Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




आदर्श गाव संकल्प आणि प्रकल्प

लेखनविभाग: 
पुस्तक समीक्षण

पुस्तक समीक्षण

आदर्श गाव संकल्प आणि प्रकल्प

'काटा पायात रुतते लाल रगत सांडते हिर्व सपन फुलते
हिर्व सपन फुलते ढग बरसते'

कित्येक वर्षांपूर्वी वाचलेल्या कवी विठ्ठल वाघ यांच्या या ओळी आजही मनःपटलावर तशाच कोरलेल्या आहेत !

वेदनेतून जन्म घेणारे सुंदर सुखाचे स्वप्न आजही तसेच कित्येक डोळ्यांमध्ये!

केंद्र शासनाच्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमासाठी नुकताच एक लेख लिहिला ज्यात उदयोन्मुख पिढीसाठी कौशल्याधारित शिक्षणाची गरज कशी आहे हे सांगताना कृषीप्रधान भारतातील शिक्षण प्रवाहात शेतीविषयक अंतर्भाव नमूद करणे फार महत्त्वाचे वाटले. त्याच अनुषंगाने शेती विषयक राजकीय धोरण याविषयी लिहिण्यासाठी पुस्तक निवडताना मला आवडलं ते 'आदर्श गाव संकल्प आणि प्रकल्प' हे पुस्तक.
हेच पुस्तक निवडण्याचे आणखी एक कारण म्हणजे पुस्तकाच्या नावाखालीच दिसणारे शब्द- 'जनतेच्या कार्यात शासनाचा सहभाग'

मुखपृष्ठातील भारताच्या नकाशात तळे, शेती, नांगरणारा शेतकरी हे चित्र पुस्तकाचा नेमका विषय लगेचच वाचकाच्या लक्षात आणून देणारे आहे. खालच्या बाजूला नसबंदी, नशाबंदी, चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, श्रमदान याविषयीची लहान लहान चित्रे समर्पक आहेत.

घ. गं. कुऱ्हाडे, गणेश पांगारे, वसुधा लोकूर या तिघांनी मिळून शब्दांकन केलेले हे पुस्तक 'हिंद स्वराज ट्रस्ट प्रकाशन, पुणे' यांनी मे १९९६ मध्ये प्रकाशित केले आहे. एकूण १२२ पृष्ठसंख्या असलेल्या या पुस्तकात गणेश पांगारे यांची छायाचित्रे, व्ही. एन. जाधव यांची रेखाचित्रे असून नोत्र स्पेशलाईज्ड पब्लिशिंग डिव्हीजन यांची मांडणी आणि सजावट आहे.

'स्वतंत्र भारताचे राष्ट्रीय नियोजन मुख्यतः ग्राम हा आद्य घटक धरून व्हावे. स्वावलंबी आणि स्वयंपूर्णता हे त्याचे ध्येय असावे.' अशा महात्मा गांधीजींच्या शब्दांनी आणि रेखाचित्राने सजलेले मलपृष्ठ आणखीनच पुस्तकाविषयी अधिक आकर्षण निर्माण करते.

आवृत्ती, किंमत यांचा उल्लेख आलेला नाही. अनुक्रमणिकेनंतरची परिशिष्टे गाव आणि त्याविषयीच्या समित्या, योजना यांचा अंतर्भाव स्पष्ट करतात.

आदरणीय कि.बा. तथा अण्णासाहेब हजारे, अध्यक्ष, आदर्श गाव संकल्प/ प्रकल्प समिती. यांचे मनोगत आश्वासक, प्रेरणादायी, मार्गदर्शक आहे.

प्रस्तावनेत सुरुवातीलाच देशाला एक नवी दिशा मिळावी म्हणून शासनाच्या योजनांचा उल्लेख आला आहे. आदर्श गावाचा संकल्प व प्रकल्प कार्यक्रम, महाराष्ट्र शासन, ग्रामविकास व जलसंधारण विभाग शासननिर्णय क्रमांकासह नमूद केले आहेत.

