नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
मंडळी, हा लेख लिहिण्या आधी एक गोष्ट स्पष्ट करावी असे मला वाटते आणि ती म्हणजे, मी शेतक-याचा मुलगा नाही, शेतीच्या कामाशी माझा संबंध नाही व आमच्या घरात कुणाच्याही नावावर अगदी एक गुंठा सुध्दा शेतजमीन नाही. हां, मात्र आमच्या कुटुंबाकडे शेती होती, मोठ्ठी आमराई होती व गावात एक मोठ्ठा वाडा सुध्दा होता असे म्हणतात, पण आमचे आजोबा सुमारे शंभर सव्वाशे वर्षापूर्वी हे सगळं काही सोडून नोकरी करण्यासाठी म्हणून शहरात म्हणजे औरंगाबादला स्थायिक झाले व आम्ही उरलो ते फक्त नावाचे " चौकेकर ,"मात्र अगदी असेच असले तरीही शेतकरी, त्याची शेती विषयक कामे, त्यासाठी तो करत असलेले कष्ट, शेतीमधून येत असलेले उत्पन्न व त्या पासून मिळणारी अगदी अल्प अशी कमाई, त्याची इतर दैनंदिन कामे इ.इ.गोष्टींशी मी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असा काही प्रमाणात का होईना पण संबंधित राहिलो, कारण माझ्या वडिलांच्या वारंवार होणा-या बदल्यांमुळे कधी तालुक्याच्या गावात तर कधी खेडेगावात रहावे लागायचे व वर्गातले सगळेच मित्र शेतक-यांची मुले असल्यामुळे कधी तरी त्यांच्या बरोबर त्यांच्या शेतात जाणे-येणे व्हायचे.
माझा जन्म एका मध्यमवर्गीय ब्राम्हण कुटुंबात झाला असून आमच्या घराच्या आजूबाजूला असलेली झाडे, आमच्या वाड्यात असलेली फळा-फुलांची झाडे, पाच प्रकारच्या द्राक्षाची वेल, त्या वेलीसाठी नियमितपणे जमीन खोदणे व आळे करणे, द्राक्ष वेलींची नियमित करावी लागणारी कटींग व त्यानंतर वेलीची घ्यावी लागणारी काळजी, निगा व औषध फवारणी, वाड्यातील मोकळ्या जागेत पावसाळ्याच्या दिवसात भाजीपाला वगैरेंची केलेली लागवड इत्यादि इत्यादि कामे मी माझ्या लहानपणापासूनच करीत आलो आहे. पुढे युवावस्थेत मित्रांच्या शेतात पायी-पायी किंवा अगदीच कळस म्हणजे सायकलवर चक्कर मारायला जाणे, सुटीत त्यांच्या शेतातील भटकंती करणे व अगदीच नाही म्हंटल तर हुरड्याच्या दिवसात मित्रांच्या वा नातेवाईकांच्या शेतात जाऊन मनसोक्त रानमेवा खाऊन येणे ही व अशी शेतीशी संबंधित कामे मी अगदी नियमितपणे करत आलो आहे.
हां, पण आयुष्याच्या उत्तरार्धात म्हणजे अगदी वयाची पन्नाशी उलटून गेल्यावर मात्र जेंव्हा बँकेने मला प्रमोशन देऊन माझी बदली एका खेडेगावात तिथल्या शाखेचा मँनेजर म्हणून केली त्यावेळी मात्र माझा बराचसा संबंध शेतीक्षेत्राशी व संबंधित अशा उद्योगांशी आला व मी माझ्या त्या कारकिर्दीचा उपयोग देखील एका चांगल्या कामासाठी करून घेतला. वारंवार येणा-या दुष्काळामुळे शेतक-याला भेडसावणा-या आर्थिक अडचणींमधून त्याला सोडविण्यासाठी व त्याच्या नावावर असलेल्या थकबाकीमध्ये सगळे नियम व कायदे पाळून जिथे शक्य असेल तिथे one time settlement करून देत किंवा कर्जमाफीच्या धोरणाचा नियमानुसार फायदा करून देत सुमारे दीडशे ते दोनशेे शेतक-यांचा सात- बारा मी कोरा करुन दिला व अशा थकबाकीदार शेतक-याच्या विरूध्द बँकेने कोर्टात लावलेले दावे लोकअदालत मध्ये मागे घेतले अर्थात त्याबद्दल तालुक्याच्या कोर्टात माझा चक्क दोन वेळा सत्कार सुध्दा करण्यात आला आणि एव्हढाच काय तो माझा शेतीशी प्रत्यक्ष आलेला संबंध असे म्हणता येईल.
