नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
बळी-राजा
[ संदर्भ - शेतमालाच्या भावात होणार्या यादृच्छिक बदलांच्या कारणांवर सूक्ष्म निरीक्षण केले असता बरीच कारणे लक्षात येतात. त्यातील ठराविक, महत्त्वाच्या तसेच काही परिवर्तनीय घटकांवर प्रकाश टाकला असता कवितेचा प्रवास लक्षात येतो.]
म्हणतात त्याला शेतकरी, शेती धर्म त्याचा;
मेहनत त्याची जात आणि तोच त्याचा राजा!
कर्ज घेण्याची गरज, त्या राज्याला का पडते?
लेकराची आत्महत्या पाहून काळी माय रडते!
पेरतो मोती घामाचे, कष्टाचे घालतो खत;
जगाच्या पोशिंद्याला, भूक भागविण्याची रत !
काळजी एवढी पिकाची, जणू त्याच ‘तेच’ लेकरू;
शपथ देतो त्याला, माझी मेहनत नको विसरू !
मग भाबड्या नजरेला, काळ्या ढगाची आस दिसते
थोडेसे सुख वाट्याला, जास्त पुराची चिंता भासते !
कधी थंडीचा प्रकोप, कधी कोरड्यात डोकं आपटत!
बदल कोणत्याही ऋतुचा असो, रक्त त्याचच चाटत!
काही खातो निसर्ग, काही खातात किडे;
उत्पन्नाच्या स्वप्नांना, बरेच जातात तडे!
सगळ्यांच्या वाट्याचे देऊन, मग जेवढे पीक येते;
कपाळाचा सट्टा लावायला, पुढे बाजारात जाते!
मागणी-पुरवठ्याच्या गणितात, 'भावा'चा भागाकार होतो
कमी दर्जाच्या मालाला म्हणे, चिंतेचाच गुणाकार होतो!
साठवणूकखोरांच्या दिवाळीमध्ये, ह्याची हिम्मत खचते;
आणि ह्याच्या हिस्स्याची लक्ष्मी मात्र, त्यांच्या घरी नाचते!
तू मातीतून उगवतो सोन, त्यात नाही काही खोटं,
पण त्या सोन्याची चव चाखतात, व्यापाऱ्यांची बोटं!
बघतो तुटलेली चप्पल आणि, तुझी फाटलेली कापडं;
बाजारी स्मशानात जाळतांना, तुझ्या पोटाची लाकडं!
एवढं करून शेवटी, जी काही चार आणी उरतात;
मागचं कर्ज फेडण्यामध्ये, ती सगळी जिरतात!
शेवटी खुर्ची बदलली, की एम.एस.पी. पण जाते;
मग हातात फक्त कर्ज, आणि दोन दमडी ऱ्हाते!
मायभूमी विचारते प्रश्न, की कोण आहे राजा ?
'शेतकरी' अस बोलताना गळा आटतो माझा!
‘ऐसी’ मध्ये बसलेले पुढारी, त्यालाच प्रश्न करतात;
की हे शेतकरी नक्की, आत्महत्या का करतात ?
देवा तू पुढाकार घेऊन, आर्थिक असमतोल फोडावा;
शेतमालाच्या गळ्यातून, धनवंतांचा फास सोडावा!
जमलंच तर त्याचा नागवळ, शेतकऱ्याच्या हाती द्यावा;
खरा मालक आणि ग्राहकांमध्ये परस्पर संबंध बनवा !
आणि झालंच शक्य तर,
एक तरी न्यायालय बनवावे, ज्यात होईल या साऱ्यांची सुनावणी;
पुढाऱ्यांचे आणि व्यापाऱ्यांचे किडे मारण्यासाठी, व्हावी एक फवारणी !
.
[समाप्त]
लेखक/ कवी – दिराजा [डॉ दिग्विजय जाधव]
लिखाणाची तारीख - २२/०९/२०२४
भ्रमणध्वनी - ८२०८११७०३०
स्थळ – नायर रुग्णालय, मुंबई.