शोषकांना पोषक
जातीयवादाचा भस्मासुर
प्रास्ताविक
शेतकरी आंदोलन निर्णायक पायरीवर आले आहे. शेतीमालाला रास्त भाव मिळाला पाहिजे आणि शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे असे मानणारा पंतप्रधान देशाला मिळाला आहे. शेतकरी आंदोलनाची सार्थकता नजरेच्या टप्प्यात आली आहे; पण याच वेळी शेतकरी आंदोलन उखडले जाण्याचाही धोका तयार झाला आहे. जातीयवादी आणि धर्मवादी यांचे घनदाट सावट देशभर पसरले आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर तर त्यांना जणू सगळा देशच अर्धाअधिक आपल्या जबड्यात आलाच आहे असा हर्षोन्माद झाला आहे.
क्षुद्रवाद्यांच्या या धोक्यासंबंधी मी शेतकरी आंदोलनाच्या अगदी पहिल्या कालखंडापासून भाषणांतून, लेखांतून वारंवार धोक्याची सूचना दिलेली आहे. त्यातील काही भाषणे आणि लेख या पुस्तिकेत एकत्र छापलेले आहेत. शेतकरी संघटनेने जातीयवादाच्या भस्मासुराला तोंड देण्यासाठी जी आघाडी उघडली आहे, तिच्या कामी ही पुस्तिका पडावी अशी आशा आहे.
२ जानेवारी १९९० पासून शेतकरी संघटनेमार्फत फुले-आंबेडकर यात्रा सुरू होत आहे. १९९० हे मोठ्या चमत्कारिक योगायोगाचे साल आहे. १८९० साली म. जोतीबा फुल्यांचे देहावसान झाले आणि त्याच वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. यावर्षी महाराष्ट्राच्या या दोन समतासंतांची शताब्दी आहे - एकाची स्मृतिशताब्दि, दुसऱ्याची जन्मशताब्दी.
आणि याच वर्षी सारा देश क्षुद्रवाद्यांच्या कचाट्यात सापडतो की काय अशी भीती तयार झाली आहे.
१९८७ मध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या निमित्ताने मी म्हटले होते, की बाबासाहेब आंबेडकर आणि जोतीबा फुले यांच्या शताब्दीच्या वर्षी एखादा दलितशोषित देशाचा पंतप्रधान पाहायला मिळावा. आज भीती अशी वाटते, की बहुसंख्यांक धर्माची आणि अल्पसंख्याक जातीची ठोकशाही या वर्षी अवतरते का काय? १९४७ मध्ये जातीयवादाच्या वावटळीची अशीच परिसीमा झाली होती. देशाची फाळणी झाली. एका युगपुरुष महात्म्याची हत्या झाली आणि असे वाटले, की महात्म्याच्या रक्ताची किंमत देऊन तरी जातीयवादाचा भस्मासुर कायमचा गाडला गेला; पण त्या ब्रह्मराक्षसाने ३५ वर्षांच्या आतच पुन्हा डोके वर काढले.
जातीयवादाच्या बीजारोपणाची प्रक्रिया
या जातीयवादी भस्मासुराचा उदय वेगवेगळ्या प्रकारांनी आणि वेगवेगळ्या दिशांनी झाला. मुंबईतील वाढत्या बेरोजगारीचा प्रश्न अधिकाधिक क्रूर बनला. बेकारीत होरपळणाऱ्या मराठी तरुणांना सगळेच भविष्य काळोखे दिसत होते. शिवाजीचे नाव घेऊन कोणी मद्राशांना काढून लावण्याची द्वेषमोहीम उघडली, त्याचेही त्यांनी स्वागत केले. बेकारांना प्रांत नसतो, जात नसते, धर्म नसतो एवढे भान त्यांना कोठले असायला? मद्राशांविरुद्धची मोहीम आटोपली, मराठी तरुणांची बेकारी कमी झालीच नाही, उलट वाढली.
मग शिवाजीचे नाव घेऊन पुन्हा उत्तर प्रदेशातील भैयांविरुद्ध मोहीम काढण्यात आली, केरळातून मुंबईपर्यंत येऊन नारळ विकून पोट भरणाऱ्या मल्याळीविरुद्ध द्वेषमोहीम काढण्यात आली. राखीव जागांच्या निमित्ताने दलितांवरही आगपाखड करून झाली. गरिबीचे खतपाणी मिळालेल्या देशात द्वेषाचे बियाणे पसरले तर वारेमाप पीक येते हे अनेक चलाखांच्या लक्षात आले.
