Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक
नियोजित संमेलनाचे प्रारूप, उपक्रम आणि गुरुकुंजाला कसे पोचावे याबद्दल इत्यंभूत माहिती देणारा व्हीडिओ.
शेतकरी साहित्य संमेलनाचे LIVE प्रसारण "शेतकऱ्यांची चावडी" या You Tube चॅनेलवर होणार आहे.
त्यासाठी आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



अप्रामाणिक शेतकरी आंदोलन : भाग-२

अप्रामाणिक शेतकरी आंदोलन : भाग-२
 
लाल, पिवळे, हिरवे, निळे, भगवे झेंडे असो कि अन्य कोणत्याही पक्षाचे, पंथाचे व समुदायाचे झेंडे असोत, असे झेंडे हातात घेणारी मंडळी पक्की हरामी असतात. हरामी फक्त या अर्थाने कि ही मंडळी जिथे जातील तिथे फक्त आपापला स्वार्थ शोधतात. कधी कधी ही मंडळी स्वहितापायी इतकी बेभान होतात कि, टाळूवरचे लोणी खायला मढ्यांचे ढीग लागण्याची मनोकामना बाळगू  शकतात. स्वार्थ साधायची शक्यता असेल तर पराकोटीची भिन्नता असूनही एकत्र येऊ शकतात तसेच गरज भासल्यास समविचारी सुद्धा परस्परांच्या छाताडावर बसू शकतात.
 
दिल्ली शेतकरी आंदोलनासंदर्भात मी अगदी पहिल्या दिवसापासून ठामपणे मांडत आलोय की, हे शेतकरी आंदोलन शेतकरी समाजाप्रती प्रामाणिक नसून बिगर शेतकरी घटक, शेतीच्या लुटीतून निर्माण झालेले आपापले प्रस्थापित आर्थिक साम्राज्य आणि प्रस्थापित राजकीय साम्राज्य टिकवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन आंदोलन रेटत आहेत. नवे तीन विधेयक जाचक असेल किंवा कुणाच्या नजरेत त्या विधेयकात काही शेतीसाठी घातक असेल तर त्यांनी तसे तर्कशुद्ध पद्धतीने मांडायला हवे, कुणी प्रश्न विचारले तर त्याचे समर्पक उत्तर द्यायला द्यावे, ही सहजसोपी सहजसाध्य बाब होती पण या आंदोलनाला वैचारिक पाया नसल्याने "हमे कनूनवनून कूच नही समझता, बस हमे कनुन नही चाहिये, ईतनाही समझता है!" "चर्चा-वर्चा कुछ नही, कनून वापिस लो" ही झुंडशाहीची भाषा दिल्ली शेतकरी आंदोलनाचे ब्रीदवाक्य होऊन बसली आणि तिथेच हे शेतकरी आंदोलन उघडे पडले.
 
शेतीचा प्रश्न राजकीय अथवा धार्मिक नसून आर्थिक असल्याने शेतीच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी निखळ कर्तव्यकठोर अर्थशास्त्रीय मार्गानेच जावे लागते. इथे भावविभोरतेला अजिबात थारा असू शकत नाही. कुणीतरी शेतकरी आंदोलन करतोय आणि आपणही शेतकरीच असल्याने आपण त्याला पाठींबा दिलाच पाहिजे, हा 'जातीसाठी माती" खाण्याच्या तोडीचा विचार आहे; ज्या विचाराला शेतकरी आंदोलनात काहीही स्थान असू शकत नाही. शेतीच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे सर्व मार्ग अर्थशास्त्रीय कसोटीवर तपासून पाहणे, प्रत्येक शेतकरी आंदोलकांचे आणि प्रामाणिक हितचिंतकांचे प्राथमिक कर्तव्य आहे.
 
दिल्ली शेतकरी आंदोलन चुकीच्या पायावर उभे राहिल्याने पुढे नंतर वारंवार नुसत्या चुकाच चुका होत राहिल्या. लाल, पिवळे, हिरवे, निळे, भगवे... अर्थात कोणत्याही रंगाचे झेंडे आंदोलनात घुसू दिले नाही तरच शेतकरी आंदोलनाची पवित्रता व शुद्धता टिकून राहू शकते, याचे भान आंदोलनकर्त्यांना न राहिल्याने आंदोलन भरकटत गेले. ज्या कम्युनिष्टांच्या पंचेवीस पिढ्या "शेतकरी हाच शेतमजुरांचा शोषक" असल्याचे मांडण्यात गेले, तोच लाल बावटा या आंदोलनात आपला लाल झेंडा घेऊन उत्तरला. 
 
