नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
अन् तिनं धडकल्या चुलीवर तवा टाकला...
(टीप: ही कथा स्थानिक बोलीतील आहे.)
“आये, पेनाची नळी सरली. उद्या दावायचंय लिवल्यालं.”
उन्हाळा.
भर दुपार.
आईतवार.
तापलेलं शिवार.
दारापुढं आळे करून लावल्या कार्ल्याच्या येलानला चार बदल्या पानी घातलं आन् येलांचे लोंबते शेंडे मांडवावर नीट सवारून मंदा दारापुढल्या आंब्याच्या झाडाच्या सावलीला बाडदन पसरून त्यावर आडवी झाली तोच नंदाचं कुरकनं चालू झालं.
“आता ऊन लई वाढलंय. तिसरापहारा जाय संजुकडं. आसंल तेच्याकडं. उसनी घे. उद्या देऊ आनून त्याला.” मंदा
“तवर किती लिव्हून व्हईल माजं. आताच जाते मंग.”
“डोक्यावर घे कायतरी अन जाय. ऊन लागतंय चटाचटा.”
“हा, तिकडंच जाऊन लीव्ह्ते.” असं म्हणत नंदानं डोक्यावर वह्यापुस्तकांची पिशी धरली आन धावत सुटली. वाटत पमीच्या घराजवळून जाताजाता पमीला हाक मारली, “पमे, याचं का संजूच्या घरी?”
“तूच जाय, तिला कामये घरात. तुह्यासारकी रिकमटवळी न्हये ती.” पमीच्या बयेचं उद्धट बोलणं ऐकलं आन उगंच हाक मारल्याची सल तिच्या जिव्हारी लागली. पमीच्या बयेइषयीचा राग उन्हात उधळून देत तिनं पळतच संजूचं घर गाठलं. ती पोचली तव्हा सगळे दारापुढल्या निंबाच्या झाडाच्या सावलीत इसावले व्हते अन ती दमुदम झाली व्हती. महादू तात्या खाटंवर आडवा पडला व्हता. महादू तात्याचा पोरगा शंकर झाडाच्या बुडालगत सोडल्या बैलगाडीवर आईसपैस झोपला व्हता. शंकरची बायकू बाडदनावर जुन्या साड्या अन लुगडे पसरवून गोधडीला आस्तर लावत व्हती अन त्याच गोधडीजवळ बसून संजू चित्रकलाच्या वहीत चित्र काढत व्हता, बसलेल्या बैलाचं... बैलाकडं बगत...
संजू आठवीला. नंदा सहावीला. त्यामुळं तो मोठा हुशार आहे असं नंदाला वाटायचं अन तोबी सवताला लईच शाना समजायचा.
आल्याआल्या नंदा महादू तात्याच्या शेजारी खाटंवर बसली. तिला पाहताच महादू तात्या बसता झाला. नंदाच्या डोक्यावरून अन पाठीवरून हात फिरवत इचारलं, “काहाला आली एव्हढी पळत? ऊन केव्हढंय?”
“माझी नळी सरली आन आता लिव्हलं नाय तर उद्या मार खावा लागल शाळात.” नंदानं कारण सांगताच महादू तात्याच्या डोक्यात कायतरी हालचाल झाली. त्यानं तिला पोटाशी धरलं आन डोळ्यातून टचकन पानी टपकलं. क्षणभरच. दिसलं कोनलाच नयी, पर नंदाला दिसलं. दिसून उपेग नव्हता कारण समजून घेण्याईतकी ती तरी कुठं मोठी व्हती?
“संज्या ईला काय पायजे ते दे त.” महादू तात्या उपरन्यात आसू लपवत बोलला.
“तिचं कायमचंचे.” संजूनं कुरकुर केली.
“दे ना पण प्लीज. नायतर उद्या मार बसल माला.” नंदाच्या प्लीजपुढं संजू नरमला.
“दे रे ती काय मांग्तीय ते.” महादू तात्याचं वाक्य पुरं व्हायच्या आतच कंपास पेटीतून काढलेला बॉलपेन संजूनं नंदाकड फेकला.
“घे. आन लई नासवू नोको. नयतर बस चीरखड्या मारीत.”
“मी काय बावळट वाटले का रे तुला?” नंदा.
