Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




दशकातील सर्वात प्रभावी शेतकरी आंदोलन : करोना माहात्म्य ||१०||

करोना माहात्म्य ||१०||
दशकातील सर्वात प्रभावी शेतकरी आंदोलन
 
            काल २२ मे २०२० रोजी शेतकरी संघटनेने राज्यभर पुकारलेले "गळ्यात कांद्याच्या माळा, मूठभर कापूस जाळा" हे आंदोलन नेहमीच्या शिस्तीत यशस्वीरीत्या झोकात पार पडले. सर्व ग्रेडचा कापूस खरेदी करा व भावांतर योजनेबाबत तातडीने निर्णय घ्यावा, यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले होते. याच दिवशी कोरोना संकट रोखण्यात राज्य सरकारला अपयश आल्याचे सांगत भाजपासारख्या राष्ट्रीय पक्षाने "माझे अंगण, हेच रणांगण" अशा स्वरूपाचे पुकारलेले आंदोलन फसलेले असताना शेतकरी संघटनेचे आंदोलन परिणामकारकपणे यशस्वी व्हावे, ही ऐतिहासिक घटना आहे. मागील दहा वर्षात शेतकरी संघटनेने अनेक आंदोलने केलीत पण संख्येचे पुरेसे पाठबळ नसल्याने आंदोलन तर झाले पण परिणामाकरता कमी राहिली. लोकशाही राज्यात जनआंदोलन होत असते तेव्हा त्या आंदोलनामागे जनतेचे पाठबळ किती आहे, याला महत्त्व असणे स्वाभाविक असते. कालच्या आंदोलनात उतरणाऱ्या शेतकरी पाईकांची संख्या जरी नेहमी इतकीच होती तरी कोरोना संकट, लॉकडाऊन सारख्या संचारबंदीच्या काळात लढवैय्या शेतकरी आंदोलकांनी आंदोलन यशस्वी करून दाखवल्याने शासकांवर दबाव निर्माण करण्यात हे आंदोलन कमालीचे यशस्वी ठरले. त्यामुळे कालचे आंदोलन म्हणजे मागील दहा वर्षातील सर्वात प्रभावी व परिणामकारक शेतकरी आंदोलन ठरले आहे.
 
            १९८० ते २००० या काळात युगात्मा शरद जोशींच्या नेतृत्वात लाखांनी लोक आंदोलनात उतरायचे. सरकारवर प्रचंड दबाव निर्माण करून सरकारला हतबल करण्याइतपत त्या आंदोलनाची धग असायची. स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वात मोठा जनआंदोलक नेता म्हणून युगात्मा शरद जोशींकडे पाहिले जाते ते याच कारणामुळे. परंतू २००० नंतर युगात्मा शरद जोशींना अनेक शारीरिक व्याधींनी ग्रासले. अनेकवेळा शस्त्रक्रिया झाल्यात, त्यामुळे स्वाभाविकच त्यांना शारीरिक मर्यादा आल्यात. त्यांचा सामान्य शेतकऱ्यांशी जवळजवळ संपर्कच तुटल्याने त्यानंतरची शेतकरी संघटना केवळ संघटना कार्यकर्त्यांच्या बळावर पुढे चालत राहिली. केवळ यु. जोशींच्या शब्दाखातर रणांगणात उतरणारा शेतकरी, शेतकरी नेता म्हणून यु. जोशी सोडून कुणावरच विश्वास ठेवायला तयार नसल्याने स्वाभाविकपणे सर्वसामान्य शेतकरी संघटनेपासून दूर राहिला आणि शेतकरी संघटनेला संख्येच्या मर्यादा यायला लागल्यात. शेतकरी वर्ग शेतकरी संघटना किंवा शेतकऱ्यांचा दबावगट निर्माण करण्याबाबत सदैव उदासीन का असतो याचे उत्तर आपल्याला एकंदरीत शेतकरी जीवनाच्या वर्तनशैली मध्ये आढळून येते.
 
