कविता :
बळीराजाचा आक्रोष
कपाळावरी घाम घेऊन, राबतो शेतकरी,
तरी उपाशी पोट घेऊन, झोपतो हा शेतकरी...
पेरतो स्वप्ने मुठीने, काळ्या मातीच्या उरी,
आभाळाच्या दारात, याचना करतो हा शेतकरी...
कधी पाऊस रुसतो, कधी पूर येतो घरी,
नशिबाच्या फटकाऱ्यांनी, झिजतो हा शेतकरी...
बियाण्यांच्या किमती वाढे, खत मिळेना वेळेवरी,
हिशेबांच्या चक्रव्यूहात, फसतो हा शेतकरी...
सावकाराच्या वहीमध्ये, आयुष्याची नोंद सारी,
व्याजाच्या त्या आकड्यांनी, दबतो हा शेतकरी...
माल पिकवून बाजारात, भाव मिळेना पदरी,
कष्ट विकूनही रित्या, हाताने परते हा शेतकरी...
लेकरांच्या शिक्षणाची, स्वप्ने ठेवून अंतरी,
स्वतःच्या इच्छा गाडून, जगतो हा शेतकरी...
चुलीवरती भाकरी नाही, डोळ्यांमध्ये चिंता सारी,
पोटच्या त्या लेकरांसाठी, हसतो हा शेतकरी...
नेत्यांच्या भाषणामधुनी, आश्वासनांची बरसात,
प्रत्यक्षात मात्र त्याच्या, वाट्याला अंधारी रात..
जग जगवणाऱ्या हातांना, जगण्याचीच मारामार,
अन्नदात्याच्या वाट्याला, का उपेक्षेचा संसार.?
मातीशी नाते जपताना, रक्त आटवतो हा शेतकरी,
देशाच्या समृद्धीसाठी, दुःख पचवतो हा शेतकरी...
कधीतरी या देशानेही, त्याची वेदना जाणावी,
घामाच्या प्रत्येक थेंबाला, योग्य किंमत मिळावी...
नको दयेची भीक आता, नको खोटा सन्मान,
कष्टकऱ्याच्या हातामध्ये, हवा जगण्याचा मान.!
ज्याच्या घामाच्या थेंबांनी, ताट सजते देशाचे,
त्याच्याच घरात अंधार, हे दुर्दैव कोणाचे.?
जगाच्या भुकेचा प्रश्न जो, स्वतः उपाशीराहून सोडवतो,
त्याच्या वेदनेचा आवाज, कोण ऐकतो? कोण ऐकतो?
कवी - डॉ ज्ञानेश भाऊरावजी वाघमारे
यादगार व्यायाम शाळेजवळ, शास्त्री वॉर्ड,
हिंगणघाट, जि. वर्धा
पिन - ४४२३०१
भ्रमणध्वनी - ९०२१५११९८४

प्रतिसाद (1)
डॉ. ज्ञानेश वाघमारे सरांनी …
डॉ. मीरा पंडित
डॉ. ज्ञानेश वाघमारे सरांनी 'बळीराजाचा आक्रोष' या कवितेतून अन्नदात्याच्या जगण्याचे अत्यंत वास्तवदर्शी आणि हृदयस्पर्शी चित्र उभे केले आहे. कवितेतील प्रत्येक ओळ शेतकऱ्याच्या घामाची, त्यागाची आणि त्याच्या अंतरीच्या वेदनेची तीव्रता थेट काळजापर्यंत पोहोचवते.
"पेरतो स्वप्ने मुठीने, काळ्या मातीच्या उरी" आणि "ज्याच्या घामाच्या थेंबांनी, ताट सजते देशाचे" यांसारख्या ओळींमधून कवीची संवेदनशीलता आणि शब्दप्रभुत्व प्रकर्षाने जाणवते. अत्यंत साध्या, सोप्या पण तितक्याच धारदार शब्दांत बळीराजाची व्यथा मांडताना कवीने केवळ दुःखच मांडले नाही, तर 'नको दयेची भीक आता, हवा जगण्याचा मान' म्हणत शेतकऱ्याचा स्वाभिमानही तितक्याच ताकदीने जागवला आहे. शेवटच्या कडव्यातील "कोण ऐकतो? कोण ऐकतो?" हा प्रश्न वाचकांच्या मनात दीर्घकाळ रेंगाळत राहतो आणि अंतर्मुख करायला लावतो.
या काळजाला भिडणाऱ्या आणि संवेदनशील काव्यरचनेबद्दल कवी डॉ. ज्ञानेश भाऊरावजी वाघमारे यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील साहित्यिक वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!