विम्यामुळे तोट्याच्या शेतीचा तोटा आणखी वाढतो
हजार गाड्यांचा विमा काढला तर पैकी एका गाडीचा अपघात होतो. १ लाख लोकांनी विमा काढला तर २-४ लोक मरतात. उरलेल्या ९९ हजार ९९६ लोकांच्या प्रीमियम मधून २-४ लोकांची भरपाई होते. (मोघमपणे) आणि त्यातून उरलेल्या रकमेवर विमाकंपनीची उपजीविका आणि चरितार्थ चालतो.
शेतीमध्ये हजार शेतकऱ्यांनी प्रीमियम भरला आणि मग हजारच्या हजारही शेतकऱ्यांच्या शेतात नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, रोगराई, महापूर वगैरे अरिष्टे आली तर नुकसान भरपाईला रक्कम येईल कुठून?
नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, रोगराई, महापूर वगैरे अरिष्टे एकट-दुकट शेतकऱ्यांच्या शेतात येत असतात काय? की सार्वत्रिक असतात? कि प्रीमियम भरणाऱ्या १००% शेतकऱ्यांच्या शेतात नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, रोगराई, महापूर वगैरे अरिष्टे येणार आहेत? इतके पहिल्या वर्गातील शेम्बड्या पोराला कळेल असे साधेसोपे गणित उच्चशिक्षित फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्या किसानपुत्रांना का कळत नसेल?
शेतीमध्ये विम्याचे समर्थन करणारे दोन प्रकारात मोडतात.
१) निखळ साधे भोळे - यांना शेतीचे अर्थशास्त्रही समजत नाही आणि अनर्थशास्त्रही समजत नाही. विमा असला तर आपल्या शेतीची नुकसान भरपाई मिळेल अशी त्याला भाबडी अशा असते. कोणत्याही तोट्याच्या व्यवसायात विमा लागू झाला तर त्या व्यवसायाचा तोटा आणखी वाढतो, बदल्यात काहीच फायदा होत नसतो हे त्याला अजिबात कळतच नसते.
२) बेरकी किसानपुत्र : या प्रकारात मोडणारी शेतकऱ्यांची पोर अत्यंत बेरकी असतात. विमा असला तर आपण शासकीय आणि विम्याच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी लागेबांधे जोडून, काही तडजोडी करून आपलं बरोबर आपण जमून घेऊ याची त्याला शंभर टक्के खात्री असते. एकंदरीत शेती व्यवसाय, शेती आणि समग्र शेतकरी याच्याशी त्याला काहीही देणे घेणे नसते. तो फक्त स्वतःचा विचार करत असतो.
एकंदरीत असाच अन्वयार्थ निघतो की... शेतीचे अर्थशास्त्र व अनर्थशास्त्र न कळलेले शेतीचे हितचिंतक सुद्धा शेतीसाठी कुऱ्हाडीचे दांडेच ठरतात.
====
विमा कंपनी स्वतः नफा कमावण्यासाठी व्यवसाय करते. (त्यात शेतकऱ्यांचे भले करणे असा अव्यावहारिक व्यवहार व्यवसायात नसतोच)
विमा कंपनीमुळे इंडियाला रोजगार उपलब्ध होतो म्हणून सरकार त्यास उत्तेजन देते.
या वरील दोन्हीसाठी शेतीचे शोषण करणे अनिवार्य असते.
(विमा कंपनी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी असते असे शेतकऱ्यांना वाटणे आणि विमा शेतीसाठी आवश्यक आणि उपयोगाचा असतो असे शेतकरी चळवळीतील लोकांना वाटणे.... बहुधा यात शेतीचे अर्थशास्त्र न कळणे, हा भाग असावा... असे वाटते.)
- गंगाधर मुटे
प्रतिक्रिया
विमा कंपन्याना माहीत आहे की