*दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा.......!!!!!!!!!!*
बळीला पाताळात गाडल्याचा आनंदोत्सव साजरा करणे म्हणजे दिवाळी!
वर्षभर शेतीला लुटून मिळवलेल्या "संचयाची" पूजा करणे म्हणजे दिवाळी!!
नव्या खातेवहीची औपचारीक पूजा करून नव्या दमाने शेतीला लुटायचा संकल्प म्हणजे दिवाळी!!!
शेतकर्याच्या कमरेला धडूतही शिल्लक राहाणार नाही, अशा सरकारी धोरणांची हिरिरीने अमलबजावणी म्हणजे दिवाळी!!!!
* * *
आयुष्यभर "दिवे" नाही लावू शकलो!
मग आजच भरमसाठ पणत्या लावून असा कोणता प्रकाश पडणार आहे?
आयुष्यभर "उजेड" नाही पाडू शकलो,
मग आजच भरमसाठ फ़टाके फ़ोडल्याने असा कोणता गगणभेदी उजेड पडणार आहे?
लक्ष्मीपुजनाचे विचारताय?
मग ऐका, आता माझ्या घरात असलेली लक्ष्मी "बॅंकेच्या मालकीची" आहे. तीची पूजा केली काय नाही काय, तिला तसाही काय फ़रक पडणार आहे?
तिचा "मालक" तिची पूजा करेलच की!
माझ्यावाचून लक्ष्मीचे अडले तरी काय?
"लक्ष्मीपूजन" करावेसे मलाही वाटते, पण;
माझे दैवत माझे श्रम आहे आणि
लक्ष्मीदेवीला "श्रमाच्या घामावर" किंवा
"घामाच्या श्रमावर" प्रसन्न व्हायची अॅलर्जी दिसतेय.
* * *
बळीराजाच्या डोक्यावर यंदा निसर्गानेच "फ़ुलझड्या" चेतवल्यात आणि
सरकार बळीराजाच्या बुडाखाली "फ़टाके" फ़ोडायला निघालंय.
* * *
तसं हे आमचं बारमाही गार्हाणं
खणखणीत नसते कधीच नशीबाचं नाणं
सरून गेल्या आशा
मरून गेल्या इच्छा
तरीही मात्र म्हणावेच लागते....
.
.
सर्वांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा.......!!!!!!!!!!
- *गंगाधर मुटे "अभय''*
=-=-=-=-=