Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



पिकपाणी

लेखनविभाग: 
कथा

पिकपाणी

एक
गागळीजल्यावानी आभाळ गेल्या चार-पाच दिवसापासून होतं. शत्रू कीटकांना आणि गावातल्या नाल्यानुल्यातल्या मछरांना अशा वातावरणात मोठा जोर येई. आताही लैच जोर त्यांना आला होता. गाई-बैलाच्या खोपड्यात गेचुड्या उतून आल्या होत्या. आठ दिवसाधी मच्छरही कानाले लागत नव्हते; परंतु आता त्यांनाही बराच चेव आला होता. तेही कानोकानी जावून त्यांच्या भाषेत म्हणत होते,’अंधेरा कायम रहेगा. हमला जारी रखो.’
जेवण-खावन झालेला गाव. शांत. सामसूम पडलेला. शिवाय मच्छरांची आणि रात किड्यांची मैफिल जागी. अशात कुत्र्यांचे चिरके इलरने शांतता कापून जात होती. विनोद उजाला टार्च घेवून पांदीने चालत. मोबाईलवर मोहम्मद अजीज, सुरेश वाडकर नि शब्बीर कुमार यांचे गाणे यैकत. गाण्याच्या लयीत, त्यांच्या रचनेत तो मग्न होवून, डुबून चालत होता. अचानक एकाएकी बाजूच्या झुडपातून गपकन ससा पळाला. तशी त्याची तंद्री भंगली. तो भानावर आला. चालते पाय पटकन थांबले. काळजाला झटका बसल्यागत झालं. त्याने झुडूप हलले त्या दिशेने ‍बॅटरी वळविली. तसाच ससा कासराभर अंतरावर उजेडात थांबला. ‘पकडावं का रे याले ? सापडन का ह्यो ?’ एक पाय वळविला तसा किंचित प्रकाश हलला. तसाच ससा पुढे पळाला. ‘अरे बावा, पळ आता, नाई पकडत तुले, गुरवार हाये, पकडून कोण्या कामाचा तू ? बायको शीवाच देईन.’ बायकोची आठवण होवून त्याला मगाचा प्रसंग आठवला.
विनोद त्याची बायको-सोनल दोघे जेवत. चार-दोन घास घेतले असेल. येवढ्यात लाईन गेली. त्याला वावरात जायचे होते. म्हणून सोनलने ब्याटरी न लावता, खायच्या तेलाचा दिवा लावला. नंददिपाच्या मंद प्रकाशात सोनल म्हणाली, ‘’आवं, आपल्या बापुसाठी एक चार्जिंग फ्यान आनान का ?’’ विनोद काहीच बोलला नाही. तो गपच. नवऱ्याचा असा अबोला पाहून ती पुन्हा सरकून म्हणाली,’’कावून आयकाले नाई येत का ?’’ तेव्हा विनोद म्हणाला, ’’आवं, तुलेतं माईत हायेनं ! अम्दां कसं आपून कैचीत सापडलोतं ?’’
‘’आवं पण, चारशे-पाचशे रुपयाचा प्रश्न हाये.’’
‘’थो तुयासाठी हाये; चारशे-पाचशे रुपयाचा. मले घर चालवा लागते. माह्यासाठी लय मोठा हाये.’’ जबाबदारीचं बोलणं आयकून सोनल च्यूप राहायची; तर नाही. ती उलट म्हणाली,’’लग्नाच्या आन्धीतं भाय म्हणे तुमी, पैसा आपल्या हाताचा मळ हाये म्हणून. आता दाखवानं मळ ?’’ हे बोलनं विनोदच्या एकदम जिव्हारी लागलं. त्याची आग झाली. त्याला खूप राग आला. पण त्याने त्याचा कासरा आवळला. लगेच मुकाट्याने ताटावरून उठला. हात धुतला. प्यान्टाले हात पुसले. मंधच्या डेरीची ब्याटरी घेतली. खिशातून खर्रा काढून खाल्ला. तरातरा चालत मगा ठेवलेलं धोपटी बेलनं बगलेत मारलं. दरम्यान सोनल विनंतीच्या स्वरात म्हणाली, “आवं, जेवणावर असा राग नोका काढू. जेवून घ्या.’’
‘’भरलं माह्य पोट. तू खावून घे !’’ रागाच्या फणकार्यात विनोद म्हणाला.
‘’आवं पण दोनच पोया जेवलेनं, इतक्या लवकर भरलं पोट ?’’ ती प्रश्नार्तक म्हणाली.
‘’भरलं म्हणलनं मी. तू जेवनं कवाडं चांगले लावून दे’’ तो बावरून बायकोले आज्ञापर म्हणाला. शेवटीचे काळजीचे बोलणे तिला पटले. मग तिलाच वाटलं, ‘अगावू आपण पंख्याचं घोडं नाचवलं. नसतं नाचवलं तर हे पोटभर जेवले असते. आता ह्यो माणूस रातभर जागल करणार. अर्ध्या पोटानं आपून आगावू उपाशी ठेवलं. बुद्धी गहाण ठेवून आपून अगावू बोलले.’ तिला तिच्या बोलण्याचा पश्चाताप होवू लागला. तो तिला दुर्लक्ष करीत वावराकडे निघाला.
यंदा पावसानं भलतच झोडून टाकलं होतं. रोहनीचा पाऊसचं दणक्या झाला होता. त्यामुळे प्रत्येक शिवारात रोहनीतचं सारे फाडून बाया बी-बियाणे लावत होते. उन्हाळ्भर गपगार बसलेले मजूर, बाया-मानसं आता संपूर्णपणे कामोकामी लागले होते. पोरांची शाळा सुरु व्हायला अजून बरेच दिवस बाकी होते. म्हणून पोरं-पोरी सुद्धा वावरोवावरी तासी लागलेले होते.