हे चलाख काही कोण्या एका धर्माचे, एका जातीचे, एका भाषेचे किंवा प्रांताचे नाहीत. सगळ्याच धर्मांत, जातींत, भाषांत आणि प्रांतांत हे चलाख दुष्टबुद्धी निपजतात. देशाच्या विकासाच्या प्रवाहाला तुंबारा पडला, पाणी साचले, शेवाळे आणि घाण जमू लागली, की अशा क्षुद्र किड्यांची वळवळ सुरू होतेच. तुंबारा फोडून प्रवाह मोकळा करून देणे महत्त्वाचे नाही, डबक्यातील अपुऱ्या अन्नकणांसाठी एकमेकांचे कोथळे काढणे महत्त्वाचे आहे असे आक्रोशाने सांगणारे कीटकवीर पुढारी आणि सेनापती बनतात.
१९८१ मध्ये दक्षिणेत मीनाक्षीपुरम् येथे मोठ्या संख्येने दलितांनी धर्मांतर केले. आपल्या धर्मातील कोट्यवधी दलितांचा काय चरितार्थ चालतो याची कधी काळजी न करणाऱ्या धर्ममार्तंडांना धर्म बुडतो का काय अशी मोठी चिंता पडली. काश्मीरचा वाद तर सतत जळतच आहे. याच दशकात पंजाब प्रकरणही पेटले. आसामात शिरणाऱ्या बांग्लादेशी शरणार्थीचा प्रश्न असाच गंभीर बनला. गुरखेदेखील स्वायत्ततेसाठी उठतात का काय अशी धास्ती तयार झाली. शहाबानोप्रकरणी मुस्लिम स्त्रियांच्या माणूसपणाच्या अधिकाराचा बळी देऊन, राजीव गांधींच्या शासनाने मुल्लामौलवींची मनधरणी केली. कोणत्याही घरातील मोठ्या भावाला छोट्या भावंडाचे कौतुक जास्त होते अशी खंत व चीड असतेच. अल्पसंख्याकांचा अनुनय होतो आहे असा संघटित प्रचार करायला लागले तर बहुसंख्याकांच्या मनातही विद्वेषाची ठिणगी पडायला वेळ लागत नाही. अयोध्येतील राजमन्मभूमीच्या वादामुळे सर्व हिंदूंच्या मनांतील तारा कोठे ना कोठे छेडल्या गेल्या आणि प्रत्येक समाजातील माणसे मोठ्या संख्येने 'आम्ही' आणि 'बाकीचे' असा विचार करू लागली.
'जातीयता' वास्तविक किती?
खरे म्हणजे अशी भावना ही कधी वस्तुस्थितीशी जुळणारी असूच शकत नाही. ज्यू तेवढे हरामखोर अशी बुद्धी एखाद्या हिटलरच्याच डोक्याला शोभते. सर्व समाजातील सुष्टदुष्टांचे प्रमाण जवळजवळ सारखेच असते. भौगोलिक, आर्थिक, सामाजिक परिस्थितीत फरक असेल त्यानुसार सुष्टदुष्टांच्या टक्केवारीत काय थोडाफार फरक होईल तो होवो.
मग तरीही देशात अशी फुटाफूट का झाली? कोणी म्हणेल लोकांच्या मनातली देशभक्तीची भावना कमी झाली आहे; पण हे किती खोटे आहे! देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत मरणदेखील कवटाळले त्या देशातल्या तरुणांच्या मनातील देशभक्ती एकदम आटून गेली कशी? पाकिस्तानबरोबरच्या लढायांत चार चार वेळा इतर जवानांच्या बरोबरीने लढणारा शीख तरुण सगळ्या 'हिंदूस्थान'बद्दल एकदम एवढ्या चिडीने का बोलू लागला? भारतीय लष्करात परम शौर्य गाजवणारे गुरखे एकदम एवढे नाराज का झाले? मुस्लिम जमातीचा प्रश्न आणि दलितांचा प्रश्न पेटतच का राहिले?
