
नमस्कार ! ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
चौदावे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन
व्योमव्यापी फाउंडेशन आणि शेती अर्थ प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चौदावे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन दाभे मोहन, जावळी तालुका महाबळेश्वर येथे दिनांक 21, 22 फेब्रुवारी 2026 रोजी संपन्न झाले. प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अति दुर्गम भागात येथील तरुण मुले रोजगारासाठी पुणे, मुंबई येथे वास्तव्यास असून त्यांचे म्हातारे आई-वडील, वयस्क मंडळी गावात दिसून आली.या गावात साधे एकही किराणा दुकान आढळले नाही. काही जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी 24, 25 किलोमीटर जावे लागते असे हे दाभेमोहन गाव.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत चौदाव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने सकाळच्या वेळेत, पक्षांच्या किलबिलाटात कोयना नदीच्या संथ प्रवाहातून नावेतून ग्रंथ दिंडी पुढे पुढे आली.
जणू काही तुकारामाची गाथा इंद्रायणीत तरंगली असे म्हटले जाते अगदी त्याच पद्धतीने आयोजक अँड मा. सतीश बोरूळकर सरांच्या कल्पकतेतून निसर्गाच्या सानिध्यात ग्रंथदिंडीची सुरुवात संमेलनाध्यक्षांच्या खांद्यावर घेऊन राम कृष्ण हरीच्या गजरात भजन, गवळण, फुगडी, ज्ञानोबा तुकाराम माऊलीच्या गजरात संमेलन स्थळापर्यंत पोहोचली.
चौदाव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष लातूर येथील ज्येष्ठ साहित्यिक, शेती साहित्य अभ्यासक मा. प्राध्यापक डॉक्टर ज्ञानदेव राऊत सर हे होते तसेच महाबळेश्वर येथील प्रगतिशील शेतकरी मा. किसन सेठ भिलारे, मा. उद्योजक प्रमोद कुमार बेलसरे, मा. चंद्रलेखा बेलसरे, अतिथी मा. सुरेश मोहितकर शेतकरी साहित्य चळवळीचे संस्थापक अध्यक्ष मा. गंगाधर मुटे सर,ज्येष्ठविधीज्ञ मा. सतीश बोरुळकर सर आणि ताई तसेच इतर निमंत्रित साहित्यिक आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीत मान्यवर पाहुण्यांनी दीप प्रज्वलन करून या संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटनानंतर मा.कवी रवींद्र दळवी यांच्या "दिवाबत्ती" या (वऱ्हाडी - बोली) काव्य संग्रहाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या संमेलनात शिवाजी महाराजांचा इतिहास पुन्हा एकदा नव्याने अॅडवोकेट बोरूळकर सरांच्या भाषणातून ऐकायला मिळाला तसेच स्ट्रॉबेरीची लागवड आणि स्ट्रॉबेरी महाराष्ट्रात कशी आली ते महाबळेश्वर येथील प्रगतिशील शेतकरी मा. किसन भिलारे यांच्या भाषणातून समजले.
शेती अर्थ प्रबोधिनीचे कार्याध्यक्ष गंगाधरजी मुटे सरांनी शेतकऱ्यांचे दुःख, कष्ट, वेदना आणि शेतीमातीचे गहन वास्तव आपल्या मनोगतातून मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेतकरी संघटनेचे नेते मा.खांदेभराड यांनी केले.
या संमेलनात शेतकरी कवी संमेलन, शेतकरी गझल मुशायरा, परिसंवाद, कथाकथन असे विविधांगी सत्र घेण्यात आले. प्रत्येक साहित्यिकांनी आपल्या मनातील शेती आणि शेतकऱ्यांच्या विषयीच्या भावभावना आपल्या कवितेतून, गजलेतून, परिसंवादातून व्यक्त केल्या.
बोरूळकर ताईंचे संचालन आणि दिव्यांग दृष्टी कलाकारांच्या सांगितिक कार्यक्रमाने रात्रीच्या वेळी
तिथले वातावरण जणू काही विठ्ठलमय झाले असे भासत होते.
निसर्गाच्या सहवासात राहून आम्ही निसर्गाशी एकरूप झालो आणि संमेलनाचे मुख्य कार्याध्यक्ष मा. गंगाधरजी मुटेसर,आयोजक अॅडवोकेट मा. सतीश बोरुळकर सर, संयोजक उद्योजक मा प्रमोदजी बेलसरे, ज्येष्ठ साहित्यिका, संपादिका सौ चंद्रलेखाताई बेलसरे यांनी राहण्याची व्यवस्था डोंगराच्या पायथ्याशी टेन्ट मध्ये निसर्गाच्या सानिध्यात केलेली होती. टेन्टमध्ये जंगलात राहण्याचा जीवनातील आयुष्यात कधीही न विसरणारा एक आगळावेगळा आल्हाददायक अनुभव पाठीशी घेऊन आम्ही संमेलन संपवून आपल्या परतीच्या प्रवासाला निघालो;
पुढील वर्षाच्या संमेलनाच्या प्रतीक्षेत...
सौ सुरेखा बोरकर
नागपूर