Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक
नियोजित संमेलनाचे प्रारूप, उपक्रम आणि गुरुकुंजाला कसे पोचावे याबद्दल इत्यंभूत माहिती देणारा व्हीडिओ.
शेतकरी साहित्य संमेलनाचे LIVE प्रसारण "शेतकऱ्यांची चावडी" या You Tube चॅनेलवर होणार आहे.
त्यासाठी आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



शेतकरी आंदोलन नव्हे; राजकीय कुभांड : भाग-३

शेतकरी आंदोलन नव्हे; राजकीय कुभांड : भाग-३
 
           खायचे दात वेगळे असणे आणि दाखवायचे दात वेगळे असणे, हा काही नवखा किंवा इतक्यात मानवी जनुकांत बदल होऊन मनुष्यात तयार झालेला नवखा गूण नाही. हा फार जुना मानवी स्वभाव आहे, जो अनेक मनुष्यप्राण्यामध्ये अनादिकाळापासून हमखास आढळत आलेला आहे. जो गूण अंनत काळपर्यंत मानवी स्वभावात टिकून राहतो तो शरीराशी काळाच्या ओघात इतका एकरूप होऊन जातो की स्थायी गुणामुळे अंतर्गत जनुकांची रचनाच बदलून जाते. नंतर मग हीच जनुके एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आणि दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे सरकत राहतात. असा मनुष्य जन्मतःच वडिलोपार्जित वारसाहक्काने जातिवंत सोंगी-ढोंगी लबाड लांडगा असल्याने तशीच जीवनशैली अंगीकारत पुढे पिढ्यानपिढ्या जगत राहतो.
 
         अनेकांची जीवनशैली मात्र संसर्गामुळे बदलत असते. घरात मायबापांनी कितीही चांगले आनुवंशिक जनुके पुरवून जन्माला घातले आणि बालपणी कितीही चांगले संस्कार दिलेत तरी ऐन उमेदीच्या संवेदनशील काळात माणसाचा संपर्क बाह्य जगातील चुकीच्या मित्रमंडळींशी आला तर संगतीचे संक्रमण होऊन नराचा वानर व्हायला वेळ लागत नाही. कुसंगतीचे संक्रमण इतके सावकाश, मंदगतीने आणि प्रभावीपणे होत असते कि, ज्याची त्याला लक्षणेच आढळत नाहीत. स्वस्वभावात इतके बेमालूमपणे बदल होऊन जातात कि ज्याची त्याला पुसटशीही कल्पना येत नाही; मात्र तो पुरता जातिवंत सोंगी-ढोंगी लबाड लांडगा झाले असतो.
 
         याउलट काही मनुष्य जातिवंत सोंगी-ढोंगी लबाड लांडगे वगैरे नसतातच. ते सजग असल्याने त्यांच्या हातून थोडीशी जरी लबाडी झाली तरी त्यांच्या स्वतःच्या नजरेतून ती सुटत नाही. स्वाभाविकच असा मनुष्य सोंग-ढोंग-लबाडी करायला लागला की, ती लबाडी कृत्रिम असल्याचे कुणाच्याही सहज लक्षात येतेच पण त्याच्या स्वतःच्याही लक्षात येतच असते. आपण करतोय ती लबाडी आहे, हे माहीत असतानाही तो लबाडी का करत असेल बरे? असा प्रश्न स्वाभाविकपणे उपस्थित होत असला तरी आणि हा प्रश्न गहन असला तरी त्याचे उत्तर मात्र गहन नसून अगदीच साधे सोपे असते. कुवतीबाहेरची लालसा आणि कुवतीबाहेरची महत्वाकांक्षा असणे हेच त्याचे उत्तर असते. जितकी ज्याची कुवत असेल तितके त्याला अगदी सहजपणे मिळून जाते. त्यासाठी प्रामाणिकतेशी तडजोड करायची गरज भासत नाही आणि लबाडीचा आधारही घ्यावा लागत नाही पण कुवतीबाहेरचे अपेक्षित असेल तर स्वत्वाशी नुसत्यात तडजोडी करत राहणे भाग पडत असते.
 