हिंदू आणि मुसलमान यांच्यातील प्रश्न सोडविणे खरोखरच बिकट आहे. मुसलमान जमातीचे काही मूठभर नेते शहरात राहतात, व्यापार धंदा करतात आणि त्यांतील काही चांगले धनाढ्यही आहेत; पण सर्वसाधारण मुसलमान दलितांपेक्षाही दलित आहेत. खरे सांगायचे तर त्यांच्यातील अनेकांचे पूर्वज भणंग दारिद्र्यामुळेच धर्मांतराकडे वळले. धर्म बदलल्याने आर्थिक हालाखी संपली नाही; पण इस्लामने थोड्याफार प्रमाणात माणूस म्हणून मान आणि अभिमान दिला. गावातला मुलाणी, छोटा शेतकरी, कारागीर, विणकर, रिक्षावाले आणि छोट्यामोठ्या कारखान्यांत काम करणारा संघटित मजूर हे भारतातील मुसलमानाचे प्रातिनिधिक चित्र आहे. दलितांना मिळणाऱ्या सोयीसवलतीही त्यांना नाहीत. बहुसंख्याक समाज त्यांच्याकडे संशयाने पाहतो. संशयातून दुरावा तयार होतो आणि त्यातून पुन्हा संशय अशा दुष्टचक्रामुळे दोन समाजांत एक अक्राळविक्राळ दरी सतत रुंदावते आहे.
भूमिहीन शेतकऱ्याचे आणि छोट्या कारागिरांचे प्रश्न सुटल्याखेरीज सर्वसामान्य मुसलमानाच्या मनातील असुरक्षिततेची आणि कोंडले गेल्याची भावना दूर होणे कठीण आहे. मग तो सहजपणे आर्थिक विकासापेक्षा 'आखिरात' जास्त महत्त्वाची आहे असे निकराने सांगू लागतो. या वातावरणाचा फायदा त्यांचे शहरी पुढारी घेतात. परिणामतः स्वातंत्र्याच्या एखाद्यातरी प्रकाशकिरणाकरिता मनात आक्रंदणाऱ्या मुसलमान मायबहिणीसुद्धा 'शरियत'चे समर्थन करू लागतात. मुस्लिम समाजाचे अर्थकारण करणारा नेता जन्मलाच नाही हे मोठे दुर्दैव आहे.
दलितांची परिस्थितीही काही फार वेगळी नाही. हिंदू समाजापासूनची त्यांची फारकत काही बाबतीत थोडीफार कमी तर काही बाबतीत पुष्कळ जास्त. गावच्या वतनदार महाराला चावडीसमोर कमरेत वाकून जावे लागे; पण तोच मुसलमान बनला तर जोडे घालून थेट चावडीपर्यंत जाऊ शके. मीनाक्षीपुरमचा हाच धडा आहे. इस्लामने त्याच्या आश्रयाला आलेल्यांना काही सन्मान दिला. बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशाप्रमाणे बुद्धाला शरण गेलेल्यांना सन्मानाचे भाग्यही मिळाले नाही. दलितांत कुणी मोठा व्यापारी, कारखानदारही नाही. समाजाचे नेतृत्व राजकीय सत्तेच्या काही दलालांकडे आणि राखीव जागेच्या धोरणाचा फायदा मिळालेल्या काही भाग्यवानांकडे. मुस्लिम नेतृत्वाप्रमाणेच दलित नेतृत्वालासुद्धा चिंता आहे ती- दलितत्व संपविण्याची नाही, तर आपले नेतृत्व टिकविण्याची. कोणी समाज दुष्ट आहे म्हणून देश फुटू लागलेला नाही. भारत वैभवाच्या दिशेने झेपावत असता तर आसपासचे देशसुद्धा भारताशी घनिष्ठ आर्थिक-सामाजिक संबंध असावेत म्हणून धडपड करत राहिले असते. युरोपातील देशांप्रमाणे राजकीय सहयोगाचीही अपेक्षा त्यांनी बाळगली असती. आज देशातले गट फुटू पाहत आहेत ते मनातील दुष्टतेमुळे नाही, आर्थिक पीछेहाटीच्या ताणातुळे.
