Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




गंधवार्ता..... एका प्रेताची!

लेखनप्रकार: 
गद्यलेखन स्पर्धा-२०१७
लेखनविभाग: 
कथा

गंधवार्ता..... एका प्रेताची!

 
"दाsssदा, भाऊ गेलाsssss रेsssssss"
            असा आर्त टाहो कानावर आदळताच आपल्या कामात मग्न असलेला भरत खाडकन भानावर आला. नजर उचलून पाहताच त्याला समोर जे दृश्य दिसलं ते पाहून तो हादरून गेला. काहीतरी भयानक विपरीत घडलंय याची जिवंत वार्ता घेऊन ती बातमीच त्याच्याकडे धावत येत होती.
            भरत गव्हाणकर म्हणजे एक उच्चविद्याविभूषित आणि तेवढंच सुसंस्कारित व्यक्तिमत्त्व. बुद्धिमत्तेच्या बळावर गावामध्ये काहीतरी वेगळं करून दाखवायचंच, असा मनाचा पक्का हिय्या करून शहर सोडून गावात राहायला आलेला. चांगली महिन्याकाठी भरपूर वेतन आणि भत्ते देणारी शासकीय नोकरी सोडून दिली आणि शेतीमध्ये नवनवे प्रयोग करण्यास सुरुवात केली. त्याला इतिहास बदलायचा होता पण इतिहास बदलला नाही उलट इतिहासाचीच पुनरावृत्ती झाली, इतिहासानेच त्याचे जीवन बदलून टाकले. गावात आजवर जे इतरांच्या बाबतीत घडत होतं तेच भरत गव्हाणकरच्या बाबतीत घडलं. शेतीतून काही वरकड मिळकत मिळविण्याऐवजी, बापा-आज्याने पोटास गांजवून जे काही नगदी चार पैसे, सोनं-नाणं लेकासाठी जमवून ठेवलं होतं, तेही शेतीत गमावून बसला होता. सर्व बॅंकाचा थकबाकीदार झाला होता. खाजगी सावकारांनी त्याच्यासाठी दरवाजे केव्हाच बंद केले होते. थोडक्यात सांगायचं तर "हातावर आणणे आणि पानावर खाणे" येथपर्यंत त्याची प्रापंचिक हालत हलाखीची झाली होती. पण नियतीचे वार सोसूनही न डगमगता त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करणारा भरत तेवढ्याच ताकदीनिशी येणार्‍या भविष्याशी समर्थपणे लढत होता. आर्थिक स्थितीने खचला असला तरी त्याच्या मनमिळाऊ स्वभावाने आणि लोकांच्या सुखदु:खात समरस व्हायच्या त्याच्या गुणवैभवामुळे मात्र गावांत त्याला खूप मानमरातब मिळायला लागला होता व गावकरी त्याच्याकडे आदरभावाने पाहायला लागले होते.
            शेतीची संपूर्ण कामे करून झाली की उरलेल्या फावल्या वेळात रेडिओ,टीव्ही दुरुस्ती करून चार पैसे मिळवायचे असा त्याने नवा जोडधंदा सुरू केला होता. त्यामुळे दोन सांजेशी गुजराण व्हायला थोडा हातभार लागला होता.
           त्यादिवशीही तो असाच एक टीव्ही दुरुस्ती करीत बसला होता. संपूर्ण टेबलभर व्हॉल्व, कंडेन्सर, कॅपॅसिटर, मल्टीमिटर अस्ताव्यस्त पडलेले होते. बाजूलाच लालभडक झालेला तप्तगरम कैय्या(सोल्डरिंग मशीन) व २४० व्होल्टचा विद्युत प्रवाह इकडेतिकडे पळवत नेणारे अर्धवट अवस्थेत खुले असणारे वायर्स सभोवताल पसरले होते. भरत शांतचित्ताने टीव्ही दुरुस्त करण्यात मग्न झाला होता. आणि तेवढ्यातच त्याच्या कानावर एक आर्त टाहो येऊन आदळला.
 
