तंत्रज्ञान स्वातंत्र्याचा आधारवड कोसळला
युगात्मा शरद जोशींच्या पश्चात शेती तंत्रज्ञानाचा हिरीरीने पुरस्कार करून सातत्याने शेती तंत्रज्ञानाची बाजू घेऊन किल्ला लढवणाऱ्या शेतकरी संघटनेचे बिनीचे कार्यकर्ते आणि सक्रिय विचारवंत नेते श्री अजित नरदे यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने शेती तंत्रज्ञान स्वातंत्र्य आंदोलनाचा आधारवड कोसळला आहे आणि शेतकरी संघटनेच्या तंत्रज्ञान आघाडीची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे.स्व. श्री अजित नरदे यांना गुरुवार दि. ३०/०१/२०२० रोजी पायदळ चालत असताना दुचाकी धडकल्याने त्यांच्या जबडा व डोळ्यावर गंभीर दुखापत झाली होती. त्यांना मिरज-सांगली दरम्यान दवाखान्यात भर्ती करण्यात आल्यानंतर प्रकृती धोक्याबाहेर असल्याचा प्राथमिक अंदाज होता. वैद्यकीय उपचाराला त्यांची प्रकृती बऱ्यापैकी सकारात्मक प्रतिसाद देत होती आणि अशातच त्यांच्यावर काळाने झडप घातली.
स्व. श्री अजित नरदे हे संघटनेच्या अगदी सुरुवातीपासूनच्या काळापासून सक्रिय व समर्पित कार्यकर्ते होते. लाखोंच्या संख्येने पाईक लाभलेल्या शेतकरी संघटनेत लिखित स्वरूपात आणि मुद्रित माध्यमात शेतकरी संघटनेचा विचार पेरण्याचे कसब असणारी मंडळीचे प्रमाण मात्र अत्यंत अल्प होते आणि आजही आहे. जी काही एका हाताच्या बोटावर मोजता येईल इतकी मंडळी आहेत त्यात नरदे अग्रणी होते.
"पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न" असे ब्रीद घेऊन मी जेव्हा अ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा विचार सात वर्षांपूर्वी अनेकांना बोलून दाखवला तेव्हा त्याला अनुमोदन देत सक्रिय सहकार्य देऊ करून माझा हुरूप वाढवण्यात जी काही मोजकी मंडळी होती त्यातही श्री नरदे यांचा क्रम अग्रक्रमाचाच होता. त्यांनी अनेक संमेलनात हजेरी लावली आणि आपला सक्रिय सहभाग नोंदवला होता.
अत्यंत प्रतिभाशाली प्रगल्भ विचारवंत असलेल्या श्री नरदे यांच्या निधनाने शेतकरी संघटना, तंत्रज्ञान आघाडी आणि अ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ पोरकी झाली आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली.
- गंगाधर मुटे
प्रदेशाध्यक्ष, माहिती व तंत्रज्ञान आघाडी, शेतकरी संघटना, महाराष्ट्र
महासचिव, स्वतंत्र भारत पक्ष, महाराष्ट्र प्रदेश
संस्थापक अध्यक्ष, अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