शेतीची लूट हाच इतिहास
पण हे लक्षात कोण घेतो? दलितांबद्दल तिरस्कार अनेक सवर्णांच्या मनात मुरलेला आहे. शाळेतल्या प्रत्येक वर्गात शिकवला जाणारा इतिहास हिंदूंच्या मनात मुसलमानांचा द्वेष बिंबवतो तर मुसलमानांच्या मनांत हिंदूंचा. खरे पाहिले तर, सगळ्या इतिहासाचा सारांश म्हणजे शेतकऱ्यांचे शोषण आणि त्यातून निघणारी बलदंडांची ऐष एवढाच आहे. शेतकऱ्यांना लुटणारे कधी जवळचे, आपल्याच भाषेचे, धर्माचे असतात तर कधी ते दुरून येतात. सगळी धर्मव्यवस्था हीच मुळात शेतकऱ्यांच्या शोषणाच्या उद्देशाने तयार झाली. शेतकऱ्यांना लुटून एकत्र झालेली धनसंपत्ती परमेश्वराच्या धाकाने तरी सुरक्षित राहील या आशेने मोठी मोठी वेगवेगळ्या आकारांची वैभवशाली प्रार्थनामंदिरे उभी राहिली. काही काळ पापपुण्याच्या भीतीने लुटारूंनी मंदिरातील संपत्ती बिनधोक राखली. मंदिरे लुटण्यात, मूर्ती फोडण्यात पाप तर नाहीच; पण हक्काने स्वर्ग मिळवून देणारे पुण्य आहे असे परमेश्वराच्याच नावाने सांगणारा कुणी निघाला असता तर जगभर लुटीचे थैमान घालण्याचा खुलेआम परवाना मिळणार होता आणि तसा तो मिळालाही.
शतकानुशतके लुटालुटी झाल्या, रक्ताचे पाट वाहिले; पण या सगळ्या लढायांत शेतकऱ्यांना स्वारस्य कधीच वाटले नव्हते. अगदी लढाईची धुमश्चक्री चालू असताना शेतकरी शेतात उभे राहून लढाई पाहत राहत अशी इतिहासाची साक्ष आहे. लढाई जिंको कुणीही, लूट आसमंतातल्या शेतकऱ्यांचीच होणार आहे; जिंको कुणी, हरो कुणी, लुटले जाणार आपणच याची निश्चिती शेतकऱ्यांना होती.
शेतीचा तलवारीच्या धारेने होणाऱ्या लुटीचा तो काळ संपला. व्यापारी दीडदांडीच्या तराजूने आणि दामदुपटीच्या कर्जाने शेतीची लूट सुरू झाली आणि पहिल्यांदा शेतकरी या लुटीचा सामना करण्यास तयार झाला. त्या वेळेचे एक मोठे विचित्र दृश्य समोर येते आहे. त्याचे परिणाम इतके भयानक नसते, तर या दृश्याने हसूच यायला पाहिजे. शेतकऱ्यांना लुटण्याचा हक्क मिळावा म्हणून एकमेकांच्या कत्तली करणाऱ्यांचेच ऐतिहासिक वारसदार, त्या लढायांच्या काळात जे घडले, त्याचा सूड घेण्यासाठी, सर्वसामान्य शेतकऱ्यांनीच या लुटीच्या नवीन यंत्रणेविरुद्ध उठावे असे मोठ्या आवेशाने म्हणत आहेत.
जातीय दंग्यांची आजची निमित्ते
राखीव जागांचा प्रश्न नाही, रोजगाराच्या हक्काचा प्रश्न महत्त्वाचा आहे. समाजाच्या दृष्टीने काही प्रतीके महत्त्वाची असतात. गायीचे रक्षण हे अस्मितेचे प्रतीक म्हणून महत्त्वाचेच पण गाय शेतकऱ्याला खात असली तर केवळ धर्मभावनेच्या आधाराने तिचे रक्षण होणे कठीण आहे. रामजन्मभूमीसारखा प्रश्न महत्त्वाचा असू शकतो; पण राष्ट्रीय विकासाच्या प्रवाहाला तुंबारा पडून डबके झाले असताना हाच प्रश्न प्राधान्याने उठवणे यात काही अर्थ नाही आणि सद्हेतूही असू शकत नाही. गावातल्या गावात दोन खानदानांचे पिढ्यान् पिढ्या वैर असते. पोळ्याच्या पताकेखालून कोणाचे बैल पहिल्यांदा जायचे यावरून वर्षानुवर्षे डोकी फुटत राहतात. शेती तोट्यात, दुसरा काही व्यवसाय नाही, कर्ज तर प्राण घेऊ म्हणते असे सर्व बाजूंनी घेरल्या गेलेल्या माणसाने जगावे कसे? माणूस म्हणून अभिमान तरी कशाचा बाळगायचा? मग आर्थिक-सामाजिक लढाईत पराभूत झालेले शेजाऱ्यावर कुरघोडी करून आपली मान त्यातल्या त्यात उंच ठेवण्याचा प्रयत्न करतात.
