अर्धा जोडीदार
सकाळचे सहा वाजले होते... थंडगार हवा... कुडकुडणारी थंडी.... सगळे मजूर उसाच्या मोळया गाडीवर लादत होते... भराभर गाडी भरण्याची घाई वृद्ध -तरुण स्त्री-पुरुष असा काही भेदा-भेद नाही... फक्त काम महत्त्वाचं...
खांद्यावरची मोळी कुशबाने शिताफीने डोक्यावर घेतली आणि गाडीच्या दिशेने झपाझप चालू लागला त्याच्या माग त्याची बायको रत्ना पण डोक्यावर मोळी घेऊन चालत होती, तिच्या पाठीवरची दोन महिन्याची चिमुकली सीता चुळबुळ करत होती गाडी जवळ जाता-जाता रत्ना कुशाबाच्या शर्टच्या खोसाटाला बघून संसाराच्या फाटलेला स्वप्नाला डोळ्यात घेऊन चालत होती. अलगद डोळ्याची काठ ओली झाली रडणार कसं तीन डोळ्यातलं पाणी डोळ्यातच जिरवलं ...पाचरटातुन पाय काढत कशीबशी गाडी वर चढली मोळी टाकली तेवढ्यातच झोळीतली चिमुकली सीता मोठ्याने रडू लागली काही कळायच्या आत तिने बाळाला गोंजारत- गोंजारत दोरखंडाच्या सहा-यान गाडीच्या खाली उतरली एवढ्या कुडकुडणाऱ्या थंडीत पार घशाला कोरड पडली होती पोटात भुकेची आग भडकली होती तरीपण चिमुकल्या सीताला झाडाच्या आडोशाला जाऊन पाजू लागली ...कुशाबा घामान चिंब झालेला होता गमजान तोंड पुसत पाठमो-या रत्नाला पाहात रत्ना जवळ जाऊन बसला.
एक गाडी भरली होती दुसऱ्या गाडीची वाट बघत सारे मजुर आपापले काम करित होती काही झाडाच्या सावलीला बसली होती. रत्नाच्या मांडीवरची सीता दूध पिऊन आता झोपली... रत्ना तिच्या चेहऱ्यावर आपला उसाच्या पात्याने कापलेला हात फिरवू लागली चरबट हाताच्या स्पर्शान सीता आपले चिमुकले डोळे उघडून टुकूटुकू पहात होती ....रत्ना सार काही विसरली... छोट्या-छोट्या गालावरचं हसू ....छोट्या-छोट्या हाताच बळ जस तिच्या अंगात उतरत होतं ....तिची तहान भूक उडाली होती पण कुशाबाला भूक लागली होती... टोपल्या खालची भाकरीचे गाठोड त्याने रागारागात काढलं आणि रत्ना कड रागातच बघत स्वतः भाकरीचे गाठोडे काढून चटणीसोबत भाकरी खाऊ लागला.... गाडी आली तर भाकरी खायला जमणार नाही म्हणून त्यानं भांड्यातला तांब्या भरून घेतला गपागपा भाकरी खाऊ लागला रत्ना आपल्या सीताच्या चेहऱ्याला निरखून बघत होती... तिच कुशाबाकड लक्षच नव्हत...कुशाबान भाकरी खाल्ली ...रत्नाकडे रागातच बघत म्हणाला
"रत्ने भाकर बिकर खायची नाय का ?"
" का उपाशीच राहायचं ...."
"तुझ्या त्या कारटीकड बघत काय तुझं पोट भरणार हाय व्हय. "
रत्ना कुशाबाच्या आवाजान भानावर आली... सीताला झाडाच्या फांदीला बांधलेल्या झोक्यात टाकलं आणि झोका देत- देत खाली बसून मीठाच्या पाण्यामध्ये भाकर चुरली... पोटभरून खाल्लं ..तशी सगळ्या मजुरांची धावपळ सुरू झाली..
मुकादमान सा-या मजुराला बोलवु लागला." गाडी आली ...रे ...चला लवकर ....आर ए कुशाबा कुठ गेला.....रत्ना चल कि..."
