर त्यांना जास्त भाव मिळेल, आपल्याला नाही मिळणार. पण आता असे ही होणे नाही कारण मालाचा तुटवडा आला तर सरकार निर्यातबंदी करून भाव पाडेल, साठ्यांवर निर्बंध लावील, आयती करील, लेव्ही लावून तुमच्या घरातला माल उचलून नेईल पण भाव मिळू देणार नाही.
तिसरे असे की शेती नाही केली तर काय करावा? हा प्रश्न पडतो. फक्त दोन वर्षे शेतकऱ्यांनी आराम करावा, जमिनीलाही आराम द्यावा. शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यासाठी वेळ द्यावा, सभा मेळाव्यांना हजर राहून आपली एकजुतीची ताकद दाखवावी. सरकारला वठणीवर आणायचा निर्धार दाखवावा.

*कोंडीत सापडलो आहोत का?*
शरद जोशींनी एका इंग्रजी पुस्तकात असे म्हटले आहे की शेतकरी शेती बंद करण्याचा निर्णय सहजा सहजी घेणार नाही. जेव्हा त्याला समजेल की " जास्त उत्पादन काढले तरी आपला तोटाच होतो आहे व आपण कोंडीत सापडलो आहे तेव्हाच शेतकरी उत्पादन कमी करण्याच्या मार्गाचा अवलंब करेल." मला वाटतं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्व पिकांचा उत्पादन खर्च खूप वाढला आहे व पिकांचे उत्पादन मुबलक होत आहे. हरबरा हमीभावाने खरेदी करण्यासाठी शेतकरी नोंदणी केंद्रावर चेंगरा चेंगरी करत आहेत. मोहरीला भाव नाही म्हणून उत्तर भारतातले शेतकरी रस्त्यावर आले आहेत. मागच्या वर्षीचा भात विकला नाही मग नवीन भात कुठे ठेव्हावा हा अनेकांना प्रश्न पडला आहे. कापूस, सोयाबीन, कांदा वगैरे कितीही दिवस साठवून ठेवले तरी भाव मिळाला नाही मग पैसे येणार कुठून? पिकवायचे तरी कशाला?

*शेती काही काळ बंद ठेवता येईल का?*
पिकवले नाही तर दिवस कसे काढायचे? असा प्रश्न पडणे सहाजिकच आहे. आम्ही शेती करणे बंद करायचा निर्णय घेताना घरात चर्चा झाली. १९९५-९६ ची घटना आहे. तेव्हा मी घरच्यांना विचारले, " आपल्याला पिकासाठी जमीन तयार करायला किती खर्च येईल?" अंदाजे पन्नास हजार असा हिशोब निघाला. त्याकाळी साधारण आमच्या कुटुंबाला महिन्याला दोन हजार रुपयांचा किराणा लागत असे. म्हणजे फक्त जमीन तयार करण्याच्या खर्चात दोन वर्षांचा किराणा भगत होता!! नंतरचे बियाणे, खते, औषधे, मजूरी, बारदाना वगैरे वगैरे हे सगळे खर्च अजून बाकीच होते. तेव्हा आम्ही स्वतः शेती न करण्याचा निर्णय घेतला व सुखी झालो.

*बाहेरचा पैसे शेतीत का घालावा?*
अनेक शेतकरी असे आहेत ज्यांचे मुख्य उत्पन्नाचे स्त्रोत वेगळे आहेत. कोणी चांगल्या पगाराच्या नोकरीला आहेत, व्यापार आहे, ठेकेदारी आहे, उद्योग आहेत. ही मंडळीही तिकडे कमावलेले पैसे शेतीत घालवत असतात. शेतीत घातलेले पैसे परत येत नाहीत हे समजत असून ही शेती करतच रहातात कारण जमीन पडीक ठेवली तर लोक काय म्हणतील? याची त्यांना चिंता असते. ज्यांना शेती शिवाय काही उत्पन्नाचे साधन असेल त्यांनी तर शेती फायद्याची होई पर्यंत शेतीत पैसे वाया घालवणे बंदच करायला हवे.

*पोटापूरते पिकवायचे आंदोलन करण्याची ही योग्य वेळ*
पोटापूरते पिकवण्याचे आंदोलन करण्यासाठी हीच वेळ योग्य आहे. एरव्ही इतर देशांमध्ये भरपूर अन्नधान्य पिकत असते व भारत आयात करत असतो. पण आता जगभर तुटवडा असण्याची शक्यता जास्त आहे. आयात करायची म्हटले तरी भारताला परवडणार नाही, अन सर्वच पिकांचे उत्पादन घटवले तर काय काय आयात करणार?
पुढच्या हंगामात अल निनोचा धोका असल्याचे भाकीत केले जात आहे. म्हणजे दुष्काळ पडण्याची शक्यता दाट. तुम्ही पेरणी केली तरी ती वाया जाण्याचीच शक्यता आहे. त्यापेक्षा पोटापूरते पिकवायच्या आंदोलनात सहभागी होऊन सरकार पर्यंत शेतकऱ्यांच्या नाराजीचा संदेश जाऊ द्या.

*लूट थांबवण्यासाठी आंदोलन*
हा विचार सर्वांना पचने अवघड आहे पण राज्यकर्ते आपली सत्ता टिकविण्यासाठी शेतकऱ्यांना लुटून ग्राहकाचे लांगुलचालन करत आहे हे स्पष्ट झाले आहे. इकडे शेतकरी रात्रंदिवस कष्ट करून कंगाल झाला आहे. कर्जपायी बँका आपल्या जमिनी गिळायला टपून आहेत. तरी पिकवतच रहायचे का? लुटून घेतच रहायचे का? नाही सहन झाले तर फाशी घ्यायची का?
अनेक पिढया पासून आपली होणारी लूट थांबवायची असेल, आपल्या पुढच्या पिढ्यांना सुखाने आणि सन्मानाने जगताना पहायचे असेल तर दोन वर्षे तरी पोटापुरते पिकवण्याचे आंदोलन करावे लागेल. नाहीतर शेतकऱ्यांना लाचारीचे आणि दारिद्र्याचे जिणे जगत रहाण्या शिवाय पर्याय नाही.

२८/०२/२०२३

अनिल घनवट
राष्ट्रीय अध्यक्ष, स्वतंत्र भारत पार्टी

Share