रामजन्मभूमीसारखे प्रश्न वेगळ्या परिस्थितीत सहज सुटू शकतात. वाढत्या संपन्नतेच्या अवस्थेत वेगवेगळे समाज माणुसकी आणि उदारता दाखविण्याच्या मानसिकतेत येऊ शकतात. आजच्या आर्थिक परिस्थितीत हे प्रश्न उभे केले तरी ते सुटणार नाहीत. एक बाजू जिंकली तरी त्याची जखम दुसऱ्या बाजूवर राहणार आहे. आणि कधी ना कधी या जखमा सगळ्या समाजाचे जीवन नासवून टाकणार आहेत. या पलीकडे, हे प्रश्न आता उभे केल्याने वैभवाकडे जाण्याची वाटच बंद होणार आहे. वैभवाकडे जाणारा रस्ता शेतकऱ्यांच्या संपन्नतेच्या वेशीतूनच जातो. ही वेसच अडवली जाईल तर गरिबीही हटणार नाही; मग अस्मिता आणि प्रतीकांची फक्त राखच हाती येईल.
जातीय दंग्यांचे आजचे रूप
जातीय विद्वेष हा काही आता केवळ आगपाखडू भाषणांचा आणि लिखाणाचा विषय राहिलेला नाही. जातीयवादी आणि जमातवादी, शासनाची भीती न बाळगता ज्या प्रकारची भाषणे करतात त्यांचे त्रोटक अहवाल वाचले तरी धक्का बसतो; पण जमातवादी आता त्या पलीकडे गेले आहेत. राजकारणाचे गुन्हेगारीकरण जसजसे होत आहे तसतसे समाजचे समाज गुन्हेगारी प्रवृत्तीचे बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गुंड, पुढारी, आर्थिक हितसंबंधी - त्यांची धर्म, जात, कोणतीही असो- नियोजनपूर्वक दंगली आणि कत्तली घडवून आणतात. त्याला पोलिसांचीही साथ मिळते. अशा दंगली सुरू झाल्या, की शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, दलितांचे, स्त्रियांचे आवाज कत्तलीच्या कोलाहलात ऐकू येईनासे होतात.
हे दंगली घडवून आणणारे खेड्यापाड्यात नसतात, शहरांतून येतात. यांचा मुखवटा आता बदलला आहे; पण शेतकऱ्यांचा हा शत्रू इतिहासात शेतकऱ्याचे घर उजाड करण्याकरिता अनेकदा आला आहे. कधी लुटारूंच्या स्वरूपात आला, कधी भटशाहीच्या स्वरूपात आला, आता इंडियाचा हात म्हणून येतो आहे. या हाताचा बंदोबस्त करण्याची वेळ आजच आहे. जमातवादाच्या विरुद्धचे लढाईचे कुरुक्षेत्र महाराष्ट्र हेच आहे आणि या भस्मासुराला गाडण्याची जबाबदारी महाराष्ट्रातील शेतकऱ्यालाच पार पाडायची आहे.
हिंदू हा धर्म नव्हे, संस्कृती आहे
मी हिंदू घरात जन्मलो, ब्राह्मण घरात जन्मलो. आयुष्यातील पहिली १८-२० वर्षे सगळे धर्माचार केले, स्नानसंध्यादी विधी केले, पाठांतरही केले. आज मी यातले काहीही करत नाही. विश्वाच्या उत्पत्तीसाठी, जीवमात्राच्या उत्क्रांतीसाठी आणि मनुष्यसमाजाच्या विकासासाठी कोणी परमेश्वरी शक्ती असण्याची मला शक्यताही दिसत नाही आणि आवश्यकताही दिसत नाही. काही समजले असे आज वाटते, उद्या, कदाचित आज समजले सारेच चूक आहे असे ध्यानात येईल तर तेही मानायची माझी तयारी आहे. प्रत्यक्ष अनुभवाने, क्षणाक्षणाने आणि कणाकणाने जग समजण्याची पराकाष्ठा करणारा मी एक यात्रिक आहे.