“नको लई शहाणी व्हऊ. लेहून घे.” संजू
दोघांमधल्या या भांडणानं महादू तात्या सुखावला. संजू त्याचा एकुलता एक नातू. शंकरचा एकुलता मुलगा. नंदा दिसायला काळीसावळी आसली तरी नाकीडोळी तरतरीत. आन कष्टाळू किती! महादू तात्यानं मनातच त्या दोघांचा सौसार मांडायला सुरवात केली खरी, पर ते सारं अश्यक्य असल्याची बोच काळजावर टोच मारून गेली. काही झालं तरी महादू तात्या नंदात गुतत चालला व्हता, हेच खरं! नंदाला पाहताच त्याला तेची नात आठवायची... मुलीची मुलगी... तात्यानंच संभाळली व्हती... लहान्पनापसून मागल्या सालापोतर… अंगाखांद्यावर खेळणारी ती... पानी काढताना तोल जाऊन हिरीत पडली... गेली... नंदाच्याच वयाची... दोघी एकाच वर्गात... नंदाला पाहताच तात्याच्या मनात पडल्याला खड्डा भरू लागायचा... कदाचित जास्ती मोठा जाणवाया लागायचा... कदाचित आणखी मोठा नको व्हाया म्हणनू धास्तीबी वाटायची... म्हणून तिला ‘कुठं ठिवू न् कुठं नको’ असं व्हऊन जायचं तात्याला.
गत्काळाला चालू काळात जरा येळ इर्जळून टाकीत तात्या भईश्याचं ऊन उतरायची वाट पाहत पुन्हा आडवा झाला. नंदा तात्याशेजारी खाटंवर बसून संजूने दिल्याली नळी आपल्या वहीच्या रिकाम्या पानांवर रिकामी करत राह्यली. मंग कोनीच कोनाशी काहीच बोललं न्हई. बराच येळ. एव्हाना संजूबी आपली चित्राची वही पिशीत कोंबत तुंबल्या लेखनाच्या वह्यांवरून नदर फिरवू लागला.
दिवस कलला. शंकर बैलगाडीवर बसता झाला. “संज्या पाणी आन रे.”
संजूनं तांब्याभरून पानी दिलं. शंकरनं तोंडावर वल्ला हात फिरवला अन तांब्या तोंडात रिकामा केला.
“ये माला पन दे ना पानी.” नंदा
“उठून घे, नवकर नयी ये तुजा.” संजू.
महादू तात्या उठून बसला. झोपला नव्हताच तो. पडून व्हता फक्त.
नंदा पाणी प्यायला पडवीतल्या राजनाकडं गेली. अन महादू तात्या शंकरपुढं मोकळा व्हऊ लागला.
“एक मातर डोळ्याला काय चांगलं नयी दिसत शंकर.” महादू तात्या.
“काय झालं तात्या?” शंकर.
“आरं ती भाम्राची मंदा बैलासार्क औत वढते रे.”
“आपल्याला काय करायचं. ना जातीची ना पातीची. तिच्या देराला नाय का कळत?” शंकरची बायको
“भावबंदकी लय वाईट पुरी... समद्यांनी तिला वाऱ्यावं सोडलं. पर माह्या डोळ्याला काय बरं नयी दिसत.” महादू तात्या
“तिची जाव तर म्हणत व्हती...” शंकरची बायको
“काय? ... त्यांच्या तोंडाचं काय घेऊन बसली. शेळीच्या शेपटासारके मानसं ते. माशा बी हाकलणार नयी अन लाज बी झाक्णार नयी. नवरा गमावल्यावर तिला आधार द्याचा सोडून हकलायच्या मांगं लागलेत ते तिला.” महादू तात्या.
“पण मंग... खरंच दुसरा नवरा केला आन गेली जुमीन इकून मंग?” शंकर
“तुझं काय घेऊन जाईल?” महादू तात्या.
“उद्या लोकं म्हण्तील यांनीच फूस लावली न काय.” शंकरची बायको.
“ते काय बी असुंदे, पर तिला आसं वाऱ्यावं सोडून न्हाय चालायचं. उद्या जाय अन तिच्या वावरात चार वळणं घालून दे. आड्ल्याला मदत करन धरम हाय आपला. नसशील तू जानार तर मी सवता जाईल.” महादू तात्या.
“जातो. पाहू उद्याचं उद्या.” असं म्हणत शंकर नाखुशीनं उठला आन बैलांचे खुटे बदलायला वावरात निन्घून गेला. शंकरच्या बायकुनं अर्धवट राह्यल्या गोधडीवर लाकूड आडवं ठीवलं अन गुंडाळी करून घरात घेऊन गेली. तात्या पाण्याची बादली घेऊन वासराच्या खूट्याकडं गेला आन नंदानं संजूला प्रस्न केला,
“म्हंजी काय रे, आपली जात येगळी येगळी हाये का?”