           भारतीय मनुष्य राजकारणापायी चक्क पिसाळलेल्या अवस्थेला पोचलेला आहे असे मी वारंवार मांडत आलो आहे. कुवतीएवढे मिळाल्याने ज्याचे समाधान होत नाही तेव्हा तो कृत्रिम सोंग-ढोंग-लबाडीचा आधार घेऊन आपले ईप्सित साध्य करायचा प्रयत्न करत असतो. कुणाला आपला पक्ष सत्तेवर आणायचा असतो, कुणाला आपल्या जातीची सत्ता स्थापित करायची अभिलाषा असते तर कुणाला आपल्या धर्माची वगैरे वगैरे. राजनीतीमध्ये साम-दाम-दंड-भेदाचा वापर करण्याची औपचारिक मान्यता आहेच पण सारेच कुवतीबाहेर असल्याने तेवढ्यानेही जेव्हा कार्यसिद्धी पूर्णत्वास जाण्याची शक्यता दिसत नाही तेव्हा लबाडी इतकी पराकोटीला पोचते की त्या क्षेत्रातील सारेच्या सारे पिसाळलेल्या अवस्थेला पोचायला लागतात.
 
           दिल्ली शेतकरी आंदोलन हे अशाच पिसाळलेल्या राजकीय लोकांचे कुभांड-कारस्थान आहे. त्या आंदोलनाला शेतीच्या दुर्दशेशी कवडीचेही देणेघेणे नाही. शेतकऱ्यांना अर्थशास्त्र कळत नसल्याने त्यांची दिशाभूल करत आपापले शेतीबाह्य मनसुबे पूर्ण करण्यासाठी लबाडीचा वापर करत उभे झालेले हे शेतकरी आंदोलन आहे.
 
खूप झाकले पदराखाली पण; काय झाकले गेले?
एक हवेची झुळूक आली अन सारे उघडे पडले
 
           आमचे एकेकाळचे हंगामी सहकारी थोर व महान शेतकरी नेते सन्माननीय डॉ. गिरधर पाटील त्यांच्या लेखात काल काय लिहून गेलेत बघा. म्हणतात ना कि माणसाने कितीही सोंग-ढोंग केले तरी तो कधी ना कधी उघडा पडतोच. शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन राजकीय लांडगे आपापले छुपे एजेंडे साध्य करू पाहात आहेत. हेच आहे यांचे असली रूप. ना यांना शेतकऱ्यांशी देणे घेणे, ना यांना शेतीच्या समस्यांशी देणे घेणे.
 
उघडा डोळे वाचा नीट......
 
       पाटील साहेब आपल्या लेखात लिहितात की, "सदरचा उठाव हा प्रचलित अर्थाने माध्यम केंद्रित न ठेवता एका सुप्त पातळीवर काम करत निवडणुक हेच मोठे आंदोलन समजत तशी आखणी करावी लागेल. अशा प्रयत्नांतून निर्माण होणाऱ्या शक्यता गृहित धरत त्या कशा असाव्यात याचा फारसा आग्रह न धरता सत्ताबदलाचे अंतिम ध्येय कसे गाठता येईल याचा विचार व्हावा."
 
       स्वतःला महान शेतकरी नेता समजणारा हा लेखक शेतकरी आंदोलनाचे अंतिम ध्येय्य सत्ताबदल आहे, हे नकळतपणे लिहून गेला आहे. याचा अर्थ शेतकरी आंदोलन आणि तीन विधेयक रद्द करण्याची मागणी केवळ केंद्रात सत्ताबदल करण्यासाठी वापरायचे एक साधन आहे, केवळ एक हत्यार आहे. असली उद्देश तर केंद्रात सत्ताबदल घडवून आणणे, हेच आहे आणि त्यासाठी शेतकरी आंदोलनाचा वापर केला जात आहे. 
 
      लोकशाहीत सत्ताबदल करण्याचा प्रत्येक मतदाराला अधिकार आहे. ज्यांना सत्ताबदल करावासा वाटतो त्यांनी त्यासाठी प्रयत्न करणे हा अगदी लोकशाहीचा भाग असून ते सजग मतदारांचे कर्तव्यच आहे. पण तुम्ही जर सिंह असाल तर करा ना स्वसामर्थ्याने सत्ताबदल. तुम्ही लबाड लांडगे बनून स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी शेतकऱ्यांना निष्कारण शेतीबाह्य कारणावर का चुलीच्या आगीत झोकता आहात? या प्रश्नाचे उत्तर या लबाड लांडग्यांनी दिले पाहिजे की नाही?
 