माझ्यासारखा माणूस कोणत्याही धर्मात चालण्यासारखा नाही. प्रत्येक धर्माची एक पोथी असते, एक प्रेषित असतो आणि त्याने मांडलेली आचारविचाराची एक नैतिकता असते. ज्या काळात पोथी लिहिली गेली तो काळ सगळा बदलला तरी प्रेषितांचे उत्तराधिकारी त्याच आचरणनियमांचा आग्रह धरतात. यहुदी, ख्रिस्ती, मुसलमान हे असे बांधीव धर्म आहेत. त्यांच्यात माझ्यासारख्या यात्रिकाला जागा नाही; पण माझ्यासारखा यात्रिक हिंदू राहू शकतो. नरबलींनी चामुंडामातेला प्रसन्न करू पाहणाऱ्या अघोर भक्तापासून, श्वासोच्छ्वासात जंतू तर मरत नाहीत ना अशी चिंता बाळगणाऱ्या साधूंपर्यंत कोणीही हिंदू असू शकतो. कारण, हजारो वर्षे हिंदू हा शब्द एका खुल्या प्रयोगशाळेचे नाव आहे. हिंदू हा बंधने घालणारा बांधीव धर्म नाही. हिंदू ही एक संस्कृती आहे. याज्ञवल्क्य-पाराशरापासून चालणाऱ्या हिंदू परंपरेचा अभिमान कोणालाही वाटेलच. त्याचबरोबर मनुस्मृतीसारख्या काही ग्रंथांबद्दल शरमही वाटेल. जे हिणकस आहे ते फेकून देण्याची आणि चांगले आहे ते आत्मसात करण्याची हिंदू संस्कृतीने ताकदही दाखविली आहे. गेल्या शतकात कितीएक समाजसुधारकांनी वर्ण-जाति-आश्रमव्यवस्थेवर हल्ला केला आणि हिंदू संस्कृतीतला हा हिणकस भाग काढून टाकण्याचा प्रयत्न केला.
आज हिंदूत्वाचा झेंडा घेऊन नाचणारे खरे म्हटले तर हिंदूत्वाला छोटे करू पाहत आहेत, निव्वळ धर्मग्रंथ म्हणजे भगवद्गीता, हिंदू पुरुषार्थाचा रम्य आविष्कार म्हणजे भगवान श्रीकृष्ण अशी संकुचित मांडणी गेल्या शंभर वर्षांत हळूहळू पुढे येत आहे. यहुदी ख्रिस्ती, मुसलमान धर्मांची तुलना हिंदू संस्कृतीशी करणे अगदीच निरर्थक आहे; पण हिंदू संस्कृतीला असे बदनाम करण्याचा प्रयत्न हिंदूत्वाचे पोवाडे गाणारेच करीत आहेत. हिंदू धर्म हा शब्द आता जिभेवर रुळू लागला आहे, पार लोकांच्या बोलण्यात रूढ झाला आहे. हिंदू धर्माला याहीपलीकडे खाली खेचण्याकरिता त्यात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढविण्याचा भरकस प्रयत्न होतो आहे. यासाठी समर्थन म्हणून इतर धार्मिकांच्या चालचलणुकीकडे बोट दाखवले जाते. मुसलमान असे करतात मग आम्ही असे का करायचे नाही? ही भाषाच मुळी हिंदू परंपरेला शोभणारी नाही. पाकिस्तानमध्ये भारतातील खेळाडूंवर दगडफेक झाली म्हणून भारतातील प्रेखाकांनी अशीच दगडफेक करायची म्हटले तर दोघेही हास्यास्पद होतील. कुत्रा माणसाला चावला तर प्रत्युत्तर म्हणून माणूस कुत्र्याला थोडाच चावतो? हिंदू संस्कृतीचा खरा वारसदार कसा वागतो याचे उत्तम उदाहरण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी २ ऑक्टोबर १९८९ च्या दिल्लीतील किसान जवान पंचायतीच्या वेळी दाखवून दिले.
हिंदूत्वाची पताका घेऊन त्याचा जयजयकार करणारे, त्याचा व्यापार करणारे, राजकारण करणारे हिंदूत्वाच्या अथांग प्रवाहाला बंदिस्त करू पाहत आहेत. 'हिंदू' हाही जर निव्वळ धर्म झाला तर प्रयोगशील सत्यशोधकांना आश्रय घ्यायला काही थाराच उरणार नाही.
शरद जोशी
आंबेठाण