नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
कोरोना- वेगवान बदलांची बदलती मानसिकता...
लेखक: रावसाहेब खं. जाधव
(चांदवड)
“कोरोना वगैरे काही नाही हो...”
“तुम्ही उगाच घाबरता हो...”
“तुमचा देवावर विश्वास नाही का?...”
“जे नशिबात असेल ते घडेल...”
“मरण यायचं तेव्हा येणारचे...”
“ठेविले अनंते तैसेचि राहावे...”
आजचं पोट महत्त्वाचं उद्याचं कोणी पाहालय...”
सारे जग कोविड-१९ चा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन असताना अशी वाक्ये कानावर पडू लागली की, क्षणभर आपले मनही लॉकडाऊन होते आणि बुद्धीही कुंठीत होते...
एकीकडे नीती आयोग सांगतो की, शंभर कोटी भारतीयांना संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यांपैकी पंधरा टक्के लोकांना संसर्ग होऊन गेला असण्याची शक्यता आहे. कदाचित त्यांची प्रतिकार शक्ती अधिक असावी, म्हणून त्यांच्यात लक्षणे दिसली नाहीत; पण म्हणून कोणीही आपली प्रतिकार शक्ती आजमावून पाहणे संयुक्तिक ठरेल काय?
लॉकडाऊनचे नियम पाळणे, फेसमास्क वापरणे, हात वारंवार स्वच्छ करणे, सामाजिक अंतराचे नियम पाळणे, असे कितीही प्रबोधन सुरु असले तरी लोकांची मानसिकता त्यासाठी तयार करणे, हे फारच मोठे आव्हान विज्ञान आणि विद्वानांपुढे आहे, असे म्हंटले तर फार वावगे ठरू नये. तशातच समाज माध्यमांतील तथाकथित वैचारिक व काळजीवाहू संदेशांमुळे तर वैचारिक गोंधळाला आणखीच खतपाणी मिळताना दिसते. त्यात अमुक औषध, तमुक काढा, अमुक पदार्थ टाळावे किंवा खावे अशा अशा विविध उपदेशपर, तर गरम पाणी प्या, वाफ घ्या, व्यायाम करा असे काही काळजीयुक्त संदेश; तसेच काही अफलातून संशोधन दर्शक वैचारिक संदेशही मुक्तपणे फिरताना दिसतात; जसे या व्हायरसचा पी.एच. अमुक असून त्याला घशातच मारण्यासाठी त्यापेक्षा जास्त पी.एच. असलेले पदार्थ घ्यावे म्हणजे प्यावे. तशातच लिंबू रसाचा पी.एच. वीसपेक्षाही जास्त दाखवला असेल तर आपल्याला आपलेच ज्ञान आणि समजूत पुन्हा पडताळून पाहावी की काय असे प्रश्न पडतात. त्यातही कहर असा की अशा संदेशांच्या खरे-खोटेपणाची खातरजमा न करताच ते पुढे मार्गस्थ केले जातात. काही जण त्याकडे कळत नकळत दुर्लक्ष करत असतीलही परंतु काही जण त्यात सांगितलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करत नसतील कशावरून?
असे असले तरी या महामारीने काही सकारात्मक व काही नकारात्मक बदल घडवले आहेत. तर काही बदल स्वीकारण्यास भागही पाडले आहे. जगण्याच्या काही जुन्या वाटा मोडीत निघाल्या आणि नव्या वाटा तयार होऊ लागल्या. काही जुने बंध मोडून नवीन वैचारिक बंधांची बांधणी होऊ लागली. पारंपारिक रुळलेल्या वाटांवरून चालणारांना नव्याने निर्माण होणाऱ्या नव्या वाटांबाबत शंका व भीती देखील वाटू लागली. साहजिकच समाजात दोन गट दिसू लागले आहेत: एक म्हणजे जुन्या वाटा मोडीत निघाल्याने हताश होऊन बसलेला आणि दुसरा आधुनिक नव तंत्रज्ञानाचा लीलया वापर करू पाहणारा. म्हणजेच हे आव्हान काहींना अनुकूल वाटू लागले तर काहींना खूप मोठे संकट. यांपैकी काही जण तणावग्रस्त झाले तर काही जण स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करू लागले.