पण माझ्या या कामाची खरी सुरूवात झाली होती ती मात्र जुलै,१९७९ मध्ये जेंव्हा मी माझ्या बँकेतील नोकरीसाठी हजर झालो होतो तेंव्हापासुनच, कारण साधारणपणे त्याच काळात दादासाहेब शरद जोशी व त्यांची शेतकरी संघटना ही चांगलीच नावारूपाला येत होती. ठिकठिकाणी सभा घेऊन असंघटीत अशा शेतक-याला संघटीत करण्याचे काम त्यांनी सुरू केलेले होते व या संबंधीच्या बातम्या आणि वृत्तांत त्या काळात आपण सगळेच दररोजच्या वृत्तपत्रांमधून वाचत देखील होतो.
शेती मध्ये काम करणा-या शेतकरी व शेत मजूरांना त्यांच्या वास्तव परिस्थितीची माहीती देऊन, त्यांना मिळत असलेल्या शेतमालाच्या कमी किंमती कशा कमी आहेत, त्याला कारण असलेले सरकारचे शेती विषयक धोरण इत्यादि इत्यादि गोष्टींची संपूर्ण आकडेवारीसह माहिती देऊन, त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देऊन ते अडकलेल्या या दुष्ट चक्रातून बाहेर पडण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे व आंदोलनात्मक पाऊल उचलावे अन्यथा शेतकरी हा या दुष्ट चक्रातून बाहेर पडणे अवघड नव्हे निव्वळ अशक्य आहे असे पटवून देऊन आंदोलनासाठी तयार राहण्याचा सल्ला देत ते राज्यभराचा दौरा करत हिंडत होते व शेतकरी व शेतमजूर यांच्या मधे जागृती करण्यासाठी त्यांनी संपूर्ण राज्य जणू काही पिंजूनच काढले होते.
साधी, सोपी व सरळ अशी सर्वसामान्य माणसाला समजू शकणारी भाषा, शेतीविषयक शास्त्र शुध्द अशी माहिती, विविध प्रकारच्या आकडेवारीसह केलेले विश्लेषण या सर्व गोष्टींमुळे आपण कुठे चुकतो आहोत व नेमके काय केले म्हणजे यातून बाहेर पड येईल हे सभेसाठी उपस्थित शेतक-याला तर कळत होतेच पण माझ्या सारख्या शेतीशी प्रत्यक्ष संबंध नसलेल्या माणसाला सुध्दा कळत होते व सभेवरून परत जात असतांना माणूस याचाच विचार करत करत घराकडे परत जायला निघायचा, एव्हढे लोक त्यांच्या भाषणामुळे भारावले गेलेले मी पाहिले आहे नव्हे मी स्वत: अशा प्रकारचा अनुभव घेतल्याचे मला आजही अगदी चांगले आठवते आहे.
आणि बघता बघता शेतकरी संघटना व दादासाहेब शरद जोशी यांच्या बद्दल लोक गावागावात व चौकचौकात खूपच मनापासून व आपुलकीने चर्चा करू लागल्याचे दृष्य दिसू लागले होते, एव्हढेच नव्हे तर तुम्ही फक्त आदेश द्या आम्ही रस्त्यावर उतरतो अशी स्थिती त्यावेळी शेतकरी वर्गामध्ये निर्माण झाली होती.
सभा, मोर्चे व मिरवणुका चालूच होत्या व अशातच " रास्ता रोकोची " ची घोषणा करण्यात आली व नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव (बसवंत) येथे यापैकीच एक भला मोठा " रास्ता रोको " राष्ट्रीय महामार्गावर आयोजित केला गेला पण दुर्देवाने या " रास्ता रोको " आंदोलना दरम्यान झालेल्या गोळीबारात चार निरपराध शेतकरी हुतात्मा झाले व या घटनेमुळे हे आंदोलन अजूनच चिघळले व सर्व राज्यभर या आंदोलनाच्या झळा पोहोचल्या.
मंडळी, या आधी कुठल्या एखाद्या आंदोलनात इतक्या मोठ्या प्रमाणात " रास्ता रोको " झाले होते किंवा नाही याची मला तरी कल्पना नाही पण शेतकरी संघटनेच्या या आंदोलनानंतर मात्र " रास्ता रोको " ही संकल्पना अगदी सामान्य माणसापर्यंत जाऊन पोहोचली हे मात्र मी माझ्या अनुभवांवरून नक्कीच सांगू शकतो आणि हीच महाराष्ट्र राज्यात शेतकरी संघटनेची व रास्ता रोकोची सुरुवात होती व म्हनुनच या
" रास्ता रोको " ही दादासाहेब शरद जोशी यानी दिलेली देन आहे असे म्हणायला काही एक हरकत नसावी असे मला वाटते.
या निमित्ताने मला माझ्या आठवणी आपल्या सर्वांसोबत मांडण्याची संधी मिळाली म्हणून मी आपला मनापासून आभारी आहे.
दिवाकर चौकेकर,
गांधीनगर (गुजरात)
मोबाईल : 97237 17047
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!