Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक
नियोजित संमेलनाचे प्रारूप, उपक्रम आणि गुरुकुंजाला कसे पोचावे याबद्दल इत्यंभूत माहिती देणारा व्हीडिओ.
शेतकरी साहित्य संमेलनाचे LIVE प्रसारण "शेतकऱ्यांची चावडी" या You Tube चॅनेलवर होणार आहे.
त्यासाठी आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



शेती आणि कोरोना

लेखनविभाग: 
वैचारिक लेख

विश्वस्तरीय लेखनस्पर्धेसाठी (वैचारिक लेख)

शेती आणि कोरोना

मार्च महिन्यात शेतीचा हंगाम जवळजवळ आटोपलेला असतो. उन्हाळवाही करण्याचे दिवस असतात. आजकाल ट्रॅक्टर आणि तत्सम मशीनरीज खूप आल्या आहेत. त्यामुळे पुर्वीसारखी दोन दोन महिने नांगरण चालत नाही. फक्त पैशाची सोय पाहिजे. एकदा का ट्रॅक्टर वावरात आला, की दोन तीन दिवसात वावर नांगरून मोकळं करून देतो. त्यामुळे आजकाल शेतकरी लोक बिलकुल घाई करत नाहीत. करू आरामात, करू आरामात असे म्हणत मार्च सोडाच पण एप्रिल महिना सुद्धा असाच उलटून जातो. मग हे दोन महिने कास्तकारांना बऱ्यापैकी फुरसत मिळते. त्या फुरसतीचा सदुपयोग करत ते सोयरीका जोडतात. लग्नाला जातात. सोयऱ्याधायऱ्यांना भेटायला जातात. किंवा देवदर्शनासाठी, तिर्थाला जातात. आणि हंगामात जे काही थोडेबहुत गाठीशी जमलेले असते, त्यातल्या पाच दहा हजाराचा चुराडा करून टाकतात.परंतु सन २०२० हे वर्ष मात्र या परिस्थितीला काहीसे अपवाद ठरले आहे.
जगात कोरोनाची हूल उठली आणि पाहता पाहता त्याने भारतात आपले पाय पसरायला सुरवात केली. बावीस मार्चला संपूर्ण भारतात जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला. आणि त्यानंतर लगेच लाकडाऊन. बाजारपेठा बंद झाल्या. वाहतूक बंद झाली. प्रवास करण्यावर निर्बंध लादण्यात आले. एस टी बंद, लक्झरी बंद, रेल्वे बंद,ऑटो बंद, सारेच बंद. माणूस घरात कोंडला गेला. शहरात या लाकडाऊनचे परिणाम लगेच जाणवायला लागले.
त्यांचे शॉपिंग बंद पडले, हॉटेलिंग बंद पडल ,सहली बंद झाल्या, वगैरे वगैरे. मात्र ग्रामीण भागात या सर्व गोष्टींंचे लोण अजून तरी पसरलेले नाही. त्यामुळे लगेच तसा काही वेगळा परिणाम ग्रामीण जीवनावर पडला नाही. एक मात्र झाले, साधारणपणे मार्च, एप्रिल या महिन्यात रिकामा असणारा शेतकरी वर्ग गावातच कोंडला गेला. परिणामतः त्याचा जास्तीत जास्त वेळ वावरात जायला लागला. कारण शेतीवर जाण्यासाठी कोणतीच मनाई नव्हती. तिथे कोणताही लाकडाऊन नव्हता. याकाळात सगळीकडे बहुतेक उलंगवाड्याच असतात. म्हणून शेतीत सुद्धा चोटीने करावे असे काही काम नसते.म्हणून राहिलेली, सुटलेली बरीच कामे शेतकऱ्यांच्या नजरेत यायला लागली. आणि अप्रत्यक्षपणे का होईना पण तिकडे त्यांचे लक्ष केंद्रित झाले. धुरे, बंधारे निटनेटके करून घेणे, अनावश्यक वाढलेली झुडपे, पालव्या खोदून काढणे, कूप काटी ठीक करणे इत्यादी कामे, ज्यांच्याकडे निष्काळजीपणामुळे म्हणा, हलगर्जीपणामुळे म्हणा किंवा बदलत्या सामाजिक परिस्थितीमुळे म्हणा दुर्लक्ष झाले होते, ती कामे करण्यासाठी त्यांना भरपूर वेळ मिळाला. इंग्रजीत ज्याला Loose Fault म्हणतात ते दूर करण्याची एक संधी शेतकऱ्यांना प्राप्त झाली. आणि अशाप्रकारे वावराला एक मशागत पूर्व मशागत घडली आणि वावराचे रूप पालटले.