पाटील साहेब आपल्या लेखात आणखी असेही लिहितात की, "आज विरोधकांना नामशेष करण्यात इडी, सीबीआय, आयकर, करसंकलन यांचा वेचक वापर होऊ लागला आहे."
 
       म्हणजे काय ब्वॉ?  म्हणजे असे कि, इडी, सीबीआय, आयकर, करसंकलन थांबवण्यासाठी शेतकरी आंदोलन आणखी तीव्र करणे गरजेचे आहे. पाटलांना कधीच समर्पक उत्तरे देता येत नाही म्हणून मी त्यांना प्रश्नही विचारत नाही. त्याऐवजी हा लेख वाचणाऱ्यांना मी प्रश्न विचारतो आहे कि; राजकीय पुढाऱ्यांमागची बला जसे कि; इडी, सीबीआय, आयकर यांचा ससेमिरा थांबवण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन का करावे? ज्यांना याचा जाच आहे, ज्यांना  इडी, सीबीआय, आयकर चा गैरवापर करून नामोहरण केले जात आहे, त्यांनीच आंदोलन का करू नये? शेतीबाह्य प्रश्नावर शेतकऱ्यांची आहुती का देत आहेत हे लोक? प्रश्न त्यांचेच आहेत तर तेच स्वतःची आहुती का देत नाहीत?
 
पाटील साहेब पुढे आपल्या लेखात आणखी असेही लिहितात की, "सामान्य नागरिकांना जेरीस आणण्यासाठी वाहन व वाहतुकीचे कायदे, बँकिग व आर्थिक निर्बंध, सक्तीच्या वसूल्या आणत इंधनाच्या दराचे कोलित वापरत त्यांना जखडून ठेवण्याचा प्रयत्न होत आहे."
 
          हे खरे आहे असे जरी गृहीत धरले तरी हे काय शेतीचे प्रश्न आहेत का? सामान्य जनतेचे प्रश्न असेल तर आंदोलनही सामान्य जनतेलाच करावे लागेल ना? प्रश्न सामान्य जनतेचे आणि आंदोलन करण्यासाठी मात्र शेतकऱ्यांना वापरून घेतले जाणे, हे आहे दिल्ली शेतकरी आंदोलनाला पाठींबा देणाऱ्याचे असली रूप.
 
        शेतकरी आंदोलन केवळ शेतीचे प्रश्न सोडवण्यासाठी असले पाहिजे. शेतकरी आंदोलनाचे पावित्र्य अबाधित राखायचे असेल तर सर्वप्रथम अशा ढोंगी लबाड लांडग्याचे बुरखे टराटरा फाडून टाकले पाहिजेत. या लबाड लांडग्याविषयी शेतकऱ्यांनी सहानुभूती ठेवली तर हेच उद्या आस्तिनचे साप बनून शेतकरी आंदोलनाचा घात करतील, इतके लक्षात घेतलेच पाहिजे.
(क्रमशः)
 
- गंगाधर मुटे आर्वीकर
========
१) दिल्ली शेतकरी आंदोलन शेतीविरोधी : भाग-१ >>> http://www.baliraja.com/node/2370
२) अप्रामाणिक शेतकरी आंदोलन : भाग-२ >>> http://www.baliraja.com/node/2412
३) शेतकरी आंदोलन नव्हे; राजकीय कुभांड : भाग-३  >>> http://www.baliraja.com/node/2413
४) निर्बुद्ध शेतकरी नेता टिकैत : भाग-४  >>> http://www.baliraja.com/node/2414
५) शेतकरी आंदोलन आंधळे व सरकार बहिरे : भाग-५ >>> http://www.baliraja.com/node/2416
६) बुद्धिबळ व भुजबळाची लढाई : भाग-६ >>> http://www.baliraja.com/node/2417
 
Share

प्रतिक्रिया