"ऐ चला रे... कुठ गेलात.. "
भराभरा सगळे मजुर जमा झाले ...गाडी लांबून धुरळा करता येत होती... गाडी थांबली तसे सगळे मजूर उसाच्या रानात निघाली. रत्नाकड..आजीमाय येऊन बसली रत्नान तिच्या टोपलीतली भाकर आजीमाय समोर मांडली.
" खा ..आजी माय दोन चार घास... सीता झोक्यात हाय लक्ष ठीव बरं ..."
आजीमाय " व्हय " म्हणाली आणि भाकरीच्या धुडक्यातच चटणीसोबत भाकर खाऊ लागली ...रत्ना कुशाबाला शोधत- शोधत चुंबळीच धुडक घेऊन साडीच्या निऱ्या खोचून आणि पदर कंबरेला खोचून सगळीकडे नजर फिरवली पण कुशाबा कुठे दिसला नाही.. तिने रखमा आत्याला विचारलं "ह्यांना कुठ बघितलं का हो "
रखमाआत्या म्हणाली "नाय ग. "
रत्न म्हणाली " व्हय रखमा आत्या... हे गाडी भरायची सोडून गेले तर नाही आड्यावर."
रखमा आत्या चुंबळीच धुडक फटकीत म्हणाली "काय माहित बया ...तुझ्या नवऱ्याचं... काय सांगु...कधी काय करल सांगता येत नाही. "
रत्नाचा गळा कोरडा पडला... पापड्या आलेल्या ओठांवर जीभ फिरवत तिन अावंढा गिळला ...मनात विचार करत पुटपुटली 'नाही नाही ते असं करणार नाही ...कालच त्यांनी वचन दिलं होतं ते कधीच पिणार नाही सीताची शपथ घेतली होती...'
" नाही नाही ते असं करणार नाही" म्हणतच होती की कुशाबा हालत - डुलत रत्नाच्या दिशेने येत होता ..रत्ना कुशाबा कड भराभर चालत निघाली ..कुशाबा तिच्याकडे बघून चालत होता... ती मोठ्याने ओरडत बोलली "असं का केलं पोरीची शपथ घेतली होती ना आता तरी सोडायची होती दारू."
कुशाबाला रत्नाच्या बोलण्यान काहीच फरक पडला नाही. . तो तसाच चालत होता... रत्ना आणखी रडवलेला आवाज चढवत बोलत होती" तुम्ही हे ठीक नाही केलं माझ्या पोरीला काही झालं तर काय करायचं खोटी शपथ कशाला घ्यायची ..." म्हणून ओक्सा-बोक्शी रडू लागली तिच्या रडण्याचा आवाज ऐकून सगळे मजूर जमा झाले. हा रोजचाच तमाशा सगळ्यांसाठी होता काहीजण मुरक्या-मुरक्या हासत होते. काही जण म्हणाले "चला रे ह्यो ह्यांचा रोजचाच तमाशा म्हणून चालले होते." रत्नासाठी हे रोजचंच होतं पण आज कुशाबान मोडलेली शपथ तिला बोचत होती..आईच काळीज तरफडत होते... ती स्वतःचाच सनिताप करत ...तोंडात मारून घेत होती रखमा आत्यान मधेच येऊन तिला थांबवलं..पण रत्नाच्या अंगातलं सगळ बळच गेल्यासारखं झाल ती धाय मोकलून रडू लागली काळ्या मातीच्या उघड्या ढेकळात तिन तिच अंग सोडून दिलं ..तसच मोठ्या ढेकळातल्या नोकदार दगडावर तिच डोकं आपटलं बघता-बघता तीचं डोकं रक्तबंबाळ झाल. ऐवढ्यात कुशाबाला काही कळालच नाही ...रत्नाचा रक्ताळलेला चेहरा पाहून त्याने शेजारच्या विहिरीकडे धाव घेतली...मद्यधुंद कुशाबा रत्नाला आधार देयचा सोडुन तो नुसता पळत होता... हातातला कोयता त्यान घट्ट पकडला होता... त्याला काही कळायच्या आत शेजारच्या कोरड्या विहीरीत तो पडला... हातातला कोयता हातातच होता...पण त्यान आपल्याच हातावर घाव केला होता...