
नमस्कार ! ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
कास्तकार नायी बनाचं...!
कालचा बाबू आज आयकत नाई बापाचं
रोज सांगते मले कास्तकार नाई बनाचं
सांगू नोका म्हनते तुमच्या वावराच पुरान
तग नाई धरत आता मार्केटात कोंत वान
थ्या वावराच्या खानीत आता नाई उतराचं
मान्य हाये ना आजलोक पोसलं थ्या मातीनं
आता मातर मरत हाये वावराच्या साथीनं
जीतेपनी नाई मले मुरदयावानी जगाचं
कास्तकारी त आज घळीले झाली मोठा श्याप
वावराच्या नावान बुजाडते पोरीचा बाप
लाईनित मले मुंज्याच्या उभं नाई रहाचं
दीऊ नोका घळीघळी सातबाऱ्याच्या धवसा
कायद्यापायी जीवं टांगून रायले भर दिवसा
गयात मले आता हे लोळनं नाई बांदाचं
जमान्याच्या हिसाबान अजमावू द्या ना मले
काई त लागन आता माती परीस हाताले
मातेऱ्यावानी जिवाले अजूक नाई धुवाचं
अजून कसं घुसत नाई तुमच्या डोकश्यात
कास्तकारासाठी कोनी झुरते का हो मनात ?
दिल्लीतल्या रस्त्यावर बेमोत नाई मराचं
असं नाई हो बाबा का मले समजत नाई
मेयनतीले त तुमच्या जगात तोळ नायी
घरादारासाठी आता मले भाईर पळाचं
रवींद्र अंबादास दळवी..