राळेगणसिद्धीच्या धर्तीवर आर्थिक व सामाजिक शिस्तीचे प्रकल्प राबविण्याचा निर्धार शासनाने व्यक्त केला आहे.
कार्य कक्षा, सुकाणू समिती, निधीचे नियोजन याबाबत भि. श्री. देसाई उपसचिव महाराष्ट्र शासन, यांनी काही बाबी स्पष्ट केल्या आहेत. पुढे लक्ष वेधून घेणाऱ्या ओळी म्हणजे या 'आदेशावरून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की आजपर्यंत केंद्र आणि राज्य शासनाने नऊ पंचवार्षिक योजना राबवून कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च करूनही हाताशी काय आले? हा खरा प्रश्न आहे.'

असंख्य खेड्याची परिस्थिती भूकंपग्रस्त खेड्यांसारखी दिसते याची कारणे काय ? त्यातील महत्त्वाची आठ कारणे सविस्तर दिली आहेत.

मंत्रालय स्तरापासून ते ग्रामस्तरापर्यंत कार्यप्रणालीचा ओघतक्ता दिला आहे.

पहिल्या प्रकरणात योजनेची वैशिष्ट्ये, गाव निवड प्रक्रिया आणि योजनांची यादी दिली आहे. मृद् , जलसंधारण, पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, सामाजिक वनीकरण, अपारंपारिक ऊर्जा, पशुपालन, दुग्ध व्यवसाय, कृषी विज्ञान इत्यादी मुद्दे आहेत.
शेतकऱ्यांसहित सरकारचा फायदा कसा होईल हे सांगणारे पाणलोट क्षेत्राबाबतचे महात्मा ज्योतीराव फुले यांचे 'शेतकऱ्यांचा आसूड' मधील काही विचार समाविष्ट आहेत. संत तुकडोजी महाराज यांना अभिप्रेत गावाविषयीच्या काही बाबी श्री. ग्रामगीता मधून घेतल्या आहेत.
कै. दे. भ. अच्युतराव पटवर्धन यांचा लेख युवाशक्तीचे महत्त्व स्पष्ट करणारा आहे.
दुसऱ्या प्रकरणात राळेगणसिद्धीतील विकासाचे वर्णन निष्कर्षासह मांडले आहे. तिसऱ्या प्रकरणात आदर्श गाव योजनेची तत्वे आणि वैशिष्ट्ये सांगताना पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन महत्त्वाचे मानले आहे. पावसाचे प्रमाण, अनिश्चितता हे पाहता पाणलोटांमधील उपचार पद्धती किती महत्त्वाची आहे हे समजते. शेतीचे उत्पादन वाढवायचे असेल तर माती आणि पाणी या दोन गोष्टी महत्त्वाच्या असून शेतीची सुधारणा आधुनिक पद्धतीने करणे क्रमप्राप्त ठरेल व हे देशाच्या अर्थशास्त्राशी निगडित आहे हे पटवून दिले आहे. चराईबंदी, कुऱ्हाडबंदी निसर्गसंपत्तीच्या रक्षणासाठी सहाय्यभूत ठरल्याचे दर्शवले आहे.

चौथ्या प्रकरणात स्वयंसेवी संस्थांचे योगदान ग्रामविकास हेतू स्पष्ट केला आहे. पाचवे प्रकरण प्रशासकीय अडचणी, निधी, निरनिराळ्या शासकीय यंत्रणांचा समन्वय, लोकसहभाग, कर्तव्य, जबाबदाऱ्या या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणारे आहे. निधी व्यवस्थापन, जलसंधारणासाठी निधी मंजुरी आणि निधीची विनियोग पद्धती 'जलसंधारण कार्यक्रम, गाभा क्षेत्र' या शीर्षकाखाली सहाव्या प्रकरणात स्पष्ट केली आहे.

प्रशिक्षण व जागरूकता या सातव्या प्रकरणात राष्ट्रीय पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, प्रशिक्षण केंद्राच्या कार्याची माहिती इतर माहितीसह समाविष्ट आहे. निष्कर्ष या आठव्या प्रकरणात कृषी विकासाच्या प्रगतीसाठी नवीन उपाययोजना करणे गरजेचे आहे. लोकसंख्येचा प्रश्न व ग्रामीण भागातील उजाड क्षेत्राचे नंदनवन करण्याची गरज यांचा ऊहापोह केला आहे.