आता उन्हाचे दिवस ढकलत आलेली, खोळंबलेली मानसं जोमाने दतारी हाणत होती. यात विनोद येरणेही होता. त्याने यंदा लावायला काही जुन्या व्येरायट्या आणल्या होत्या. काही नवीन आणल्या होत्या. ‘आज आपून मोयतीर करायचे.’ असे ठरवून त्याने ते केले. आणि त्यानं त्याचे घरचे अडीच एकर वावर आडव्या उभ्या पद्धतीने डोबून घेतले. पाहता-पाहता पश्चिमे कडून आभाळ भरून आलं. वारं सुटलं. आनं बघता-बघता आभाळ धो-धो फुटलं. अवचित पापणी भरून यावी अनं पाणीच पाणी दिसावं; तसे सगळीकडे पाऊसमय झाले. साऱ्याने पाणी धावू लागले. ‘आपून मोयतीर करालेनं पाऊस पडाले. आता सरकी दबते का काय ?’ तो लावलेल्या वावराकडे पाहू लागला. मनात विचार करू लागला. ‘यंदा पाउस जास्तचं आहे. असं आपुन बातम्यावर आईकलं होतं. साऱ्या च्यानेलवर मान्सून लवकर येणार सांगत होते. हे तर आता खरंच झालं. आता आपली सरकी न दबता टर्रटर्र निघून आली पाहीजे.’ पाऊस सारखा संततधार पडत होता. त्या दिवशी सारखा पाऊस दोन तास पडला. शेती शिवारातील लोकं आपले ओले चिंब होवून घराकडे वळले होते.
दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी विनोदची सरकी लावून पूर्ण झाली. पाऊस पोटभर पडला होता. त्यामुळे काही लोकांची पराटी वतरी लागली होती. परंतु लावणीच्या पहिल्या दिवशीची पराटी बऱ्याच लोकांची एक भाग निघाली होती. त्यात विनोदचाही सहभाग होता. तो वावरात येवून बांधावरून चारीमेरा पाहत होता. उन्ह डोक्यावर चिडत होती. रिकामे ढग त्याच्या डोक्यावरून येरझाऱ्या मारीत होते. विनोद तासनंतास घेवून हरेक फुली उकतून पाहत होता. त्याला काही त्यात कोम्बीजून सरकी दिसत होती. काही मातीत जळलेली दिसत होती. तर काहींचे पीठ पडले होते. ‘माती आड केले / कुजके बियाणे / कसे कनसावे / त्याने आता.’ या प्रकाश होळकरांच्या ओळी पुढचे दृश्य पाहून मनात चमकून गेल्या. ‘असं कसं झालं यंदा ? दरवर्षी आपून ज्या व्यरायट्या लावून राह्यलो, त्या तीन भाग कशा का अबीव निघाल्या ?’ तो पुन्हा पुढे सफाईने फुल्यानंफुली मसण्या उदासारखा उकतू लागला. आधी सारखेच चित्र त्याला पुढे-पुढे दिसत होते. त्याच्या मनात सरकीच्या कंपनी विषयी राग येत होता. एक भयानक अनामिक चीड मनात उभी होत होती. याच वेरायट्या त्याने या घरच्या वावरात आणि मक्त्याच्याही वावरात डोबल्या होत्या. ‘त्यांचीही परिस्तिथी हीच राहते का काय ? नाही, नाही, असं नाही झालं पाहीजे. असं झालं तर आपून अख्खे मरू.’ असे विचार करीत त्याला वाटत होते. ‘गावात एखाद्याने असी अबीव सरकी निर्माण करुन दिली असती, तर त्याचे आपून क्यालर धरले असते. त्याची माय-बहिण घेतली असती. त्याले झोडपून लगलगं केलं असतं. पण ह्या मोठ-मोठ्या टोलेजंग कंपनीं वाल्यायले आपून काय करू शकतो. यांनी जनुकीय बदल करून शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे द्यायला नाही पाहीजे. या बाबत सरकारने त्यांच्यावर टांगती तलवार धरायला पाहीजे. यंदाचेच म्हणून नाही हे. साले दोन-तीन साल झाले हाच रोना होऊन आहे जिंदगीचा. नावाजल्याही व्यरायट्या तशाच आणि बिन नावाजल्याही तशाच; काहिंचा अपवाद वगळता. अख्खा जीव साला यायच्यापाई घायीस आला. यंदा तर म्हणे खताचे भाव तर्काटले. दिवसेंदिवस सरकार बी कास्तकारायचा पनच पाहून राहिलं. यांनी कायच्या-कायच्यावर कर नाही लावला. गाई-म्हशीच्या आलपत घालाच्या चुनीवर सुद्धा कर. तोही आपल्याच खिशातून भरायचा. असे चुनी सारखे लगीत प्रोडक्ट आहे. फक्त आपल्या मालालेच भाव नाही. आपुन कष्ठ करानं, आपुनच चोरायचे खिशे भरा. नाना तऱ्हेचे विचार करीत विनोदभाऊ वावरात पोहचला.
ब्याटरीचा उगामा त्याने चौफेर पाडला. पराटीत कडकड आवाज येत होता. पराटी हलत होती. त्याने समोरच्या खोपड्यात जावून वेळूचा सोठ हाती घेतला. ब्याटरीचा उगामा पुन्हा त्याने त्या हललेल्या हिम्मत्बाज जागी धरला. अनं एक किलारी बोम्बलीच्या देटापासून त्याने जोरात मारली. ‘’ईss.....इ...ही...ईss..इ..ही..’’ दाट पराटीत हलवाहलव करणारी अदृश जात गपगार झाली. डोळ्यापुढून तूर पराटीचे झाडे मंद मंद हलली. ‘कोणी चोर पावलाने तिथून हळूहळू जात आहे की काय ?’ असं त्या झाडांना पाहून त्याला वाटत होते. त्याने मागे टार्च पाडला. आणि मगाच हललेल्या झाडातून तीच क्रिया एक एक झाड हलत शेल्यावर गेले. रेल्वेचे डब्बे जातात तसे. त्याला आताही काहीच दिसले नाही. त्याचे काळीज वेगाने धडधडू लागले. मग त्याने घरून आणलेल्या धोपटी बेलण्यातून फट्याक्याची पेटी काढली. गाठोडं तसच तिथे खोपड्या पुढे टाकून दिले. त्या पेटीतून त्याने एक सुतळी बॉम्ब काढला. त्याला एका गोट्याच्या चापंवर ठेवला. लायटरने त्याची वात शिलगावली. कानपटं बसविणारा आणि पाया खालची भूमी दान्द्रून सोडणारा आवाज झाला. तसेच त्या हलणाऱ्या पराटीतून पंचीस तीस डुकरे भयभीत होवून एका मागे एक पळत सुसाट निघाले.
