पुस्तकाचे नाव - अव्यक्ताची वादळे.
जे जे अव्यक्त, अस्पष्ट, अदृश्य आहे त्या सर्वांची जाणीव होते पण अंतर्मनात भावनांची प्रचंड घालमेल चालू असते आणि एका अस्वस्थ क्षणी कागदावर त्या वादळाचे ठसे उमटवतात. हीच अव्यक्ताची वादळे कवितासंग्रहाच्या रूपाने वाचक रसिकांच्या पुढ्यात येतात.
अतीव कोरीवकाम केलेली, विलोभनीय, देखणी, सकस कविता 'अव्यक्ताची वादळे' या संग्रहाच्या निमित्ताने प्रसिद्ध साहित्यिका संजीवनीताई बोकील यांनी साकारली आहे.
ज्यांना सहज शब्दाचे दान पडते अशा शब्दवैभवी, प्रतिभासंपन्न साहित्यिका माननीय संजीवनीताई बोकील यांचे एकूण 29 पुस्तके त्यांच्या विविध अंगी साहित्य प्रवासाची साक्ष देतात. त्यांच्या कवितेचे गारुड तर संबंध साहित्य विश्वात आहे. यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या 'हिरव्या सुक्ताच्या प्रदेशात', 'वडिलांचे मुलीस पत्र', 'काळीज कुप्पी', 'एकांतरेघेवर' यासारख्या कवितासंग्रहाने मिळवलेली रसिक प्रियता त्याची साक्ष देते.
एकूण साठ कवितांचा समावेश असणाऱ्या या काव्यसंग्रहातील प्रत्येक कविता वाचकांच्या हृदयाला स्पर्श करून जाते. संग्रहातील पहिलीच कविता ह्या काव्य अनुभवाच्या वाटेवर जाताना कसं जावं ते शिकवून जाते.
'या बसा या होडीत...' अशी सुरुवात करत पुढे कवयित्री सांगतात,
'डोळे तेवढे बरोबर घ्या
रंगाचे चष्मे नकोच
वणवे दिसत नाहीत त्यातून
कान काढून ठेवा
त्याचा उपयोग नाही
जंगलातले ध्वनी ऐकण्यासाठी....
मी बोटाने दाखवीन
काजव्यांचे शहर,
पाचोळ्या खालचे बहर
पारंब्याची झाडे, लपलेल्या गुहा
वारूळातले कहर
मौनाच्या कातळाखालचे
निरुपाय पाझर
किनारा टाळणाऱ्या लहरी....'
ही कविता खरं तर काव्य वाचण्याची आपली नजर बदलून टाकते. निर्विकार बालमनाच्या अंत:चक्षुंनी बघायची असते कविता आणि व्यवहारी जगाचे पापुद्रे सारून अनुभवावे लागते कवितेचे विश्व. ही जाणिव जगाला करून देणारे मूल्यबळ शिकवणारा हा उच्च कोटीचा कवितासंग्रह आहे.
एका कवितेत तर त्या असही सांगतात
'झाडाने जितके सहज
सोडून द्यावे पाण्यावर
जाळीदार पान
तशी सोडून द्यावी कविता
वाचत्या डोळ्यांच्या
जिवंत झऱ्यात....'
किती सहज, सोपं पण तितकच गुढ आणि अवघड तत्त्वज्ञान कवयित्री सांगून जातात!
कविता कशी असावी? कशी वाचावी? कशी पहावी? याचे सुफळज्ञान कवयित्री ह्या संग्रहात देऊन जातात.
या काव्य संग्रहात साहित्य वाचनाची जाण देणाऱ्या कवितेसोबतच समाज भान राखणाऱ्या, जगण्याची शिकवण देणाऱ्या आणि निसर्गाशी आपले नाते सांगणाऱ्या ही कविता आहेत.
'मोगरा', 'सांग ना रे', 'पावलापुरता उजेड', 'नाते', 'समज', 'बरे झाले' यासारख्या कविता अंतर्मनाशी गुढ संवाद साधत जगण्याचे भान देतात.
