जिंदगाणी
राबराबुनी वावरी उभा संसार थाटला
विश्वाचा अन्नदाता त्याचा सदरा फाटला
उसवल्या वाकळी धागा सुईत भेटला
दुःख लपवुनी उरी दाणादाणा वाटला
चिखलात पाय त्याचे कुणा दिसले नाय
होता काळजाले घाव कसा दिसेल पाय
काटा रुतला पायात त्याने चोरून काढला
दुःख लपवुनी उरी दाणादाणा वाटला
सजवूनी सपान पीक आणली जोमात
नाही दिसली कुणा अश्रू ढाळीले घामात
अतिवृष्टीच्या ओघानं कंठ पिकात दाटला
दुःख लपवुनी उरी दाणादाणा वाटला
उरलेलं आलं हाती हमीभाव ठरला
कर्जातली जिंदगाणी बारदानाच उरला
जीव ठेवुनी गहाण चालवितो खटला
दुःख लपवुनी उरी दाणादाणा वाटला
बळीराजा सावध हो ऐक पुढल्या हाका
वार करुनी लेखणीने टाळ पुढला धोका
राज्य येईल बळीचे घेऊ नको गळ्या फास
लढा लढूनी जिंकू,जिंकू अखेरचा श्वास
- रंगनाथ तालवटकर
चिखली (कोरा)
त.समुद्रपुर जि.वर्धा
7387439312
