नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शेतकरी......... तो देशाचा आधारस्तंभ असतो. अशा काहीशा अर्थानं हे शेतकरी साहित्य संमेलन. संमेलनात शेतकरी बांधवाला केंद्रस्थानी मानलं होतं. सुरुवातीला दरवर्षी सारखं याही वर्षी स्पर्धा घेतल्या गेल्या व परीक्षक ठरवले गेले. दहा परीक्षक नेमले होते या परीक्षणाला. त्या परीक्षकात फक्त औरंगाबादच नाही तर बुलढाणा, पुणे, नागपूर वर्धा, नाशिक, परभणी येशील परीक्षक होते. यामध्ये एकूण पाच कथा आल्या. एकामागून एक सरस कथा. व्यवस्थेचा बळी, धग, पीकपाणी, परतीचा पाऊस आणि तिचं परगती पत्रक. सर्वच कथा डोळ्यांना धारा लावणाऱ्या होत्या. त्यात पुरस्कार प्राप्त तीन कथा निवडल्या. धग, व्यवस्थेचा बळी आणि...
व्यवस्थेचा बळी या कथेचं प्रारूप असं होतं. शामराव एक शेतकरी. बिचारा मेहनती. शेतात पाण्याची व्यवस्था करण्यासाठी त्यानं हिरामण सेठकडून कर्ज काढलं. कर्जात सर्व गहाण ठेवलं. परंतू फसगत झाली. मानवी व्यवस्थेनं फसगत केली व निसर्ग व्यवस्थेनंही. त्यामुळं शामराव खचला व त्यातच तो बळी ठरला या दोन्ही व्यवस्थेचा. त्यामुळं लेखक श्री लक्ष्मण लाड यांच्या कथेनुसार एकदा वादळ यावं व सारं संपावं असंच झालं होतं.
शामराव सर्वांकडे गेला मरणापूर्वी. कोणीही मदत केली नाही आणि मग गळफास आवळला गळ्याभोवती. त्यानंतर मदतीचा ओघ सुरू झाला. भेटीचा ओघही. ते सर्व कांता पाहत होती. त्यानंतर तिला अतिशय राग आला आणि रागाच्या भरात ती बोलली. ती काय बोलली हे काही मी सांगत नाही. ते आपण वाचावे.
दुसऱ्या कथेमध्ये दसरुनं अख्खा ऊसच जाळून टाकला सरकारच्या दुर्दैवी धोरणापायी. ऊस चांगला होता तरीही. परंतू त्याला कापायला कोणीच का आलं नाही? तो का जाळला? या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी ही कथा आपल्याला वाचावी लागेल.
तिसरी कथा होती. परतीचा पाऊस. सोयाबीनचं पीक. पीक चांगलं होतं. परंतू तो शेवटचा पाऊस. त्या पावसानं दगा दिला व हाती आलेल्या पिकाला त्यानं नेस्तनाबूत केलं. ते कसं केलं? यासाठी ही कथा.
चवथी कथा आली होती पीकपाणी. या पीकपाणी कथेत विजेचा प्रश्न मांडला आशिष वरघणे यांनी. वरघणे यांनी या कथेत विनोदची कथा मांडली. त्याला विजेमुळं कोणता त्रास होतो व त्यासाठी तो काय करतो. पीक कसं लोळतं? याचं वर्णन केलं आहे त्यांनी. परंतू ते कसं वर्णन केलं? हे मी सांगत नाही. ते आपण वाचावं. बळीराजा डॉट कॉम वरून. तिचं परगती पत्रक. ही देखील कथा फारच चांगली. वंदी आणि मंदीची कथा. गंगारामचं शांत परंतू मग्रुरीचं बोलणं. या कथेत नंदू कोण? त्यानं काय केलं? त्याचं काय झालं? हा गूढ प्रश्न आहे.
सर्वच कथा चांगल्या होत्या. एकाहून एक सरस कथा. आशय चांगला होता. परंतू निव्वळ आशयावरून क्रमांक निघत नाहीत. त्या कथेत वाक्यरचना महत्त्वाच्या असतात. समास महत्त्वाचा असतो. तसेच मुख्यतः महत्त्वाचं असतं विरामचिन्हे व शुद्धलेखन. त्यातच मांडणी आणि बोधालाही महत्त्व असतं. शिवाय विषय धरून लिहिला की नाही. त्याला तेच शीर्षक समर्पक कसं? ते शीर्षक बरोबर दिलं की नाही. या सर्व गोष्टीचं एकत्रीकरण म्हणजेच परीक्षण. शिवाय त्या कथेत विश्लेषणही महत्त्वाचं असतं. कथेबाबत मी माझं मत मांडताना एक गोष्ट सत्य सांगतो की दुसऱ्याकडे बोट दाखवणं सोपं आहे. परंतू स्वतःवर वेळ आल्यावर पंचाईत होते. माझीही तीच गत होईल. जेव्हा मी एखाद्या स्पर्धकाच्या रांगेत उभा असेल. आज असेच स्पर्धेत लिहिणारे भरपूर आहेत. काहीजण केवळ क्रमांकासाठी लिहितात. परंतू मुख्य सांगायचं म्हणजे केवळ क्रमांकासाठी लिहू नये. काहीतरी बोध द्यायला लिहावं. बोध जर असेल तर तो देशाच्या हिताच्याही कामात येतो. बोध जर असेल तर त्या कथेतून लहान मुलांनाही चांगलं वळण लावता येऊ शकते.
या शेतकरी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने गझल तपासता आली. याबाबत मी आवर्जून सांगेन काहीतरी. एका गझलसम्राटाने एक गझलेची पुस्तक मला दिली व म्हटलं की या पुस्तकावर समीक्षण लिहा. मी पुस्तक चाळली व पाहिलं की मुखपृष्ठावर गझलसंग्रह नाव लिहिलं आहे. त्यानंतर आतील भाग तपासला आणि आढळलं की त्या पुस्तकात शेर आहेत. परंतू त्या शेराचा क्रम लगावलीत जुळत नाही व त्याची काही लगावली लिहिलेली नाही. त्यामुळं त्या गझल नाहीत तर त्या कविता आहेत. त्यानंतर मी म्हटलं की यात लगावली कुठाय? त्यावर तो म्हणाला,
"दुसऱ्या पुस्तकात रफमध्ये."
"यात का टाकल्या नाहीत?"
"ज्येष्ठ गझलकारांनी म्हटलं की टाकायच्या नाहीत."
"मग मी हा गझलसंग्रह असल्यामुळं यावर समीक्षण कसं लिहू. मी आक्षेप घेणार ना."
"तुम्ही लिहा. त्यानंतर त्यावर उत्तर ते देतील."
मुख्य म्हणजे यामध्ये लेकरू याचं आणि उत्तर गावातील लोकं देणार. किती हुशार आजचे गझलवाले. अलीकडं असे गझलकाराचे पीकच आले आहे. गझलेला एवढे महत्त्व आहे की अलीकडे अखिल भारतीय साहित्य संमेलनात गझल शीर्षक दिलं कवितेला की ती कविता पास. त्याला कवी कट्ट्यातील प्रथम पत्र प्राप्त. काही पुण्यातील लोकं गझलेबाबत म्हणतात की गझल ह्या गायन करून म्हणायच्या नसतात. मग भीमराव पांचाळे आणि सुरेश भट का गायन करायचे. अलीकडे ज्याला गझल जमत नाही, तेही म्हणतात की मी गझल लिहितो. परंतू ते गझलसदृश्य रचना लिहितात आणि गझल म्हणून प्रसवतात. मला गझलेबद्दल जास्त खोल माहिती नाही. परंतू जेवढी आहे तेवढी पुष्कळ आहे. जी मी महाविद्यालयात असताना व गझलसम्राट सुरेश भटांकडे जात असताना शिकलो. त्यांना आम्ही दादा म्हणायचो आणि त्यांच्या घरी गेलो तर ते लिहून मागायचे. त्यावेळी हात दुखायचे. परंतू आज त्याचा फायदा झालेला वाटतो. गझलाही सुंदर होत्या. त्यातील एक गझल. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय देणारी होती. कवितेचं रसग्रहणही केलं काही लोकांनी. काही लोकांनी पोवाडे लिहिले, काहींनी छंदमुक्त कविताही लिहिल्या. काहींनी दुःखद अनुभव मांडले आपल्या शब्दात. साऱ्याचं परीक्षण केलं गेलं. मी आतापर्यंत कथेचं, लेखाचं, कवितेचं परीक्षण केलं होतं. परंतू पुस्तक परीक्षण. ते मी यावेळी पहिल्यांदाच केलं. पुस्तक परीक्षण. तेही दमदार असलेलं परीक्षण लिहिलं साऱ्यांनी. परंतू प्रत्येकाची शैली वेगळी. त्यातच कोणाच्या पुस्तकाचं परीक्षण लिहावं. कोणाच्या नाही हेही काहींना समजत नसल्यासारखं परीक्षण लिहिलेलं भासलं. एक कथाही तशीच वाटली. शिव्या होत्या त्यात.