दरम्यान, विनोदने जवळच्या कडू लिंबावर छलांग मारली. बंद्रासारखा एका फांदी वरून दुसऱ्या फांदीवर जावून बसला. तिथून वावरात सगळीकडे नजर टाकून तो पुन्हा पुन्हा किंकाळी ठोकू लागला. ब्याटरी गळ्यात अडकून, एका हाती लायटर धरून, दुसऱ्या हाताने बारीक चीनग्डी लाल फटाके वरून खाली टाकू लागला. त्यांचा वारंवार ‘फटss फटs’ आगाज होवून तसतसे डुकराचे पिल्ले त्यांच्या माय-बापासंग ‘’चीची....चीची’’ करीत सुसाट पळू लागले. विनोद झाडावरून फटाके फोडत जोर जोराने आवाज करीत होता. किल्याऱ्या मारीत होता.
पंधरा-वीस मिनटात सगळं काही पूर्वी सारखं सामसूम झालं. तो खाली उतरला. पराटीत जावून पाहिले. पराटी त्या डुकरांनी पार घोळसून टाकली होती. हे दृश्य पाहून त्याच्या पायातलं अवसान खचलं. तो तितेच मस्तकावर दोन्ही हाताचे पंजे ठेवून बसला. डोळ्याच्या पापण्या भरून आल्या. मनात देनेकर्याचे तकादे उभे झाले. काही वेळ तो विचार करीत तितेच बसला. अनं काही वेळात त्याच्या काळजाखाली आग भडकली. घोळसलेल्या कपाशीचे सांडलेले बोंडे त्याने एका जागी गोळा केले. ‘साल्या माजरचोदायले माहेच वावर दिसते. ज्यायचे आगावू वावरं आहे. तिकडे नाही मरत साले. ज्याचं मोडकं हाये नशीब त्याचेच साले पुन्हा तोडकं करते. साल्यांनी जे खायचे ते मुकाट्याने खायला पाहीजे. तासनंतास घेवून संगीत्ल्यावानी मोडमाड केली. सोंगल्यासारखी बगलेनं पाडली. लढाईत मुडदे पडल्यावानी.’ त्याला त्यांची माय-बहिण घ्यावी का काय ? असं वाटलं. ‘पण घेवून काय करते. त्यांना एक तर आपली भाषा समजत नाही. उलट शिवारात चौफेर आपले शब्द घुमेल. आपल्या सारखे कोणी जागल करणारे असेल तर त्यांना आयकू जाईल. मग तेच आपल्याला पुन्हा फोन करुन विचारण. कोनासंग काय झालं रे ? बापासंग होये का ? भावसंग होये ? अजून आपल्यालेच तोंड दुखेस्तोर सांगा लागण.’ तो पुढे ब्याटरीचा उगामा पाडत पाडत खालच्या डूंगीत आला.
हरभऱ्या भोवती गुंडलेला तार त्याला तोडून दिसला. तुटतात करुन एका शेल्याले पडलेला दिसला. त्याच्या हृदयाला पुन्हा गरम सरुत्याचा चटका बसल्यागत झालं. तो चालत चालत चारीमेरा पाहू लागला. हरभराही कपाशी सारखा तासनंतास घेऊन चोतकोर भाग खावून होता. तुडवून होता. चेंदाडून होता. त्याने डोळ्याला हात लावला. ब्याटरीचा प्रकाश भलतीकडेच गेला. तशी त्याच्या डोळ्यावर अंधारी आली. पायात गोळे दाटल्यागत झाले. तो खाली बसला. काही वेळ बसूनच राहिला. मग त्याने धीराने स्वतःला सावरले. हृदयाला आवरले. दातावर दात रगडले. ‘काय म्हणावं आता ह्या लाईन वाल्यायले. हे वीज महावितरण वाले लेकाचे भलत्याच टायमात लाईन बंद ठेवते. आता मगा सायंकाळी पाच वाजता पासून रात्री बारा वाजे पर्यंत वीज ठेवली असती. तर गव्हाले, तुरीले पाणी वलून झाले असते. यायले करंटचा झटका देवून चांगली अद्दल घडवली असती. मार सरकार म्हणते आम्ही शेतकऱ्यांना वीज मोफत देवू. दिवसा आठ ते दहा घंटे लाईन दिली; तर आम्ही बाकी रात्रीचा दिवस एक करू. नका देवू आम्हाला वीज मोफत. आम्ही बिल भरायला तयार आहोत. आपून मगा घराकडे जायला. आणि यांचे आगमन व्हायला. तरी मगा करंट लावून ठेवला होता. पण लायीनच आली नाही; तर कसा बसणार झटका. आपून घराकडे निघायला गेलो की लायीन चालू करते. आपल्याला वाटते का आता करंट टाकून ठेवावा. जेवण करत पर्यंत या रान स्वापदांचा त्रास कमी होईल. परंतु नाही, तसं बिलकुल होतच नाही. दोन दिवस साले बरोबर ठेवते लाईन. मग पुन्हा दोन-चार दिवस जुनं नवं सारखेच करते. अशाने आता महिना होत आहे. गहू पेरला तईपासून धड फेर शेल्यावर गेला नाही. हरभर्याचीही तीच स्थिती आहे. विहिरीले यंदा अतिवृस्टीमुळे पाणी बक्कळ. पण लाईनचाच मोठा प्राब्लेम. तरी तूर आणि पराटी दूरच राहिली. अतिवृष्टीमुळे आधी तुरी गेल्या. आता मागून चुका डोबल्या तर डुकरांनी काव आणला. आता ही समोरची घरची तूर लावलेली. ती शेवर्यावर येऊन आहे. काही तासातल्या आधीच्या तुरीचे दाणे भरण्यावर येऊन आहे. पण काय करते ? पाणी ओलाची सोय आहे. पण लाईन नाही. किती मोठ्या विचाराने आल्तो. का आज आपला राहिला चुईला गहू होते बा मनलं ओलून. उद्या तुरीले पाणी ओलू. पण काय करते. लाईनचा पत्ता नाही. हे आता वीज नाही तर रान स्वापदांनी जीव मेटाकुटीला आणला. आज लाईन बंद नसती; तर बोरायवांनी या डूकरायचा सातरा पडला असता. आनं काही वाचलेही असते; तर पुन्हा फिरकून आले नसते. ज्या दिवसी लाईन असते, त्या दिवशी साले बिलकुल येत नाही. माहित असल्यावानी. काय करंटचा वास येतो का काय तर ? त्या दिवशी बिलकुल फिरकत नाही. आज आपल्याला उशीर व्हायला. आनं यायचे भजन जमायला. विचार करून नुसते डोस्कं दुकते. विन्या झोप आता.’
