नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
मढे मोजण्याला
लपेटून फासामधी कायद्याला
ससे वाकुल्या दावती पारध्याला
नको पाडसा आज कळपास सोडू
चुल्ह़ा तप्त टपला तुला रांधण्याला
जवानीत होता उतावीळ श्रावण
अता फ़ागही ना विचारीत त्याला
तुझी आत्मग्लानी वृथा-व्यर्थ आहे
कुणी येत नाही मढे मोजण्याला
करा की नका काम कोणी पुसेना
बिले चोख ठेवा; लुटा आंधळ्याला
इथे देवळाच्या चिखल भोवताली
स्मशाने चकाचक ’अभय’ तालुक्याला
- गंगाधर मुटे "अभय"
==^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=
प्रतिक्रिया
स्मशाने चकाचक
इथे देवळाच्या चिखल भोवताली
स्मशाने चकाचक ’अभय’ तालुक्याला
हा शेर कळत नाहीये किंवा उलगडत नाहीये म्हणून हा शेर चुकला आहे, असे काहिंनी मत व्यक्त केले आहे. त्या निमित्ताने या शेराविषयी थोडासा उहापोह. (खरं तर कवीला आपल्या काव्याचा उलगडा करण्याची वेळ येऊच नये.)
कच्च्या मालाचे शोषण झाल्याने ओसाड पडलेला भूप्रदेश/प्रभाग म्हणजे ’भारत’ आणि ’भारताचे’ शोषण करून विकसित झालेला भूप्रदेश/प्रभाग म्हणजे ’इंडिया’. भारत आणि इंडिया यांच्यातील वाढत्या दरीवर भाष्य करणारा हा शेर आहे.
शेरात ’इथे’ हा शब्द आल्याने वाचकाच्या मनात ’इथे’ म्हणजे नेमके कुठे? व ’तिथे’ म्हणजे नेमके कुठे? हा आणि तसा तुलनात्मक विचार उत्पन्न व्हायलाच हवा. ’इथे’ चा उलगडा शेरात नसला तरी ’तिथे’ म्हणजे तालुक्याला (तालुका पातळीच्या शहरात) हे शेरात अधोरेखीत झालेले आहेच. त्यावरून ’इथे’ म्हणजे नेमके कुठे? हा प्रश्न उलगडायला मदत होते. मग तालुका पातळीच्या शहराची तुलना अन्य कोणत्या प्रभागाशी झालेली आहे एवढेच शोधणे बाकी उरते. देवळाच्या भोवताली चिखल आहे म्हणजे तो भाग अविकसित आहे, एवढा अविकसित आहे की; नागरी वस्ती आणि लोकांची मकाने जाऊ द्या, साक्षात देवाचे देऊळही चिखलाने वेढलेले आहे, एवढे लक्षात आले तर त्याचे उत्तरही अगदी सोपे आणि थेट मिळते.
भारत ओसाड व भकास असल्याने देवळेसुद्धा भकास झाली आहेत. मंदीरात जाणारा रस्ताही चिखलाने व्यापला आहे; मात्र इंडियातील तालुक्यासारख्या शहरातील स्मशानेसुद्धा चकाचक आहेत आणि हे आपोआप घडलेले नाही तर तालुक्यासारख्या शहरांना आणि शहरातील स्मशानघाटांना सुद्धा शासकिय "अभय" आहे, अभय आहे म्हणून अनुदान आहे, अनुदान आहे म्हणून निधी आहे......
"इंडिया"ला शासकीय "अभय" आहे म्हणून "तिथे" स्मशाने चकाचक आहेत. "भारत" बेवारस आहे म्हणून "इथे" सारं काही बकाल आहे.
असा अर्थ वरील शेरातून काढता आला तरच शेर कळेल. या अर्थाव्यतिरिक्त दुसरा कुठलाच अर्थ शेरातून स्पष्टपणे निघत नसल्याने, परिणामत: शेराचा अर्थच न लागल्याने शेरच चुकला आहे, असे कुणाला वाटले तर ती चूक म्हणता येणार नाही.
शेतकरी तितुका एक एक!
खुप सुन्दर
kavigore