साठीचे हितगुज : भाग - ६
युगात्मा शरद जोशी फार्मर्स प्रोड्युसर कं. लि.
करायचे बरेच काही असते पण आयुष्य छोटंसं असल्याने करायचे बरेच काही राहून जाते. अतृप्तीचे शेपूटही कधी न संपणारे असते पण जे करायचे आहे त्यापैकी नेमके काय काय करायचे आहे याचा प्राधान्यक्रम ठरवता आला तर मनाची चलबिचलता कमी होऊन कर्तव्यपूर्तीवर लक्ष केंद्रित करणे थोडेसे सोपे होऊन जाते. त्याच शृंखलेतील प्राधान्यक्रमाने हाती घ्यावयाचे एक कार्य म्हणजे युगात्मा स्मारक, स्वप्नपूर्ती आणि ग्लोबल ग्रंथालय. युगात्मा जोशींचे स्मारक म्हणजे त्यांच्या अपूर्ण स्वप्नांची पूर्तता करणारे आदर्श मॉडेल असेल. या उपक्रमाचे ३ विभागात वर्गीकरण असेल.
१) स्मृतींचे जतन - स्मृतींची जपणूक, स्मृती समारंभ, प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन, चिंतन-मनन सुविधा व विचारप्रसारासाठी युगात्मा स्मारक
२) साहित्य प्रसार - साहित्याच्या प्रसारासाठी युगात्मा ग्लोबल ग्रंथालय. ग्लोबल ग्रंथालयाची व्याप्ती मोठी असेल जेथे शेतीविषयातील सर्व साहित्याचा संग्रह असेल. सोबतच ऑनलाईन ग्लोबल डिजिटल ग्रंथालय ही कल्पना सुद्धा साकार करायची आहे. शेती विषयातील सर्व ग्रंथ, प्रबंध, शोधप्रबंध, पुस्तके, विशेषांक, कादंबरी, काव्यसंग्रह यासहित सर्व शेती साहित्य एकत्रितपणे वाचकांना व अभ्यासकांना उपलब्ध करून देणे हा यामागील प्रमुख उद्देश असणार आहे.
३) युगात्मा शरद जोशी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी - सीता शेती, माजघर शेती, व्यापार शेती, निर्यात शेती..... म्हणजेच युगात्मा शरद जोशींच्या स्वप्नातील भारत
पहिले वर्ष - पहिला टप्पा : पहिल्या टप्प्यात पहिल्यावर्षी युगात्मा शरद जोशी फार्मर्स प्रोड्युसर कंपनीवर लक्ष केंद्रित करायचे आहे. बदलत्या काळाच्या प्रवाहाचा वेध घेत १९९२ मध्ये द्रष्टे शेतकरी नेते शरद जोशी यांनी शेतकरी उत्पादक कंपनीची संकल्पना मांडून शेतकऱ्यांनी यापुढे सीता शेती, माजघर शेती, व्यापार शेती आणि निर्यात शेती अशी चतुरस्त्र शेती करावी, असे आवाहन केले होते. सोबतच काही प्रात्यक्षिके म्हणून त्या दिशेने पाऊलही टाकले होते पण त्यावेळेस शासकीय धोरणे शेती प्रक्रिया व्यवसायाला पूर्णतः प्रतिकूल असल्याने ही दार्शनिक प्रात्यक्षिके आदर्श मॉडेलमध्ये रूपांतरित होऊ शकली नव्हती. त्यासोबतच रस्त्यावरची लढाई निकराने लढण्यातच पुरेशी दमछाक झाल्याने संघटनेच्या पाईकांना आर्थिक लढाई लढायला उसंतच मिळाली नाही.
१९९२ मध्ये शरद जोशींच्या गुरुकिल्लीकडे कानाडोळा करणाऱ्या शासनाने कालांतराने मात्र हीच संकल्पना शरद जोशींचे नाव न घेता आडपडद्याने स्वीकारली. शेतमाल प्रक्रियेला प्रतिकूल असलेली पूर्वीची धोरणे हळूहळू अनुकूल व्हायला लागली. शेतकरी उत्पादक कंपन्यांना मदत करण्यासाठी स्वतंत्र विभागांची निर्मिती झाली आणि आता तर केंद्र व राज्यसरकारकडून शेतकरी उत्पादक कंपन्यांना भरघोस अनुदान देणाऱ्या विविध योजना अस्तित्वात आल्या आहेत. जागतिक बँकेच्या सहकार्याने अर्थपुरवठा केला जात आहे. शेतकऱ्यांनी एकजूट करून शेतमाल मूल्यसाखळी विकसित करण्याची, प्रक्रिया उद्योग उभारण्याची, शेतमाल प्रक्रिया उद्योगाचा पाया रचण्याची हीच योग्य वेळ आहे आणि म्हणूनच त्यादिशेने सामूहिकपणे प्रयत्न करायचे आहेत. युगात्मा शरद जोशी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी Companies Act, 2013 नुसार रजिस्टर झाली असून ३१ जानेवारी २०२२ रोजी नोंदणी, पॅन व टॅन प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
कंपनीची सभासद (शेअरहोल्डर) नोंदणी सुरु असून त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ मार्च २०२२ आहे. १८ वर्षावरील व्यक्ती सभासद होऊ शकतो.
- गंगाधर मुटे आर्वीकर
=-=-=-=
एकेवीस/तीन/बावीस
=-=-=-=
प्रतिक्रिया
अधिक माहितीसाठी
अधिक माहितीसाठी
http://yugatma.sharadjoshi.in/
येथे भेट द्या.
पाने