कोरोना काळाच्या सुरवातीला बाजारपेठा बंद होत्या. शेतकऱ्यांना आपला माल विकणे कठीण झाले होते. बऱ्याच लोकांचा कापूस घरातच भरून ठेवलेला होता. सोयाबीन,चणा,गहू,इत्यादी माल घरातच पडून होता. त्यामुळे नगदी पैशांची आवकच थांबली. पण या परिस्थितीशी कसे जुळवून घ्यायचे हे आमच्या कास्तकारांना सांगायची गरज नाही. बारा महिने तेरा काळ कंगाल असणारा कास्तकार याही परिस्थितीला सहज सामोरा गेला. उलट खिशात पैसा नसल्यामुळे अनावश्यक खर्च करताच आला नाही. मजुरांना द्यायला पैसे नाहीत म्हणून बरीचशी कामे स्वतःच केली. आपोआप काटकसर घडली. त्या कामानिमित्त जास्तीत जास्त वेळ वावरात घालवला. म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात! त्याचा इष्ट परिणाम झाला. घरात मिळणारी भाकर, चटणी, भाजी, निसर्गाचा सहवास आणि मेहनतीची कामे ! याकाळात कास्तकारांना तब्येतीच्या कुरबुरी जाणवल्या नाहीत, त्यांच्या ऑक्सिजनची पातळी कधी खाली आली नाही. ही वस्तुस्थिती आहे.
आजकाल खेड्यापाड्यात सुद्धा भाजीपाल्याचा तुटवडा जाणवतो. कारण भूजलपातळी खूप खोल गेलेली आहे. त्यामुळे लहान बागायतदार, जे भाजीपाल्याचे प्रमुख उत्पादक होते, ते जवळजवळ संपुष्टात आले आहेत. कारण तिनशे चारशे फूट खोल बोअर मारून त्यातून सबमर्शिबल पंपाने पाणी काढून आपल्या दोन एकर वाडीत भाजीपाला पिकवणे त्यांच्या आवाक्याबाहेर आहे. आठवडी बाजारात येणारा भाजीपाला अनेकदा शहरातील मोठ्या बाजारपेठेतून व्यापारी लोक विकायला आणतात. या कोरोना काळात वाहतूक आणि बाजार बंद असल्यामुळे भाजीपाल्याचा तुटवडा जाणवायला लागला. परिणाम असा झाला, की लोक पुन्हा आपल्या जुन्या पद्धती कडे वळले. घरात असलेल्या वड्या, खारोड्या, मूंग, मटकी, उसऱ्या ( वाळवलेले वांगे, कोबी वगैरे) यांचा वापर व्हायला लागला. ही एक अत्यंत चांगली पद्धत जुन्या काळात होती. ती पुन्हा या कोरोनाच्या निमित्ताने उजेडात आली. नव्या पिढीला तिचे महत्त्व कळले.
सरकारच्या कृपेने अन्न-धान्याची कमतरता मात्र जाणवली नाही. कोरोनाच्या विशेष पॅकेज अंतर्गत महिन्यातून दोनदा रेशनचे धान्य मिळायचे. एकदा फुकट आणि एकदा दोन किंवा तीन रूपये दराने. गहू, तांदूळ, चणाडाळ वगैरे. शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहार अंतर्गत तर मुग डाळ सुद्धा मिळाली . त्यामुळे आम्ही खाऊन पिऊन बरे आहोत, असाच ग्रामीण सूर या काळात ऐकायला मिळाला.