"दाsssदा, भाऊ गेलाsssss रेsssssss"
            पिसाटल्यागत सुसाट वेगाने, जिवाच्या आकांताने टाहो फ़ोडत शेवंता धावत आली आणि त्याला काही कळायच्या आतच त्याच्या गळ्याला बिलगली.
           क्षणभर भरत हादरलाच. काहीतरी अघटित घडल्याच्या शंकेच्या कारणापेक्षाही सभोवताल विखुरलेल्या जिवंत विजप्रवाहाच्या खुल्या तारा हे हादरण्यामागचे प्रमुख कारण होते. शिवाय टीव्हीमध्ये पिक्चर ट्यूब प्रकाशमान व्हावी म्हणून "पॉवर सेक्शन" भागात प्रचंड दाबाची विद्युतशक्ती तयार होत असते. नेमका तेथे जर मानवीस्पर्श झाला तर थेट मृत्यूच किंवा शरीराचा किमान एखादा अवयव/भाग कायम निकामी होण्याची हमखास खात्रीच.
            शेवंता गळ्याला बिलगल्याने तिच्यासोबत त्याचाही तोल डळमळलाच होता. त्यामुळे शरीराचा कोणताही भाग कधी विद्युत प्रवाहाच्या संपर्कात येईल सांगता येत नव्हते. पण असे म्हणतात की आणीबाणीच्या क्षणी माणसाची विवेकबुद्धी शांत असली तर आलेल्या प्रसंगावर मात करण्यासाठी संकट धावून येण्याच्या वेगापेक्षा जास्त वेगाने बुद्धी संरक्षणाचे शस्त्र शोधायला लागते आणि क्षणार्धात उपायाचे मार्ग सुचायला लागतात. आणि तेच झाले. भरतने एकही क्षण न दवडता स्वतःचा तोल सावरून दोन्ही हाताने शेवंताला अलगद छातीपर्यंत उचलून घेतले आणि तिथून बाहेर आला.
 
तोवर बाहेर पन्नास-साठ लोकांचा जमाव जमला होता. कुणीतरी धावत जाऊन ग्लासभर पाणी आणून शेवंताला पाजले. पण शेवंताच्या तोंडून भाऊ....भाऊ..... भाऊ यापुढे शब्दच फुटेना.
 
"आवं तोंडानं सांग की, काय झालं त्ये" एक आजीबाई समजावणीच्या स्वरात बोलली.
"जे व्हाचं आसन त्ये झालं एकदा, आमालेबी माहीत होऊ दे ना, का झालं त्ये" सरस्वती काकू
"ताई नुसते रडून काय होणार? थोडा धीर धरून सांगा की आम्हाला" भरतची पत्नी अर्चना.
 
 आता शेवंताने स्वतःला सावरले होते, त्यामुळे थोडावेळ स्तब्धता पसरली.
आणि शेवंता सांगायला लागली. 
"मी वावरात कापूस वेचत व्हती. बाजूच्या रस्त्याहून एक फटफटी गेली. माह्या माहेरचा त्या फ़टफ़टीवर बसलेला मांगचा माणूस म्होरच्याले डगर्‍याने सांगत व्हता की अर्जुन आणि त्येची बायको दोघबी मेल्येत म्हून. म्या आइकलं आनं त्येला डगर्‍याने आवाज देल्ला, पण थे लई दूर निघून गेले व्हते."
"अगं मग तो अर्जुन म्हणजे तुझाच भाऊ असेल कशावरून. दुसरा कोणीही असू शकते. तू तसं फारसं काही मनाला लावून घेऊ नकोस" भरत समजावणीच्या स्वरात सांगायला लागला.
"म्या बी थेच म्हंते. उगच दोरीले साप म्हणून भुई कायले ठोपट्टे बाप्पा?" सरस्वती काकूंनीही भरतचीच री ओढली.
"नाय नाय, माहा आत्मा गाही देत्ये की कायबी तरी इपरीत झालंच हाय, थे काय नाय. दादा तू लवकर फटफटी काहाड. आपल्याले लगबगीनं गेलं पाह्यजे" एका हातात पदराचा शेला घेऊन डोळे पुसत शेवंता बोलत होती.
            शेवंताचं माहेर सोनेगाव फारसं लांब नव्हतं. केवळ १३ किमी अंतरावर. शेवंताचा भाऊ अर्जुन म्हणजे भरतचा वर्गमित्र. त्यामुळे सोनेगाव भरतच्या परिचयाचाच गाव. भरतने डोळ्यासमोर सोनेगावचं दृश्य उभं करून गावात दुसरा कोणी अर्जुन असावा काय, याचा शोध घेतला पण या अर्जुन व्यतिरिक्त दुसरा कोणी अर्जुन डोळ्यासमोर येईचना. म्हणून भरतच्या हृदयगतीचे ठोके जोरजोराने धोक्याची घंटा वाजवायला लागलेच होते.
            भरतकडे मोटरसायकल नाही आणि त्याला शेवंताला घेऊन लगोलग सोनेगावला जाणे आवश्यक आहे, हे ताडून सरपंच विश्वासदादांनी आपली होंडा आणून समोर उभी केली आणि चाबी भरतच्या हातात देत म्हणाले.
 
