सहाव्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे ठराव
दि. ८ व ९ फेब्रुवारी २०२० रोजी क्षात्रैक्य समाज सभागृह, अलिबाग जि. रायगड येथे दोन दिवशीय सहावे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन संपन्न झाले. या संमेलनात सर्वानुमते ६ ठराव पारित करण्यात आले.
ठराव - १ : भारत हा शेतीप्रधान देश आहे असे मानले जाते आणि बदलत्या स्थितीतही देशातील बहुसंख्य जनतेचे उपजीविकेचे साधन शेती हेच आहे. तरीही शेतीक्षेत्राकडे शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. शेतकऱ्याला देशातील इतर नागरिकांप्रमाणे सुखाचे आणि सन्मानाचे जीवन जगता यावे, यासाठी शासनाने निर्णायक पावले उचलून शेतीवर झालेला अन्याय दूर करावा.
ठराव - २ : शेतीविषयामध्ये रुची वाढावी व सर्वार्थाने नवीन उदयोन्मुख पिढीच्या शेतीविषयक जाणिवा प्रगल्भ व्हाव्यात म्हणून प्राथमिक, माध्यमिक शालेय आणि उच्च महाविद्यालयीन अभ्यासक्रमात शेतीसाहित्याचा प्राधान्यक्रमाने अंतर्भाव केला जावा.
ठराव - ३ : सध्या महाराष्ट्र राज्यासहित संपूर्ण देशात शेतकरी आत्महत्यांनी विक्राळ रूप धारण केलेले आहे. शेतकरी आत्महत्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस आणखी उग्र रूप धारण करत आहे, यावरून शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी आतापर्यंत केलेले प्रयत्न आणि उपाययोजना कुचकामी ठरल्या आहेत, हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांच्या कारणाचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी, कृषी पत्रकार आणि शेतीसाहित्यिकांचा समावेश असलेली एक बहुआयामी अभ्यास समिती गठीत करावी.
ठराव - ४ : महात्मा ज्योतीराव फुले आणि युगात्मा शरद जोशी यांनी शेतीसाहीत्यात दिलेले सर्वोच्च योगदान लक्षात घेऊन राज्य शासनाने त्यांना “शेती साहित्यरत्न” सन्मान देऊन त्यांचा गौरव करण्यात यावा.
ठराव - ५ : शेती हाच भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असल्याने अभ्यासकांना शेतीविषयक सर्व पुस्तके सहज उपलब्ध व्हावी म्हणून “शेती ग्रंथ पेढी” आणि “शेतकरी वाचनालय” ही संकल्पना स्वीकारून अंमलबजावणी करण्यात यावी.
ठराव - ६ : अ. भा. मराठी साहित्य संमेलनात शेती आणि शेतकरी या विषयाला प्राधान्य क्रमाने स्थान देण्याची प्रथा सुरु केल्याबद्दल अलिबाग येथील ६ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्यावतीने उस्मानाबाद येथे संपन्न झालेल्या ९३ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.
========