या कोरोना काळात काही शब्द प्रकर्षाने पुढे आले, विलगीकरण किंवा कोरंटाईन,-लॉकडाऊन किंवा टाळेबंदी, सोशल डिस्टन्स किंवा दो गज की दुरी, इम्यूनिटी पावर किंवा रोगप्रतिकारक शक्ती. या सर्व बाबी शेतकऱ्यांना सहज साध्य करता आल्या. शेतीत जी कामे केली जातात ती करतांना एकमेकांना खेटण्याची तशी गरज नसते. साधारणपणे दो गज की दुरी आपोआपच निर्माण झालेली असते. निसर्गाच्या सानिध्यात भरपूर ऑक्सिजन आणि मेहनत आणि साधे जेवण हे सर्व त्यांची इम्यूनिटी वाढवण्यासाठी पुरक ठरलेले घटक आहेत. आणि इतर शहरी आजारांपासून आमचा कास्तकार तसाही दूरच आहे. एकतर त्याला ते आजार होतच नाहीत, किंवा झालेच तर महागडे इलाज करून स्वतःचा नाशवंत देह जिवंत ठेवण्याची त्याची ऐपत नसते.
आणि विलगीकरणाचे म्हणाल, तर आजच्या सोकॉल्ड सोफिस्टिकेटेड व्यवस्थेने कास्तकारांना तसेही विलग करून ठेवलेले आहेच! माणसाच्या डोईला दुपट्टा आणि बाईच्या डोईवर पदर नेहमीच असतो. त्याचाच उपयोग मास्क म्हणून व्हायला लागला आहे. डोईचे सोडून तोंडावर बाधण्याला कितीसा वेळ लागणार?
शरीरस्वास्थ्य निकोप हवे असेल तर मनाची स्वस्थता निकोप असणे आवश्यक असते. कुटुंबातील लोकांचे एकमेकांशी असलेले प्रेमाचे आणि आपुलकीचे संबंध मनुष्याच्या मनाचे पोषण करते. या कोरोना काळात कुटुंबातील सर्व लोकांना जास्तीत जास्त काळ एकत्र राहता आले. अगदी बाहेर गावी म्हणजे पुणे, मुंबई, सुरत ,बंगलोर इत्यादी ठिकाणी काम करणारे नोकरदार पोरं लेकराबाळासह आपल्या मूळ गावात परत आले. कुटुंबातील सर्वांना एकत्र येण्याची अभूतपूर्व संधी या निमित्ताने मिळाली. ही शिकलीसवरली मुलं जेव्हा घरी परतली तेव्हा साहजिकच आपली शेतीवाडी आणि घरदार या विषयी विचार करायला त्यांना वेळ मिळाला. प्रत्यक्ष परिस्थिती त्यांच्या डोळ्यासमोर आली आणि भविष्यात येऊ घातलेल्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी काही नवीन योजना आखण्यात त्यांनी पुढाकार घेतला.आपल्या शेतीत थोडेबहुत पैसे गुंतवण्याची आवश्यकता आहे, याची जाणीव त्यांना झाली. त्यामुळे कोणी आपल्या शेतात बोअर मारून घेतले, कोणी विहीर दुरूस्त करून घेतली, कोणी पक्के तारांचे कुंपण केले तर कोणी जुन्या घराचे नुतनीकरण करण्यासाठी मदत केली. शिवाय अगदीच बेरोजगार म्हणून शहर सोडून परत आलेल्या मजुरांना शेतीत रोजगार मिळाला. कारण जग जरी लाकडाऊन असले, तरी शेतीतील सर्व कामे सुरूच आहेत. इथे वर्क फ्राम होम हा प्रकार नाही. घरी बसून नांगर चालवता येत नाही. घरी बसून निंदण खुरपण करता येत नाही. किंवा घरी बसून पिकांची राखणही करता येत नाही. त्यामुळे शेतीत रोजगार उपलब्ध होताच आणि तो नेहमीच राहणार आहे.
असे असले तरी अनेक बाबतीत शेतकऱ्यांना सुद्धा या कोरोना काळाची झळ सोसावी लागली आहे. बाजारपेठा आणि वाहतूक बंद असल्यामुळे भाजीपाला,दूध यासारखे नाशवंत पदार्थ बाजारापर्यंत पोहचले नाहीत. त्यामुळे जिथे ते पिकतात तिथे त्यांची मुबलकता वाढली ,आणि जिथे त्यांची गरज आहे तिथे कमतरता भासली. परिणामतः कुठे बाजारभाव पडले तर कुठे प्रचंड महागाई वाढली. थोडक्यात बाजारात कमालीचा असमतोल निर्माण झाला.
