कसं चाललंय? तर बरं !!
वृत्त_ 24 मात्रवृत्त ( पदाकुलक लय)
संदीप, १७/११/२०२३
कसं चाललं ते विचारलं कुणी, तर म्हणतो बरं
बाकी माझं मलाच माहित, किती बोलतो खरं!
जगापुढती चेहरा हा असा, नेहमी हसरा दिसे
एकट्यात उरलेलं दुःख, सांग कुणाला पुरं!
जरी आज ही रात्र काळी अशी, दाटुनी राहिली
उद्याच्या नभातूनी तेज नवं, नक्कीच झरं!
दिसतात सहजच देहावरी, घाव जे वरवरी
आत खोल रुतलेलं शल्य ते, कुठं लवकर भरं!
सुखात सोबत चालायला, सारेच येतात पुढे
संकटात मग आपुल्यांचंही, वागणं वेगळंच ठरं!
धावपळीच्या या जगात असा, हरवला 'संदीप*
स्वतःसाठी जगणं इथे, कुणाच्या वाटेला सरं!