सर्वंकष पाणलोट योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सवलती, मृद् चाचणी प्रयोगशाळा, प्रशिक्षण व भेट योजना, रोजगार हमी- फलोत्पादन, सधन कापूस विकास कार्यक्रम, राष्ट्रीय गळीत धान्य विकास कार्यक्रम, राष्ट्रीय कडधान्य विकास कार्यक्रम, ठिबक सिंचन अनुदान, सर्वंकष पीक विमा योजना ठळक वैशिष्ट्यांसह नमूद केल्या आहेत.

आदिवासी शेतकऱ्यांना दारिद्र्यरेषेच्या वर आणण्यासाठी अर्थसहाय्य, सुधारित शासन निर्णय तक्ता , अनुदान मर्यादा लाभार्थींसाठी दिल्या आहेत. विषेश घटक योजनेत अनुसूचित जाती, नवबौद्ध, शेतकरी कुटुंबासाठी योजनांची माहिती असून दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन यासाठीच्या अनुदान योजनाही दिल्या आहेत.
स्वयंरोजगाराच्या अंतर्गत राष्ट्रीय बायोगॅस विकास योजना, जवाहर रोजगार योजना विषयी चांगली माहिती आहे. विविध समित्या, संस्था यांची शेवटच्या टप्प्यात माहिती सांगितलेली आहे.

अशा या पुस्तकाचे समीक्षण करण्याचा मुख्य हेतू म्हणजे केवळ अनेक शेतकरी बांधवांसाठी माहिती देणे हा नसून त्यांना योजनांचा लाभ घेण्याची प्रेरणा देणे हाही आहे. नव्या योजनांच्या माहितीसह यादी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या पुस्तकाचे योगदान महत्त्वाचे ठरणारे आहे.
राळेगणसिद्धीतील विकास नेमका कशा पद्धतीने झाला हे सोदाहरण स्पष्ट केले आहे हे या पुस्तकाचे मुख्य बलस्थान आहे. सचित्र माहिती रंजकता वाढवते, आकर्षित करते. प्रत्यक्ष गाव डोळ्यासमोर उभा राहतो.
काही योजनांच्या बाबतीत आणखी सविस्तर वर्णन, लाभ घेण्याची थेट पद्धत आणि निधी व्यवस्थापनाचे मार्गदर्शन आणखी करणे आवश्यक होते.
शेतकऱ्यांसाठीचे राजकीय धोरण वाचकांपर्यंत बऱ्यापैकी पोहोचले आहे. लोकसहभाग आणि सरकारी मदत या दोन्हींच्याद्वारे विकास साधने कसे शक्य आहे हे पुस्तक वाचले की सहज लक्षात येते. पुस्तक यासाठी महत्त्वाचे आहे की कृषी क्षेत्रात प्रगती करण्यासाठी सकारात्मकता नक्कीच यामुळे वाढेल.

परिस्थितीचा कायापालट करण्याची ताकद आपल्या प्रबळ इच्छेत, प्रयत्नात आणि विश्वासात आहे. सरकार व शेतकरी यांच्यातील दुवा साधणारे हे पुस्तक त्याचे वेगळेपण जपून आहे ते शासनाने दिलेले प्राधान्य आणि शेतकऱ्यांच्या गरजा यांच्यातील समतोल साधल्यामुळे.

एकंदरीत 'आदर्श गाव संकल्प आणि प्रकल्प' जनता आणि शासन यांच्या मर्मबंधातील दुवा ठरणारे आहे.
आजच्या जागतिकीकरणाच्या परिस्थितीत कृषी क्षेत्राचेही महत्त्व लक्षात घेऊन अद्ययावत माहितीच्या समावेशासह पुढील आवृत्त्यांचे स्वागत वाचक करतील असा विश्वास वाटतो.

~ माधुरी मगर-काकडे.
दौंड. जिल्हा- पुणे.
महाराष्ट्र
पिन कोड:- ४१३८०१
चलभाष:- ९२२६४५३८८,
९४२२२३६७१०

Share