याशिवाय बऱ्याच शेतकऱ्यांनी आज उद्या योग्य भाव मिळेल म्हणून आपला कापूस घरातच भरून ठेवलेला होता. अचानक कोरोना आला आणि मग तो कापूस विकायला नेणे शक्य झाले नाही. शेतकरी वर्ग आपला माल अधिक काळ पर्यंत रोखून ठेऊ शकत नाही. पण या कोरोना काळात त्याचा नाइलाज झाला. काही ठिकाणी मातीच्या घराला ओल आल्यामुळे कापूस जाग्यावरच खराब झाला. पुढे पेरण्या पाण्याच्या दिवसांत त्याला पैशाची गरज भासते, तेव्हा मोठ्या मुश्किलीने राखून ठेवलेला माल बाजारात न्यावाच लागतो. भले त्यावेळी मग भाव पडलेले का असेना! या वर्षी मात्र मोठीच कठीण परिस्थिती निर्माण झाली. बाजारच बंद. सरकारने कापूस खरेदी सुरू केली, पण त्यांची पद्धत म्हणजे गोगलगायीची चाल! सर्वांना कापूस विकण्याची एकच घाई झाली. त्याचा फायदा व्यापाऱ्यांनी उचलला. कापसाचे भाव एकदम पडले. नाईलाजाने कास्तकारांना आपला कापूस चार किंवा जास्तीत जास्त साडेचार हजार रूपये क्विंटलने व्यापाऱ्यांना विकावा लागला. खराब झालेल्या कापसाला तर दोन हजारापेक्षाही कमी भाव मिळाला.
लाकडाऊन शिथिल झाल्यानंतर जेव्हा बाजार उघडले, तेव्हा वस्तूंच्या किमती अव्वाच्या सव्वा दराने वाढलेल्या होत्या. खते आणि औषधे तर जवळजवळ दुपटीने महाग झाले होते. यामुळे साहजिकच शेतकऱ्यांच्या डोक्यावर नेहमी असणारा कर्जाचा बोजा यंदा जास्त वाढला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच यावर्षी बोगस बियाण्याचा फटका जवळपास सर्वांनाच बसला. पेरलेले उगवलेच नाही. खरे काय, खोटे काय पण बियाणे कंपन्यांनी याचा ठपका थेट कोरोनावरच ठेवला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कोरोनाच्या लाकडाऊनमुळे सर्व कंपन्या बंद पडल्या, कामगार वर्ग आपापल्या गावी निघून गेला. त्यामुळे मजुरांची कमतरता भासायला लागली आणि बियाण्यांवर हवी तशी प्रक्रिया होऊ शकली नाही. म्हणून यावर्षी हे असे प्रक्रिया न झालेलेच बियाणे ऐन वेळी बाजारात आणावे लागले. अशा बियाण्याची उगवण क्षमता साहजिकच कमी होते. काही का असेना, पण याची झळ थेट शेतकऱ्यांना सोसावी लागली, हे मात्र खरे. या वर्षी भरपूर पाऊस पडला. ही एक जमेची बाजू असली, तरी काही पाणबसनचे वावरं उत्पादन देऊ शकणार नाहीत. अर्थात, कोरोनाचा या बाबीशी तसा संबध नाही. पण या नुकसानीचे एकत्रित परिणाम सहन करतांना तेही विचारात घेतले जाईलच.
तुलनात्मक दृष्टीने विचार केला, तर कोरोनाचे थेट शेतीवर झालेले नकारात्मक परिणाम तसे कमीच आहेत. बाजारात मात्र कोरोनाने फार भयावह परिस्थिती निर्माण केली आहे.आज हा लेख लिहित असतांना शेतकऱ्यांची पिके शेतात उभी आहेत. आता काही दिवसांत सोयाबीन निघेल. मग कापूस निघेल मग तूर येईल. तेव्हा बाजाराची नेमकी काय अवस्था राहील, ते कळेलच. त्यावेळी मात्र कोरोनाचे कारण सांगून मागील वर्षीसारखेच व्यापाऱ्यांनी भाव पाडले, तर मात्र शेतीवर झालेला कोरोनाचा हा एक भीषण परिणाम असेल.

प्रदीप बाबुराव देशमुख
चंद्रपूर
भ्र. ध्व. ९४२१८१४६२७

Share

प्रतिक्रिया