साल आले हे दुष्काळी
आला दुष्काळ कोरडा
रान सारे करपले
झाला निसर्गाचा कोप
भान माझे हरपले
कष्ट करून करून
काय शेतात उरते
कष्ट करून बळीचे
इथे आयुष्य सरते
बाप आभाळास पाही
साल आले हे दुष्काळी
कशी करावी आवंदा
घरी साजरी दिवाळी
ढग वांझोटे निघाले
मेघ पांढरे सावळे
आले दुष्काळ पाहण्या
व्यवस्थेचे ते कावळे
वडिलोपार्जित शेती
माझ्या पिढ्यांना पोसते
समृध्दीचा मार्ग कसा
तिच्या मध्येच घुसते
दत्तात्रय गंगाराम वालेकर
विक्रम फोटो स्टुडिओ,
घाटनांदूर, अंबाजोगाई,
जि.बीड मराठवाडा पिन-431519
9421440922
dattawalekar@gmail.com