"भरतराव तुम्ही शेवंताला घेऊन निघा लवकर आणि पोचल्यापोचल्या आम्हांस फोन करा."
भरत आणि शेवंता सोनेगावात पोहचले तेव्हा गावातली निस्तब्ध शांतता आणि गावकर्‍यांचे पाणी उतरलेले चेहरे पाहून भरतची हृदयगती अधिकच वाढायला लागली होती.
 
आणि हे काय? अर्जूनच्या घरासमोर गर्दी?
ती घटनाच खोटी असेल किंवा दुसराच कोणीतरी अर्जुन असेल, अशी आतापर्यंत मनसमजावणी करत स्वतःस सावरणार्‍या शेवंताचा आता मात्र धीर सुटायला लागला होता.
गर्दीतून वाट काढत दोघेही कसेबसे अंगणात पोहचले. आणि ते दृश्य पाहून शेवंताने जिवाच्या आकांताने टाहो फोडला.
 
भाssssऊ हे का केलंसssssssss रे ssss????
 
एखाद्या कठीण काळजाच्या माणसाचेही हृदय फाकून......वितळून पाणी-पाणी व्हावे, असेच ते दृश्य.
गळ्यात दोर लटकवून अर्जुन बोरीच्या झाडाला झुलत होता.
समोरच अगदी १५ फुटावर अर्जुनची बायको नीलिमा दोन्ही हात पसरून उपडी निपचीत पडली होती.
हे दृश्य पाहून भरतला भरून आलं. डोळ्यातून टपटप आसवे गळलीत.
 
            पण हे असे का व्हावे त्याला कळेना. अर्जुनला गळ्यात फास लटकवून झुलताना पाहून नीलिमा त्याच्या दिशेने धावली असेल आणि धावता धावताच भावनांचा उद्रेक होवून अचानक हृदयगती थांबल्याने ती तेथेच पोटाच्या भारावर पडून गतप्राण झाली असावी. असा अंदाज त्याला आला पण अर्जुनचे काय? त्याने असा टोकाचा निर्णय का घ्यावा. अर्जुन तसा वाघासारख्या निधड्या छातीचा. विद्यार्थीदशेपासूनच खूप उन्हाळे-पावसाळे सोसलेला. बिनापुस्तकाने वर्गात आला म्हणून गुरुजीने ’गेट आऊट’ म्हणताच "गुरुजी, मी काही वर्गात बेडाबिस्तर घेऊन मुक्कामाला आलेलो नाहीये. ५ वाजले की जाणारच आहे. पण प्रथम मला हे सांगा की, पैशाअभावी पुस्तक घेतले नाही हा काय मोठा गुन्हा ठरतो? तुम्ही मला अभ्यासाचे प्रश्न विचारावे, मी उत्तर देऊ शकलो नाही तर अवश्य ’गेट आऊट’ होईन. पण पुस्तक नाही म्हणून ’गेट आऊट’ हे मी मान्य करणार नाही" असे गुरुजींच्या डोळ्याला डोळे भिडवून सांगणारा अर्जुन आत्महत्या करेल, हे भरतच्या गळी उतरत नव्हतं. पण समोर वास्तव होतं.
 
“कालच तालुक्याला गेला होता. मुन्नीसाठी शाळेचा ड्रेस आणायला” अर्जुनचा मित्र श्रीकांत सांगत होता.
“म्हणाला की अडत्याला उसनवार पैसे मागतो. पण त्याने दिलेच नसणार. तो तरी कसा देईन? यंदाचे सर्व पीक त्याला देऊनही कर्ज फ़िटलेच नव्हते. बॅंका आणि सावकाराची तर दमडीही चुकता करू शकला नव्हता. दुकानदाराने किराणा तर कधीचाच थांबवलाय. गेल्या वर्षी कोरडा आणि यंदा ओला दुष्काळ.”
 
            मुन्नी. अर्जुनला दोनच मुली. मुन्नी मोठी, आठवीत शिकत असलेली आणि शब्दाली लहान, जेमतेम अकरा महिन्यांची.
            मुन्नीला ड्रेस एकच. तोच शाळेचा आणि तोच घरी वापरायचा. सातवीची शाळा सुरू झाली तेव्हा घेतलेला. मुन्नीने ड्रेसचे नाव काढले की तिला १५ ऑगष्ट सांगायचा, नंतर दिवाळी सांगायची. दिवाळी उलटून गेली की २६ जानेवारी सांगायचे. असाच नित्यक्रम चालला होता दीड वर्षापासून. आणि एवढे दिवस निभावूनही नेलेत. पण आता ड्रेसच्याच आयुष्याने दगा दिला. विहिरीचे पाणी भरतेवेळी घागर उचलताना चर्रकन उभी रेघ घेऊन शर्ट फाटलं. तशी मुन्नीही समजदार, सुईदोरा घेऊन तिने लगेच शिवून घेतलं. पण ते शर्ट तिला घराबाहेर पडू देईना. चारचौघीत मिसळू देईना, शाळेतही जाऊ देईना.
 
