नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
तिसऱ्या शेतकरी - स्त्री कवी संमेलनाचा वृतांत
युगात्मा शरद जोशी विद्यानगरी, भूमिकन्या सीताकुटी, रावेरी ता. राळेगाव जिल्हा यवतमाळ येथील नियोजित असलेले सातवे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन कोरोणाच्या सार्वत्रिक वाढलेल्या प्रादुर्भावामुळे कोरोणा अरिष्ट पर्यायी ऑनलाईन वेबमिलन सप्ताहाच्या माध्यमातून यशस्वीरीत्या नुकतेच पार पडले आणि याचे सर्व श्रेय आहे कार्याध्यक्ष श्री. गंगाधरजी मुटे सर यांना जाते. त्यांचे अथक परिश्रम व मेहनतीचे आणि त्यांच्या शिस्तबद्ध नियोजनाचे फलित म्हणजेच यशस्वी आणि उत्तमरीत्या पार पडलेला हा ऑनलाईन वेबमिलन सप्ताह सोहळा होय. दिनांक 20 मार्च 2021 रोजी सुरू झालेल्या या वेबमिलन सप्ताहाचा समारोप दिनांक 26 मार्च 2021 रोजी झाला. सातव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्या या ऑनलाईन वेबमिलन सप्ताहाच्या सहाव्या चरणामध्ये म्हणजेच गुरुवार, दि. 25 मार्च 2021 रोजी तिसऱ्या शेतकरी कवी संमेलनामध्ये शेती मातीशी व स्त्री जातीशी निगडित अप्रतिम कवितांनी रसिक श्रोत्यांची दाद मिळविली.
या कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी पालघर येथील सुप्रसिद्ध कवयित्री सौ.अनुराधाताई धामोडे या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून माननीय गंगाधरजी मुटे सर उपस्थित होते. या कवी संमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक श्री. अनिकेत जयंतराव देशमुख, गोपालखेड, जिल्हा अकोला यांनी केले. झूम मीटिंग व फेसबुक लाइव्ह या ऑनलाईन माध्यमातून हे कवी संमेलन पार पडले.
नमो मायभाषा! जयोस्तुss मराठी!
तुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी
जडो ध्यास हा छंद व्यासंग बोली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
विवेक मुटे, तेजू कोपरकर व स्वरा पोहाणे या बालकलाकारांनी आपल्या गोड गळ्यातून सादर केलेल्या या मराठी भाषेच्या स्तवनाने या शेतकरी कवी संमेलनाच्या तिसऱ्या सत्राला सुरुवात झाली. आपल्या सुमधुर आवाजामध्ये त्यांनी हे अप्रतिम गीत सादर केले.
आता तयार व्हावे लढण्यास लेखणीने, रक्षण अबोलतेचे करण्यास लेखणीने
न्यावा शिवारराणी जागर सरस्वतीचा, इडापिडा अव्यक्ती पुरण्यास लेखणीने
अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनात पंचप्राण फुंकणाऱ्या वरील ओळींनी सूत्रसंचालक श्री.अनिकेत देशमुख यांनी या कविसंमेलनाचा आगाज केला. सर्व उपस्थित मान्यवर व निमंत्रित कवींचे शब्दसुमनांनी स्वागत करून त्यांनी या कवीसंमेलनाची सुरुवात केली. अमरावती येथील सुप्रसिद्ध वऱ्हाडी कवी श्री.खुशाल गुल्हाने यांनी आपली गारपीट ही कविता सादर केली.
"अवकाण्या पाण्यासंग गारपीटही आलं, अंवदातं ईचिबिहिण भलकसंच झालं" या त्यांच्या विनोदी कवितेतून त्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनामधील विदारक स्थितीचे आणि प्रशासनाच्या विचित्र कारभाराचे वर्णन केले. त्यांच्या कवितेने या कवीसंमेलनाची दमदार सुरुवात झाली. त्यानंतर चांदवड नाशिक येथील सुप्रसिद्ध कवी रावसाहेब जाधव यांनी आपल्या "माणसासाठी कणसात दाना" या कवितेने विचार करण्यास भाग पाडले. "बुरखा ओढुनी निजती नगरे, माणुसकीने टाकल्या माना, माती मात्र जपते अजून, माणसासाठी कणसात दाना" या भावगर्भ ओळींनी त्यांनी मातीची आणि शेतीची व्यथा आपल्या शब्दात मांडली.
त्यानंतर परभणी येथील कवयित्री विद्याताई लटपटे यांनी "लगीन" ही कविता सादर केली. व त्यातून आत्महत्या केलेल्या शेतकरी बापाच्या मुलीची व्यथा मांडली व आत्महत्या हा संकटांवरचा पर्याय नाही हे आपल्या कवितेतून सांगितले. त्यानंतर परळी बीड येथील कवी लक्ष्मण लाड यांनी आपल्या "कोरोणातही दिला हात" या कवितेने सध्याच्या वास्तव परिस्थितीचे चित्रण केले. धान्य दूध भाजीपाला घरोघरी पुरविला. ''केली ना जीवाची फिकीर नमन या हिमतीला'' या ओळीतून त्यांनी हे चित्र रेखाटले. त्यानंतर परळी बीड येथील कवी केशव कुकडे मुक्तविहारी यांनी सुद्धा हाच धागा पुढे नेत "कोणी पेरलेत हे विषाणू" ही मार्मिक रचना सादर केली व ओल्या कोरड्या दुष्काळातही खंबीर राहून जगाला पोसण्याची ताकद फक्त शेतकऱ्यातच असते हे त्यांनी आपल्या कवितेतून मांडले.