खरेतर बदल स्वीकारले पाहिजेत, अपेक्षित असो वा अनपेक्षित... बदल योग्य असतील ते काळाच्या कसोटीवर टिकतील, अयोग्य असतील ते स्वत:च स्वत:ला बदलून घेतील... असे असले तरी सध्या घडत असलेल्या बदलांचा आढावा घेतल्यास आपल्याला अनेक क्षेत्रात बदल घडताना दिसून येत आहेत. त्यांपैकी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, भौगोलिक, वैज्ञानिक आणि विशेष म्हणजे मानसिक क्षेत्रांत होत असलेल्या बदलांचा आढावा घेतल्यास आपल्याला या बदलांची जीवनव्यापकता नक्कीच लक्षात येईल.
शिक्षण क्षेत्र हे बालकांपासून ते वृद्धांपर्यंत असलेले जीवनव्यापी क्षेत्र. या क्षेत्राच्या ठरलेल्या साचात बदल घडू लागले तेव्हा काहींना स्वागतार्ह आव्हान वाटले तर काहींना नकारात्मक संकट. परंतु या क्षेत्राशी सबंधित घटकांची मानसिकता अतिशय वेगात बदलू लागली आणि मुठीत न येणाऱ्या नव्या तंत्रास मिठीत घेण्याची तयारी सुरु झाली. जुने बंध ढिले होऊन अनेक नवीन बंध जुळू लागले. ज्या शब्दांचा संपर्क नव्हता ते शब्द तोंडात लीलया घोळू लागले. जसे ऑनलाईन शिक्षण, ऑफलाईन शिक्षण, झूम मिटिंग, गुगल क्लासरूम, यूट्यूब लिंक, नेटवर्क, डेटा, गुगल शीट, ऑनलाईन चाचणी, इत्यादी.
काही वाक्येही सहज कानांना परिचयाची होऊ लागली, जसे “मिटींगला जॉईन व्हा...”, “स्क्रीनशॉट पाठवा...”, “दिलेली लिंक ओपन करा...”, “दिलेल्या लिंकने जॉईन व्हा...”, “सर, नेटवर्क अनस्टेबल होतेय...” “सर, सारखं बॅक होतय...”, “सर, रिचार्ज संपलाय...”, इत्यादी...
‘विद्यार्थ्यांपासून मोबाईल दूर ठेवावा...,’ ही वैचारिक धारणा बेडकाच्या शेपटासारखी गळून पडली आणि सोबतच अनेक शिक्षकांच्या घराचा कोपरा शुटिंगसाठी स्टुडीओ बनला तर पालकांचे घर, अंगण, शेतांचे बांध, घराची गच्ची, वगैरे ‘वर्गखोल्या’ झाल्या. काही विद्यार्थ्यांना शाळा दुरावल्याचे दु:ख तर काहींना कटकट थांबल्याचा आनंदही झाला.
एकूणच शिक्षण हे वर्गखोलीपुरतेच मर्यादित असते, आणि मूल्यमापनासाठी लेखी परीक्षाच असाव्यात, या धरणा मात्र आज बदलू लागल्या आणि उद्याही त्या बऱ्याच प्रमाणात तशाच बदलत राहतील...
सामाजिक रीतीरिवाज, रूढी, परंपरा नवी रूपे धारण करू लागल्या. समाजजीवनातील सर्वात जिव्हाळ्याचे व हजार बाराशेच्या उपस्थितीत साजरे होणारे उत्सव पाचपन्नासच्या उपस्थितीत संपन्न होऊ लागले. त्यात लग्नसमारंभ असो वा जन्म वा मृत्युच्या अनुषंगाने साजरे होणारे कार्यक्रम कमीत कमी उपस्थितीत साजरे होऊ लागले. अर्थात त्यातही कायद्यांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत लपूनछपून अधिक उपस्थितीत काहींचे कार्यक्रम पार पडतही आहेत. कदाचित समाजातली ती एक सहजप्रवृत्ती असावी. काही जणांना भावनिक गुंत्यामुळे सामाजिक अंतराचे नियम पाळणे कठीण जाऊ लागले, काही जण परिस्थितीचे गांभीर्य समजून न घेता किंवा सूचनापालनाच्या उलट वागण्याच्या प्रवृत्तीमुळे नियम मोडतानाही दिसू लागले, तर काही जण अत्यंत कठोरपणे स्वयंशिस्तीच्या अंगाने नियमांचे पालन करू लागले.