            शेतकऱ्याला बळीराजा म्हटले जाते कारण तो दानशूर आहे. आजही लोकजेवणाच्या सार्वजनिक पंगतीचे कार्यक्रम शेतकर्‍याच्या अंगणात जेवढ्या प्रमाणात संपन्न होत असतात तेवढे टाटा, बिर्ला, अंबानीच्या अंगणात होत नाहीत. शेतकऱ्यांमधील दातृत्वाचा हा गूण चांगला की वाईट, हा वेगळा आणि वादाचा विषय असू शकतो पण शेतकरी आजही दानशूर आहेच, हे नाकारता येत नाही. शेतकऱ्यांनी स्वतःच्या स्वार्थापुरताच विचार केला किंवा स्वतःचा व्यवसाय अधिक फायदेशीर होण्यासाठी आणि आर्थिक सुबत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न केला, याची नोंद कोणत्याच युगाच्या इतिहासात शोधूनही सापडत नाही. शेतकऱ्यांनी बिगरशेतकऱ्यांना लुटले किंवा शोषण केले असा तर कुठल्याच युगात पुरावा उपलब्ध असल्याचे आढळत नाही. शेतकरी संघटित झाला, शेतकरी एकत्र आला आणि त्यात त्याने त्याचा दबावगट निर्माण केला असेही पुरावे इतिहासात अजिबातच आढळत नाहीत. 
 
            तसं पाहता एकंदरीतच शेती आणि शेतकऱ्यांचा इतिहास तसा फार चांगला नाही. शेतकऱ्यांचा तर नाहीच नाही. इतिहासाच्या संबंध कालखंडाचा विचार केला तर शेतकऱ्यांचा कैवार घेणारे राजे दोनच. पहिला बळीराजा आणि दुसरा छत्रपती शिवाजी राजा. शेतकऱ्यांचा नेता शोधायला गेलो तर मात्र सर्व इतिहासात दुष्काळच दुष्काळ दिसतो. शेतकऱ्यांमध्ये शेतकऱ्यांचे हित साधणारा नेता कधी निर्माण झालाच नाही. इतिहासात डोकावून पाहिले तर स्पष्टपणे जाणवते की संबंध सृष्टीच्या इतिहासातील पहिला शेतकरी नेता म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. त्यानंतर दुसरा शेतकरी नेता शोधायला निघालो तर  शोधताना गाडी सुसाट वेगाने निघते, ती कुठेच थांबत नाही, मध्ये कुठेच थांबत नाही, अध्येमध्ये कुठेच थांबत नाही, एकदम थेट आणि शेवटी शरद जोशी यांच्या नावावर येऊन थांबते. शेतकऱ्यांना केवळ दोनच नेते मिळालेत. पहिले महात्मा फुले आणि दुसरे युगात्मा जोशी.
 
             शेतकरी संघटना म्हणून विचार केला तर समग्र इतिहासात शेतकरी संघटना कधी निर्माण झालीच नाही. शेतकरी संघटना स्थापन करण्याचा मान फक्त यु. शरद जोशींनाच जातो. लाखाच्या संख्येने शेतकरी फक्त यु. शरद जोशींच्या पाठीमागेच उभा राहिला, अन्य कुणाच्याच पाठीमागे उभा राहिलाच नाही. अगदी महात्मा फुले यांच्या पाठीमागे सुद्धा शेतकरी उभा होता किंवा खांद्याला खांदा लावून लढायला तयार झाला होता, असे माझ्या तरी वाचनात आलेले नाही. इतिहासात कधी नव्हे तो महात्मा फुले यांचे रूपाने एक लढवैय्या शेतकरी नेता शेतकऱ्यांना मिळाला पण दुर्दैवाने शेतकरी फुलेंच्या बाजूने देखील अजिबात उभे राहिले नाहीत. सावित्रीबाईच्या अंगावर शेण फेकले गेले तेव्हा चार शेतकरी सावित्रीबाईच्या बाजूने ठामपणे उभे राहिले आणि सावित्रीबाईवर अन्याय करणारांच्या विरोधात पेटून उठले, अशा तऱ्हेच्या ऐतिहासिक नोंदी सुद्धा माझ्या वाचनात आलेल्या नाहीत. 
 
