Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




वऱ्हाडी बोलीचा वारसा जपणारा अस्सल वऱ्हाडी काव्य संग्रह - धोंडी धोंडी पाणी दे

लेखनविभाग: 
पुस्तक समीक्षण

"वऱ्हाड बोलीचा वारसा जपणारा अस्सल वऱ्हाडी दीर्घ काव्यसंग्रह 'धोंडी धोंडी पाणी दे''

साहित्य विश्वातील आगळ्या- वेगळ्या व्यक्तिमत्वाचे आणि अद्वितीय साहित्यकृतीचे धनी असणारे सु. पुं. अढाऊकर म्हणजे विदर्भातलं एक चिकित्सक, चिकाटीचं, साहित्याच्या समुद्रातील मोती वेचणार आणि तें जगापुढे आपल्या शैलीने मांडणारं समीकरण आहे.'धोंडी धोंडी पाणी दे' हा त्यांचा दीर्घ काव्यसंग्रह म्हणजे जुन्या आणि नव्या साहित्यिकांना वऱ्हाडी शब्द सामर्थ्यांची मेजवानी उपलब्ध करून देणारा, वऱ्हाड मराठमोळी शब्दाचा खजिना त्यांच्या पुढ्यात टाकणारा हा काव्यसंग्रह म्हंटले तरी हरकत नाही.
साहित्य क्षेत्रात आपल्या लिखाणाच्या वऱ्हाड शैलीने तसेच सु. पु. यां टोपण नावाने ओळखले जाणारे सु.पु.अढाऊकर यांची प्रकाशित साहित्य संपदा म्हणजे चूल,भूक,भाकर हे काव्य संग्रह, तर "वऱ्हाडीच्या कथा" हा लघुकथा संग्रह. आणि "धोंडी धोंडी पाणी दे" हा दीर्घ कविता संग्रह असून नुकतीच अलीकडे प्रसिद्ध झालेली वऱ्हाडीच्या भावनाप्रधान शब्दांनी ओतप्रोत भरलेली अशी "शियाण" कादंबरी सध्या बहू चर्चेत आहे.तर सु.पु. अढाऊकर आणि संदिप साबळे यांनी संपादन केलेला "गाडगे बाबाच्या कविता"हा कविता संग्रह प्रकाशित आहे. यां बहू आयांमी व्यक्तिमत्व असणाऱ्या लेखकाचा, जन्म मराठीतील पहिले गद्य साहित्य लिळाचरित्र लिखित चक्रधर स्वामी यांच्या रिद्धपूर नगरीत झाला असून. त्यांच्या सर्वच कवितासंग्रहातून, कथासंग्रहातून, कादंबरीतुन वऱ्हाडी भाषेला जिवंत ठेवण्याचं काम केलं आहे.
लेखकांनी आपले अभंग लेखन हे 'फुलदास' यां नावाने केले असून तें अनेक पुरस्काराने पुरस्कृत झालेले आहे. आपल्या साहित्य प्रवासाच्या कार्यकाळात त्यांना 'शांताबाई शेळके जीवन गौरव पुरस्कार ' पुणे , तर अकोला येथील 'वऱ्हाडी साहित्यरत्न पुरस्कार', त्याचप्रमाणे गीतकार 'जगदीश खेबूळकर साहित्यरत्न पुरस्कार तेल्हारा', 'शंकर बढे साहित्य रत्न पुरस्कार', 'मनोहर तल्हार जीवन गौरव पुरस्कार', 'युवा साहित्य रत्न पुरस्कार', 'अकोला शिवभूषण पुरस्कार' तसेच इतर अशा अनेक पुरस्काराने सन्मानीत झालेले हे लेखक, कवी, समीक्षक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर परिचित आहे.