शिव्या......कथेनुसार ठीक आहेत. परंतूू त्या स्पर्धेमध्ये नसाव्यात. माझं तरी मत असं आहे. याच अनुषंगानं मी गतकाळात बाकीच्या लोकांनी पहिल्या क्रमांकानं नावारूपास आणलेली एका लेखकाची कथा स्पर्धेतून बाद केली होती. त्याचं कारण तुम्हाला पटेलच असं नाही. परंतू मला पटते. ते कारण आवर्जून देतो इथे. मी ती कथा कापताच त्या माणसाचा फोन आला. म्हणाला, "माझी कथा का कापली? इतर मंडळांकडून माझ्या कथेला प्रथम क्रमांक मिळालाय. तुम्ही तर सर्रास यातून बाद केली. उत्तेजनार्थही नाही." मी वरील प्रश्नावर चूप बसलो. परंतू तो आग्रहच करीत होता, त्यावर मी म्हणालो, "त्यात शिव्या टाकल्या होत्या." मी सांगितलेलं उत्तर त्याला पटलं नाही. तसा तो इतर लेखकाची नावं घेत होता. म्हणत होता. "त्यांनी सांगितलंय की कथेला आशयगर्भीत करण्यासाठी अशी शिवी टाकली तर चालेल. मग तुम्ही कशी कापली? माहीत आहे मी कोण आहे. मला अखिल भारतीय संमेलनात निमंत्रित म्हणून बोलावतात." मला त्या लेखकाच्या बोलण्याची कीव आली. अखिल भारतीय संमेलनाचं नाव घेताच व त्या मंडळींना बदनाम करताच त्याला सरळ करण्यासाठी मला उत्तर द्यावं लागलं. अखिल भारतीयांचं निमंत्रण असो की मोठमोठ्या कवीसंमेलनाचं निमंत्रण असो. ते कोणाला मिळतं. हे सर्वांनाच माहीत आहे. सत्य सांगायचं झाल्यास कवी कट्ट्यातील कविता चांगल्या असतात. परंतू अखिल भारतीय संमेलनातील निमंत्रित लोकांच्या नसतात. तिथं कोण जातात? ज्यांची ओळख आहे ते वा जे तेथील मुख्य लोकांना पैसा मोजत असतील ते. त्यांनाच विचारपीठ मिळतं. अखिल भारतीयच नाही तर कोणत्याही संमेलनात जे वशिलेबाजीने पुढारलेले असतात. त्यांनाच विचारपीठ मिळत असतं. इतरांना नाही. ही सत्यता नाकारता येत नाही. ते लेखक महाशय. त्यांनी प्रश्न विचारताच मी म्हटलं. "हे बघा महाशय, तुमच्या कथेला आतापर्यंत आपण सांगितलेल्या मंडळांनी कसा पुरस्कार दिला हेच कळत नाही. जर माझ्यासारख्या आणखी लोकांनी तुमच्या कथेला पुरस्कार दिले आणि उद्या एवढे पुरस्कार प्राप्त आहे असे समजून ती कथा जर अभ्यासक्रम मंडळानं अभ्यासक्रमाला लावली तर उद्या लोकं आम्हा परीक्षकांना चपला जोड्यांनी मारतील. कारण त्या कथेत शिव्या आहेत. शिव्यांचे संस्करण आहे. त्या शिव्या शिकवायच्या का मुलांना की लोकांना शिकवायच्या शिव्या. ही एक की अशा शिव्या असणाऱ्या कथा मनोरंजनासाठी ठीक आहेत. परंतू शाळेत शिकणाऱ्या लहान मुलांसाठी वा महाविद्यालयीन मुलांसाठी नाहीत. त्याचप्रमाणे अशा कथा ह्या पुरस्कारासाठी वा पुरस्कारात क्रमांक मिळविण्यासाठी नसाव्यात असं माझं मत आहे. इतरांचं मत मला माहीत नाही.
एक प्रसंग सांगतो. एका प्रसिद्ध लेखकाची पुस्तक एका विद्यापीठाला लागली. ज्यात शिव्या होत्या. ती पुुस्तक एका महाविद्यालयीन तरुणीनं वाचली. तिला ती शिवी पटली नाही व तिनं त्याचा गवगवा केला. प्रकरण बरंच गाजलं. त्यानंतर ती पुस्तक त्या विद्यापीठातून बाद झाली. लिहिणारे लेखक असे असतात की त्यांना प्रसिद्धीसाठी मी काय करू आणि काय नाही असं वाटतं. काही लेखक मी असे पाहिले की ते पुस्तक पाठवतात. त्यानंतर माझी पुस्तक मिळाली का म्हणून फोन करतात. त्यावर समीक्षण लिहा म्हणून सांगतात. त्यानंतर ते समीक्षण स्वतः वर्तमानपत्रात छापतात. मग ग्रीनिज बुकात नोंद करायचा प्रस्ताव पाठवतात. तसेच काही लेखिका अशाही पाहिल्या की त्या कविता वर्तमानपत्रात पाठवायलाही सांगतात. स्वतः पाठवत नाही आणि छापून आल्यावर ती कात्रणं शोधून ती कात्रणंही पाठवायलाही सांगतात. म्हणजे फकिराच्याच म्हणण्यानुसार मेहनतही कोंबड्यानंच करायची आणि अंडंही फकिरानंच खायचं. काही मागोवेही आलेत. काही वैचारिक लेखही.......
या परीक्षणाच्या माध्यमाने एक ललितलेखही आला. त्यातील गोवंश बंदी हा लेख मागोवा मध्ये आला. तो बरा वाटला. काही टिप्स दिले आहेत त्यात. वाचण्यालायक आहे. गंगाधर मुटे त्याचे लेखक आहेत. त्यांचाच "शेतीतज्ज्ञांनो लाज बाळगा" हाही त्यांचा लेख चांगला आहे. त्यांचा "उलट्या काळजाची उलटी गंगा" हाही लेख चांगला आहेे. त्यातच "शेतकरी सुखी तर जग सुखी" या भारती सावंत ताईचा लेखही विचार करायला लावणारा आहे. परीक्षण करीत असताना मी त्या लेखाचा लेखक कोण वा कवितेचा कवी कोण? हे मी पाहिलं नाही. बेरीज केली. त्यानंतर जास्त गुण पाहिले. त्यात गंगाधर मुटेंना जास्त गुण दिसले. त्यानंतर मी त्यांना व्हाट्सएपवर मेसेज केला की आपण तर आयोजक आहात. मग स्पर्धेत भाग का घेतला. त्यावर ते नियम व अटी वाचल्या नाहीत का म्हणाले. मी चूप बसलो. परंतू मला शंका होती की जर मी त्यांच्या लेखांना प्रथम क्रमांक दिला तर लोकं म्हणतील, 'काहीतरी सेटिंग असेल. म्हणूनच तर क्रमांक दिला. परंतू तसं काही नाही. आपण वेळ मिळाल्यास त्यांचे लेखही वाचून पाहावे. खरंच ते सरस आहेत. डॉ. राजेंद्र फंड व गंगाधर मुटेंचे लेखन पाहून आता कळलं की ते दर्जेदार लेेखक आहेत माझ्याहीपेक्षा. मी त्यांच्यासमोर काहीच नाही.
परीक्षण आपल्या लेखांचे, कवितेचे, गझलेचे, कथेचे. परंतू आपले सर्वांचे आभार. आपल्या लेखाच्या निमित्ताने माझे अनुभव वाढलेले आहेत. मी आपल्यापेक्षा बराच लहान असेल. वयानं, मानानं आणि इतरही गोष्टीनं. या निमित्तानं आपल्या कथा, लेख वाचायला मिळाल्या. अनुभवता आल्या. त्यामुळं आपले आभार. तसेच आयोजकांनी मला तशी संधी दिली व आपल्या दर्जेदार कथेचं मला परीक्षण करता आलं, त्याबद्दल आयोजकांचंही आभार. एकंदरीत आभार मानायचं झाल्यास सर्वांचेच आभार. साहित्यसंमेलनात रंगत येवो ही सदिच्छा!
आपला स्नेहांकित
अंकुश शिंगाडे, नागपूर
भ्रमणध्वनी : ९३७३३५९४५०