तेव्हा अर्जुन म्हणाला होता.
“अगं मी नाहीतरी २६ जानेवारीला घेणारच होतो. आता २४ तारखेला तालुक्याला गेलो की आणतोच बघ.”
            पण नियतीला हे मंजूर नसावे. सारे प्रयत्न विफल ठरले होते, आणि तो तालुक्याहून रिकाम्या हाताने परतला होता. हे सर्व कळलं आणि भरतचं हृदय भरून आलं. त्याला टाहो फोडावासा वाटला. धाय मोकलून गडबडा लोळावंस वाटलं. पण त्याची प्रतिष्ठा आडवी होऊन त्याला तसं करू देईना. क्षणभर त्याला वाटलं की हे सर्व खोट्या प्रतिष्ठेचे बुरखे टराटरा फाडून फेकून द्यावे आणि यथेच्छ रडून घ्यावे, अगदी मन हलके होईस्तोवर. पण त्याने परत एकदा स्वतःला सावरले. भावनेवर ताबा मिळाल्याचे बघून हळूच श्रीकांतला विचारले.
 
“शब्दाली कुठाय?”
 
श्रीकांत काहीच बोलला नाही, बाजूच्या एका खोलीकडे चालायला लागला.
शब्दाली... ११ महिन्याची पोर ती. तिला नर्मदाकाकू मांजरीच्या पिलासोबत खेळवत होत्या. शब्दालीने त्या पिलाच्या मिशा धरल्या की ते पिलू मान हलवायचे. आणि मनीम्याऊची मान हलतांना पाहून शब्दाली खदखदा खिदळायची.
            हे दृश्य पाहून परत एकदा भरतच्या मनात कालवाकालव झाली. हिला सांगायला हवे की तिच्या डोईवरचे सर्व छप्पर उडून गेले आहे. ती अनाथ झाली आहे, पोरकी झाली आहे. आज शब्दाली दोन्ही पंखांनी उघडी पडली आहे. हे कुणीतरी शब्दालीला सांगावे असे त्याला वाटले. पण हे सांगायचे कसे?
शब्दात सांगावे तर तिचे कान ग्रहण करण्याच्या योग्यतेचे नव्हते.
डोळ्यांनी दाखवावे तर दृश्याचे पृथक्करण करून मेंदूस अर्थ पुरवण्याइतपत तिच्या जाणीवा पक्व नव्हत्या.
मग तिला श्वसनेंद्रियामार्फ़त गंधवार्ता तरी कळली असावी का?
जडदेहातून प्राण निघून गेला की मग केवळ प्रेतच उरत असते. प्रेताचे वय जसजसे वाढत जाते तसतशी प्रेतातून निघणार्‍या गंधाची तीव्रताही वाढत जाते. आणि त्या गंधाला स्वत:ची अशी एक ओळखही असते.
मग तो गंध तरी शब्दाली पर्यंत वार्ता घेऊन आला असेल काय?
नाहीच. कारण शब्दालीच्या जाणीवांची क्षमता एकतर या सर्व जाणीवांच्या अलीकडे किंवा पलीकडे तरी असणार. आता भरतलाही पुन्हा एकदा भरून आले, आणि तो पुटपुटला.
 
“अरे कुणी तरी तिची आईबाबांसोबत शेवटची भेट करून द्या रे.......”
आणि आतापर्यंत खिदळत असलेली शब्दाली जोराने रडायला लागली. पण तिच्या रडण्याचे कारण तिला आईबाबांच्या निधनाची वार्ता कळली म्हणून नव्हते तर भरतने मोठ्याने फोडलेल्या कर्णभेदी टाहोला दचकून घाबरल्यामुळे होते.
“अरे कुणी तरी शब्दालीची आईबाबांसोबत शेवटची भेट करून द्या रे.......!” असे भरत शब्दात पुटपुटायला गेला आणि यावेळेस त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडण्याऐवजी एक कर्णभेदी टाहोच बाहेर पडला होता.

- गंगाधर मुटे
Share

प्रतिक्रिया