त्याने खोपड्यात गोणा टाकला. अनं आंग टाकलं. पुढे लिंबाच्या झाडाला बांधलेला कानपुर्या बोंबला. तशी त्याला आठवण झाली. ‘आरे, उठ विन्या, चाल बैलाले लम्पीचे अवशीद दे.’ तसा तो उठला. डेरीच्या थयला काढून गोळ्या देवू लागला. ‘यंदा तर पुन्हा लम्पी आली. गत वर्षी बरेच बैल मेले. मोठी भयानक बिमारी साली. गाठी यायल्या लागल्या का गपंगपं यते. मागच्या वेळेस आपल्या बैलावर नाही आल्या. यंदा आली लम्पी तर दोन्ही बैलावर आली. सरकारी दवाखाने वाले बी लसीकरण वेळेवर करत नाही. कोरोनात लेकायनी शेत शिवार फिरून लसीकरण केलं असतं. तर आपल्या गावातले बैल दगावले नसते. जवळ आहे म्हणाले दवाखाना. पण काही मिळत नाही. सरकार यायले काहीच नसन माल पुरवत का ? कोणतीही अवशिधी गेलं मागले का देते लेकायचे चिट्टी लिहून. बसा मेडिकल मधून घेत. काय सरकारी काम न दहा महिने थांब. चलो आता झोपले. विचार करण्यात काही मज्या नाही. ‘’बसा रे बाबांनो आता ! आराम करा. मी जिवंत आहे तोवर तुमचा चांगल्या चांगल्या डोक्टरांकडून इलाज करतो. इचार नोको करू रे कानपुर्या ?’’ बैलाले बोलत त्याने आंग टाकलं. तसाच फोन वाजला. ‘’कोनाले आता फोन कराचा होता ?’’ तो फोन पाहून उचलत म्हणाला,’’बोल, शंकर का म्हणते ?’’
‘’काही नाही. पाणी वलाले येवून आहे का ?’’ तिकडून विचारणा झाली. ‘’आरे हो, तू पण आहे का वावरात ?’’ इकडून विनोद म्हणाला. “हो, आत्ताच आलो. गाईले अवशीद पाजलनं; तुले फोन केला. लायीनत आजही नाही गा ?’’ शंकर प्रश्नार्तक बोलला. तसाच विनोद पुढे बोलला,”हो, लायीनत नाही, येते मग आपून झोपल्यावर. ये चहा पिवू.” म्हणत विनोदने फोन ठेवला. तसा तो जवळच्या तीन गोट्या चुलीपाशी गेला. चहाचे आन्धन ठेवले. उकळी फुटत नाही तर शंकर आला. ‘’ये !’’ म्हणत त्याने चहा गाळला. शंकर गोण्यावर बसला. चहा देत विनोद म्हणाला, “मी का म्हणतो ?”
‘’म्हण नं !’’
‘’आपुनू उद्या माग्च्यावानी सब स्टेशनला जावू. त्यांना विनंती करू. आनं म्हणू, का दिवसा बंद ठेवा लाईन पण रात्री तरी वलू द्या पाणी.’’
‘’आरे, पण थे तसे आईकन का ? ठेवण का चालू ?’’
“कावून नाही आईकन ? त्यायले आईका लागण. आपले सेवक आहे.’’
‘’अरे, पण मागे आपण दोघा तिघांनी त्या इंजिनिअरले पैशे दिले होते. तो आता नाही. बदलला. आता पुन्हा नव्याले द्या लागण का ?’’ शंकर म्हणाला. ‘’होनं, हे माह्या लक्षातच नाही आलं. आता तर घरी पण पैशे नाही. मगाच बायकोनं पंख्याचं ठुमन्न लावलं होतं. राग आला मले, मी उठलो अर्ध्यापोटाने.’’ विनोद लहानच्या तोंडानं म्हणाला, ‘’त्या कोत्वालासंग मागीलदिसा दोन शब्द झाले. तर साल्याने माहे कागदपत्र अतिवृष्टीच्या पैशासाठी पटवार्याले दिले नाही. दिले अस्तेतं आता पर्यंत खात्यावर पैसे जमा झाले असते.’’
‘’आरे, तूय जमत नाही. म्हणून नसन दिले. पण मह्यासंग जमते. तरी लेकाने माहे कागदपत्र अजून पोहचता केले नाही.” शंकरचे ऐकून विनोदला प्रश्न पडला. असं का ? म्हणून त्याने विचारले,’’ असं कावून रे बा ?”
“असं कावून. आपण त्याच्या पार्टीच्या मानसाले यंदा निवडून दिले का ?”
“नाही.” पुढे शंकर म्हणाला,“म्हणून तर हे असं होये.” पुरा गेम विनोदच्या लक्षात आला. तो म्हणाला,”आपुन आपल्या सरपंचला सांगू ?”
“आरे, पण थो काय करणार ? त्याच्या संग बी थे कोतवाले तोंडा म्होर हो हो करते. आनं गांडीमागे जुने नवे सारखेच करते.” शंकरने सारा खुलासा केला. मग विनोदचा नाईलाज झाला. आता पुढे काय बोलावे ? प्रश्न पडला. तो चालू गोष्ट टाळून म्हणाला,”आरे, आपल्या गावात कावून अतिवृष्टीचे पैसे उशिरा जमा झाले. त्या नाग्रीवाल्यायले तर मागेच जमा झाले.” तसा शंकर पुढे म्हणाला,”आरे, मागच्या सोमवारीच सरपंच्यानी आमदाराला फोन केलता. तर तो म्हणे ज्यांचे सरकार बसून आहे केंद्रात. त्याच पक्षाचे आमदार-खासदार आधी आपले तालुके वाटत आहे म्हणे. तुम्हाले बी भेटन म्हणे, पण थोड्या उशिराने मिळन म्हणे.” विनोद भुवया उंचावून नवल वाटल्यागत म्हणाला,”अस्सा हाये तर हा खेळ. अरे, पण हेक्टरी तेरा हजार देणार होते. मग त्यांनी सरासरी साडे तेरा नं चौदा हजार कावून दिले ?” हे आईकून शंकर गप झाला. दोघेही गप. पुढे शंकर म्हणाला, “मले नाही माहीत बा.” दोघांनी एक एक सुस्कारा टाकला. विन्या म्हणाला, “पण काही लोकायले अजूनही भेटले नाही. काय कारण असण ?” कारण सांगत शंकर बोलला,”अरे, मले काय माहित. हे कर्मचारी तांत्रिक अडचणी म्हणून हेदाडून देतात.” मग या नंतर कोणीच काही बोलले नाही. दोघेही विचार करत. विनोद म्हणाला, ‘’चाल, उद्याचे उद्या पाहू. आणतो कुटून तरी पैशे. लाईनशिवाय पर्याय नाही आपल्याले. आपल्या पेटीत करंट असला तर आपल्यात करंट राहते.” म्हणत त्याने मोबाईल पाहिला. तर रात्रीचे दोन वाजले होते. विनोद म्हणाला,”आता उठवू सारे रान.” शंकरला काही कळले नाही. त्याने विनोदला विचारले,”मी समजलो नाही.” त्याला तो समजावून सांगू लागला,”आरे, आपुनच नाही शिवारात. अख्खे रान जागे आहे. सारे वाट पाहत आहे लाईनचे. काही झोपले असण. काही मोबायीलवर काड्या करत असण. त्यांना आपून उद्यासाठी जागे करू.” शंकर, विनोदला काय म्हणायचे ते समजला. दोघांनी फोन फिरवून रान उटवायला सुरुवात केली. बराच वेळ त्यांनी फोन नंबर इकडे तिकडे घुमवले. शंकर म्हणाला,”झोप आता. जावू उद्या.” दोघांनी डोळे मिटले.
उदरांनी टीनावरती कूचकूच करणे चालू केले. दोघाचेही काही केल्या डोये लागत नव्हते. मग विनोदने टीन वाजवून एफ एम चालू करून आंग टाकले. डोळा इकडून तिकडून लागला तर एफ एम वाजला. तसा दोघानाही जाग आला. शंकर आपल्या वावरात धावत गेला. विनोद मोटार चालू करुन सर्णीवर गेला. जायच्याधी रेडीओ मिर्ची च्यानेल लावून गेला. एक पाटी शेल्यावर टेकली. त्याने दुसरी फोडली. तो ब्याटरी घेवून फोडल्या सारणीच्या शेवट जावून उभा राहिला. तसा एक फुत्कार त्याच्या कानी पडला. “अरे, बाप रे ! स्सssरपs” म्हणत त्याची छाती धाडकन भरून आली. अंगावर काटे उभारले. हृदयाची गती घोड्यावानी तेज दौडवू लागली. तो मागे उठून पळाला. खोपड्यापाशी जावून दम घेतला. भयाने त्याला सुचनासे झाले. शरीर गरम झालं. श्वास उष्ण झाला. तोंडातून काहीच शब्द फुटेना. त्याने चर्वितले घुटभर पाणी पेले. ‘बाल बाल वाचलो. हा पाणी वलाचा काळा जोडा नसता तर तो रुतलाच असता. हे भोलेनाथ धन्यवाद. आता काय करावं ? शंकर्याही गेला. आपण मरता मरता वाचलो. पण आता याला मारले नाही. तर केव्हा हा पुन्हा फिरून मागे लागेल. हे सांगता येत नाही.’ भयाने त्याचे हातपाय कापत होते. ओठही अडखळत होते. तो आपल्या मागे तर आला नाही ना ? म्हणून त्याने आपल्या मागे पुढे टार्चने पहिले. चौ भवताल दूर दूर पर्यंत प्रकाशाने पहिले. कुठेच काही दिसत नवते. त्याने दोन श्वास लांब सोडले. स्वतःला सावरले. आणि शंकरला फोन लावला. घडलेला प्रसंग सांगितला. ‘तू पाणी घालून लवकर ये. मले भेव लागत आहे.’ म्हनत फोन कट करून सफाईने शिवारातल्या अख्या कास्त्कारायले फोन घुमवला. कोणी उचलत होते. कोणी उचलत नव्हते. हा टाईम खरंच फोन उचलण्याचा नव्हताच. घाढ झोपेत खराटे मारण्याचा होता.
येवढ्यात शंकर आला. शंकरने विनोदला धीर दिला. त्यानेच मग पेटीतला ह्यालोजेन लावला. भयाने कापत विनोद खालीच बसून होता. शंकरने गावात दोन तीनदा फोन लावले. कोणाले तरी सान्झ घेऊन येशील. असे सांगितले. येवढ्यात विनोदने बोलावलेले कास्तकार आले. “काय झाले रे ?” एकाने विचारले. “कोणता होये गा भाऊ सरप ?” दुसऱ्या कमी वयातल्या पोराने विचारले. तिसरा म्हणाला,”चाल, कुठ आहे दाखव ?” तसा विनोद लवरलवर कापत उठला. एवढ्यात गावातून साप मारायचे अवजारे घेऊन काही लोकं आले. विन्याला बर्यापैकी बळ आलं. त्याने मगाच्या फुत्काराच्या जागी सर्वांना नेले. तर काय त्या सापाने एक मोठा उंदीर गिळला होता. त्याच्या पुष्ठाकडील काही भाग बाहेरच होता. एवढ्यात किशोर मानकर नावाच्या इसमाने त्याच्या गळ्यावर बरोबर सान्झ टाकली. तसा तो साप बिथरला. त्याने आंगच्या ताकदीने आपले शरीर त्या अवजारासंग गुंफले. तशी सान्झ त्याच्या हातातून खाली पडली. साप फुत्कारू लागला. कारण जिथे दणका बसायला पाहीजे. तिथे अजून बसला नव्हता. मग साऱ्यांनी हातमुठी त्याच्या आंगावर दणके टाकायला सुरुवात केली. तरी काही केल्या साप जुमानत नव्हता. सापही तसाच होता. न जुमानणारा. भरीव माणसाच्या मंगटासारखा. “हाना रे गपागप. टाका दणके. नाही तर ह्यो आपल्याले खाईल.” एका वयस्कर भोई समाजाच्या माणसाने आवाज केला. तसे आपणपुट लोकं दणके टाकू लागले. अर्धा तास सरप पावून डझनच्या वर माणसांना झुंज देत होता. शेवटी त्याला मरणे टाळता आले नाही. तो सान्झच्या हिसक्याने यम सदनी पोहचला. सारे माणसे घामात भिजून गेलेली. तरी थंडीचा मोसम होता. कोणी तरी चर्वी आनली. सगळे पाणी पेले. मगाचा जेष्ठ भोई म्हणाला,” नशीब तुयं विनोद्या, नाहीतं ह्या सोन्या परडाच्या हातून कोणी वाचत नाही.” त्यातला एक म्हणाला,”साप म्हणे शेतकऱ्याचा मित्र. पण हा तर आपल्या दोस्ताच्या जीवावरच उठून होता.” तिसरा सुरेश खत्री निर्वाणीचा म्हणाला,” असो. विपरीत नाही घडलं. बरं झालं. जा घरी आता. उद्या वलाजो पाणी.” म्हणत सारे आपापल्या मार्गी लागले.