आपापले धर्म व पक्ष सोबत घेऊनच आंदोलक आंदोलनात उतरल्याने कुणाचा पायपोस कुणाच्या पायी  राहिला नाही. आधीच नेतृत्वहीन असलेले शेतकरी आंदोलन आणखीनच नेतृत्वहीन होऊन अनियंत्रित झाले. परिणामी शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली लालकिल्ल्यावर वेगळ्याच रंगाचे ध्वज फडकावल्या गेले. ही कृती केवळ निंदनीयच नसून राष्ट्रीय अपराध मानावी इतकी अश्लाघ्य स्वरूपाची आहे. आंदोलन म्हणजे कायदेशीर अपराधच असतो आणि आंदोलकांनी एक नव्हे तर हजार अपराध हजारदा करायचेच असतात पण केलेले अपराध मानवतेच्या विनाशासाठी नव्हे तर मानवतेच्या उत्थानासाठी करायचे असतात, इतके स्मरण आंदोलकांना सदैव असले पाहिजे. धार्मिक झेंडा लाल किल्यावर फडकवण्याऐवजी;
 
या देशाचे पालक आम्ही, सच्चे कास्तकार रे
लालकिल्ल्याच्या सिंहासनाचे, आम्हीबी हकदार रे
 
अशा प्रामाणिक भावनेने निधड्या छातीच्या प्रामाणिक शेतकरी आंदोलकांनी लाल किल्यावर "किसान आंदोलनाचा" झेंडा फडकावला असता तर तोही अपराध झाला पण शेतकरी आंदोलनाची आन-बान-शान वाढवणारा अपराध झाला असता. प्रत्येक शेतकऱ्याची छाती अभिमानानाने फुगून आली असती आणि असा अपराध करून फासावर जायची वेळ आली तरी हसत हसत सन्मानाने फासावर जाण्याची तयारीही दाखवता आली असती.
 
पण आता साराच केर मुसळात जाण्याची वेळ आली आहे असे कालच्या घटनाक्रमावरून दिसत आहे. हिंसाचार नेहमी सत्तेलाच परवडतो, आंदोलकांना फायदेशीर ठरूच शकत नाही. आता आयते हाती कोलीत मिळाल्याने सरकार आणखी मजबूत होईल. हे तीन विधेयक मागे तर घेणारच नाही याउलट आणखी काही कायदे नव्याने करतील. सरकारची पुढील पावले शेतीला फायद्याचीच असतील असे अजिबात नाही. कदाचित शेतीला भयानक मारक ठरणारी असू शकतील. तीन विधेयकासारख्या शेतीला अनुपद्रवी असलेल्या किरकोळ बाबीवर या आंदोलनाने अमाप शक्ती खर्च करून टाकली. आता सरकार शेतीविरोधी ठोस निर्णय घेईल तेव्हा त्याला विरोध करण्याची आंदोलकांची शक्ती संपलेली असेल आणि शेतकरी आंदोलनाप्रती असलेली जनतेची सहानुभूतीही संपलेली असेल.
 
माझे आकलन मला असे सांगते कि आजपासून दिल्ली शेतकरी आंदोलन संपल्यात जमा आहे. एकदा जे करायला नको होते तेच करून झाल्याने आता शांततामय मार्गाने दहा-पाच वर्षे जरी आंदोलन सुरु ठेवले तरी ते प्रभावशून्य असेल. अहिंसा हेच जगातील सर्वात प्रभावी हत्यार आहे पण हिंसक मार्ग एकदा जरी अवलंबला तरी अहिंसेचे अस्त्र पूर्णपणे बोथट होऊन जाते; इतकेच नव्हे तर अहिंसेची भाषा मग केवळ दुर्बलांची होऊन बसते.... शूरांची नाही.
(क्रमश:)
 
- गंगाधर मुटे आर्वीकर
=========
१) दिल्ली शेतकरी आंदोलन शेतीविरोधी : भाग-१ >>> http://www.baliraja.com/node/2370
२) अप्रामाणिक शेतकरी आंदोलन : भाग-२ >>> http://www.baliraja.com/node/2412
३) शेतकरी आंदोलन नव्हे; राजकीय कुभांड : भाग-३  >>> http://www.baliraja.com/node/2413
४) निर्बुद्ध शेतकरी नेता टिकैत : भाग-४  >>> http://www.baliraja.com/node/2414
५) शेतकरी आंदोलन आंधळे व सरकार बहिरे : भाग-५ >>> http://www.baliraja.com/node/2416
६) बुद्धिबळ व भुजबळाची लढाई : भाग-६ >>> http://www.baliraja.com/node/2417
 

शेतकरी आंदोलन

Share