नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
मास्क आणि ती...
रावसाहेब जाधव (चांदवड)
“हॅलो...” स्क्रीनवर आलेला नंबर अनोळखी होता. क्षणभर विचार केला आणि उत्साही अवसान सोबत घेत प्रतिसाद दिला.
“.......” फक्त ओल्या श्वासांच्या गतीचा आवाज कानावर आला.
“हॅलो, येतोय का आवाज?....” मोबाईल हँड्सेट कानावर घट्ट दाबत मी जाणून घेऊ लागलो.
“स्स.......” आणखी एक ओलसर नी:श्वास कानावर पडल्याचा भास झाला.
“कोण बोलतंय? बोला ना. जाधव सर बोलतोय.” आपण योग्य त्या व्यक्तीलाच कॉल केलाय की नाही, हे समोरच्याला समजावे म्हणून मी ओळख दिली.
“.....” एक अडखळलेला हुंदका.
“कोण आहे? रडताय का? काय झालंय?” मी अस्वस्थ झालो. मनात अनेक शंका तरळू लागल्या.
“सर, मी मीना बोलतेय.” मीना नाव ऐकलं. चार्जिंगला लावलेला मोबाईल वायरपासून सोडवला आणि कॉल घेण्यासाठी जेथून निरुत्साहाने उठून आलो होतो त्या पसरवलेल्या गादीवर पुन्हा जाऊन बसलो.
खरं तर न्याहारीनंतर दोनेक तास मोबाईलच्या स्क्रीनवर फिरवून फिरवून बोटाला कळ लागली होती आणि स्क्रीनला भिडून राहिलेले डोळेही आता थकले होते. पंख्याचा वेग वाढवला. मोबाईल चार्जिंगला लावला. गादीची गुंडाळी अलगद उलगडली आणि या आभासी जगतात वावरणाऱ्या मनाला शरीराची जाणीव करून देत वास्तवातल्या गादीवर आडवे होण्याचा निर्णय घेण्यास भाग पाडले. सगळं जग लॉकडाऊन असलं आणि डोळे मिटले तरीही मन मात्र स्वत:ला कोंडून ठेवण्यास राजी नसल्याची जाणीव झाली.
झोपेतून उठल्यावर कदाचित कोविड-१९च्या संकटातून जग सावरलेलं असेल. लॉकडाऊनची कुलपं उघडण्याची चावी आपल्याच हातात असेल. थांबल्याने तुंबलेलं जगणं पुन्हा एकदा वाहतं होईल आणि बाहेर जाऊन संध्याकाळचा लालसर सूर्य डोळ्यांत साठवण्याची संधी मिळेल; अशी कल्पनाही करण्याची हिम्मत लॉकडाऊनच्या या दुसऱ्या टप्प्यावर निदान मी तरी गमावली होती.
तशातच ‘शाळा बंद असल्या तरी शिक्षण सुरू ठेवण्याचे’ संदेश येऊन धडकू लागले आणि माझ्याही अंगात उत्साह संचारला. मुलांच्या पालकांना मोबाईलवरून कॉल करण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडून what’s app वापरात असलेले जुने-नवे नंबर घेऊ लागलो. काही जणांकडे साधे हॅँडसेट होते तर काही जणांकडे इन्टरनेटसाठी रिचार्ज करण्याची ऐपत नव्हती तर काहींची इच्छाशक्ती. काहींनी शेजाऱ्यापाजाऱ्याचे संपर्क क्रमांक दिले होते. काही ठिकाणी मोबाईलला रेंज नव्हती. साधारण निम्म्याच विद्यार्थ्यांची अभ्यासासाठी आपल्याशी online जुळणी होऊ शकते, असे चित्र दिसल्याने थोडीशी निराशा झाली खरी पण ‘हेही नसे थोडके’ म्हणत काम सुरु केले. जुळल्या तेवढ्या मुलांचे गट तयार केले. अभ्यासक्रमाशी संबंधित व्हिडिओ तयार करून अपलोड करू लागलो. मात्र मिनाशी संपर्क होऊ शकला नव्हता. तसा तो अनेकांशी होऊ शकला नव्हता पण मिनाशी संपर्क व्हावा, असं मात्र मनोमन सारखं वाटत होतं.
शाळेपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या देवगावची मीना दोन वर्षांपूर्वी आठवीच्या वर्गात दाखल झाली होती. मी त्या वर्गाचा वर्गशिक्षक. सतत अबोल असणारी ती जशी जवळीक वाढत गेली तशी हळूहळू मोकळेपणाने बोलू लागली. अक्षर चांगलं होतं, पण मनाने फार काही लिहू शकत नव्हती. आठवड्यात दोन दिवस तरी शाळा बुडवायची. वर्गात असलेली काही मुले सामान्य दिसत नसतात तेव्हा त्यांच्याविषयी अधिक काही जाणून घेण्याची इच्छा आपोआप मनात निर्माण होते. मीनाही जरा वेगळी वाटली. सुरुवातीला संकोचून वागणारी ती, काळ पुढे सरकत गेला तशी मनमोकळी वागू लागली होती. मधली सुट्टी झाली आणि कोणत्याही कामात असलो तरी अवतीभोवती रेंगाळत राहायची. ‘बोल’ म्हटलं तर बोलायची नाही. मात्र ‘बोलायचं असलं’ तर न सांगता बोलत राहायची.
“आई म्हन्लि, दोन दिवस कामाला जाय. म्हणून नही आले.” शाळेत न येण्यासाठीचं तिचं ठरलेलं कारण असायचं आणि मी ही ते आपसूकच मान्य करून टाकत असे. कारण उपस्थितीचा अधिक आग्रह केला तर शाळा सोडून मोकळी होईल ती, याची धास्ती मनात असायची.
“दिलेल्या फॉर्मवर वडिलांची सही घेऊन उद्या माझ्याकडं जमा करा.” प्रवेशाच्या सुरुवातीला वर्गात सूचना केली आणि मधली सुट्टी झाली तसं मीनानं बाहेर येत मला गाठलं.
“आईची आणली तर चालंल का?” मीना फॉर्म पुढं करत म्हणाली.
“वडील घरी नाहीत का?” माझा सहज प्रश्न.
या अशा पहिल्याच मुलाखतीत तिच्याविषयीची माहिती तिनंच दबकत दबकत जी काय सांगायला सुरवात केली, त्यामुळं तिच्याविषयीची सहानुभूती आणि कुतूहल जास्तच वाढत गेलं. पुढं अनेक गोष्टीं उलगडत गेल्या.
परिस्थिती तशीच होती. सात-आठ वर्षांपूर्वी तिचं कुटुंब देवगावात राहायला आलेलं. आई शेतमजुरी करायची. उत्पन्नाचे दुसरे साधन नव्हते. चार मुली. त्यात मीना मोठी. घर भाड्याचे. बाप चार वर्षांपूर्वी कोणा बाईसोबत पळून गेलेला. मोठ्या होत चाललेल्या मुलींचा भार आई कसाबसा सोसत एकेक दिवस लोटत होती. खरं तर समाजाच्या दृष्टीत ते कुटुंब तुच्छ ठरलं होतंच पण ते स्वत:ही स्वत:कडे तुच्छतेने पाहत असल्याचे जाणवत होते. दोन वेळच्या खाण्याच्या गरजा मजुरी करून भागत असल्या तरी त्यांना भावनिक आधाराची गरज मात्र होती. पालकभेटीच्या निमित्तानं तिच्या घरी बऱ्याच वेळा जाणं झालं होतं. साहजिकच सहानुभूतीची सावली सहजच तिच्या डोक्यावर मी धरू लागलो होतो आणि एव्हाना तिला माझा खूपच आधारही वाटू लागला होता. दोन वर्षांच्या या सहवासात शाळेतल्या अभ्यासापेक्षा घरगुती प्रश्नांच्या बाबतीतच ती जास्त बोलत असायची.