"धोंडी धोंडी पाणी दे" बद्धल लोककवी विठ्ठल वाघ आणि बाबाराव मुसळे सोबतच सुरेश पाचकवडे, डॉ सतीश तराळ, तर डॉ रावसाहेब काळे, डॉ प्रतिमा इंगोले यांनी आपआपले अभिप्राय मांडत असताना.लेखकांच्या यां साहित्याची तोंड भरून स्तुती केलेली आहे. तसा तर मी, वाचलेल्या आजपर्यंतच्या साहित्यामध्ये 'धोंडी धोंडी पाणी दे' हा दीर्घ कविता संग्रह मनाला वेड लावणारा, त्यातील शब्दाच्या मोहात पाडणारा, जणू काही वाचताना वाचकाला भूल पडावी असा हा काव्य संग्रह आहे. यां संग्रहाबद्धल विठ्ठल वाघ म्हणतात, "धोंडी धोंडी पानी दे " मधून संपूर्ण वऱ्हाडी जीवन व्यक्त होते.वऱ्हाडी भाषेतील शब्दही अचूक वापरले आहे. शिवाय कौतुकासाठी शब्द ही थिटे पडावे असे असा हा काव्यसंग्रह आहे."
यां संग्रहाची विशेषता सांगावी तर संपूर्ण संग्रहच विशेष आहे.त्यातही मला भावलेले त्यातील पाण्याची कविनी केलेली विनवणी आणि त्यातून दिलेल्या शिव्या, वेळप्रसंगी केलेली विनंती. आणि कुठेही खंड न पाडता, एकसारखे असणारे 500 कडव्याचे आणि 2000 ओळीचे हे दीर्घ काव्य पाच भागात विभागलेले आहे. तशी त्यांची ओळख तर एक वऱ्हाडी कथाकार म्हणून आहे. त्यांचं संपूर्ण साहित्य हे अस्सल वऱ्हाडीतुन लिहिलं गेलं आहे. त्यामुळे त्यांच्या वऱ्हाडी बोलीत एक तळमळीची आर्तता दिसते,भाव दिसतो, लवचिकता दिसते, गोडवा दिसतो .
वऱ्हाडी भाषेला जपत अनेक वऱ्हाडी साहित्यिकांनी वऱ्हाडीची धुरा आपल्या खांद्यावर घेत ती समर्थपने पेलली आहे. त्यामध्ये वऱ्हाडीतील अग्रक्रमाने येणारे 'धग'कार उद्धव शेळके,मधुकर केचे,बाजीराव पाटील, मनोहर तल्हार, शंकर बढे, विठ्ठल वाघ, बाबाराव मुसळे,यांच्या नंतर नवीन पिढीतील दमदार लेखन करणारे सु. पु. हे वऱ्हाडीचा जणू वारसाच जपत आहे असे वाटते.
"धोंडी धोंडी पानी दे" यातून कवीनी माणसाच्या व्यथा, वेदना, सुख, दुःख यांचं सत्य दर्शन आपल्या काव्याद्वारे प्रगट करून जी शब्द शैली मांडली ती अप्रतिमचं आहे. आपल्या काव्याला सुरुवात करायच्या आधी त्यांनी सर्व नदयाची विनवणी केली आहे. आणि आपलं काव्य सर्व नद्याना समर्पित केलं आहे.त्यामध्ये कविनी महाराष्ट्रभरातील वऱ्हाडीची पावन माती, वऱ्हाडीतील पूर्णा, मोर्णा, मनं, उमा, वर्धा, पेढी, शहानुर,इराई,काटेपूर्णा, कापरा, गाडगा,खंडू, चंद्रभागा, चुडामन, तापी, तिगरी, पेढी,बाखली, बेंबळा, भावखुरी, भुलेश्वरी, मदू,, यशोधा, वाण, सिपना,सुरकी, खडकपूर्णा, नळगंगा, निपाणी, पैनंगंगा, बांनगंगा, बोर्डी, वाण, विश्वगंगा, ज्ञानगंगा, मास, उतवळी, अरुणावती, वाघाडी, विदर्भा,खुनी, पूस, अडाण अडोळा यां नद्याना प्रणाम करुनं आपलं "धोंडी धोंडी पानी दे" हे समर्पित केलं आहे.आणि मोजक्याच शब्दात आपलं मनोगत मांडून अनेकांचे ऋण व्यक्त केले हे. त्यांना असं वाटते की माझी सर्व वऱ्हाडातील गरीब जनता ही शेतीच्या भरोशावर असल्यामुळे यां शेतकऱ्याच्या हितासाठी, कोरड्यां मातीच्या डोळ्यातलं आटलेलं पानी भरून निघण्या साठी आता ते पावसाला बरसण्या साठी विनवणी करतात.आणि लिहितात

धोंडी धोंडी पानी दे
मीठ पीठ अगादा दे
पानी माती आटंसाटं
औदा तरी होऊ दे
धोंडी धोंडी पानी दे

आठी घागरी घळ्या
माठ फाट भरू दे
आळ आला ढगावर
आकण आता निघू दे
धोंडी धोंडी पानी दे

कवी म्हणतात, "माझे त्या पावसाशी कोणतेही वैर नाही. पण जेव्हा तो वेळेवर येत नाही तेव्हा मात्र मला माझ्या वऱ्हाडातील शेतकऱ्यांचं दुःख पाहवत नाही. आणि सहज मनातून काव्य उत्पत्ती होऊन मी त्याला विनवणी करतो, मिठा पिठाणे घरदार पूर्ण भरण्यासाठी आग्रह करतो. पाण्यात माती मिसळून त्याचं आटंसाटं होऊनं ते एकत्र होऊ दे,घरातल्या पूर्ण आठी,घागरी घळ्या,माठ,फाट सर्व डबडबून भरू दे.पण तरी तो येतच नाही त्यामुळे लेखक कासावीस होताना दिसतात
कधी कधी तर ते पावसाबद्धल तक्रारही करतात. तर कधी प्रार्थना करून विनवतात. लेखकाचं संपूर्ण लेखन हे वाड्मयीन दृष्ट्या खुप उंचीवर गेलेले दिसते.आपल्या काव्यात त्यांनी आशय, अभिव्यक्ती, भावनेची घालमेल, कुठे अलंकार तर कुठे अस्सल ग्रामीण धाटणीच्या शिव्या देऊन काव्य संग्रहाला अलंकृत केलेले आहे.
पुढे कवी म्हणतात हे पावसा येताना तू उताणा उबळा होऊन ये, दवळ्या, पाट्या भरू दे एवढंच नाही तर ते रागाने, आणि हट्टाने यां पावसाशी भांडताना दिसतात आणि म्हणतात,"वेळ पडली तर, तुही अशी सटक काढीन ना त्यामुळे तुझी इभरत जाईन, म्हणून तू तुया इरसद जागा ठेऊन वाग असे कवी कळवळून सांगतात. एवढेच नाही तर प्रेमाने बोलताना पावसाशी आपले ऋणानुबंध जपत तू जर आला तर मी तुझ्यासाठी काय काय करीन हे ते पुढल्या ओळीतून स्पष्ट करतात,

"खंडिभर बकरे कापीन
खयवाळी भजन करीन
गरसोयी खटल्याची टुटे
जीवाचे झाले हरण
गह्याटलं अवघं वऱ्हाड
गदकां ढगाले येऊ दे
धोंडी धोंडी पाणी दे "

हे पावसा तू फक्त ये. वाटल्यास तुयासाठी मी कोंबळे, बकरे कापीन, वावरात जाऊन भजन करीन तू सांगशील ते मी करीन पण पावसा तू ये आणि माझ्या वऱ्हाडातल्या शेतकऱ्यांला धो, धो पावसाने न्हाऊ घाल. पावसाची केलेली मनं व्याकुळ करणारी आराधना तिचे हे रूप मात्र वाचकाला विलक्षण अचंबित करते.लेखकांनी आपल्या कविता संग्रहात एकूण पाच भाग केले असून त्या प्रत्येक भागामधे पाण्याच्या मागणी विषयी आपल्याला एक विशेष आर्जव दिसते, तळमळ दिसते.
आणि त्याच तळमळीने ते पावसाला शिव्याशाप देताना म्हणतात,

"लय माजला माजरचोदा
गुरमी तुले चळते रे
गुल्ल्या गेला दरबारीं
राजा मातीत लळते रे
गुदस्ता तुवा तसंच केलं
जागोजागी हरफय वाणी दे
धोंडी धोंडी पानी दे

एकंदरीत यां संग्रहाच्या सर्वच कडव्यातून लेखकांनी वऱ्हाडी भाषेची, शब्दाची लाखोली आपल्या वऱ्हाड प्रांतातल्या वाचकाला, लेखकाला वाहली आहे.आणि त्या त्या परिस्थितीची, त्या त्या वेळी मनात निर्माण होणाऱ्या भावनेची प्रत्यक्ष कल्पना मांडून. वाचकाला अचंबित केले आहे. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं दुखणं आहे त्याचं ठिकाणी नेमकं बोट ठेऊन त्याच्या मनातला हुंकार हा डोळसपणे सर्वांच्या समोर आणला आहे. प्रतिमा, प्रतिकांनी ठसठसून भरलेलं हे काव्य वाचतच राहावं आणि ती भूक सरूच नये असं वाटते. याचं धटणीचं पुढे ते लिहितात,

"तुरीले हयद लेवू दे
पऱ्हाटिले कापूस फुटू दे
मुंग उडीद जोंधय औंदा
रान पाखरायले लुटू दे
धोंडी धोंडी पानी दे "

कविचा प्रत्येक शब्द हा यां वऱ्हाड रुपी महासागरातील मोती वाटतो. प्रत्येकच शब्दाचं एक वेगळं महत्व वाटते. त्यांचे काही शब्द अंतरंग फुलून टाकते. सांगायचं झालं तर त्यांच्या चार ओवीवरच चार आठ पान लिहायला कमी पडतील असं त्यांचं भारदस्त काव्य आहे. लेखकांच्या शब्दाची जादू ते शब्द वाचूनच मनाला शांत करतात. जसे चूलभानोश्या, खाजकुयरी, टाल्लमटूल्लम, सुईकाळी, टोयगोटा,झुंजूमुंजू, ढोमकांद्या, तनफुग्या, गुरमय गुरमय, गुब्बाळीच्या, अळोनग्याले असे अनेक शब्द वऱ्हाडीचं वैभव वाढवतात.
पुढे ते म्हणतात,

"ताथी भाकर दवळीत
ताव्याले गदाल हासू दे
शेकोटीच्या तवावर
गवऱ्या न सासू दे
धोंडी धोंडी पानी दे "

"म्हशीचे थानं आटले
ओचा पोटाले भिळला
अजून तुवा मोर्चा
मातीवर ना कहाळला
धोंडी धोंडी पानी दे "

प्रत्येक कडव्याच्या शेवटी कवीच्या मनातील मागणी ही फक्त वऱ्हाडासाठीचं नाही तर सर्व जगासाठी आहे. तशी तर कवीला सर्व जगाची काळजी वाटते, संपूर्ण मानवजात ही धन धान्याने स्वयंपूर्ण होऊन सोख्याने नांदावे कोणीही उपेक्षित राहू नये हे यातून स्पष्ट होते.त्यांच्या काव्यातून लोकरूढी, लोकश्रद्धा, लोकभ्रम यांचेही हुबेहूब दर्शन होते. कवी हे जीवन प्रत्यक्ष जगले असल्यामुळे त्यांच्या बालपणापासून ते आतापर्यंत त्यांना आलेले अनुभव आणि अस्सल ग्रामीण वातावरणातील चालण्या बोलण्यातुन आलेले हे सर्व शब्द ते सहज वापरून जातात.ते शेवटी त्रासून देवाला सुध्दा हक्काने आणि हट्टाने बोलतात

"देवदेव करून शिनलो
देखारा आता सोळून दे
देवपाखरू लफाळात
घिरट्या मारत उडू दे "

दिंड्या वाऱ्या निघू दे
दिवट्या रातीस पेटू दे
पंढरीच्या पांडुरंगा
वैष्णवाला भेटू दे
धोंडी धोंडी पानी दे "

सर्व भाषेत 'मराठी' गोड आणि मराठीतली अमृततुल्य बोली म्हणजे 'वऱ्हाडी'. जो चाखेल तो तो कायम स्वरूपी टिकेल असं हे वऱ्हाडीचं लेणं संतांच्या लेखणी पासून ते ग्रामीण लेखक, कविपर्यंत सर्वांनी कस्तुरी मृगाप्रमाणे जपत आपल्या उरात ठेवलेली आहे. हा दीर्घ कवीता संग्रह वऱ्हाडीतल्या प्रत्येक व्यक्तीने वाचावा.आणि त्या अनमोल अनुभूतीचा अनुभव घेत आपले जीवन सार्थक करावे. कारण प्रत्येक वऱ्हाडी माणसाला वऱ्हाडीचे अमृत पाजून हा संग्रह जिवंत ठेवेल यात तिळमात्रही शंका नाही.आणि शेवटी इतकी आर्जव केल्यानंतर धोंडीला केलेली मागणी ही पूर्ण होते आणि मग ते हर्षुन म्हणतात,

"ढगात पानी संगयलं
घरात लेकरू भोंगयलं
कापसाचे दाते आमी
सरकीले कोण चघयलं

धोंडी माय नाचे जोऱ्यात
बेंडको दादा आला तोऱ्यात
निंबाचा पाला ओलाचिंब
पानी नदीच्या झिऱ्यात"

शेवटी कां होईना पण ढग भरून येतात, मोर नाचू लागते इजा चमकू लागतात आणि तो धो, धो बरसतो. त्यामुळे अर्धळा नाचायला लागतात, चारी दिशा उजळायला लागतात, नवंतारुण्य बहरायला लागते. आणि म्हणून ते शेवटी लिहितात,

"मातीत कस्तुरी घोयसली
कोंबांनं मुंडके कहाळले
शिदोयचं गांड तोंड वलवले
खंदाळीनं सोनं सावळले
धोंडी धोंडी पानी ये, पानी ये "

कवींचा हा दीर्घ कविता संग्रह फक्त पाण्याच्या विनवणीसाठी आहे.त्यासाठी ते धोंडी काढतात, पावसाला येण्यासाठी हाका मारतात.सुरवातीपासून शेवट पर्यंत वाचकाला खिळून ठेवणारा हा संग्रह म्हणजे आपल्याच अवती भवतीच्या बोलीत आपल्या सोबत बोलणारा, मुक्याला बोलका करणारा, काव्याच्या प्रेमात वाचकाला पाडून त्या प्रवाहाच्या ओघात वाहत वाहत काठावर कसा नेऊन सोडतो माहीतच पडत नाही. धोंडी धोंडी पानी दे बद्धल जितकं बोलावं तितकं कमीच.शब्द थिटे पडावे त्याप्रमाणे.....म्हणून तूर्तास थांबतो.

-"धोंडी धोंडी पानी दे"
साहित्यविश्व प्रकाशन पुणे
कवी - सु. पु.अढाऊकर

समीक्षक -
विशाल मोहोड
तळवेल, चांदुर बाजार
अमरावती,9011578771

Share