कुशाबा रक्ताच्या थारोळ्यात पडला... विहीरीत सारे रक्त -रक्त पसरले होते... तो बेशुध्द पडला... सगळे मजुर त्याच्याकडे पळाले... रकमा आत्या रत्नाला उठवत बोलली. "रत्ने कुशाबा हिरीत पडला ग... " हे ऐकताच रत्ना भानावर आली... आपल्या डोक्याला लागलेल्या मारालाही विसरली...विहीरीच्या दिशेने सगळा जीव एकवटून पळत गेली... सगळे लोक विहीरीच्या बाजुला जमा झालेले होते... रघु मुकादम तोंडात तंबाखु चघळत... विहीरीतल्या कुशुबाला बाहेर काढण्यासाठी सांगत होता... रत्ना कुशाबाच्या रक्ताळलेल्या चेह-याकडे पहात होती... एक नजर तिची रघु मुकादमा कडे गेली... तो रत्नाकडच बघुन आपल्या मिशीवर ताव मारत तो हसला... रत्नाच्या डोक्याला लागलेल्या मारामुळे जेवढा त्रास झाला होता. त्याच्यापेक्षा जास्त त्याच्या हासण्यान मेंदु हालला होता... अंगा-अंगात मुंग्या आल्या होत्या... तिन तिची नजर कुशाबाच्या बेशुध्द आणि रक्तबंभाळ शरिरावर टाकळी.... तिला रडु येत नव्हत.. ती भिलेली होती.....
मुकादमान आणि बाकीच्या मजुरांन कुशाबाला दवाखाण्यात घेवुन जाती तैयारी केली... तेवढ्यात आजीमाय चिंमुकल्या सीताला घेऊन आली... सीता आणखी झोपेतच होती... रत्नान रक्तान भरलेला हात पदराला पुसला... सीताला आपल्या जवळ घेतल... तसच डोळ्यातल पानी टपा-टपा सीताच्या चेह-यावर पडल... सीता तशीच निपचित पल्ली होती... रत्नान तीच्याइवल्याशा ओठा जवळ आलेला पांढरा फेस पुसला... तीच शरीर थंड पडलेल होत... कुशाबाला दवाखान्यात नेयची तयारी झाली होती....रत्ना गाडीत बसली... दवाखान्यात पोचली तरी सीताची काही हालचाल नव्हती... कुशाबाला ऑपरेशन रुम मध्ये नेल... कुशाबाच्या उपचाराला सुरवात झाली... कुशाबाचा एक हात कायमचाच गेला होता... पन कुशाबा सुखरुप होता याच रत्नाला समाधान होत... की निवांत झाली... तिच्या डोक्याला ही पट्टी केली गेली... तरीपण सीता उठत नव्हती... आता रत्नाला मात्र भीती वाटत होती... तीच काळीज धडधडत होत... डॉक्टर कड धाव घेतली.... तीला समजल की... सीता आता या जगात नाही... दोन महिन्याची सीता आपल्याला सोडुन गेली... हे ऐकुन तिला कळालेच माही... की स्तब्ध उभा राहिली... फक्त श्वास येत जात होता... ती एखाद्या मुर्ती सारखी डॉक्टरकडे बघत उभा होती... कुशाबाला ही कळाले होते.... तो ही... कसा-बसा रत्ना पर्यंत पोहचला होता... एक वेळ तो रत्ना कडे पहात होता... एक वेळ सीता कडे... काय करावे... हे कळतच नव्हत... तो तसाच टकमक पहात होता... त्याने आवाज दिला... "रत्ने.... रत्ने आपली सीता.... "
"काय झाल...हे सार.... "
म्हणुन रडु लागला... सीता तशी भानावर आली... तिन कुशाबा कडे पाहिल... नंतर.... सीताकड...
कुशाबा पुन्हा म्हणाला "रत्ने हे सार दारु पाई झाल ...मला माफ कर... "
रत्ना कुशाबाला एकही शब्द बोलली नाही... सीताच्या निष्प्राण शरिराला जवळ घेतल... ती खाली बसली सीताला मांडीवर घेतल...चेह-यावर हात फिरवला .... डोळ्यातल पानी टप-टप तिच्या चेह-यावर पडले... डोळ्यातील पाण्यानीच जस ती अखेरची आंघोळ घालत होती.... अन् पहात राहिली एकटक तिच्या गोंडस बाहुलीला..
डॉ. राजश्री तावरे (मस्के)