तर 'एक तरी भेट', 'निर्वाणधुन', यासारख्या कविता विश्वकर्त्याला काहीतरी मागणे मागताना दिसतात. 'अर्जन विसर्जन' ही कविता तर माणसाला माणूस बनण्याच्या प्रक्रियेचे विश्वकर्त्याला पसायदान मागताना दिसते
'वसो माझ्यामध्ये
असे गुजभर रामत्व
की निष्ठांन्नापरिस लागो
जीभेला उष्ट्या बोराची
भाबडी चव अपूर्व....'
माणसातील स्वार्थ, न्यूनगंड गळून जावा आणि परोपकार, प्रेम निर्माण व्हावे आणि शेवटच्या क्षणी -
'पंचमहाभूतातच
उरावा फक्त
एक अर्जित मानवी सुगंध
क्षणभर धुम्रवलयात...'
असे आर्त मागणे ही कविता मागतांना चिंतनाची परमोच्च पातळी गाठत असल्याचे जाणवते.
ही कविता प्रतिमा लावण्याने ओतप्रोत असूनही परिवर्तनाचा अभ्युदय करणारी व मौलिक समाजभान जागे करणारी आहे. या कवितांमध्ये एक गुढ संवाद असला तरीही प्रांजळ अनुभव संपन्नता आणि जीवनानुभूतीचे दर्शन पदोपदी या काव्यसंग्रहात घडताना दिसते.
निसर्ग हा कवयित्रीचा प्राण सखा असून त्याच्या हातात हात घालून काव्य प्रवास करत असताना स्वप्नाळू मनाचा आविष्कार क्वचितही आढळत नाही, उलट निसर्ग प्रतिमा मधून जीवन जाणिवेचे चिंतन सूत्र अभिव्यक्त होताना दिसते. 'आकाश दिवा', 'जुन्या गावात', 'चित्रकार' यासारख्या अनेक कविता 'निसर्ग' साकारताना दिसतात. असे असले तरी प्रामाणिकतेचा सौहार्द लपेटून ह्या कविता संवेदनशीलतेच्या लावण्याने उजळून येतात. या कविता फक्त शब्दांची आरास न माडंता, फक्त भावनांचे विवेचन न करता वाङमयीन कौल सांभाळत कवितेतील देखणेपण प्रतिबिंबित करतात.
या कवितांमध्ये संसाराकडून परमार्थाकडे जाणारा प्रवास सुद्धा कधी कधी द्रुगोचर झालेला दिसतो तर भक्ती, संघर्ष, जिद्द आणि आत्मपरीक्षणाची नोंद सुद्धा करायला हा कवितासंग्रह विसरत नाही.
साखरेच्या चाचणीत मुरवलेला मोरआवळा मुरत जातो तसतसा तो अधिक चवदार होतो आणि सद्गुण सुद्धा वाढत जातात तसाच हा काव्यसंग्रह. सुरुवातीपासून संयम शिकवत, प्रेरणा देत, आतल्या आत खोल आवर्तन निर्माण करत, संभ्रमाला दूर सारत शेवटी निर्वाणाकडे वाटचाल करतो.
'हरवल्या मी पणापाशी सरलेला चांदव चकवा
कळ्याकरंद फांदीवर एकटेपणाचा झुलवा
मावळत्या अवरोहाशी क्षणघुंगुर झाले गोळा
नसण्याच्या काठावरती असण्याचा चोळामोळा'...
जीवनाचे एक सम्यक तत्त्वज्ञान मांडत असतानाच त्यातील बारकावे आणि विविध पैलू उलगडत सम्यक विचारांचे दर्शन या कविता घडवितात. निराशेला नकार देत आशावाद पेरणाऱ्या या लक्षार्थ आणि गर्भार्थ दोन्हीचे वहन करणारा अतिशय सुदृढ आणि सक्षम असा हा कविता संग्रह प्रत्येकाच्या संग्रही असावा.
पुस्तकाचे नाव - अव्यक्ताची वादळे
लेखिका - मा. संजीवनी ताई बोकील
प्रकाशक - अनुबंध प्रकाशन पुणे
मूल्य - ३००/-

प्रतिसाद (1)
धन्यवाद
Manjusha sanja…
धन्यवाद