त्यानंतर परळी बीड येथील कवी दिवाकर जोशी साळेगावकर यांनी गदिमांच्या सैनिक हो तुमच्यासाठी या गीतावर आधारित "कृषकहो तुमच्यासाठी" हे विडंबन गीत सादर केले. 'खादीधारी महोदय यांचा घास रोज अडतो ओठी, कृषकहो तुमच्यासाठी, श्रमिक हो तुमच्यासाठी' अशा प्रकारे त्यांनी फटकारे मारले. बीड येथील कवी सिद्धेश्वर इंगोले यांनी आपल्या "बाप" या कवितेतून "बाप मातीशी बोलतो, माये रुसू नको अशी थांब ढगांशी भांडतो, कुठे दडला आकाशी" या शेती मातीशी नातं सांगणाऱ्या कवितेतून बापाची तळमळ मांडली. त्यानंतर घाटनांदुर अंबाजोगाई जिल्हा बीड येथील कवी दत्ता वालेकर यांनी आपल्या "बळीराजा" या 'काळ्या मातीत राबतो साऱ्या जगाचा पोशिंदा, राबराब राबूनिया काढी मातीचा कशिंदा' या कवितेतून बळीराजाचं जगणं मांडलं. परळी येथील कवी बालाजी कांबळे यांनी आपल्या "शेतकरी बाप" या कवितेतून साऱ्या जगाचा पोशिंदा कसा रात्रंदिवस काबाडकष्ट करत असतो हे आपल्या गोड आवाजातून मांडले. 'भेगाळल्या पायांमध्ये दिसतो जगाचा नकाशा, धूळ पेरणी करून फुलवितो शिवार'' या त्यांच्या ओळी वास्तव रेखाटणार्या होत्या.
सुप्रसिद्ध कवी संजय आघाव, बीड यांनी आपल्या "बाप" या कवितेने धीरगंभीर वातावरण तयार केले. ''उसा इतकाच गोड बाप, रसा सारखा दाता झाला, जगाला देऊन गोडी, स्वतः मात्र चोथा झाला" बापाच्या डोळ्यातील ओलं चैतन्य टिपणारी त्यांची रचना काळजात घर करून गेली. त्यानंतर राजेश जौंजाळ हिंगणघाट यांनी "प्रश्न" ही कविता सादर करून "नवजात पाखरांचे जळत शव होते, स्पर्शून त्या धुराला रडत नभ होते" या ओळीतून भ्रूणहत्या प्रश्नावर बोट ठेवले. रत्नाकर वानखडे, अमरावती यांनी महागाईवर भाष्य करणारी आपली "महागाईचा फुगा" ही रचना सादर केली.
अशा प्रकारे सर्व उपस्थित निमंत्रित कवींच्या कवितांनंतर सलग पावणेदोन तास या शेतकरी कविसंमेलनाचे आपल्या खुमासदार शैलीत बहारदार सूत्रसंचालन व निवेदन करणारे प्रसिद्ध कवी पाऊलखुणाकार या नावाने सुपरिचित असलेले गोपालखेड, जिल्हा अकोला येथील श्री. अनिकेत जयंतराव देशमुख यांना कविता सादर करण्यासाठी प्रमुख अतिथी गंगाधरजी मुटे सर यांनी निमंत्रित केले. त्यांनी मातृत्वाची महती सांगणारी आपली अष्टाक्षरीतील रचना "माय" ही कविता सादर केली.
''माय कस्तुरीचा गंध, जीवनाचे या सार की, बाप हिमालय माझा, माय सह्याद्री सारखी'' या त्यांच्या गोड आवाजातील ओळी रसिकांच्या काळजात घर करून गेल्या.
काही तांत्रिक अडचणीमुळे या कवीसंमेलनाच्या नियोजित अध्यक्षा अनुराधाताई धामोडे पालघर ह्या शेवटी उपस्थित नसल्यामुळे अध्यक्षीय समारोप अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य चळवळीचे कार्याध्यक्ष माननीय गंगाधरजी मुटे सर सुप्रसिद्ध गझलकार व कवी यांच्या काव्यरचनेने झाला. त्यांनी आपली सडेतोड रचना आपल्या खास आवेशपूर्ण शैलीमध्ये सादर केली.
"बायल्यावानी कायले मरतं? मर्दावाणी मर, सरणावरून ऊठ आणि मशाल हाती धर" शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये नवचैतन्य फुलवणारी व त्यांना लढण्याचा नवा संदेश देणारी आपली सडेतोड रचना मुटे सरांनी सादर केली. आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये त्यांनी या कवीसंमेलनामध्ये सहभागी झालेल्या सर्व कवींचे अभिनंदन केले तसेच सर्वांना शेती मातीशी निगडित प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या लिखाणासाठी शुभेच्छाही दिल्या. अध्यक्षांच्या परवानगीने झूम मीटिंग व फेसबुक लाइव्ह या ऑनलाईन माध्यमातून पार पडलेल्या या कवी संमेलनाचा समारोप झाला.
- श्री.अनिकेत जयंतराव देशमुख
अकोला
======
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.