दोन चार मिनटे झाले नाही झाले. लाईन गेली. तसा त्याले महावितरण वाल्यायचा खूप राग आला. इलाज नवता. त्याने राग गिळून आंग टाकले. पण झोप येयीनात. येवढ्यात शंकर पुन्हा येत म्हणाला,”माह्या डोळा लागत नवता. म्हणून मी आलो. म्हणलं तुया पण लागला नसेल.” पुढे विनोद म्हणाला, “बरं झाला आला तर. माही अजूनही फाटूनच आहे. अजूनही भय निघाले नाही.” शंकर पुढे म्हणाला, “भय इथले संपत नाही. हे आताचं मी गानं आईकले. बरोबर आहे का नाही. आपल्या शेतकर्याय्च्या जीवनातले केवाच भय संपत नाही.” भयाची शीग ओसरल्या नंतर विनोद बोलला,”बरोबर आहे यार. भय इथले संपत नाही.” गोष्टी गोष्टी केव्हा दोघांचा डोया लागला. दोघांनाही काही कळलेच नाही.

दोन
सूर्य बराच वर आला होता. त्याच्या फोनची रिंग वाजली. तसा सोनलने फोन उचलला, “कोण, शंकर भावजी, थे आंघोळ करायला बसले.” तिने फोन कट केला. “आवं, त्यांनी याटो लागला म्हणून बोलावले.” ती बाथरूमकडे बोलत म्हणाली. तसा विनोद म्हणाला,”माहे, कपडे काढ कपाटातून.” तसे तिने कपाट जवळ जात विचारले, ”कोणाच्या फायनलले चालले ?” तो यावर काहीच बोलला नाही. काढलेले कपडे त्याने कपाटात ठेवून दिले. नि सर्व साधारण कपड्यापैकी त्यातले बऱ्यापैकी शर्ट प्यांट घातले. त्याला कपडे अदलाबदला करतांना पाहून तिला अप्रूप वाटले. ‘याटो लागला म्हणून फोन आलंय आणि हा माणूस कावून असे कपडे घालून राहिला.’ तिला रहावले नाही. तिने पडलेल्या प्रश्नाचे उत्तर विचारले,”आवं, तुमी चालले तरी कुठे ?” तो आपल्या तयारीत मग्न होता. इकडे फोन वाजत होता. तो मोबाईलची स्क्रीन पाहत होता. शंकरचे नाव त्याला दिसत होते. म्हणून तो फोन रिसीव करत नव्हता. त्याचं मूक राहणे तिला अजब वाटले. तिला जेव्हा ते जड झाले. तेव्हा ती टाट वाढायला गेली.
विनोद तयारी करून फोनवर बोलत निघाला,”आरे हो, येत आहे. मले वावरातून यायला उशीर झाला. उशिरा जास्तचं डोया लागला.” सोनालला आत हे सगळ आईकू येत होते. टाट वाढून तिने आवाज दिला,” आवं, जेवायला या !” तसा विनोद जुने बिल गोळा करत म्हणाला,”मी मग दुपारी जेवीन. आता मले जावू दे. उशीर होत आहे.” ‘अजबच आहे माणूस. रात्री अर्ध्या पोटाने उपाशी राहिला. आता अजून भूक लागली नाही. असे कोणते काम अर्जंट आहे.’ “आवं पण, चालले कुठे ? हे तरी सांगून द्या ?” सोनल दारात उभी राहून त्याला पाठी मागून विचारत होती. तो कासर्याभरावर गेला होता. ‘सोनल कुठे चालले असेल हे.’ हा विचार करून ती आपल्या पोराले जेवू भरवू लागली.
विनोद याटोपाशी आला तेव्हा साडे दहा वाजले होते. तो आल्या बरोबर शंकर तिजारेनं विचारलं,”काय रे बा ? कावून उशीर केला. तूच म्हणे रात्री आपण लवकर जावू. आणि आता अकरा वाजविले.” विनोदला प्रश्नाचे उत्तर सोडविणे गरजेचे होते. तो म्हणाला,”आधी जावून करते काय ? इंजिनिअर अकरा वाजता येते.’’ तमाम लोकांना आश्चर्य वाटलं. महादेव भोमल्या म्हणाला,”मग आमाले कावून लवकर बोलावले. आमी आगावू आलो लवकर.”
“आगा दादा, तुमी वेळेवर जमा होत नाही. म्हणून मी एक तासाधी बोलावले. आता यात काय झाले ?’’ सारे किंतू परंतु करणारे गप बसले. याटो चालू झाला. डांबरीने धावू लागला.
मागच्या वर्षी ऐन गव्हाच्या घाती लाईन वाल्यांनी पंप कापले होते. आधी थकीत बिल भरा. मग पिकात पाणी भरा. ही अट महावितरण वाल्यांनी टाकली होती. काहींनी बिल भरले. मात्र काहींनी भरलेच नाही. अशा शेतकऱ्यांची वीज कापण्यात आली. त्यांना गव्हाला पाणी कसे ओलावे ? हाच प्रश्न पडला होता. म्हणून मागच्या वर्षी काही लोकांनी खासदार, आमदारांकडे जावून त्यांच्यावर दट्ट्या आणला. अशामुळे का होईना मागच्या साली पुन्हा मोटारी उशिरा चालू झाल्या. पण गहू मात्र बारीक मारले. ज्यांनी बिल भरले होते. त्यांना वाटलं की आपण अगावू भरले. भरून शेवटी लाईन एकाच वेळी चालू झाली. आपण बिले भरून मोटारी काही आधी चालू झाल्या नाही. विनोदही असाच म्हणत होता. पण आता यावर्षी त्यांनी असे करू नये. आणि गहू यंदाही बारीक होऊ नये. म्हणून त्याने यंदाही सब स्टेशनला जायचा पुढाकार घेतला होता.
याटो चालत होता. गप्पागोष्टीत डुलत होता. शिवाजी परचाके म्हणाला,”अरे, तुमी काही कर्जमाफी होणार आहे म्हणून आईकले का ?” यावर काही हासले. काही मात्र गप बसले. याटोतले वातावरण पाहून विनोद म्हणाला,”शिवा, अरे आपून गेल्या चार वर्षात बँकेत रेगुलर होतो. दोन हजार सतरा, आठरा ते वीस या दरम्यान सुद्धा चालू भरत होतो. म्हणे रेगुलर वाल्यांना बक्षीस म्हणून काही तरी पन्नास हजार देणार होते म्हणे; पण आपल्या तर अजून खात्यावर आले नाही.” बोलणं आयकून सारेच गप झाले. कारण यातले अर्धे चालू होते. काही थकीत होते. चालू वाल्यातून एक हासत म्हणाला,”माह्या खात्यावर जमा झाले बा पंचवीस हजार.” हे आईकून विनोदला खराब वाटले. त्याला वाटलं ‘ह्यो आपल्यावर खरंच हसला की काय ? किती हासत हासत याने सांगितले. आपल्याही खात्यावर असेच जमा झाले असते. तर आपणही या बैठकीच्या हसण्यास पात्र नसतो ठरलो. आज पर्यंत वाट पहिली. कळ काढली. परंतु काहीच नाही. निराशा. निराशा.’ विनोद विचारातच होता. एक त्याला म्हणाला,”अरे, मग रेगुलर राहिला कायले ?” विनोद विचरातच हुरहूर करीत होता. अजून बाहेर पडलाच नव्हता. त्याची अशी गपगुमान अवस्ता पाहून त्याला हलवत शंकर म्हणाला,”अरे, सोड तो विचार. काय विचारलं ते सांग ?”
“कोण काय विचारलं ?” त्याच्या चेहऱ्यावर तेलागत घाम उमटला. त्याला वाटलं, ‘आपल्याला काही तरी विचारात आहे. आणि आपुन विचार करत आहोत.’ आधीनाथ पिम्प्लापुरे त्याला म्हणाला,”अरे, तुले रेगुलर कर्ज भरायला कोणी सांगितलं ?” विनोद त्यावर म्हणाला,”आपल्याला सरकारने सवय लावून दिली. पण मी सोताला लावून घेतली नाही. कारण कर्ज करून आपुन किती पिकवितो ? किती उत्पन्न शिल्लक पडते ? याचा मेळ बँकेचे कर्ज थकून नाही लागत. असे माझे मत आहे.” प्रामाणिकपणे त्याने अभिमानाणे सांगितले.
“म्हणून तर तुया हातावर सरकारने अशा तुरी दिल्या. मग तू कायले सरकारच्या बक्षिसाची वाट पायते ?” निलेश वातखेडे हसत म्हणाला. मग सारी मैफिलच त्यावर हसली. त्याला खजील झाल्यागत वाटलं. ‘आपुन आगावू हा विषय काढला. नसता काढला तर आपला असा अपमान नसता झाला. पण आपला मानच कुठं आहे. मग काय बेकार वाटून घ्यायचे आहे. मनाला समजावत म्हणाला,”घ्या हसून, पाहू सरकार किती दिवस तुमाले कर्जमाफी देतेतं.” यावर पुन्हा गाडीचं अख्खी हासली. यावेळेस त्याला मोठे खराब वाटले. त्याला वाटलं, ‘आता आपुन शांत राहायचे. काहीच बोलायचे नाही. तो शांत बसला.
मात्र याटो अशांत होता. राकेश मानकर पुढे म्हणाला,”आता तर सरकारने शिवार पांदन रस्ते करून द्यायला पाहीजे. काय म्हणता तुमी ?”
“अरे, आमी म्हणारे कोण ? म्हणून होणार तरी काय ? आपुन म्हणल्याने काही झाले असते तर आपल्या गावातल्या पिकीच्या रानावर धरण नसते झाले.” सुरज खोडेने वास्तवावर बोलून दुसऱ्या विषयाला सुरुवात केली. त्यावर राकेश म्हणाला,”अरे, माझे म्हणणे हेच होते की, यांत्रिक शेती शंभर टक्के करायची असेल तर रस्त्याचा अभाव नसला पाहीजे. मागे सोयाबीन काढतांना किती लोकायच्या वावरात हेडमबे फसले. त्यात पुन्हा पाणी थांबण्याचा विचार करत नव्हता. आणि सूर्य नारायण नित नेमाने दिसत नवते. माह्या वावरापाशी हिंगणघाट वाल्याने वावर केले. तर त्याचे अजूनही सोयाबीन काढायचे आहे. काळे येऊन राहिले सोयाबीन त्याचे. आता किती महागात गेला थो.”
“आरे, जावू दे. थो पुन्हा अशाने वावर असे अंदरचे करणार नाही. पुन्हा वावराचे नाव घेणार नाही.” शंकर निर्वाणीचा बोलला. पण मागचा धरणाचा विषय अर्ध्यावर थांबून होता. त्यावर बोलत एक म्हणाला,”यांना जलयुक्त शिवार हा उपक्रम राबवायचा असतो तर यांना शेतकर्याच्या पिकीच्या जमीनीच मिळते का ? हे तर आपल्याले सरकारचे बिलकुल पटत नाही. वन विभागाच्या येवड्या जमिनी आहे. त्यावर हे असे उपक्रम राबवायला पाहीजे.”
“होनं, अगदी मनातला बोलला तू, पण हे साले त्या फोरेस्टच्या जागेवर झाडे लावते. आणि त्यामध्ये मग रानटी पशु वास करते. मग हेच आपल्याला संकट होते.” विनोद म्हणाला. तोच पुन्हा पुढे बोलला,”यांना असे करायचे असते तर यांनी सौर उर्जेवरच्या ब्याटर्या सबसिडवर द्यायला पाहीजे. सोबत कुंपणासाठी जाळ्या, तारेही द्यायला पाहीजे. जेणे करून रान श्वापदापासून संरक्षण होईल.” या गोष्टीला फाटा फोडत एक म्हणाला,”सरकार तुमाले गांडीचीही चड्डी देणार का ? एवड्या अपेक्षा कायले करता. चाला सब स्टेशन आलं.” साऱ्यांची नजर सब स्टेशनवर गेली. सर्व उतरले. विनोद म्हणाला,”शिस्तीने घ्या रे ! बावरबीवर नोका करू.” यावर एक म्हणाला, ‘’असे केलेही तर काय आपले उपडून जमा करणार ?”
“अरे, ते सरकारी कर्मचारी जरा अदबीने बोला. पुढे मग पाहू.” म्हणत कार्यालयाकडे चालते झाले.
“नमस्कार साहेब !” विनोद इंजिनियर साहेबांना हात जोडून अदबीने म्हणाला. तो पुढे होता. बाकी सर्व त्याच्या मागे होते. पुढे तो साहेबांना म्हणाला, “साहेब, आम्ही गहू पेरून कोणाला एक महिना झाला, कोणाला पंधरा दिवस झाले, लाईन कशी का बरोबर धड घन्टाभरही राहत नाही.” साहेब खुर्चीवरून उभा झाला. विनोदच्या पुढ्यात येवून म्हणाला,”यातेल्या किती जणांनी बिले भरून चुकता केले ?” काहींनी माना खाली घातल्या. दोन तीन सोडून सर्वांनीच माना हळूहळू खाली टाकल्या. विनोद छाती फुगवत मागे न बघता म्हणाला,”अहो, मी नाही जवळ जवळ यातील अर्ध्या लोकांनी तर बिले भरले. मग यांना तर वीज पाहीजे चालू ?” साहेबांनी कोणा कोणाच्या माना खाली होत्या म्हणून पाहिल्या होत्या. त्यावरून त्यांना अंदाज लगेच आला असेल; म्हणून पुढे ते हासत म्हणाले,“दाखवा मला यातले अर्धे व्यक्ती ? जर यांनी मला भरल्या बिलाच्या पावत्या नाही दाखवल्या तर तुमाला यांचे बिले भरावे लागेल.” हे आईकून विनोद नि सर्व विचारात पडले. यातला शिवाजी परचाके म्हणाला,”नाही साहेब आम्ही तीन भाग लोकांनी नाही भरले. कायले आम्ही खोटे बोलून या गरिबाला बिले भरायला भाग पडू.” राकेश विनंतीच्या स्वरात म्हणाला,”साहेब दिवसा बंद ठेवत जा. आणि रात्री तरी वीज चालू ठेवत जा. आम्ही रात्रीचा दिवस करू. आमच्या पिकाला जगवू.” राकेश थांबला. आणि निलेश त्यांना प्रश्न विचारात म्हणाला,”काहो साहेब, आमच्या मात्यावर तुमी खाता, आमी पिकविलेच नाही तर काय घंटा खाणार का ?” निलेश साहेबावर नरमाईने गरम झाला. त्याची तळपायाची आग मस्तकात जात पुढे तो म्हणाला,”तुमी कंपनीवाल्यांना चोवीस तास लायीन पुरवता. कारण त्यांच्या कडून तुमाला खिशे भरून खायला मिळतात. आमी गरीब कास्तकार तुमाले मुठभरही देऊ शकत नाही. कारण याच्या जवळ बक्कळ जमीन आहे. पण कोण्या अर्जेंट वेळेला पाच पैशे सुद्धा राहत नाही.” बोलून त्याने डोयाला रुमाल लावली. त्याचे हे असे गहिवरणे पाहून कर्मचारी सोडून सर्वांना राहवले नाही. बाहेर दारातला एक शिपाई सारे आईकात होता. त्याच्याही पापण्या ओलावल्या होत्या. विनोद हात जोडून म्हणाला,”साहेब तुमी रात्रभर लाईन चालू ठेवाचे दर महिन्याला किती घ्यान?” विनोदचे निर्वाणीचे बोलणे पाहून संगचे अर्धे गोंधळले. साहेब मात्र हासत म्हणाले,”तुमी किती आणले ?” विनोद खिशातून पैसे काडत म्हणाला,”हे घ्या पाच हजार. विषय मोकळा करा.” साहेब त्याच्या हातातून ते पैसे घेत म्हणाले,”पुन्हा कोणी किती आणले ?” तसे अर्ध्यांनी खिशातून शे पाचशे शे पाचशे काढले. सर्वांचे मिळून तीन हजार झाले. बाकी मानाखाली घालून होते. हे पाहून विनोद म्हणाला, “ह्या पाच झनाचे माह्या पाच हजारामध्ये धरा. मग मी यांच्या कडून घेऊन घेईल.” ते खाली मान घालणारे जरासे सुखावले. “हो, हो साहेब, मग आम्ही देवून देईन.” खावू त्याचे काय देवू. या वृत्तीने मिश्कील हासत ते म्हणाले. पुढे साहेब म्हणाले,”ठीक आहे. मला खुश ठेवा मी रोज रात्रीची वीज तुमाला पुरवतो.” सर्वांच्या चेहऱ्यावर आंनद झळकला. सूर्य उगवतीच्या किरणासारखा. विनोदने साहेबांना रामराम घातला. त्याच्या मागून सर्वांनी नमस्कार केला. साहेब हासत बारीक आवाजात गिधाडी नजर; त्यांच्या पाटमोर्या आकृतीवर टाकत हळूच म्हणाला,”मूर्ख कुटले साले.” मगा ज्या शिपायाच्या डोयाला पाणी आले होते. तो जवळ दाराच्या बाजूला सेक्युरिटी गार्ड म्हणून सेवा देत होता. तो साहेबांचा चेहरा वाचत होता. त्याला कुटिलता त्यात दिसत होती. तो दात रगडत उभा होता. नाइलाजाने. त्याला त्या सर्वांची कीव कदाचित येत असेल. हे त्याच्या डोळ्यात दिसत होते.
रात्रदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असे वाटून, चेहऱ्यावर उसना आनंद आणून, विनोद सहित सर्व माघारी फिरले होते. विनोद म्हणला,”शेतकऱ्याचे मरण हेच सरकारचे धोरण. आता राहा तयारीत रातभरासाठी. वावरातच बांधल्या आहे आपल्या जाल्माच्या गाठी.”
 आशिष वरघने
 रा. सिरुड, पो. वेळा, ता. हिंगणघाट जि. वर्धा.
 मो. ९३५९६७९०९३, ९६३७८१३५०६

Share