नववीच्या वर्गाची वार्षिक परीक्षा रद्द झाली; मीनासह सर्व मुलं दहावीच्या वर्गात पोहचली आणि मी या लॉकडाऊनच्या काळात मोबाईल नावाचे साधन वापरून मुलांना गृहकार्य देऊ लागलो होतो.
“सर, तुम्ही अभ्यास देऊन राह्यले का?” तिच्या आवाजानं मी क्षणार्धात वर्तमान गाठला. एव्हाना तिनं आसू पुसले असावे.
“होय.”
“मला नही करता यायचा. माझ्याकं तसा मोबाईल नहिये.”
“ते मला माहीत आहे. सध्या वाचता येईल ते वाच. शाळा भरली की, शिकवीन तुला... त्यात एवढं रडण्यासारखं काय आहे?”
“तुम्हाला भेटायचंय.”
“सध्या तर ते शक्य नाही. लॉकडाऊन आहे.”
“काय करू? आई.....” तिनं अर्ध वाक्य खाऊन टाकलं.
“आईचं काय?”
“काय नयी. जाऊ द्या.” तिनं मोबाईल ठेवला, पण एक हुंदका मात्र मागं ठेवून गेली; संवाद अर्ध्यावर तोडून.
‘काय करावं? अभ्यासासाठी तर नक्कीच नव्हता केला फोन तिनं. वेगळीच काहीतरी अडचण असावी. असली तर काय असंल? तिनं ज्या नंबरवरून कॉल केला तो नंबरही तिचा नव्हता. पण ज्या कोणाचा असंल ती व्यक्ती अजून जवळपासच असंल कदाचित. करावा का कॉल?’ असा विचार करून आलेला तो नंबर रिकॉल साठी डायल केला. कॉल घेतला गेला.
“हा सर, मीच बोल्तेय.” मोबाईल अजून तिच्या जवळ होता म्हणून समाधान वाटलं.
“हा मोबाईल कोणाचा आहे? नंबर सेव्ह करू का?”
“मळ्यातल्या दामू तात्याचा ये. ते आज गावात भाजी विकाया आल्ते, तैन्ला म्हन्ल, तर करू दिला त्यांनी फोन.”
“पण मग अर्ध्यावर फोन का बंद केला? काय झालंय ते व्यवस्थित सांग...”
“काय नई सर, अडचण ये थोडी, पण आई नही म्हन्ति सांगायला.”
“आई कुठं आहे?”
“इठच ये.”
“मी बोलू का आईशी?”
“नही म्हण्ति ती.”
“काय ते मोकळं बोलून टाक एकदाचं... मी काय परका वाटतो तुला?”
“घरातलं व्हतं तेव्हढं सगळं सरत आलंय आता. आन कुठं काम बी नई मिळत. उसनवार घेता बी यील कोनाकून, पन माज्या डोक्यात एक ‘आयड्या’ आली व्हती, म्हनून बोलायचं व्हतं तुमच्याशी.” मीना आता न संकोचता घडाघडा बोलू लागली होती, अगदी शाळेतल्यासारखी.
“तुझी कल्पना सांग.” तिला बोलतं ठेवणं आवश्यक होतं म्हणून मी मुद्दा लावून धरला.
“सध्या लॉकडाऊनमुळं काम नही ना, तर मंग कायतरी काम शिकायचंय.”
“चांगली कल्पना आहे. बोल काय मदत हवी आहे तुला?”
“मी आसं ऐकलंय,... सध्या मास्क जास्ती गरजेचे हायेत. अन ते घरी पण शिवता येतात... मी आईला म्हन्ल, कापड अन सुई-दोरा मिळला तर पाहू करून. तसं बी गोधड्या तर शिवता येत्याच ना...”
“तर मग...?”
“तुमच्या कोणी वळकीचा दुकानदार आसल तर कापड आन दोरा पायजे व्हता.”
“कल्पना चांगली आहे... मला खूप म्हणजे खूपच आनंद झालाय. तुझं काम झालंच म्हणून समज.”
“मला माहीतच व्हतं.”
“पण तू म्हणते तसं नाही.”
“मंग वो सर?”
“योगायोग म्हणजे माझ्या एका मित्राकडं शिलाई मशीन विकावू आहे. दोनेक महिन्यांपूर्वी विषय झाला होता आमच्यात.”
“चालल सर, शिकून घेईल मी आन पैसे बी देऊन टाकील हळूहळू.”
“ते पाहू नंतर... उद्या व्यवस्था करतो.” असं म्हणून फोन ठेवला खरा पण आता काहीतरी हालचाल करावाच लागल, कारण उर्मी ओसरायला नको याची जाणीव सतावू लागली.
दुसऱ्या दिवशी मित्राच्या मदतीने शिलाई मशीन मिळवली. ओळखीच्या दुकानदाराकडून कापडाचा एक तागा मिळवला आणि सर्व साहित्य देवगावला तिच्या घरी पोहचवण्याची व्यवस्था केली. सोबत नमुना म्हणून वेगवेगळ्या डिझाईनचे काही मास्कही पाठवले.
आठ दिवसांनी तिचा फोन आला. लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून मी तिच्या घरी गेलो. तयार केलेले १०० मास्क दुकानदारांना विकण्याच्या बहाण्याने मीच विकत घेतले. तिला खूप आनंद झाला. उत्साह तर तिच्या हालचालींमध्ये खळाळून वाहताना दिसत होता.
घरी आलो. गाठोडे सोडले, तर त्यांपैकी बहुतेक मास्क हे ओबड-धोबडच होते; पण एक दिशा मात्र तिला मिळाल्याची खात्री पटली होती. ओबड-धोबड मास्क बाजूला काढून टाकले. उरलेले ७० मास्क गावच्या सरपंचाकडे नेऊन दिले. सरपंचांनी ते गावात वाटून दिले. गावात वाटण्यासाठी आलेले मास्क हे, तेच आहेत आणि सरांनी ते फुकट दिलेले आहेत, हे तिला समजलं आणि म्हणूनच कदाचित तिनं फोन केला असावा.
“हॅलो....” नंबर अनोळखीच होता.
“.......” केवळ एक ओलसर हुंदका ऐकू आला आणि मोबाईल बंद झाला.
त्यानंतर पंधरा दिवस संपर्क झाला नाही. मीही तसा प्रयत्न केला नाही. पंधरा दिवसांनी समजले की आईसोबत चांदवडला येऊन येथील काही मेडिकल दुकानदारांना तिनं तयार केलेले मास्क विकले होते आणि एका कापडदुकानदाराकडून कापडाचा तागाही विकत घेऊन गेली होती.
एव्हाना माझ्या मनातल्या विषण्णतेचे विषाणू शरणागतासारखे हार मानू लागले होते.
..........................
प्रतिक्रिया
मी परवा तुमची कथा वाचली सर
मी परवा तुमची कथा वाचली सर.ह्रदयास स्पर्श करणारी आहे.
तुम्ही त्या मुलीचा उत्साह बघून त्यास योग्य ती दिशा देण्याचा केलेला प्रयत्न.आणि त्या विद्यार्थिनीला तिच्या शिक्षकाबद्दल आधार म्हणून निर्माण झालेला विश्वास या दोन्ही गोष्टी मनाला स्पर्श करून जाते.
हे उदाहरण शिक्षकांकरीता एक आदर्श उदाहरण ठरावे.
वर्गातील सर्वच विद्यार्थ्यांची स्थिती सारखी नसते.
एक शिक्षक विद्यार्थ्यांचा फक्त वर्गापुरता आधार नसावा. वर्गाबाहेर सुद्धा त्या शिक्षकाचा विद्यार्थ्यांना आधार वाटला पाहिजे. शिक्षकाला विद्यार्थ्यांच्या घरची परिस्थिती माहीत असली पाहिजे.त्याने बरेच प्रश्न सुटू शकतील.
खूप छान सर.
मी परवा तुमची कथा वाचली सर
आपण दिलेली सविस्तर प्रतिक्रिया माझ्या अनुभूती मांडणीचे पोषण करणारी आहे. धन्यवाद!
रावसाहेब जाधव (चांदवड)
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने