नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
लेखनविभाग : छंदमुक्त कविता
'दुर्लक्षित कोविड योद्धा बळीराजा'
कोरोणासाठी वाजवले ताट कोणी वाजवला कोपर
बांधून घंटी बैलाला आम्ही हाती घेतला वखर
असाच खेळ चालू असतो आमचा सदैव मातीशी
उद्देश आमचा एकच असतो कुणी राहू नये उपाशी ||१||
घरात बसले लावून कुणी कूलर कुणाचा एसी चा थाट
तेव्हा उन्हात होत होती आमच्या घामानेच आमची थंड पाठ
अशीच झुंज चालु असते ऊन-पाऊस, विजा, वाऱ्याशी
उद्देश आमचा एकच असतो कुणी राहू नये उपाशी ||२||
एका ढेकळाचे दोन केले दोनाचे केले राबून चार
माती भुसभुशीत करून केलं जोंधळ्याच शेत तयार
ज्वारी, बाजरी, सोयाबीन आणि लावायची जरा कपाशी
उद्देश आमचा एकच असतो कुणी राहू नये उपाशी ||३||
सारे कारखाने बंद पडले जगाचे एकाच वेळी
आम्ही राहिलो राबत कुणाचा जाऊ नये भुकेने बळी
लाख संकटे आली तरी लावू धान्याच्या राशीच्या राशी
उद्देश आमचा एकच असतो कुणी राहू नये उपाशी ||४||
मंदिर, मज्जित उघडा म्हणून लोक लढतात एकमेकात
कुणी सांगावे त्यांना देव असतो उभ्या पिकात
इथेच आमची असते पंढरी आणि इथेच असते काशी
उद्देश आमचा एकच असतो कुणी राहू नये उपाशी ||५||
डॉक्टर, पोलीस यांना म्हटलं जातं कोविड योद्धा
तसबीज होते त्यांच्यासाठी मिळतात पन्नास लाख सुद्धा
आम्हीही लढतो आहो कोरोणा उठला जरी जिवाशी
उद्देश आमचा एकच असतो कुणी राहू नये उपाशी ||६||
नका म्हणू योद्धा आम्हा नको कुठला मानपान
पदरात टाका तुम्ही आमच्या रास्त भावाचे दान
अशक्य होते जगणे तेव्हाच लावतो गळ्याला फाशी
बाकी उद्देश आमचा एकच असतो कुणी राहू नये उपाशी
कुणी राहू नये उपाशी ||७||
राजेश हनुमंतराव अंगाईतकर
मयादेवी प्लॉट, स्टेट बँक चौक, यवतमाळ ४४५००१
७०२०७६३९५५
प्रतिक्रिया
मार्मिक रचना सर
मार्मिक रचना सर
रवींद्र अंबादास दळवी
नाशिक
धन्यवाद दळवी सर
धन्यवाद दळवी सर
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!