एकीकडे समोर येणाऱ्या आपल्याच सख्यासोबत्यांकडे, नातेवाईकांकडे, ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तीकडे जड अंत:करणाने संशयास्पदपणे पाहण्याची वेळ आल्याची सल सोबत घेऊन समाजजीवन पुढे सरकू लागले; तर दुसरीकडे काही जण समोरच्याचा आपल्याविषयी गैरसमज होईल, त्याच्या भावना दुखावल्या जातील याची भीती मनात कोंडू लागल्याच्या जाणिवेने भावनेच्या आहारी जाऊन जणू लादल्या सारख्या वाटणाऱ्या अंतरालाच दूर ढकलून देऊ लागले.
सभोवतालच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता, अनेक कारखाने बंद झाल्याने हवेचे, पाण्याचे प्रदूषण कमी झाले. पृथ्वीने मोकळा श्वास घेतला. ज्याप्रमाणे स्वच्छ हवेचा स्तर सुधारला त्याप्रमाणेच स्वत:ला निसर्गापेक्षा श्रेष्ठ समजणाऱ्या मानवाच्या डोक्यातील अहंतेचा स्तर देखील सुधारू लागल्याचे जाणवू लागले.
काहींचे व्यवसाय ठप्प झाले. काहींचे संसार गप्प झाले. काहींच्या हातातली कामे गेली. काहींनी नवी कामे शोधली. काही पूर्णत: बेरोजगार झाले. काहींनी हालअपेष्ठा सहन करत शहरे सोडून आपापल्या गावांकडे प्रयाण केले. काहींनी आपले जुने व्यवसाय बदलले. कालपर्यंत वेगवेगळ्या वस्तूंची विक्री करणाऱ्या लहानसान व्यावसायिकांनी जीवनावश्यक वस्तूंची किंवा शेतमालाची खरेदी-विक्री करण्यास सुरुवात केली. त्यात काही यशस्वी झाले. काही थांबले. काही मागे फिरले तर काहींना थांबावेही लागले. त्यातल्या त्यात काही वस्तू स्वस्त झाल्या तर काही महागही.
ते काहीही असले तरी सामन्य खरेदीदार मात्र घरात येणाऱ्या प्रत्येक वस्तूंकडे ‘संसर्गास कारण तर ठरणार नाही ना’ अशा शंकास्पद नजरेने पाहू लागला. जीव लावून वस्तू गोंजारण्याचे मनसुबे मात्र त्यामुळे त्याचे मनातच विरू लागले. काहीजण येणारी प्रत्येक वस्तू निर्जंतुक करण्यासाठी धडपडू लागले तर काही जण तसले ते कृत्य ‘निरर्थक’ असल्याचे सांगत त्यांची खिल्लीही उडवू लागले...
सामाजिक जाणिवांनी भरलेले अत:करण सोबत असणाऱ्या काही जणांनी आपले समाजभान जागृत ठेवून सामाजिक बांधिलकीच्या आपल्या भावनांना समाजसेवेचे मूर्त रूप दिले. काहींनी जनजागृती करण्यास सुरुवात केली. काहींनी निर्व्याज मनाने मदत म्हणून गरजूंना वस्तूंचे व अन्नाचे वाटप सुरु केले. ज्याप्रमाणे येथेही समाजातील खरे गरजू व खोटे गरजू असे दोन गट दिसून आले; त्याप्रमाणेच समाजसेवकांचेही दिसणारे आणि न दिसता सेवा करणारे असे गट दिसले.
डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार यांचे महत्त्व अधोरेखित झाले. समाजात या घटकांबद्दल आदर वाढला. काहींना त्यांच्याबद्दल विश्वास वाटू लागला तर काहींना अविश्वासही.
कोविड १९ने भाषेलाही सोडले नाही. ज्याचा संबंध नव्हता असे शब्द कोविडसोबत मराठी भाषाही आपल्या अंगाखांद्यावर लीलया खेळवू लागली. जसे- सॅनिटायझर, मास्क, ऑक्सिमीटर, ऑक्सिजन लेव्हल, सोडियम हायपोक्लोराईड, डिजिटल लेझर थर्मामीटर, ऑनलाईन, ऑफलाईन, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, इत्यादी. त्यातही ‘पॉझिटिव्ह’ शब्दाने आपली सकारात्मकता सोडून दिली आणि त्याच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन ‘निगेटिव्ह’ करून टाकला.
कोविडने काही धार्मिक व वैचारिक धारणाही बदलवल्या. देवालये बंद झाले. वारी थांबली. ‘तुझे आहे तुजपाशी’ची जाणीव विस्तारित मूर्तरूप घेऊ लागली. डॉक्टर, परिचारिका, आरोग्यसेवक, पोलिस, समाजसेवक यांच्यातच देव पाहण्याची व त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची मनोवृत्ती निर्माण होऊ लागली. येथेही स्वार्थ-परार्थ, विश्वास-अविश्वास, समज-गैरसमज अशा दोन-दोन गटांत विभागलेल्या समजप्रवृत्ती दिसून आल्या. कदाचित याही सहजप्रवृत्ती असाव्यात.
मानसिक बदल घडत असताना महामारीच्या सुरुवातीच्या काळात वाटणारे गांभीर्य कमी होत गेले आणि समाजात दोन गट निर्माण झाले. हे गट अनेक क्षेत्रांत तयार झाल्याचे दिसून आले. जसे ऑनलाईनवाले- ऑफलाईनवाले, बदल स्वीकारण्याची इच्छा असणारे- नसणारे, मास्क वापरण्याची इच्छा असणारे- नसणारे, कोविडला भयंकर मानणारे- न मानणारे, कोविडबाबत गंभीरपणे विचार करणारे- न करणारे, इत्यादी.
समारोप करताना एक प्रसंग कथन करावासा वाटतो. दोन मित्रांचा संवाद चाललेला होता. त्या संवादातील एक वाक्य सहज कानावर पडले,
“साधी सर्दी होऊ दे रे, तू टेस्ट करायला गेला की, पॉझिटिव्हच येशील...”
साहजिकच लोकांच्या मनात प्रचंड गोंधळ असल्याचे जाणवले. अफवा, अनुभव की गैरसमज? नक्की काय असावं? काहीही असेल, पण वास्तव काय आहे याबाबत लोकांना आश्वस्त करण्याची गरज मात्र प्रकर्षाने जाणवली.
कोविड-१९ विषाणूचा संसर्ग झालेल्या एका मित्राने योग्य उपचारानंतर कोरोनावर मात केली. रुग्णालयातून मुक्त होऊन घरी पोहचला. बरेच दिवस संपर्क झाला नव्हता. त्याच्या आशावादीपणाचे कौतुक करावे आणि धीर द्यावा या उद्देशाने त्याला त्याच्या मोबाईलवर कॉल केला. “स्वत:ची इच्छाशक्ती प्रबळ ठेवावी... जीवनाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन बाळगावा....” असे बरेच बोलणे झाल्यानंतर जरासा विनोद करण्याच्या उसळून आलेल्या उर्मीमुळे मी त्याला सहज म्हणालो, “मला वाटतं, तू फारच धास्ती घेतली होती. कोरोनाला एवढं घाबरायचं असतं काय...! कोरोना-बिरोना काही नसतं रे...” आणि हसलो.
तेव्हा तो चताळून बोलला, “तुला होऊ दे, मंग कळंल....” त्यावेळी माझ्या कानाशी असलेला माझा मोबाईल माझ्याच कानाला चावल्यासारखे वाटले.
.............................................