            अनेकदा विषय निघतो आणि असा एक प्रतिवाद केला जातो की, १९८० चे दशक शेतकरी आंदोलनाचे दशक होते. तो काळ आंदोलनाचा होता म्हणून लाखो शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करायचे. आता काळ बदलला असल्याने लोक रस्त्यावर येत नाहीत. पण हे खरे नसून सपशेल खोटे आहे. १९७८ ते १९९० या दरम्यान जेव्हा शरद जोशींच्या पाठीमागे लाखाने शेतकरी उभे राहत होते, त्यांच्या एका सादेवर स्वतःचा जीव ओवाळून टाकायला तयार होत होते, त्यांच्या एका शब्दावर स्वतःचे बलिदान देऊन हौतात्म्य पत्करायला तयार होत होते, त्याच काळात अन्य शेतकरी नेत्यांच्या मागे शेतकरी गेला अशा पाऊलखुणा अजिबात आढळत नाहीत. १९८० च्या दशकात शेतकरी नेता म्हणून जेव्हा शरद जोशी यांचा उदय झाला; त्याच काळात विदर्भात नावाजलेले अर्थतज्ज्ञ डॉक्टर म. गो. बोकरे, ट्रिपल शरीरयष्टी आणि गोंडस चेहरा लाभलेले अभ्यासू व अमोघ वक्तृत्वशैली असलेले विजय जावंधिया, नागपूरचे जीवनलाल चांडक, अकोल्याचे वा. रा. कोरपे,  पश्चिम महाराष्ट्रात माधवराव मोरे, प्रल्हाद कराड पाटील वगैरे मंडळी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपापल्या परीने लढतच होते पण त्यांचे पैकी कुणाच्याही मागे शेतकरी गेलेला नाही. संबंध सृष्टीच्या इतिहासात फक्त शरद जोशींच्या मागेच शेतकरी उभा राहिला, हे शाश्वत सत्य स्वीकारण्याची सर्वांनी हिंमत दाखवली पाहिजे. तरच शेतकरी आंदोलनातील उणीवा व बलस्थाने ओळखून पुढील वाटचाल करणे सोयीचे होईल.
 
            शेतकरी आंदोलनाचा थोडासा जरी अभ्यास केला तर स्पष्ट निष्कर्ष निघतो की पुढील काळात लाखांच्या संख्येने शेतकरी आंदोलन उभे राहण्याची शक्यता नाही. अशा स्थितीत उपलब्ध असलेली बेताची ताकद वापरून "मर्यादित शक्ती व अमर्यादित यश" अशा तऱ्हेने आखणी केल्यास मर्यादित सैन्यसंख्येच्या बळावर देखील रायगड सर करता येऊ शकेल, अशा वाटा हेरून शेतकरी आंदोलनाला पुढील वाटा शोधाव्या लागतील. कालचे आंदोलन म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाची किमया आहे. सोशल मीडियाच्या प्रभावी वापराने आंदोलनाची रणनीती आखून तितक्याच प्रभावीपणे अंमलबजावणी करता आल्याने आंदोलन यशस्वी करण्यापर्यंत मजल मारता आली. सौ. सरोजताई काशीकर, ऍड वामनराव चटप यांचे मार्गदर्शन, श्री अनिल घनवट यांचे कणखर नेतृत्व, श्री मधुसूदन हरणे यांची कल्पक रणनीती यामुळेच हे आंदोलन यशस्वी होऊ शकले. येणारा उद्याचा भविष्यकाळ आधुनिक तंत्रज्ञानाचा असणार आहे. ज्याच्याकडे अधिक अद्ययावत तंत्रज्ञान, कौशल्य आणि तंत्रज्ञान कौशल्य वापरण्यासाठी आवश्यक असणारी समर्पित कार्यकर्त्यांची फळी असेल तोच व्यवस्थेवर प्रभाव टाकू शकणार आहे आणि गरज भासल्यास व्यवस्थेला जेरीसही तोच आणू शकणार आहे.
 
गंगाधर मुटे आर्वीकर 
दि. २३/०५/२०२०
(क्रमशः)
=============
टीप : हा लेख आपण माझ्या नावासकट किंवा माझ्या नावाशिवाय कुठेही शेअर किंवा कॉपी करून पेस्ट करू शकता.
=============
 
या लेखमालेतील इतर लेख http://www.baliraja.com/carona इथे उपलब्ध आहे.

कोरोना

Share