“आसल. तुला काय करायचंय?” आधीच तुंबलेलं लेखन पुरं करायचं जीवावर आल्या संजून वही मिटत साहित्य कंपासपेटीत भरलं. “पेन दे माझा.”
“ऱ्हाऊ दे ना प्लीज, आजच्या दिवस. उद्या शाळात गेल्याबरुबर देऊन टाकील. थोडंच राह्यलंय आता.”
“निन्घ मंग. जाय घेऊन. पण शाळात येशील का नक्की? नयतर काये? तुजा काय भरुसा नही.” संजूचं म्हन्न आईकलं नाआईकलं करत नंदा पळत सुटली.
नंदा घरी पोचली तव्हा आई बकऱ्या सडकायला बेन्दीत गेली व्हती. बेंदी एका वावराचं नाव. चार वाटन्या वलांडल्या का पुढं सारं पडीत रान. कोनी बी त्यात ढोरं सडकायचं पर गेल्या सालापुन रखमईच्या इठूबनं त्यावर कब्जा केला व्हता. बापजाद्यापुनच्या कब्जाचे कागदं गोळा करत करत धा-बारा सालं कोर्ट-कचेरीत खिट्यां घालून त्यानं हक्क जमवला व्हता.
“आक्के, तुह्या दोन शेळ्या. माह्या बेन्दीला काय जड नयी व्हायच्या.” इठूबाच्या मनात मंदाईशयी कळवळा व्हताच. साऱ्याइनच्या ढोरानला इठूबानं बंदी घातली तरी मंदा आपली हक्कानं आपल्या शेळ्या बेन्दीत नेऊन सडकायची. अन शेजारपाजारचे मळेकरी उगाचंच मंदावर जाळायचे. ‘आपल्याला न्हई तर कोन्लाच नसावं’ अशी गत. दुसरं काय?
नंदानं दप्तराची पिशी आत ठिवून दार लोटलं अन आईच्या मागुमाग पळतच बेन्दीत गेली. नंदा पोचली तव्हा मंदा शेळ्यांची सडक नीट लावत खुटे ठोकून परत फिरली व्हती.
“काहाला आली? मी येतंच व्हते ना?” मंदाचं वाक्य पुरं व्हायच्या आत फुगवट्याचं पानी फुटून वाहू लागावं तसं नंदाचं बडकं सुंरू झालं. महादू तात्याच्या घरी काय काय घडलं, ते सारं ऐकून घेत नंदाच्या बडबडीसोबत दोघीबी घराकड जानाऱ्या पायवाटन चालत राह्यल्या.
“लेहायला गेल्ती का तेहीनचं बोल्नं ऐकायला?” मंदानं दटावलं तरी नंदाचं तोंड काय उगी ऱ्हाईना.
सारं काही सांगून झाल्यावं नंदाला मंग मोकळं चोकळं वाटू लागलं. तरी बी मनातला एक खटका काही जाईना.
“आये आपली आन संजूची जात येगळी येगळी हाये का? कोंची वं?” नंदाच्या या प्रश्नावर मंदा गप झाली.
जरा येळानं बोलली. मनातच “मराटी.”
नंदाची बडबड चालू राह्यली... मंदा वरून गप झाली तरी आत आत खोल जात राह्यली... गुत्ता वाढतच गेला. मुकेपण सोबत घेऊनच सरपणाच्या ढिगाकड गेली. वरून चार लाकडं वढून काढले. तव्हर नंदान घराचं दार उघडलं. आत गेली. चुलीजवळ बसली. आतली राख वढली. मंदान आन्लेले लाकडं चुलीजवळ ठिवले. चार बारके लाकडं आत सरकवत चूल पेटवली अन धडकल्या चूलीवर तवा टाकला. सवयीनं...
एव्हाना नंदानं ईश्यय सोडून दिला आसला तरी मंदाच्या मुकेपनासोबत लाकडांची राख मात्र चुलीत साठत राह्यली वास्तवाचा इस्तव झाकत... आन् मंदा मातर कोंडलेला स्वास फुकनीतून फुकत चूल पेटती ठीवत राह्यली... पुरीला समज येन्याची वाट पाहत...
(टीप : ही कथा स्थानिक बोलीत आहे.)
रावसाहेब जाधव (चांदवड)
९४२२३२१५९६
rkjadhav96@gmail.com
७०, महालक्ष्मी नगर, चांदवड
जि. नाशिक ४२३१०१
प्रतिक्रिया
सुंदर
अतिशय सुंदर कथानक, छानच!
Dr. Ravipal Bharshankar
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने